पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

डेहराडून येथे उत्तराखंड राज्याच्या स्थापनेच्या  रौप्यमहोत्सवी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित


पंतप्रधानांच्या हस्ते 8140 कोटी रुपये मूल्यांच्या विविध विकास उपक्रमांचे उद्घाटन आणि पायाभरणी संपन्न

उत्तराखंड राज्याने आज जी उंची गाठली आहे, एकेकाळी या सुंदर राज्याच्या निर्मितीसाठी ज्या व्यक्तींनी संघर्ष केला, त्या प्रत्येकाला आनंद होणे साहाजिकच आहे - पंतप्रधान

उत्तराखंडच्या उदयाचा आणि प्रगतीचा हा खरोखरच निर्णायक काळ आहे : पंतप्रधान.

भारताच्या आध्यात्मिक आयुष्यातील हृदयाचे ठोके म्हणजे देवभूमी उत्तराखंड:पंतप्रधान

उत्तराखंडची आध्यात्मिक ताकद हीच त्यांची खरी ओळख आहे: पंतप्रधान

Posted On: 09 NOV 2025 2:54PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेहराडूनमध्ये उत्तराखंडच्या स्थापनेच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्याला संबोधित केले. या कार्यक्रमादरम्यान , पंतप्रधानांनी 8140 कोटी रुपये मूल्यांच्या विविध विकास प्रकल्पाची पायाभरणी आणि उद्घाटन केले. या समारोहाला संबोधित करताना, मोदी यांनी देवभूमी उत्तराखंडच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आणि सर्वांप्रती आदर, सन्मान आणि सेवाभाव व्यक्त केला.

9 नोव्हेंबर हा दिवस दीर्घ आणि समर्पित संघर्षांचे फलित असल्याचे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले आणि हा दिवस आपल्या सर्वांमध्ये अभिमानाची भावना जागृत करत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी उत्तराखंडमधील देवस्वरूप लोकांनी दीर्घकाळापासून पाहिलेले स्वप्न, जे अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या नेतृत्वाखाली पंचवीस वर्षांपूर्वी पूर्ण झाले. गेल्या 25 वर्षांच्या प्रवासाचा विचार करता, आज उत्तराखंडने जी उंची गाठली आहे, ती पाहून प्रत्येक व्यक्ती जिने या सुंदर राज्याच्या निर्मितीसाठी संघर्ष केला, तिला आनंद होईल, असे मोदी म्हणाले. ते म्हणाले की, ज्यांना डोंगर-पर्वत आवडतात त्यांना उत्तराखंडची संस्कृती, आवडते , त्याचे नैसर्गिक सौंदर्य जपतात आणि देवभूमीच्या लोकांविषयी ज्यांना प्रेम वाटते त्या सर्वांना आज आनंद आणि सुख वाटत असेल.

केंद्र आणि राज्य सरकार, उत्तराखंडला नवी उंची गाठून देण्याप्रती वचनबद्ध असल्याविषयी समाधान व्यक्त करत, मोदी यांनी उत्तराखंडच्या स्थापनेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सर्वांचे हार्दिक अभिनंदन केले. या प्रसंगी, त्यांनी चळवळीदरम्यान, आपले प्राण अर्पण करणाऱ्या शहिदांना श्रद्धांजली वाहिली आणि त्या काळातील कार्यकर्त्यांना अभिवादन केले.

