पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी आयसीसी महिला विश्वचषक 2025 च्या विजेत्या संघासोबत साधला संवाद
विश्वचषक जिंकण्यासाठी केलेल्या असामान्य कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी संपूर्ण संघाचे केले अभिनंदन
आपल्या यशोगाथांची माहिती इतरांपर्यंत पोहोचवून त्यांना प्रेरित करण्याचे पंतप्रधानांनी केले खेळाडूंना आवाहन, एका वर्षात तीन शाळांची निवड करण्याची खेळाडूंना केली सूचना
लठ्ठपणावर मात करण्यासाठी फिट इंडिया चळवळीवर पंतप्रधानांनी दिला भर, या चळवळीचा सर्वांना, विशेषतः देशातील सुकन्यांना लाभ मिळवून देण्यासाठी तिचा प्रसार करण्यासाठी प्रयत्न करण्याचे खेळाडूंना केले आवाहन
Posted On:
06 NOV 2025 5:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत 7, लोक कल्याण मार्ग येथे आयसीसी महिला विश्वचषक 2025 च्या विजेत्या संघासोबत संवाद साधला. भारतीय संघाने रविवारी 2 नोव्हेंबर 2025 रोजी अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या संघावर मात केली होती. पंतप्रधानांनी काल देव दिवाळी आणि गुरुपूरब असल्याने हा दिवस विशेष असल्याचे सांगून सर्व उपस्थितांना या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या संघाचे प्रशिक्षक अमोल मझुमदार यांनी पंतप्रधानांकडे कृतज्ञता व्यक्त करत त्यांची भेट घेण्याची संधी मिळणे हा मोठा बहुमान असल्याचे सांगितले. या संघातील सर्व मुलींनी कमालीच्या एकाग्रतेने आणि ऊर्जेने प्रत्येक सराव सत्रात सहभाग घेतला आणि त्यांनी घेतलेल्या कष्टांचे फळ त्यांना मिळाले आहे, असे त्यांनी नमूद केले.
या संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने 2017 मध्ये चषकाशिवाय पंतप्रधानांची भेट घेतली होती याची आठवण करून दिली आणि हा चषक मिळवण्यासाठी अनेक वर्षे जे प्रयत्न केले होते त्यामुळे मिळालेला चषक पंतप्रधानांना दाखवताना अतिशय बहुमानाची भावना व्यक्त केली. पंतप्रधानांनी आमचा आनंद द्विगुणीत केला आणि ती अतिशय अभिमानास्पद बाब होती, असे तिने सांगितले.भविष्यातही त्यांची भेट घेण्याची आणि त्यांच्यासमवेत संघाचे छायाचित्र घेण्याचा उद्देश असल्याचे तिने सांगितले.
मोदी यांनी त्यांच्या कामगिरीची दखल घेतली आणि त्यांनी खरोखरच महान बाब साध्य केली आहे असे नमूद केले. क्रिकेट हा भारतात केवळ एक खेळ नाही तर तो लोकांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे यावर त्यांनी भर दिला. ज्यावेळी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी होत असते त्यावेळी संपूर्ण देशामध्ये उत्साह संचारतो आणि अगदी लहानशा धक्क्यानेही संपूर्ण देश हलतो. सलग तीन सामने हरल्यानंतर कशा प्रकारे संघाची खिल्ली उडवली जात होती याची त्यांनी दखल घेतली.
2017 मध्ये अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर त्यावेळी संघातील खेळाडूंसह पंतप्रधानांची भेट घेतली होती या आठवणीचा पुनरुच्चार हरमनप्रीतने केला. त्यावेळी त्यांनी या संघाचे मनोबल उंचावले होते आणि त्यांना यापुढे ज्या ज्या वेळी संधी मिळेल तेव्हा सर्वोत्तम कामगिरी करा असा सल्ला दिला होता. अखेर हा चषक जिंकण्यात यश मिळाल्याबद्दल आणि पुन्हा एकदा पंतप्रधानांसोबत संवाद साधण्याची संधी मिळाल्याबद्दल तिने आनंद व्यक्त केला.
