पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त वर्षभर चालणाऱ्या स्मरणोत्सवाचे उद्घाटन करताना पंतप्रधानांनी केलेले संबोधन

Posted On: 07 NOV 2025 2:01PM by PIB Mumbai

 

वंदे मातरम!

वंदे मातरम!

वंदे मातरम!

वंदे मातरम, हे  शब्द एक मंत्र आहेत,एक उर्जा आहे,एक स्वप्न आहे,एक संकल्प आहे.वंदे मातरम,हे  शब्द भारत मातेची साधना आहेत,भारत मातेची आराधना आहे. वंदे मातरम हे  शब्द आपल्याला इतिहासात घेऊन जातात.आपल्या आत्मविश्वासाला,आपल्या वर्तमानाला आत्मविश्वासाचे बळ देतात  आणि आपल्या भविष्याला नवी उमेद देतात की  असा कोणताही संकल्प नाही, असा कोणताही संकल्प नाही जो साध्य होऊ शकत नाही.असे कोणतेही लक्ष्य नाही जे आपण भारतवासीय साध्य करू शकत नाही.

मित्रहो,

वंदे मातरमच्या  सामुहिक गायनाचा हा अद्भुत अनुभव खरोखरच अवर्णनीय आहे.इतक्या आवाजांमध्ये एक लय,एक स्वर,एक भाव,एक स्फुरण, एक ओघ,असा मेळ,असा तरंग, या उर्जेने मन उचंबळून आले.भावनेने भारलेल्या अशा या वातावरणात मी आता आपल्या भावना व्यक्त करत आहे. मंचावर उपस्थित मंत्रिमंडळातले  माझे सहकारी गजेंद्र सिंह शेखावत,दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना, मुख्यमंत्री रेखा गुप्ता जी,इतर मान्यवर,बंधू आणि भगिनींनो,

आज आपल्यासमवेत देशाच्या सर्व कानाकोपऱ्यातून लाखो लोक सहभागी झाले आहेत त्या सर्वाना मी  वंदे मातरम् ने शुभेच्छा देतो.आज 7 नोव्हेंबर हा दिवस खूप ऐतिहासिक आहे,आज आपण वंदेमातरम् च्या 150 वर्षांचा महाउत्सव साजरा करत आहोत. हा पुण्य प्रसंग आपल्याला नवी प्रेरणा देईल,कोट्यवधी देशवासियांना नवी उर्जा देईल.या दिवसाची  इतिहासात नोंद ठेवण्यासाठी  आज वंदेमातरम् वर एक विशेष नाणे आणि टपाल तिकीटही जारी करण्यात आले आहे. वंदेमातरम् या मंत्रासाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या देशाच्या लक्षावधी थोर पुरुषांना, भारतमातेच्या लेकरांना  मी भक्तिभावाने नमन करतो आणि देशवासियांना याप्रसंगी शुभेच्छा देतो. वंदेमातरम् ला 150 वर्षे झाल्याबद्दल मी सर्व देशवासियांना शुभेच्छा देतो.

मित्रहो,

प्रत्येक गीत,प्रत्येक काव्याचा स्वतःचा एक मूळ भाव असतो,त्याचा एक संदेश असतो.वंदेमातरम् चा मूळ भाव काय आहे ? वंदेमातरम् चा मूळ भाव आहे, भारत, भारत माता.भारताची शाश्वत संकल्पना, ती संकल्पना जी मानव जातीच्या आरंभापासूनच घडायला सुरवात झाली होती. जिने युगा-युगांना एक-एक अध्याय म्हणून जाणले. वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या राष्ट्रांची निर्मिती, वेगवेगळ्या महाशक्तींचा उदय,नव-नव्या संस्कृतीचा विकास,शून्यापासून शिखरापर्यंतचा आणि शिखरापासून पुन्हा शून्यापर्यंत त्यांचा प्रवास,घडणारा इतिहास,जगाचा बदलता भूगोल,भारताने हे सर्व पाहिले आहे. मानवाच्या या अनंत प्रवासातून आपण शिकलो आणि वेळो-वेळी नवे निष्कर्ष काढले. त्या आधारावर आपल्या संस्कृतीच्या  मुल्यांची आणि आदर्शांची पारख केली, त्यांची बांधणी केली. आपण,आपल्या पूर्वजांनी,आपल्या ऋषी-मुनींनी, आपल्या आचार्यांनी, भगवंतांनी,आपल्या देशवासीयांनी आपली एक सांस्कृतिक ओळख निर्माण केली. आपण सामर्थ्य आणि नैतिकता यांचे संतुलन जाणले आणि बावनकशी  सोन्याप्रमाणे भूतकाळाचे सर्व आघात सहन करत  भारत एक राष्ट्र म्हणून अमर राहिले.