उत्तराखंडशी असलेल्या आपल्या गहिऱ्या भावनिक नात्याविषयी बोलताना, मोदी यांनी या प्रदेशातील त्यांच्या आध्यात्मिक प्रवासादरम्यान डोंगराळ भागात राहाणाऱ्या त्यांच्या बंधू-भगिनींचा संघर्ष, कठोर परिश्रम आणि दृढनिश्चय प्रेरणादायी असल्याचे सांगितले. उत्तराखंडमध्ये घालवलेल्या दिवसांमुळे राज्याच्या अफाट क्षमतेचा थेट अनुभव दिल्याचे ते म्हणाले. बाबा केदार यांना भेट दिल्यानंतर पंतप्रधानांनी सांगितले की, या दृढनिश्चयामुळे हे दशक उत्तराखंडचे असल्याचे त्यांना जाहीर करावे लागले. राज्याला 25 वर्ष पूर्ण होत असताना, "हा कालखंड खरोखरच उत्तराखंडच्या उदय आणि प्रगतीचा निर्णायक काळ आहे. " 25 वर्षांपूर्वी, जेव्हा उत्तराखंडची नवनिर्मिती झाली होती, तेव्हा असणाऱ्या प्रचंड आव्हानांची आठवण करून देताना, मोदी म्हणाले की, संसाधने मर्यादित होती, राज्याची आर्थिक तरतूद कमी होती, उत्पन्नाचे स्रोत कमी होते आणि बहुतांश गरजा केंद्राच्या मदतीने पूर्ण केल्या जात. हे चित्र आता पूर्ण बदलल्याचे मोदींनी नमूद केले. कार्यक्रमाला येण्यापुर्वी,रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित उल्लेखनीय प्रदर्शनाला त्यांनी भेट दिली, ज्यामध्ये गेल्या 25  वर्षांतील उत्तराखंडच्या प्रवासाची झलक पाहायला मिळते. पायाभूत सुविधा, शिक्षण, उद्योग, पर्यटन, आरोग्य, वीज आणि ग्रामीण विकास या सर्व क्षेत्रातील यशोगाथा नक्कीच प्रेरणादायी आहेत. पंतप्रधानांनी असेही नमूद केले की, 25 वर्षांपुर्वी उत्तराखंडची अर्थसंकल्पीय तरतूद ही केवळ 4000 कोटी रुपये होते, ते आता 1 लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. या काळात, राज्यातील वीजनिर्मिती चौपट झाली आहे. या काळात रस्त्यांची लांबी दुप्पट झाली. पूर्वी सहा महिन्यांत केवळ 4000 विमान प्रवासी उतरत, आज एका दिवसांत 4000हून अधिक विमान प्रवासी येतात .

गेल्या 25 वर्षांत उत्तराखंडमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या संख्येत दहा पटीने वाढ झाली आहे, असे मोदींनी अधोरेखित केले.तसेच पूर्वी एकच वैद्यकीय महाविद्यालय होते तर आज दहा महाविद्यालये असल्याचे त्यांनी नमूद केले. 25 वर्षांपूर्वी, लसीकरणाचे प्रमाण 25 टक्क्यांपेक्षा कमी होते, परंतु, आता उत्तराखंडमधील प्रत्येक गाव लसीकरणाच्या कक्षेत आल्याचं त्यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी नमूद केले की, उत्तराखंडने जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती साधली आहे. या विकास प्रवासाचे वर्णन करताना त्यांनी तो उल्लेखनीय असल्याचे सांगितले आणि या परिवर्तनाचे श्रेय सर्वसमावेशक विकास धोरणाला तसेच उत्तराखंडमधील प्रत्येक नागरिकाच्या सामूहिक निर्धाराला दिले. पूर्वी पर्वतांच्या कठीण चढाईमुळे विकासाचा मार्ग अडखळत होता, परंतु आता नवीन वाटा खुल्या होत आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले.

पंतप्रधानांनी उत्तराखंडमधील युवक आणि उद्योजकांशी झालेल्या त्यांच्या पूर्वीच्या संवादाचा उल्लेख करत सांगितले की, राज्याच्या विकासाबद्दल ते अत्यंत उत्साही आहेत. ते म्हणाले की, आज उत्तराखंडच्या जनतेची भावना गढवाली भाषेत एका वाक्यात सांगता येईल सन 2047 मध्ये जेव्हा भारत विकसित राष्ट्रांच्या श्रेणीत सामील होईल, तेव्हा माझे उत्तराखंड, माझी देवभूमी पूर्णतः तयार असेल.

मोदी यांनी सांगितले की, आज उत्तराखंडच्या विकास प्रवासाला गती देण्यासाठी अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले आहे. हे प्रकल्प शिक्षण, आरोग्य, पर्यटन आणि क्रीडा क्षेत्राशी संबंधित असून, त्यामुळे या प्रदेशात नवीन रोजगारसंधी निर्माण होतील. त्यांनी विशेषत्वाने सांगितले की, जमराणी आणि सोंग धरण प्रकल्प देहरादून आणि हल्द्वानीच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येचे निराकरण करण्यात महत्वाची भूमिका बजावतील. या योजना साकारण्यासाठी ₹8,000 कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक केली जाणार आहे. त्यांनी या उपक्रमांसाठी उत्तराखंडच्या जनतेचे अभिनंदन केले.