पंतप्रधानांनी स्मृती मानधनाला आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आमंत्रित केले. त्यावेळी स्मृती मानधनाने 2017 ची आठवण करून दिली जेव्हा संघाला चषक जिंकता आला नव्हता, मात्र त्यावेळी पंतप्रधानांना जनतेच्या अपेक्षांची हाताळणी कशी करायची हा प्रश्न विचारल्याचे लक्षात आहे, असे तिने सांगितले. त्यांनी दिलेले उत्तर आपण लक्षात ठेवले आणि गेल्या सहा ते सात वर्षात अनेकदा विश्वचषक स्पर्धेत निराशाजनक पराभवांनंतरही त्याचा संघाला खूप मोठ्या प्रमाणावर फायदा झाला असल्याचे सांगितले. भारत पहिल्यांदाच महिला विश्वचषक जिंकेल हे विधिलिखित असल्याचे आपल्याला जाणवले , असे तिने सांगितले. पंतप्रधान नेहमीच एक प्रेरणास्रोत राहिले आहेत विशेषतः ज्या प्रकारे प्रत्येक क्षेत्रात म्हणजे इस्रोच्या प्रक्षेपणापासून ते इतर राष्ट्रीय कामगिरींमध्ये महिलांचा वावर दिसू लागला आहे, जी बाब अतिशय प्रेरणादायी आणि अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी आणि इतर मुलींना प्रेरणा देण्यासाठी सक्षमीकरण करणारी आहे, अशी भावना मानधनाने व्यक्त केली.यावर मोदी यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की संपूर्ण देश पाहात आहे आणि अभिमान वाटत आहे आणि आपल्या स्वतःला अगदी मनापासून या संघाचा अनुभव ऐकण्याची इच्छा होती. स्मृती मानधना म्हणाली की या मोहिमेचा सर्वोत्तम भाग म्हणजे प्रत्येक खेळाडूला घरी जाता येईल आणि त्यांची यशोगाथा सांगता येईल. कारण प्रत्येकाचे या कामगिरीत मोठे योगदान होते. अपेक्षांची हाताळणी कशी करावी याबाबत पंतप्रधानांनी यापूर्वी दिलेला सल्ला कायम आपल्या मनात राहिला आणि त्यांची शांत आणि धीरगंभीर वृत्ती हा स्वतःच एक प्रेरणेचा स्रोत आहे, याचा पुनरुच्चार स्मृतीने केला.
जेमिमा रॉड्रिग्जने संघाच्या वाटचालीवर प्रकाश टाकला. ज्यावेळी त्यांनी तीन सामने गमावले त्यावेळी हे सिद्ध झाले की संघाची व्याख्या त्याच्या विजयाच्या संख्येच्या माध्यमातून ठरत नसते तर तो संघ अपयशानंतर कशा प्रकारे कामगिरी उंचावतो त्यावर त्या संघाचे मोठेपण सिद्ध होते, असे तिने सांगितले. ती सर्वोत्तम कामगिरी या संघाने केली आणि त्यामुळेच हा संघ अजिंक्यपद मिळवणारा संघ ठरला असे तिने अधोरेखित केले. या संघातली एकजूट देखील तिने अधोरेखित केली. यापूर्वी कधीही न पाहिलेली ही एकजूट होती, असे ती म्हणाली. ज्यावेळी एखादी खेळाडू चांगली कामगिरी करत होती त्यावेळी त्या कामगिरीचा आनंद प्रत्येक खेळाडू अशा प्रकारे साजरी करत होती जणू काही तिने स्वतःच इतक्या धावा केल्या आहेत किंवा इतके बळी घेतले आहेत.त्याचप्रमाणे, जेव्हा जेव्हा कोणी निराश व्हायचे, तेव्हा नेहमीच संघातील एखादी खेळाडू त्यांच्या खांद्यावर हात ठेवून धीर द्यायची, "काळजी करू नकोस, पुढच्या सामन्यात तू हे करशील." पाठिंबा आणि एकजुटीची ही भावना हीच खरी संघाची ओळख असल्याचेही तिने नमूद केले.
स्नेह राणा जेमिमा रॉड्रिग्जच्या मताशी सहमत असणाऱ्या स्नेह राणाने सांगितले की विजयाच्या क्षणी सर्वजण सोबत असतात परंतु हरत असताना सांघिक भावना अधिक महत्त्वाची आहे. एक संघ म्हणून आणि एक युनिट म्हणून, त्यांनी ठरवले होते की काहीही झाले तरी ते कधीही एकमेकांची साथ सोडणार नाहीत आणि नेहमीच एकमेकांना प्रोत्साहन देतील यावर तिने भर दिला. ही त्यांच्या संघाची सर्वोत्तम गुणवत्ता आहे याकडे तिने लक्ष वेधले.
सर्वांना हसतमुख राहण्यास हरमनप्रीत कौर नेहमीच प्रोत्साहन देत असे असेही क्रांती गौड हिने निदर्शनास आणले. तिने सांगितले की जर कोणी थोडेसे जरी उदास जाणवले, तर संघाचा दृष्टिकोन हसत राहण्याचा होता जेणेकरून एकमेकांना हसताना पाहून सर्वांचा आनंद आणि आत्मविश्वास वाढेल. सर्वांचा उत्साह कायम ठेवणारे संघात कोणी आहे का असे पंतप्रधानांनी विचारताच क्रांती म्हणाली की जेमिमा रॉड्रिग्जने ती भूमिका बजावली. हरलीन कौर देओलनेही संघाला एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल जेमिमाहने अवगत केले.