बंधू-भगिनींनो,

भारताची ही संकल्पना,त्यामागे वैचारिक शक्ती आहे. घडणाऱ्या - कोसळणाऱ्या जगापासून वेगळा आपल्या स्वतंत्र अस्तित्वाचा बोध,हे यश,लयबद्धता,ती शब्दाद्वारे उमटवणे त्यासाठी  हृदयाचा ठाव घेत,अनुभवांच्या गाठोड्यातून,आत्यंतिक संवेदना प्राप्त केल्यानंतर वंदेमातरम् सारखी रचना साकारते आणि म्हणूनच गुलामीच्या त्या कालखंडात वंदेमातरम् या संकल्पाचा उदघोष ठरला होता आणि तो उदघोष होता- भारताच्या स्वातंत्र्याचा,भारत मातेच्या हातातील गुलामीच्या बेड्या तुटतील  आणि तिची लेकरे स्वतःच आपले  भाग्य घडवतील याचा.

मित्रहो,

गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांनी एकदा म्हटले होते, “बंकिमचंद्र यांची आनंदमठ ही केवळ कादंबरी नाही,स्वतंत्र भारताचे एक स्वप्न आहे”.आपण पहा,आनंदमठ मध्ये वंदेमातरम् चा प्रसंग,वंदेमातरम् च्या एकेका ओळीमध्ये, एकेका शब्दामध्ये एक गहन अर्थ आहे. या गीताची रचना गुलामीच्या कालखंडात झाली असली तरी त्याचे शब्द त्या गुलामीच्या छायेत कधी अडकले नाहीत. गुलामीच्या स्मृतीपासून हे शब्द मुक्त राहिले म्हणूनच वंदेमातरम् प्रत्येक कालखंडात समर्पक राहिले, अमर राहिले. सुजलाम् सुफलाम् मलयज शीतलाम् सस्यशामलाम् मातरम् ही वंदेमातरम् ची पहिली ओळ आहे. निसर्गाच्या दिव्य वरदानानाने सुशोभित आपल्या  सुजलाम् सुफलाम् मातृभूमीला नमन केले आहे.

मित्रहो,

हजारो वर्षांची हीच तर भारताची ओळख राहिली आहे.इथल्या नद्या,इथल्या डोंगर दऱ्या,इथली वनसंपदा,वृक्षराजी,इथली सुपीक जमीन,ही भूमी नेहमीच सोने पिकवण्याचे सामर्थ्य बाळगत आली आहे.शतकानुशतके जग, भारताच्या समृद्धीच्या कथा ऐकत आले आहे. काही शतकांपूर्वीपर्यंत जागतिक जीडीपीचा  सुमारे एक चतुर्थांश वाटा भारताकडे होता.