उत्तराखंड सरकारने सफरचंद व कीवी उत्पादक शेतकऱ्यांना डिजिटल चलन स्वरूपात अनुदान देण्यास सुरुवात केली आहे, याचा उल्लेख करताना मोदी यांनी नमूद केले की, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आता दिल्या जाणाऱ्या आर्थिक सहाय्याचा संपूर्ण मागोवा घेणे शक्य झाले आहे. या उपक्रमासाठी राज्य सरकार, रिझर्व्ह बँक आणि सर्व संबंधित घटकांच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

देवभूमी उत्तराखंड ही भारताच्या आध्यात्मिक जीवनाची धडधड आहे,” असे उद्गार काढत मोदी यांनी आपल्या श्रद्धेचे प्रतीक असलेली पवित्र तिर्थस्थाने गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ, जागेश्वर आणि आदि कैलास यांचा उल्लेख केला. दरवर्षी लाखो भक्त या पवित्र स्थळांकडे यात्रेला निघतात. यामुळे भक्तीचा मार्ग तर खुला होतोच, पण उत्तराखंडच्या अर्थव्यवस्थेलाही नवी ऊर्जा मिळते, असे त्यांनी नमुद केले.

उत्तराखंडच्या विकासाशी सुधारित संपर्काची नाळ घट्ट जोडलेली असल्याचे अधोरेखित करताना मोदी म्हणाले की, राज्यात ₹2 लाख कोटींहून अधिक किमतीचे प्रकल्प सध्या सुरू आहेत. ऋषिकेशकर्णप्रयाग रेल्वे प्रकल्प प्रगतीपथावर असून दिल्लीदेहरादून एक्सप्रेसवे जवळजवळ पूर्ण झाला आहे. गौरिकुंडकेदारनाथ आणि गोविंदघाटहेमकुंड साहिब या रोपवेप्रकल्पांचे  भूमिपूजनही करण्यात आले आहे. या प्रकल्पांमुळे उत्तराखंडचा विकास वेगाने होत आहे.

पंतप्रधानांनी सांगितले की, गेल्या 25 वर्षांत उत्तराखंडने प्रगतीचा मोठा प्रवास केला आहे. पुढील 25 वर्षांसाठी उत्तराखंडसाठी आपण कोणती उंची गाठायची हे त्यांनी प्रश्नरूपाने विचारले. जिथे इच्छा, तिथे मार्ग’, या म्हणीचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, एकदा आपले ध्येय निश्चित झाले की ते साध्य करण्याचा मार्ग आपोआप सापडतो. तसेच, या भावी उद्दिष्टांवर चर्चा सुरू करण्यासाठी 9 नोव्हेंबरपेक्षा अधिक योग्य दिवस असूच शकत नाही, असे त्यांनी नमूद केले.

उत्तराखंडची खरी ओळख त्याच्या आध्यात्मिक शक्तीत असल्याचे पुन्हा अधोरेखित करत मोदी म्हणाले की, उत्तराखंडने ठरवले तर येत्या काही वर्षांत या राज्याला जगाची आध्यात्मिक राजधानीम्हणून स्वतःची ओळख प्रस्थापित करता येईल. त्यांनी सांगितले की, राज्यातील मंदिरे, आश्रम आणि योगध्यान केंद्रांना वैश्विक संपर्क जाळ्याशी जोडले जाऊ शकते.

पंतप्रधानांनी नमूद केले की, भारतभरातून आणि विदेशातूनही लोक आरोग्य व निरामयतेसाठी  उत्तराखंडला येतात आणि येथे मिळणाऱ्या औषधी वनस्पती व आयुर्वेदिक औषधांची मागणी झपाट्याने वाढत आहे. गेल्या 25 वर्षांत उत्तराखंडने सुगंधी वनस्पती, आयुर्वेदिक औषधी, योग आणि आरोग्य संपन्नतेचे पर्यटन या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती केली आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांनी प्रस्ताव मांडला की, उत्तराखंडमधील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात योग केंद्र, आयुर्वेद केंद्र आणि निसर्गोपचार संस्था असलेला संपूर्ण पर्यटन संच तयार केला पाहिजे, ज्यामुळे परदेशी पर्यटकांना आकर्षित करता येईल.