प्रत्येक संघात वातावरण हलकेफुलके ठेवणारे कोणीतरी असावे असे वाटत असल्याची भावना हरलीन कौर देओल ने व्यक्त केली. तिने सांगितले की जेव्हा जेव्हा तिला कोणी एकटे बसलेले दिसते किंवा तिला थोडा मोकळा वेळ मिळतो तेव्हा ती इतरांशी छोट्या छोट्या मार्गांनी संवाद साधण्याचा प्रयत्न करते. सभोवतालचे लोक आनंदी असतात तेव्हा आपल्याला आनंद होतो असे तिने सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारले की संघाने इथे आल्यावर काही केले आहे का. हरलीन कौर देओल विनोदाने म्हणाली की इतरांनी तिला खूप मोठ्याने बोलल्याबद्दल सूचित केले होते आणि तिला शांत राहण्यास सांगितले होते. त्यानंतर पंतप्रधानांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख करत तिने त्यांच्या दिनचर्येबद्दल विचारले. पंतप्रधानांनी नम्रपणे उत्तर दिले, ते म्हणाले की त्यांनी त्या विषयाकडे फारसे लक्ष दिले नाही. एका खेळाडूने टिप्पणी केली की कोट्यवधी भारतीयांचे प्रेमच त्यांना चैतन्य देते. यास सहमती दर्शवताना पंतप्रधान म्हणाले की समाजाकडून मिळणारा हा स्नेह खरोखरच एक मोठी शक्ती आहे. त्यांनी नमूद केले की त्यांनी सरकारच्या प्रमुखपदासह सरकारमध्ये 25 वर्षे पूर्ण केली आहेत आणि इतक्या दीर्घ कार्यकाळानंतरही असे आशीर्वाद मिळणे कायमस्वरूपी परिणाम करते.
प्रशिक्षकांनी विचारल्या जाणाऱ्या विविध प्रश्नांवर आणि संघातील वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांवर भाष्य केले. त्यांनी सांगितले की ते दोन वर्षांपासून त्यांचे मुख्य प्रशिक्षक आहेत. त्यांनी जूनमध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या एका घटनेची कहाणी सांगितली, जिथे ते किंग चार्ल्सना भेटले. नियमावलीच्या निर्बंधांमुळे फक्त 20 लोकांना परवानगी होती, त्यामुळे सहाय्यक कर्मचारी उपस्थित राहू शकले नाही. सर्व खेळाडू आणि तीन कौशल्य प्रशिक्षक उपस्थित होते. त्यांनी सहाय्यक कर्मचाऱ्यांना सांगितले की त्यांना खूप वाईट वाटते, कारण नियमावलीत फक्त 20 लोकांनाच परवानगी होती. आपल्याला त्या फोटोची आवश्यकता नसल्याचे नमूद करताना सहाय्यक कर्मचाऱ्यांनी सांगितले की त्यांना 4 किंवा 5 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदींसोबत एक फोटो हवा होता. आज, ती इच्छा पूर्ण झाली.
हरमनप्रीत कौरने सांगितले की असे काही क्षण होते जेव्हा असे वाटायचे की त्यांनाच फक्त संघर्षाला तोंड द्यावे लागत आहे, परंतु ते संघर्ष त्यांना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत बनवण्यासाठी होते. हे खूप प्रेरणादायी आहे हे नमूद करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरमनप्रीतला हे सामायिक करतानाच्या तिच्या भावना विचारल्या.खेळाडूने उत्तर दिले की नेहमीच असा विश्वास होता की एक दिवस ते चषक उंचावतील आणि संघात पहिल्या दिवसापासूनच ती खास भावना होती. पंतप्रधानांनी वारंवार येणाऱ्या त्यांच्या आव्हानांची दखल घेतली आणि प्रतिकूल परिस्थितीतही इतरांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याच्या त्यांच्या धैर्याची आणि क्षमतेची प्रशंसा केली. हरमनप्रीतने संघातील सर्व खेळाडूंना श्रेय देत, त्यांचा आत्मविश्वास आणि प्रत्येक स्पर्धेतील त्यांची सातत्यपूर्ण सुधारणा अधोरेखित केली. भूतकाळ बदलता येत नाही हे स्वीकारून गेल्या दोन वर्षांत त्यांनी मनोबल वाढवण्यावर मोठ्या प्रमाणात काम केल्याचे तिने अधोरेखित केले. या प्रवासाने त्यांना वर्तमानात जगायला शिकवले आहे याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. तिने सहमती दर्शविली आणि म्हणूनच तिने त्याना विचारले की ते त्यांच्या संघ सदस्यांना प्रेरणा देण्यासाठी अतिरिक्त काय करतात - जेणेकरून ते वर्तमानात राहण्याचा त्यांचा विश्वास दृढ करू शकतील. पंतप्रधान आणि त्यांच्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे ते योग्य मार्गावर असल्याचे तिने सांगितले.