मात्र बंधू-भगिनींनो,

जेव्हा बंकिम बाबूंनी वंदेमातरम् ची रचना केली होती,तेव्हा भारत आपल्या त्या सुवर्ण युगापासून खूप दूर गेला होता.परदेशी आक्रमणकर्त्यांनी,त्यांचे हल्ले,लुटालुट, शोषण करणारी इंग्रजांची धोरणे, त्या काळात आपला देश गरिबी आणि उपासमारीच्या विळख्यात होता. तेव्हाही बंकिम बाबूंनी,त्या हलाखीच्या स्थितीतही, चहू बाजूला वेदना,दुःख, विनाश,शोक होता,सर्वत्र अंधःकार दिसत होता अशा काळात बंकिम बाबूंनी समृद्ध भारताचे आवाहन केले. कारण त्यांना विश्वास होता की कितीही संकटे असली तरी भारत आपला सुवर्णकाळ पुनर्जीवित करू शकतो आणि म्हणूनच त्यांनी आवाहन केले ,वंदेमातरम्.

मित्रहो,

गुलामीच्या त्या कालखंडात भारताचे  हीन आणि मागास असे चित्र रंगवत इंग्रज आपल्या सत्तेचे समर्थन करत होते,तो दुष्प्रचार पूर्णपणे फोल ठरविण्याचे काम या पहिल्या ओळीने केले. म्हणूनच वंदेमातरम् केवळ स्वातंत्र्य गीत राहिले नाही तर स्वतंत्र भारत कसा असेल, वंदेमातरम् ने  ते सुजलाम सुफलाम स्वप्नही कोट्यवधी देशवासियांसमोर सादर केले.

मित्रहो,

आज हा दिवस आपल्याला वंदेमातरम् चा अलौकिक प्रवास आणि त्याचा प्रभाव जाणण्याची संधीही देतो.1875 मध्ये बंकिम बाबूंनी बंगदर्शन मध्ये ‘वंदे मातरम्’ प्रकाशित केले होते तेव्हा काही लोकांना वाटले की ते केवळ गीत आहे.मात्र बघता-बघता वंदे मातरम भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा,कोट्यवधी जनतेचा आवाज बनले.एक असा आवाज जो प्रत्येक क्रांतिकारकाच्या ओठी होता, एक असा आवाज जो प्रत्येक भारतीयाच्या भावना व्यक्त करत होता.आपण पहा ना,स्वातंत्र्य लढ्यात वंदेमातरम् कोणत्या ना कोणत्या स्वरुपात जोडले गेले नाही,असा अध्याय क्वचितच असेल. 1896 मध्ये गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांनी कलकत्ता अधिवेशनात वंदेमातरम् गायले.1905 मध्ये बंगालची फाळणी झाली.देशाचे तुकडे करण्याचा इंग्रजांचा हा धोकादायक प्रयोग होता.मात्र वंदे मातरम् या मनसुब्याविरोधात एखाद्या अभेद्य खडकाप्रमाणे उभे ठाकले.बंगालच्या फाळणीला विरोध दर्शवत रस्त्यावर एकच जयघोष  होता- वंदे मातरम्.

मित्रहो,

बरिसाल  अधिवेशनात आंदोलनकर्त्यांवर जेव्हा गोळ्या झाडण्यात आल्या तेव्हा त्यांच्याही ओठी हाच मंत्र होता, हेच शब्द होते वंदे मातरम्! भारताबाहेर परदेशात  राहून स्वातंत्र्यासाठी काम करणारे वीर सावरकर यांच्यासारखे स्वातंत्र्यसेनानी जेव्हा एकमेकांना भेटत असत तेव्हा  वंदे मातरम् हेच त्यांचे अभिवादन असे.असंख्य क्रांतिकारकांनी फाशीच्या तख्तावर चढताना वंदे मातरम् हाच जयघोष केला होता.   

अशा कित्येक घटना, इतिहासातील कितीतरी तारखा, इतका मोठा देश, वेगवेगळे प्रांत आणि प्रदेश, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक, त्यांच्या चळवळी, पण जो नारा, जो संकल्प, जे गीत प्रत्येकाच्या तोंडी होते, जे गीत प्रत्येक सुरात होते, ते होते - वंदे मातरम्!