भारत सरकार सीमाभागांवरील व्हायब्रंट व्हिलेज  कार्यक्रमयाला विशेष प्राधान्य देत असल्याचे सांगून पंतप्रधानांनी इच्छा व्यक्त केली कीउत्तराखंडमधील प्रत्येक सशक्त ग्रामएक छोटे पर्यटन केंद्र बनावे, जिथे गृह- निवास, स्थानिक खाद्यपदार्थ आणि संस्कृतीला प्रोत्साहन मिळेल.

डुबके, चुडकानी, रोट-अरसा, रस-भात आणि झांगोरे की खीर यांसारख्या पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेताना पर्यटकांना घरच्या वातावरणाचा अनुभव येतो. त्यांना यात किती आनंद मिळत असेल याची कल्पना करा, असे आवाहन मोदींनी सर्वांना केले. हाच आनंद त्यांना पुन्हा पुन्हा उत्तराखंडला घेऊन जाईल, असे ते म्हणाले.

उत्तराखंडच्या छुप्या क्षमतेला उलगडण्याकडे लक्ष केंद्रित करण्याच्या गरजेवर भर देतानाच हरेला, फुलदेई आणि भितौली यांसारखे उत्सव त्यात सहभागी होणाऱ्या पर्यटकांवर कायमस्वरूपी ठसा उमटवतात, हे पंतप्रधानांनी नमूद केले. नंदा देवी मेळा, जौलजीवी मेळा, बागेश्वरचा उत्तरायणी मेळा, देवीधुरा मेळा, श्रावणी मेळा आणि बटर महोत्सव यांसारख्या स्थानिक मेळ्यांच्या चैतन्यशीलतेवर त्यांनी प्रकाश टाकला. उत्तराखंडचा आत्मा या उत्सवांमध्ये आहे, असे ते म्हणाले. हे स्थानिक सण आणि परंपरा जगाच्या नकाशावर आणण्यासाठी "एक जिल्हा, एक उत्सव" सारख्या मोहिमेचा प्रस्ताव त्यांनी मांडला.

उत्तराखंडमधील सर्व डोंगराळ जिल्ह्यांमध्ये फळझाडांच्या लागवडीची मोठी क्षमता आहे आणि त्यांना फलोत्पादन केंद्र म्हणून विकसित केले पाहिजे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. ब्लूबेरी, किवी आणि औषधी वनस्पती हे शेतीचे भविष्य असल्याचे त्यांनी हेरले. अन्न प्रक्रिया, हस्तकला आणि सेंद्रिय उत्पादने यांसारख्या क्षेत्रात एमएसएमईंना नव्याने सक्षम करण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली.

"उत्तराखंडमध्ये वर्षभर पर्यटनाची क्षमता आहे",असे पंतप्रधान म्हणाले. कनेक्टिव्हिटी सुधारल्याने त्यांनी यापूर्वीच हंगामी पर्यटनाकडे वाटचाल करण्याचे सुचवले होते. उत्तराखंड आता हिवाळी पर्यटनाला एक नवीन आयाम देत आहे, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. मोदी म्हणाले, की नवीन घडामोड  उत्साहवर्धक आहेत, हिवाळ्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यांनी पिथोरागड येथे 14,000 फूट उंचीवर झालेल्या मॅरेथॉनच्या यशस्वी आयोजनाकडे लक्ष वेधले आणि आदि कैलास परिक्रमा धावणे देशासाठी प्रेरणास्त्रोत बनले आहे, असे नमूद केले. तीन वर्षांपूर्वी, आदि कैलास यात्रेत 2000 पेक्षा कमी यात्रेकरू सहभागी झाले होते; आज ही संख्या 30,000 पेक्षा जास्त झाली आहे. काही दिवसांपूर्वीच केदारनाथ मंदिराचे दरवाजे त्या हंगामासाठी बंद करण्यात आले होते आणि यावर्षी सुमारे 17 लाख भाविकांनी केदारनाथ धामला भेट दिली, अशी माहिती त्यांनी दिली. तीर्थयात्रा आणि वर्षभर पर्यटन ही उत्तराखंडची ताकद आहे, जी त्याला विकासाच्या नवनवीन शिखरांवर नेत राहील, असे पंतप्रधानांनी सांगितले. ते म्हणाले, की भारतातील तरुणांना आकर्षित करण्यासाठी इको-टुरिझम आणि साहसी-टुरिझम हे उत्तम पर्याय आहेत.