त्यानंतर पंतप्रधानांनी दीप्ती शर्मा यांना त्यांच्या उप-पोलिस अधीक्षक (डीएसपी) भूमिकेबद्दल विचारले. पंतप्रधान विनोदाने शर्माला म्हणाले की ती नक्कीच सर्व काही नियंत्रणात ठेवत असावी. त्यावर दिप्तीने उत्तर दिले की त्या सर्वजणी केवळ पंतप्रधानांना भेटण्याची आणि त्या क्षणाचा आनंद घेण्याची वाट पाहत होत्या. 2017 मध्ये पंतप्रधानांनी तिला सांगितले होते की ‘खरा खेळाडू तोच असतो जो अपयशातून उठून पुढे जाण्यास शिकतो’ याची आठवण तिने केली. पंतप्रधानांचे हे शब्द नेहमीच तिच्यासाठी प्रेरणादायी ठरले आहेत, असे दीप्ती म्हणाली. आपण नियमितपणे पंतप्रधानांची भाषणे ऐकतो, असे तिने सांगितले. कोणी कितीही गोंधळ केला तरी पंतप्रधान ज्या शांत आणि संयमी पद्धतीने परिस्थिती हाताळतात, ते पाहून तिला तिच्या वैयक्तिक खेळात खूप मदत झाली असल्याचा उल्लेख तिने केला.
पंतप्रधानांनी दीप्ती शर्माला तिच्या हनुमानजींच्या टॅटूबद्दल विचारले आणि त्यातून तिला कशी प्रेरणा मिळते हे जाणून घेतले. आपल्याला स्वतःपेक्षा हनुमानजींवर जास्त विश्वास आहे आणि जेव्हा जेव्हा तिला अडचणी येतात तेव्हा त्यांचे नाव घेतल्याने तिला त्यावर मात करण्याची शक्ती मिळते, अशी प्रतिक्रिया दिप्तीने दिली. पंतप्रधानांनी नमूद केले की दीप्ती तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर "जय श्री राम" देखील लिहिते, ज्याला तिने दुजोरा दिला. त्यावर पंतप्रधान म्हणाले की श्रद्धेची भावना जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, सर्वोच्च शक्तीला शरण जाण्याचे समाधान देते. त्यानंतर पंतप्रधानांनी दीप्तीला मैदानावरील तिच्या ठामपणाबद्दल आणि तिच्या प्रभावाबद्दल असलेल्या धारणेत तथ्य आहे का? याबद्दल विचारले. दीप्ती म्हणाली की तसे पूर्णपणे नाही, पण तिच्या थ्रोमुळे थोडी भीती निर्माण होते. संघातील तिच्या सहकारी गमतीने अनेकदा तिला भेदकता कमी करण्याबद्दल सांगतात, असे ती म्हणाली. पंतप्रधानांनी लक्षात ठेवून तिला तिच्या टॅटूबद्दल विचारले, तसेच पंतप्रधानांना आपली इंस्टाग्राम टॅगलाइन माहित होती याबद्दल तिने आनंद व्यक्त केला.
त्यानंतर पंतप्रधानांनी हरमनप्रीत कौरला तिने विजयानंतर सामन्यातील चेंडू तिच्या खिशात ठेवलेल्याबद्दल विचारले की तिची ही कृती नियोजित होती की कोणीतरी तिला असे करण्यासाठी सांगितले होते. हरमनप्रीतने उत्तर दिले की ही पूर्ण दैवी योजना होती, कारण तिला शेवटचा चेंडू आणि झेल तिच्याकडे येईल अशी अपेक्षाच नव्हती, परंतु जेव्हा तो आला तेव्हा ते वर्षानुवर्षे केलेल्या प्रयत्नांचे आणि प्रतीक्षेचे फळ असल्यागत वाटले आणि तिने तो चेंडू स्वतःकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला. तो चेंडू आताही आपल्या बागेत असल्याचे तिने पंतप्रधानांना सांगितले.
यानंतर पंतप्रधानांनी शफाली वर्माशी संवाद साधला. ती मूळची रोहतकची असल्याचा उल्लेख करून पंतप्रधानांनी हे ठिकाण कुस्तीगीरांसाठी प्रसिद्ध असताना ती क्रिकेटमध्ये कशी आली असे विचारले. शफालीने उत्तर दिले की रोहतकमध्ये खरोखरच कुस्ती आणि कबड्डी प्रसिद्ध आहेत, परंतु आपल्या वडिलांनी आपल्या क्रिकेट प्रवासात मोठी भूमिका बजावल्याचे तिने सांगितले. पंतप्रधानांनी विचारले की तिने कधी पारंपरिक आखाड्यातील खेळ खेळला आहे का? यावर तिने नाही असे उत्तर दिले. शफालीने सांगितले की तिच्या वडिलांना क्रिकेटर बनण्याची इच्छा होती, मात्र त्यांना हे स्वप्न पूर्ण करता आले नाही, म्हणून त्यांनी त्यांची आवड त्यांच्या मुलांमध्ये रुजवली. ती आणि तिचा भाऊ एकत्र सामने पाहत असत, ज्यामुळे तिला क्रिकेटमध्ये खूप रस निर्माण झाला आणि ती क्रिकेटर बनली, असे तिने सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका प्रसंगाची आठवण सांगितली- ज्यात झेल घेण्यापूर्वी तिच्या चेहऱ्यावर हास्य दिसले होते – पंतप्रधानांनी या हास्यामागचे कारण विचारले. तिने उत्तर दिले की ती मनातच त्या चेंडूला ‘माझ्याकडे ये’ असे सांगत होती आणि जेव्हा तो खरोखरच तिच्याकडे आला तेव्हा ती आपले हसू दाबून ठेवू शकली नाही. पंतप्रधानांनी हसत हसत सांगितले की शफालीला इतका विश्वास होता की जणू हा चेंडू आता इतरत्र जाणारच नाही. त्यावर तिने उत्तर दिले की जर तो इतरत्र गेला असता तर तिने नक्कीच झेप घेऊन तो पकडला असता.