म्हणूनच, बंधूंनो आणि भगिनींनो,

1927 मध्ये महात्मा गांधी म्हणाले होते – "वंदे मातरम्... आपल्यासमोर संपूर्ण भारताचे असे चित्र उभे करते, जे अखंड आहे." श्री अरबिंदो यांनी वंदे मातरम् ला एका गीतापेक्षाही जास्त, त्याला एक मंत्र म्हटले होते. ते म्हणाले होते – हा एक असा मंत्र आहे जो आत्मशक्ती जागवतो. भिकाजी कामा यांनी भारताचा जो ध्वज तयार करून घेतला होता, त्याच्या मध्यभागीही लिहिलेले होते “वंदे मातरम्” !

मित्रांनो,

आपला राष्ट्रध्वज कालपरत्वे अनेक बदलांमधून गेला, पण तेव्हापासून आजपर्यंत आपल्या तिरंग्यापर्यंत, देशाचा झेंडा ज्या ज्या वेळी फडकतो, तेव्हा आपल्या तोंडातून आपसूकच निघते – भारत माता की जय! वंदे मातरम्! म्हणूनच, आज जेव्हा आपण त्या राष्ट्रगीताची 150 वर्षे साजरी करत आहोत, तेव्हाही देशाच्या महान नायकांना आपली श्रद्धांजली आहे. आणि हे त्या लाखो बलिदानींनाही श्रद्धापूर्वक नमन आहे, जे वंदे मातरम् चे आवाहन करत, फाशीच्या चबुतऱ्यावर हेलकावे खाताना, जे वंदे मातरमचा जप करत चाबकाचे फटके खात राहिले, जे वंदे मातरम् चा मंत्र जपत बर्फाच्या लाद्यांवर अढळ राहिले.

मित्रांनो,

आज आपण 140 कोटी देशवासीयराष्ट्रासाठी अशा सर्व अनाम वीरांना, देशासाठी जगणाऱ्या-मरणाऱ्यांना श्रद्धांजली वाहत आहोत.  वंदे मातरम् म्हणत ज्यांनी देशासाठी बलिदान केले, ज्यांची नावे इतिहासाच्या पानांमध्ये कधी नोंदवलीच गेली नाहीत.

मित्रांनो,

आपल्या वेदांनी आपल्याला शिकवले आहे- "माता भूमिः, पुत्रोऽहं पृथिव्याः" अर्थात्, ही भूमी आमची आई आहे, हा देश आमची माता आहे. आम्ही तिचीच लेकरे आहोत. भारताच्या लोकांनी वैदिक काळापासूनच देशाची याच स्वरुपात कल्पना केली, याच स्वरुपात आराधना केली आहे. याच वैदिक चिंतनाने स्वातंत्र्य संग्रामात नवी चेतना निर्माण केली आहे.

मित्रांनो,

मित्रांनो, राष्ट्राला एक geopolitical entity मानणाऱ्यांसाठी राष्ट्राला आई मानण्याचा विचार आश्चर्यकारक असू शकतो. पण, भारत वेगळा आहे. भारतात आई जननी पण आहे, आणि पालनपोषण करणारी देखील आहे. जर अपत्यावर संकट आले, तर आई संहारकारिणी देखील आहे. म्हणूनच, वंदे मातरम् म्हणते – अबला केन मा एत बले। बहुबल-धारिणीं नमामि तारिणीं रिपुदल-वारिणीं मातरम्॥ वंदे मातरम्, अर्थात अफाट शक्ती धारण करणारी भारत माता, संकटातून पार करवणारी आणि शत्रूंचा विनाश करणारीही आहे. राष्ट्राला आई आणि आईला शक्ती स्वरूपा नारी मानण्याचा हा विचार, याचा एक परिणाम हा झाला की आपला स्वातंत्र्य संग्राम स्त्री-पुरुष, सर्वांच्या सहभागाचा संकल्प बनला. आपण पुन्हा एकदा अशा भारताचे स्वप्न पाहू शकलो, ज्यात महिलाशक्ती राष्ट्र निर्मितीत सर्वात पुढे उभी दिसेल.