"उत्तराखंड आता चित्रपटासाठी डेस्टिनेशन म्हणून उदयास येत आहे आणि राज्याच्या नवीन चित्रपट धोरणामुळे येथे चित्रीकरणही सोपे झाले आहे", असे नमूद करून पंतप्रधानांनी, उत्तराखंड 'वेडिंग डेस्टिनेशन' म्हणूनही लोकप्रिय होत असल्याचे सांगितले. "वेड इन इंडिया" या उपक्रमासाठी, उत्तराखंडने मोठ्या प्रमाणात सुविधा विकसित केल्या पाहिजेत, यावर त्यांनी भर दिला आणि यासाठी 5 ते 7 प्रमुख स्थळे ओळखून विकसित करण्याचे सुचवले.

आत्मनिर्भर भारतासाठी देशाच्या संकल्पाचा पुनरुच्चार करताना मोदी यांनी सांगितले, की स्वावलंबनाचा मार्ग व्होकल फॉर लोकलमधून आहे. उत्तराखंडने नेहमीच या दृष्टिकोनाला मूर्त रूप दिले आहे, स्थानिक उत्पादनांबद्दल आपुलकी, त्यांचा वापर आणि दैनंदिन जीवनातील एकोपा हा त्यांच्या परंपरेचा अविभाज्य भाग आहे. उत्तराखंड सरकारने व्होकल फॉर लोकल मोहिमेला चालना दिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. राज्यातील 15 कृषी उत्पादनांना GI टॅग यामुळेच मिळाले आहेत. बेडू फळ आणि बद्री गायीच्या तूपाला अलिकडेच मिळालेली GI टॅग मान्यता ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. बद्री गायीचे तूप प्रत्येक पर्वतीय घराचा अभिमान आहे, अशा शब्दात त्यांनी या तुपाचे वर्णन केले. बेडू फळ आता गावांबाहेरील बाजारपेठेत पोहोचले असल्याचे त्यांनी सांगितले. त्या फळापासून बनवलेल्या उत्पादनांना आता GI टॅग असेल आणि ते उत्तराखंडची ओळख सर्वदूर घेऊन जातील, असेही पंतप्रधान म्हणाले. अशी GI टॅग केलेली उत्पादने देशभरातील घराघरात नेली पाहिजेत, असे मोदी यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला की हाऊस ऑफ हिमालयाजहे उत्तराखंडच्या स्थानिक ओळखीला एकाच व्यासपीठावर एकत्र आणणारे ब्रँड म्हणून उदयास येत आहे. त्यांनी नमूद केले की या ब्रँड अंतर्गत राज्यातील विविध उत्पादनांना एकत्रित ओळख मिळाल्यामुळे ती उत्पादने जागतिक बाजारपेठेत स्पर्धा करू शकतील. पंतप्रधानांनी सांगितले की या उत्पादनांपैकी अनेक आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत, ज्यामुळे ग्राहकांपर्यंत थेट पोहोच साधली गेली असून शेतकरी, कारागीर आणि लघुउद्योगांसाठी नव्या बाजारपेठांचे दरवाजे खुले झाले आहेत. मोदी यांनी ब्रँडिंगच्या प्रयत्नांना नवी ऊर्जा देण्याचे आणि या ब्रँडेड उत्पादनांच्या वितरण प्रणालीत सातत्याने सुधारणा करण्याचे आवाहन केले.

