संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पोलीस स्मृतिदिन : नवी दिल्लीतील राष्ट्रीय पोलीस स्मारकावर संरक्षण मंत्र्यांनी पुष्पचक्र अर्पण करून वाहिली भावपूर्ण आदरांजली

Posted On: 21 OCT 2025 3:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर  2025

21 ऑक्टोबर 2025रोजी पोलीस स्मृतीदिनानिमित्त, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीतील राष्ट्रीय पोलीस स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केले. 1959 साली याच दिवशी 10 शूर पोलीस कर्मचाऱ्यांनी लडाखमधील हॉट स्प्रिंग्ज येथे चिनी सैन्याने केलेल्या हल्ल्यात प्राण गमावले होते.

संरक्षण मंत्र्यांनी  यावेळी संबोधित करताना, या शहीद वीरांना श्रद्धांजली वाहिली, पोलिस आणि निमलष्करी दलांनी केलेल्या देशसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सशस्त्र दले आणि पोलीस दले राष्ट्रीय सुरक्षेचे स्तंभ असल्याचे  प्रतिपादन करून सशस्त्र दले देशाचे आणि देशाच्या एकात्मतेचे रक्षण करतात, तर पोलीस दल समाज आणि सामाजिक एकात्मतेचे रक्षण करतात. "लष्कर आणि पोलीस वेगवेगळ्या स्तरांवर  काम करतात पण त्यांचे ध्येय एकच असते- राष्ट्राचे संरक्षण. आज 2047 पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य गाठण्याच्या दिशेने आपण वाटचाल करत असताना, देशाच्या बाह्य आणि अंतर्गत सुरक्षेचे संतुलन राखणे पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त महत्त्वाचे आहे." असे ते म्हणाले.

अलीकडीच्या आव्हानांविषयी बोलताना, राजनाथ सिंह म्हणाले की, सीमांवर अस्थिरता असताना, समाजात नवीन प्रकारचे गुन्हे, दहशतवाद आणि वैचारिक वाद-युद्धे होत आहेत. गुन्हेगारी अधिक संघटित, अदृश्य आणि गुंतागुंतीची होत आहेत. समाजात अराजकता निर्माण करणे, विश्वास दुर्बल करणे आणि राष्ट्राच्या स्थिरतेला आव्हान देण्याचा त्याचा उद्देश असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

समाजात विश्वास राखण्याचे नैतिक कर्तव्य पार पाडतानाच गुन्हेगारी रोखण्याची जबाबदारी पार पाडत असल्याबद्दल संरक्षणमंत्र्यांनी पोलिसांचे कौतुक केले. "आपल्या सतर्क सशस्त्र दलांवरील आणि सतर्क पोलिसांवरील विश्वासामुळेच आज नागरिक शांतपणे झोपतात. हा आत्मविश्वास आपल्या देशाच्या स्थिरतेचा पाया आहे," असं ते म्हणाले.

दीर्घकाळापासून नक्षलवाद अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने एक आव्हान होते, याकडे लक्ष वेधत राजनाथ सिंहांनी पोलीस, सीआरपीएफ, बीएसएफ आणि स्थानिक प्रशासनाच्या एकत्रित आणि संघटित प्रयत्नांमुळे ही समस्या वाढली नसल्यावर भर दिला. तसंच डाव्या कट्टरतेचा   प्रभाव असलेल्या क्षेत्रातील लोकांनी सुटकेचा श्वास सोडला असल्याचं ते म्हणाले. येत्या मार्चपर्यंत ही समस्या संपेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार करत  या दिशेने  पोलिस दलांच्या योगदानाची त्यांनी प्रशंसा केली.  "बऱ्याच काळापासून, एक राष्ट्र म्हणून,  पोलिसांच्या योगदानाला पूर्णपणे ओळखले नव्हते. तथापि, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली, सरकारने 2018 मध्ये राष्ट्रीय पोलिस स्मारकाची स्थापना केली. याव्यतिरिक्त, पोलिसांना अत्याधुनिक शस्त्रे आणि सुधारित सुविधा प्रदान केल्या आहेत. त्यांच्याकडे आता देखरेख प्रणाली, ड्रोन, न्यायवैद्यक प्रयोगशाळा  आणि डिजिटल पोलिसिंग अशी आधुनिक उपकरणे आहेत. पोलिस दलांच्या आधुनिकीकरणासाठी राज्यांना पुरेशी संसाधने देखील पुरवली जात आहेत,” असे ते म्हणाले. राजनाथ सिंह यांनी संसाधनांचा इष्टतम वापर करण्याचे आवाहन केले. हे  सुरक्षा एजन्सींमधला  समन्वय आणि एकात्मतेद्वारे साध्य केले जाऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

समाज आणि पोलिस हे परस्पर पूरक आहेत हे अधोरेखित करून, सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत आणि सतर्क करण्यासाठी दोघांमधील संतुलित संबंध राखण्याची गरज असल्याचे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. 

या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून केंद्रीय सशस्त्र पोलिस दल आणि दिल्ली पोलिसांची संयुक्त परेड आयोजित करण्यात आली होती. केंद्रीय गृह राज्यमंत्री बंडी संजय कुमार आणि पोलिस क्षेत्रातील अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.


निलीमा चितळे/विजयालक्ष्मी साळवी-साने/हेमांगी कुलकर्णी/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 2181230) Visitor Counter : 11