मित्रांनो,

वंदे मातरम्, स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेल्यांचे गीत असण्यासोबतच, या गोष्टीचीही प्रेरणा देते की आपल्याला या स्वातंत्र्याचे रक्षण कसे करायचे आहे. बंकीम बाबूंच्या संपूर्ण मूळ गीतातील पंक्ती आहेत – त्वम् हि दुर्गा दशप्रहरण-धारिणी कमला कमल-दल-विहारिणी वाणी विद्यादायिनी, नमामि त्वाम् नमामि कमलाम् अमलां अतुलाम् सुजलां सुफलाम् मातरम्, वंदेमातरम्! अर्थात, भारत माता विद्या देणारी सरस्वती पण आहे, समृद्धी देणारी लक्ष्मी पण आहे, आणि अस्त्र-शस्त्रे धारण करणारी दुर्गा पण आहे. आपल्याला अशाच राष्ट्राची निर्मिती करायची आहे, जे ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये सर्वोच्च स्थानावर असेल, जे विद्या आणि विज्ञानाच्या ताकदीने समृद्धीच्या शिखरावर असेल, आणि जे राष्ट्रीय सुरक्षेसाठी आत्मनिर्भर देखील असेल.

मित्रांनो,

गेल्या काही वर्षांत जग भारताच्या याच स्वरूपाचा उदय पाहत आहोत. आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केली. आपण जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयाला आलो आणि, जेव्हा शत्रूंनी दहशतवादाच्या माध्यमातून भारताची सुरक्षा आणि प्रतिष्ठेवर हल्ला करण्याचे धाडस केले, तेव्हा संपूर्ण जगाने पाहिले की, नवा भारत मानवतेच्या सेवेसाठी जर कमला आणि विमलाचे रूप आहे, तर दहशतवादाच्या विनाशासाठी ‘दश प्रहरण-धारिणी दुर्गा’ देखील बनू शकतो.

मित्रांनो,

वंदे मातरम् शी संबंधित आणखी एक विषय आहे, ज्याची चर्चा करणे तितकेच गरजेचे आहे. स्वातंत्र्य संग्रामात वंदे मातरम् च्या भावनेने संपूर्ण राष्ट्र उजळून टाकले होते. पण दुर्दैवाने, 1937 मध्ये वंदे मातरम् च्या महत्त्वाच्या कडव्यांना, त्याच्या आत्म्याच्या एका भागाला वेगळे करण्यात आले होते. वंदे मातरम् तोडण्यात आले होते, त्याचे तुकडे केले गेले होते. वंदे मातरम् च्या या विभाजनाने देशाच्या विभाजनाचे बीज देखील पेरले होते. राष्ट्रनिर्मितीचा हा महामंत्र, याच्यासोबत हा अन्याय का झाला? हे आजच्या पिढीलाही समजले पाहिजे. कारण तीच विभाजनकारक विचारसरणी देशासाठी आजही आव्हान बनलेली आहे.