उत्तराखंडच्या विकास प्रवासाला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला असला तरी त्यांच्या मजबूत सरकारने ही  सर्व आव्हाने पार केली आणि विकासाची गती खंडित होऊ दिली नाही, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या सरकारचे समान नागरी संहिता गंभीरपणे अंमलात आणल्याबद्दल कौतुक केले आणि ही गोष्ट इतर राज्यांसाठी आदर्श ठरेल, असे नमूद केले. त्यांनी राज्य सरकारच्या धर्मांतरविरोधी कायदा आणि दंगल नियंत्रण कायदा यांसारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवरील ठाम धोरणांचेही कौतुक केले. तसेच जमिनीवरील अतिक्रमण आणि लोकसंख्यात्मक बदलांसारख्या संवेदनशील विषयांवरील राज्य सरकारच्या कठोर कारवाईची त्यांनी प्रशंसा केली.

आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात उत्तराखंड सरकारने केलेल्या त्वरित आणि संवेदनशील प्रतिसादाचे त्यांनी विशेष कौतुक केले आणि जनतेला सर्वतोपरी मदत पुरविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे अभिनंदन केले.

पंतप्रधानांनी पूर्ण विश्वास व्यक्त केला की उत्तराखंड आपल्या राज्य स्थापनेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त, येत्या काळात विकासाची नवी  उंची गाठेल. त्यांनी सांगितले की उत्तराखंड अभिमानाने आपली संस्कृती आणि ओळख पुढे नेईल. मोदी यांनी जनतेला पुढील २५ वर्षांसाठी उत्तराखंडच्या विकासाचे ध्येय निश्चित करून ठामपणे प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी पंतप्रधानांनी उत्तराखंडमधील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देताना आश्वासन दिले की भारत सरकार उत्तराखंड सरकारच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे आणि प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या पाठिशी ठामपणे उभी राहील. त्यांनी राज्यातील प्रत्येक कुटुंबाच्या आणि नागरिकांना आनंदमयी, समृद्ध आणि उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला उत्तराखंडचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल (निवृत्त) गुरमीत सिंग, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, केंद्रीय मंत्री अजय टम्टा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

पार्श्वभूमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंड राज्य स्थापनेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला. या प्रसंगी त्यांनी  टपाल तिकिटाचे प्रकाशन केले आणि जनतेला संबोधित केले.

या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी 8140 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन केले. यामध्ये 930 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि 7210 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे भूमिपूजन समाविष्ट आहे. हे प्रकल्प पिण्याचे पाणी, सिंचन, तांत्रिक शिक्षण, ऊर्जा, नागरी विकास, क्रीडा आणि कौशल्य विकास या प्रमुख क्षेत्रांशी संबंधित आहेत.

पंतप्रधानांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना (पीएम फसल बीमा योजना) अंतर्गत 28,000 हून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 62 कोटी रुपयांची सहाय्य रक्कम वितरित केली.

पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या प्रकल्पांमध्ये देहरादून शहरातील 23 क्षेत्रांसाठी  पिण्याच्या पाण्याचे कव्हरेज (अमृत योजना अंतर्गत), पिथौरागढ जिल्ह्यातील विद्युत उपकेंद्र, शासकीय इमारतींवरील सौरऊर्जा प्रकल्प, तसेच नैनीतालमधील हल्द्वानी स्टेडियममध्ये एस्ट्रो  टर्फ हॉकी मैदान यांचा समावेश आहे.

त्यांनी दोन महत्त्वाच्या जलविद्युत प्रकल्पांचे भूमिपूजन केले, सोंग  धरण पेयजल  प्रकल्प, जो 150 एमएलडी (मिलियन लिटर प्रति दिवस) पाणी देहरादून शहराला पुरवेल; आणि जमरणी धरण बहुउद्देशीय प्रकल्प (नैनीताल), जो पिण्याचे पाणी, सिंचन आणि वीज निर्मिती या तिन्ही क्षेत्रांना सहाय्य करेल. याशिवाय, महिला क्रीडा महाविद्यालय (चंपावत), अत्याधुनिक डेअरी प्लांट (नैनीताल) आणि अनेक विद्युत उपकेंद्रे स्थापनेचे प्रकल्प यांचा समावेश आहे.

***

सुषमा काणे/विजयालक्ष्मी साळवी साने/नितीन गायकवाड/पर्णिका हेदवकर/गजेंद्र देवडा/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2188033) Visitor Counter : 13