पंतप्रधानांनी जेव्हा जेव्हा रॉड्रीग्जला त्या क्षणी तिच्या भावना काय होत्या असा प्रश्न विचारला तेव्हा ती म्हणाली की तो उपांत्य फेरीचा सामना होता आणि भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध अनेक वेळा अगदी थोड्या फरकाने सामने गमावले होते, त्यामुळे तिचे एकमेव लक्ष्य होते – सामना जिंकणे आणि शेवटपर्यंत खेळणे. संपूर्ण संघ एकमेकांना सांगत होता की आपल्याला एका दीर्घ भागीदारी जमली की सामना आपल्या खिशात असेल. त्याच विश्वासामुळे सामना जिंकण्यासाठी सर्वांनी सामूहिक आणि सांघिक प्रयत्न केले, असे तिने सांगितले. जरी तिने शतक झळकावले असले तरी, या विजयाचे श्रेय तिने हरमनप्रीत कौर, दीप्ती, रिचा आणि अमनज्योत यांच्या योगदानाला दिले. यांच्याच प्रभावी खेळीमुळे संघाला विजय मिळवता आला, असे ती म्हणाली. प्रत्येकाला विश्वास होता की ‘आपण हे करू शकतो’ आणि त्यांनी ते सिद्ध केले असे ती म्हणाली.
विश्वचषक जिंकण्याचा भारतीय संघाचा अनुभव, तीन सामने गमावल्यानंतर संघाने आत्मविश्वास कसा परत मिळवला, आणि आत्मविश्वास परत मिळवण्याचा प्रवास कसा होता, हे जाणून घेण्यास पंतप्रधान उत्सुक होते, असे जेमीमाने सांगितले.
विश्वचषक जिंकणे ही आपल्याबरोबरच आपल्या गावातील लोकांसाठीही वैयक्तिक अभिमानाची गोष्ट होती, असे क्रांती गौड म्हणाली. जेव्हा जेव्हा ती गोलंदाजी करायची तेव्हा हरमनप्रीत कौर तिला सांगायची की ‘पहिला बळी तूच घेणार आहेस’. या शब्दांनी तिला उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी नेहमीच प्रेरित केले, असेही तिने सांगितले.
क्रांतीने यावेळी तिच्या मोठ्या भावाला क्रिकेटबद्दल वाटणारे प्रेम आणि पंतप्रधानांबद्दल वाटणारे कौतुक याची देखील माहिती दिली. वडिलांची नोकरी गेल्यामुळे तिच्या भावाला अकादमीत प्रवेश घेता आला नव्हता, मात्र अनौपचारिक पातळीवर त्याने क्रिकेट खेळणे सुरूच ठेवले. भावाकडून प्रेरणा घेऊन, क्रांती टेनिस बॉलसह मुलांमध्ये क्रिकेट खेळू लागली. आमदार चषक या स्थानिक लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत, आजारी असलेल्या एका खेळाडूच्या जागी खेळण्याची विनंती क्रांतीला करण्यात आली आणि याबरोबरच तिचा क्रिकेट विश्वातील औपचारिक प्रवास सुरु झाला. लांब केस असूनही क्रांतीला संघात आमंत्रित करण्यात आले आणि या पहिल्याच सामन्यात तिने दोन गडी बाद केले तसेच 25 धावा करून सामना वीर म्हणून बक्षीस मिळवले. याच क्षणी तिची क्रिकेटमधील कारकीर्द सुरु झाली.
शफाली वर्मा हिला शेवटच्या दोन सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली याची दखल पंतप्रधानांनी घेतली. या सामन्यांसाठी बोलावणे येण्यापूर्वी ती देशांतर्गत क्रिकेट खेळत होती. प्रतीकासोबत जे झाले ते दुर्दैवी होते आणि कोणताच खेळाडू, दुसऱ्या एखाद्या खेळाडूसाठी अशी इच्छा करणार नाही हे शफालीने आवर्जून नमूद केले. मात्र, जेव्हा संघात खेळण्यासाठी बोलावण्यात आले तेव्हा तिने आत्मविश्वास दाखवला आणि संपूर्ण संघाने तिच्यावर विश्वास ठेवला असे ती म्हणाली. कोणत्याही प्रकारे संघाला जिंकण्यात मदत करण्याचा दृढनिश्चय तिने केला होता.