मित्रांनो,

आपल्याला या शतकाला भारताचे शतक बनवायचे आहे. हे सामर्थ्य भारतात आहे, हे सामर्थ्य भारताच्या 140 कोटी जनतेत आहे. यासाठी आपल्याला स्वतःवर विश्वास दाखवावा लागेल. या संकल्पयात्रेत आपल्याला रस्ता चुकवणारे देखील भेटतील, नकारात्मक विचारसरणीचे लोक आपल्या मनात शंका-कुशंका निर्माण करण्याचा प्रयत्न देखील करतील. त्यावेळी आपल्याला आनंद मठमधील त्या प्रसंगाचे स्मरण करायचे आहे, आनंद मठात ज्यावेळी संतान भवानंद वंदे मातरम् गातो तेव्हा दुसरे एक पात्र तर्क-वितर्क करतो. तो विचारतो की तू एकटा काय करणार? तेव्हा वंदे मातरम् पासून प्रेरणा मिळते, ज्या मातेची इतकी  कोट्यवधी मुले-मुली असतील, तिचे कोट्यवधी हात असतील, ती माता अबला कशी असू शकेल? आज तर भारतमातेची 140 कोटी अपत्ये आहेत, त्यांचे 280 कोटी हात आहेत. यातही 60 टक्क्यांहून जास्त तर युवा आहेत. जगातील सर्वात जास्त ‘डेमोग्राफिक ऍडव्हान्टेज’ तर आपल्याकडे आहे. हे सामर्थ्य आपल्या देशाचे आहे, हे सामर्थ्य भारत मातेचे आहे. असे काय आहे, जे आज आपल्यासाठी अशक्य आहे? असे काय आहे, जे आपल्याला वंदे मातरम् चे मूळ स्वप्न साकार करण्यापासून थांबवू शकते?

मित्रांनो,

आज आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीकोनाचे यश, मेक इन इंडियाचा संकल्प आणि  2047 मध्ये विकसित भारताच्या लक्ष्याच्या दिशेने पडणारी आपली पावले, देश जेव्हा अशा अभूतपूर्व कालखंडात नव्या कामगिरी साध्य करतो तेव्हा प्रत्येक देशवासियाच्या मुखातून उमटते- वंदे मातरम! आज जेव्हा भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश बनतो, जेव्हा नव्या भारताची चाहूल अवकाशाच्या दूरवरच्या कोपऱ्यांपर्यंत ऐकू येते, तेव्हा प्रत्येक देशवासी बोलतो – वंदे मातरम्! आज जेव्हा आपण आपल्या मुलींना अंतराळ तंत्रज्ञानापासून ते क्रीडा क्षेत्रापर्यंत शिखरावर पोहोचताना पाहतो, आज जेव्हा आपण मुलींना फायटर जेट उडवताना पाहतो, तेव्हा अभिमानाने भरलेल्या प्रत्येक भारतीयाचा नारा असतो – वंदे मातरम्!

मित्रांनो,

आजच्या आपल्या सैन्यदलाच्या जवानांसाठी वन रँक- वन पेन्शन लागू होऊन 11 वर्षे झाली आहेत. ज्यावेळी आपले सैन्य, शत्रूच्या अभद्र मनसुब्यांना चिरडून टाकते, ज्यावेळी दहशतवाद, नक्षलवाद, माओवादी दहशतीचे कंबरडे मोडले जाते, त्यावेळी सुरक्षादले एकाच मंत्राने प्रेरित असतात आणि तो मंत्र आहे – वंदे मातरम!

मित्रांनो,

भारतमातेच्या वंदनाची हीच भावना आपल्याला विकसित भारताच्या लक्ष्यापर्यंत घेऊन जाईल. माझी खात्री आहे, वंदे मातरम् चा मंत्र, आपल्या या अमृत प्रवासात भारतमातेच्या कोटी-कोटी लेकरांना सातत्याने शक्ती देईल, प्रेरणा देईल. मी पुन्हा एकदा सर्व देशवासियांना वंदे मातरम् ला 150 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मनापासून खूप-खूप शुभेच्छा देतो आणि देशभरात माझ्यासोबत जोडल्या गेलेल्या तुम्हा सर्वांना खूप-खूप धन्यवाद देत, माझ्या सोबत उभे राहून संपूर्ण ताकदीने, हात वर करून बोला-

वंदे मातरम! वंदे मातरम!

वंदे मातरम! वंदे मातरम!

वंदे मातरम! वंदे मातरम!

वंदे मातरम! वंदे मातरम!

वंदे मातरम! वंदे मातरम! 

खूप-खूप धन्यवाद!

***

सुषमा काणे/निलिमा चितळे/शैलेश पाटील/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2188160) Visitor Counter : 5