प्रतीका रावल हिने सांगितले की तिला दुखापत झाल्यावर, संघातील अनेक जणींनी प्रतीकासाठी विश्वचषक जिंकण्याची इच्छा बोलून दाखवली. जरी ती अधिकृतरित्या संघाचा भाग नव्हती, आणि संघातील 16व्या क्रमांकावरील खेळाडू होती तरीही तिला पारितोषिक वितरण समारंभाच्या वेळी व्हीलचेअरवर बसवून व्यासपीठावर आणण्यात आले आणि संपूर्ण सन्मान तसेच आदर देण्यात आला असे तिने सांगितले. हा संघ म्हणजे एक कुटुंब असून येथे प्रत्येक क्रिकेटपटूला समान वागणूक दिली जाते आणि जेव्हा असा संघ एकत्रितपणे खेळायला मैदानात उतरतो तेव्हा त्यांना पराभूत करणे कठीण असते अशा शब्दात तिने तिच्या भावना व्यक्त केल्या.हा संघ खरोखरच अंतिम सामना जिंकण्यासाठी पात्र होता असे ठाम प्रतिपादन तिने केले. संघभावना ही केवळ मैदानावरच नव्हे तर मैदानाबाहेर देखील अत्यंत महत्त्वाची असते यावर अधिक भर देत पंतप्रधानांनी प्रतीकाच्या म्हणण्याला दुजोरा दिला. पंतप्रधान म्हणाले की एकत्र वेळ घालवण्यामुळे एकमेकांशी नाते निर्माण होते आणि एकमेकांचे कच्चे दुवे आणि सामर्थ्य स्थळे समजून घेतल्यामुळे एकमेकांचा उणेपणा झाकण्यात आणि पाठींबा देण्यात मदत होते.
त्यानंतर मोदी म्हणाले की एक विशिष्ट कॅच फार प्रसिध्द झाला आहे. अमनजोत कौर म्हणाली की तिने यापूर्वी असे अनेक कॅच पकडलेले असले तरी त्यापैकी कोणालाच इतकी प्रसिद्धी मिळाली नव्हती आणि थोडे अडखळल्यानंतर त्यातून छान वाटते आहे. पंतप्रधान म्हणाले की तो कॅच सामन्याला निर्णायक वळण देणारा ठरला आणि तो घेतल्यानंतर अमनजोत कौर हिला डोळ्यांसमोर नक्कीच विजयी चषक दिसायला लागला असेल. यावर प्रतिसाद देत अमनजोत म्हणाली की तिला खरोखरच त्या कॅचच्या वेळी चषक दिसला. ती म्हणाली की आनंद साजरा करण्यासाठी तिच्यावर उड्या घेणाऱ्या लोकांमुळे ती भारावून गेली होती.
याआधी सुर्यकुमार यादवने अशाच प्रकारचा कॅच पकडला होता याचा उल्लेख करत पंतप्रधानांनी एका खेळाडूचा प्रभावी वाटलेला कॅच त्यांनी रिट्विट केला होता अशी आठवण त्यांनी सांगितली.
हरलीन कौर देओल हिने इंग्लंड येथे अशाच पद्धतीच्या कॅचचा दीर्घकाळ सराव करत असतानाची एक आठवण सर्वांना सांगितली. ती म्हणाली की क्षेत्ररक्षणादरम्यान तिने एक कॅच सोडला आणि त्यानंतर उत्तम क्षेत्र रक्षकाने अशाप्रकारे कॅच सोडता कामा नये असे सांगत हरमनप्रीत कौर हिने तिला कडक शब्दात समाज दिली अशी आठवण तिने सर्वांना सांगितली. त्यावेळी तिच्या मागे उभ्या असलेल्या जेमिमा हिने तिला धीर देत सांगितले की हा कॅच तिला सहज शक्य असा होता. हरलीन कौर म्हणाली की तिने पुढील दोन ओव्हर्स मध्ये एक उत्तम कॅच घेण्याचे वचन दिले आणि त्यानंतर लगेचच तिच्याकडे चेंडू आल्याने तिने कॅच पकडला. पंतप्रधान विनोदाने म्हणाले की आव्हानाने चांगलाच परिणाम साधला.
पंतप्रधान म्हणाले की, रिचा घोष जेव्हा खेळते तेव्हा नेहमीच जिंकते असे दिसते. त्यावर उत्तर देत रिचा म्हणाली की तिला नक्की माहित नाही पण तिने 19 वर्षांखालील, ज्येष्ठ गटातील, तसेच डब्ल्यू पी एल अशा अनेक स्पर्धांमध्ये चषक जिंकला आहे. तसेच दूर अंतरावरील अनेक सिक्सर मारले आहेत.ती पुढे म्हणाली की, बॅटिंग करताना, विशेषतः सिक्सर मारताना तिच्यावर हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना यांसारख्या सहकाऱ्यांकडून नेहमीच विश्वास मिळाला आहे. जेव्हा कमी चेंडू शिल्लक असतात आणि जास्त धावा करायच्या असतात अशा अति दबावाच्या परिस्थितीत संपूर्ण संघाने तिच्या क्षमतेवर विश्वास ठेवला असे तिने सांगितले. याच विश्वासाने आपल्याला आत्मविश्वास दिला आणि प्रत्येक सामन्यात तो देहबोलीतून दिसून आला असे ती म्हणाली.
आणखी एक खेळाडू, राधा यादव हिने आठवण सांगितली की तीन सामन्यांमध्ये पराभव होऊनही त्या पराजयाच्या वेळी त्यांच्यातील ऐक्य हा फार महत्त्वाचा भाग होता. सगळ्यांनी एकमेकाला पाठींबा दिला आणि सच्च्या तसेच खऱ्या मदतीसह खुलेपणाने विचार व्यक्त केले. याच सामुहिक भावनेमुळे त्यांना विजयी चषक मिळाला असा विश्वास तिने यावेळी व्यक्त केला. त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, सर्व खेळाडूंच्या अथक मेहनतीमुळे त्यांना हा विजय मिळाला आहे. त्यांनी राधा हिला विचारले की तिने स्वतःला अशा कामगिरीसाठी कसे तयार केले. त्यावर उत्तर देत राधा म्हणाली की बऱ्याच काळापासून आमचा संघ उत्तम दर्जाचे क्रिकेट खेळत होता आणि तंदुरुस्ती, क्षेत्ररक्षण किंवा कौशल्ये अशा प्रत्येक बाबतीत स्वतःला सज्ज करत होता....एकत्र राहण्यामुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या, एकटीने तयारी करणे कठीण झाले असते हे सांगण्यावर तीने अधिक भर दिला. तिने तिच्या बक्षिसाची रक्कम वडिलांना मदत करण्यासाठी दिली याचा पंतप्रधानांनी आवर्जून उल्लेख केला. याला दुजोरा देत राधा म्हणाली की, तिच्या कुटुंबाने अनेक अडचणींना तोंड दिले आहे, मात्र तिचे वडील किंवा आई यांनी या अडचणींचा तिच्या प्रवासावर परिणाम होऊ दिला नाही.
स्नेह राणा हिने अनेक वर्षे केलेल्या कठोर परिश्रमांबद्दल सांगितले. त्यांचे गोलंदाजी प्रशिक्षक अविष्कार साळवी यांच्याशी, ठराविक फलंदाजांना तोंड देण्याविषयी रणनीती ठरवण्यासाठी ती नियमितपणे कशी चर्चा करत असे, तेही तिने सांगितले. कर्णधार, उपकर्णधार, प्रमुख प्रशिक्षक यांच्याशी रणनीतींविषयी समन्वय साधला जात असे आणि नंतर त्या मैदानावर प्रत्यक्षात उतरवल्या जात. प्रत्येकच सामना काही नियोजनानुसार खेळता येत नसे, तथापि, पुढच्या संधीच्या वेळी सुधारणा करण्याची प्रेरणा त्या सर्वच जणींकडे असे.
पंतप्रधानांसमोर बोलताना भारावून गेल्याची भावना उमा छेत्रीने व्यक्त केली. तेव्हा मनात जे येईल ते बोलण्याची मुभा देऊन त्यांनी तिला प्रोत्साहन दिले. त्यावर तिने सांगितले की--- तिच्या अन्य निरनिराळ्या पदार्पणांच्या वेळी पाऊस पडला होता तसाच विश्वचषक स्पर्धेतील तिच्या पहिल्या सामन्याच्या वेळीही पाऊस पडला. तिने यष्टिरक्षणच केले परंतु, विश्वचषकाच्या स्पर्धेत भारताकडून प्रथम खेळणे हा क्षणच भव्य होता ! देशासाठी खेळण्याच्या भावनेने तिला उचंबळून आले होते आणि भारताला विजय मिळवून देण्यासाठी आपला सर्वोत्तम खेळ करण्याचा तिचा निश्चय होता. संपूर्ण संघाने तिच्यावर विश्वास ठेवला आणि सतत तिला मार्गदर्शन आणि प्रोत्साहनाचे पाठबळ दिले, याबद्दल तिला अतिशय कृतज्ञभाव वाटत आला आहे. भारतासाठी खेळणारी ती पहिली ईशान्य भारतीय खेळाडू आहे, असे प्रशिक्षकांनी आवर्जून सांगितले. ती आसामची आहे, याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष दखल घेतली.
रेणुका सिंग ठाकूर हिच्याशी बोलताना पंतप्रधानांनी विचारले, की तिने आल्याबरोबर मोर पाहिले का... मोर पाहिल्याचे सांगत, तिने तिला केवळ मोराचेच चित्र काढता येत असल्याचे सांगितले. तसे चित्र रेखाटून तिने ठेवून दिले होते. तिला इतर कशाचेच चित्र काढता येत नसे, आणि दुसऱ्या कोणत्याही पक्ष्याचे चित्र काढण्यापासून तिला परावृत्त करण्यात आले होते, असेही तिने कबूल केले. तिच्या आईने तिला एकटीने वाढवले असल्याचा उल्लेख करत पंतप्रधानांनी त्यांच्याविषयी अपार आदराची भावना व्यक्त केली. आयुष्याच्या अवघड वाटचालीत तिच्या संगोपनासाठी आणि प्रगतीसाठी आईने केलेल्या डोळस कष्टांची दखल पंतप्रधानांनी घेतली. रेणुका सिंगने आपल्या आईला पंतप्रधानांच्या वतीने शुभेच्छा पोहोचवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांशी बोलताना अरुंधती रेड्डी म्हणाली, की तिच्या आईने पंतप्रधानांना एक संदेश पाठवला आहे- आणि ते तिचे आदर्श / 'हिरो' आहेत- असे सांगितले आहे. तिच्या हिरोशी प्रत्यक्ष भेट कधी होणार, हे विचारायला आईने चार ते पाच वेळा फोन केल्याचेही तिने सांगितले.
मैदानातील यशानंतर आता देशाला खेळाडूंकडून काय हवे असेल, असे त्यांना वाटते- असा प्रश्न पंतप्रधानांनी विचारला. यावर स्मृती म्हणाली- "प्रत्येक वेळी विश्वचषकाची तयारी करताना त्यांच्या मनात खात्री असते की- 'चषक जिंकल्याने महिला क्रिकेटवरच नव्हे तर भारतातील एकूणच महिला क्रीडाप्रकारांवर प्रचंड सकारात्मक प्रभाव पडणार आहे'. या विजयामुळे क्रीडाक्षेत्रात एक क्रांती उत्पन्न होईल, आणि त्या परिवर्तनाला दिशा देण्याची क्षमता या संघाकडे निश्चितपणे आहे, असेही तिने सांगितले.
पंतप्रधानांनी अभिप्राय दिला की- त्यांच्या या उत्तुंग यशामुळे त्यांना प्रचंड प्रेरक शक्ती प्राप्त झाली आहे. आता मायदेशी परतल्यावर घरी जाऊन त्यांनी त्यांच्या शाळांमध्ये जावे, आणि तेथील विद्यार्थ्यांशी गप्पा मारत एक दिवस व्यतीत करावा- असे पंतप्रधानांनी सुचवले. "मुले अनेक प्रश्न विचारतील आणि त्यांना आयुष्यभर लक्षात ठेवतील आणि हा अनुभव तुम्हा खेळाडूंनाही प्रेरणा देऊन जाईल." असे पंतप्रधान म्हणाले. त्यानंतर त्यांनी असा प्रस्ताव मांडला की- तीन शाळांची निवड करावी आणि दरवर्षी एका शाळेला भेट द्यावी- जेणेकरून खेळाडूंना आणि विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळत राहील.
देशातील स्थूलतेचा प्रश्न सोडवण्यासाठी 'फिट इंडिया' चळवळीत योगदान देण्याचे महत्त्व पंतप्रधानांनी विशद केले. तेल खरेदी करतानाच 10% कमी करून तेल खाण्याचे प्रमाण घटवावे असा सल्ला देत, खेळाडूंकडून असे संदेश प्रसारित होण्याने त्याचा खोलवर प्रभाव पडेल, असे पंतप्रधान म्हणाले. 'फिट इंडिया' साठी- विशेषतः मुलींच्या सुदृढतेसाठी- प्रसार करण्यास आणि सक्रिय योगदान देण्यास त्यांनी खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
या खेळाडूंशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याबद्दलचा आनंद पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. ते पूर्वीही काही खेळाडूंना भेटले होते, तर अनेकांशी पहिल्यांदाच भेट झाली, असेही त्यांनी नमूद केले. त्यांना भेटण्यास सदैव उत्सुकता वाटेल, असे सांगत पंतप्रधानांनी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावर स्मृती मंधाना म्हणाली, की संघातील सर्व खेळाडू निश्चितपणे त्यांचे शब्द लक्षात ठेवतील आणि जेव्हाजेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा हा संदेश प्रसारित करतील. अशा संदेशांना पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण संघ कायम तयार असेल आणि जेव्हा बोलावले जाईल तेव्हा निश्चितपणे येईल- अशी ग्वाही तिने दिली.
"आपण सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्नांनी देशाला पुढे नेले पाहिजे", असे सांगत पंतप्रधानांनी या संवादसत्राचा समारोप केला आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या.
* * *
निलिमा चितळे/नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/वासंती जोशी/श्रद्धा मुखेडकर/संजना चिटणीस/जाई वैशंपायन/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2187026)
Visitor Counter : 11
Read this release in:
Malayalam
,
Khasi
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu