पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आयएनएस विक्रांतवर सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 20 OCT 2025 2:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर 2025

भारत माता की जय!

भारत माता की जय!

भारत माता की जय!

आजचा हा दिवस अद्भुत आहे, आजचा हा क्षण संस्मरणीय आहे, हे दृश्य अद्भुत आहे. आज माझ्या एका बाजूला अथांग समुद्र आहे तर दुसऱ्या बाजूला भारतमातेच्या वीर सैनिकांचे अथांग सामर्थ्य आहे. आज माझ्या एका बाजूला अनंत क्षितिज आहे तर दुसऱ्या बाजूला अनंत शक्तींना सामावून घेणारे हे विशाल, विराट आयएनएस विक्रांत आहे. सागराच्या पाण्यावर सूर्याच्या किरणांची ही चमक एका प्रकारे वीर जवानांनी उजळवलेले दिवाळीचे दिवे आहेत. या आमच्या अलौकिक दीपमाळा आहेत, यावेळी नौदलाच्या तुम्हा सर्व शूर सैनिकांमध्ये मी दिवाळीचे पवित्र पर्व साजरे करत आहे हे माझे भाग्य आहे.

मित्रांनो,

आयएनएस विक्रांत वर व्यतित केलेली कालची रात्र, हा अनुभव शब्दात सांगणे कठीण आहे. मी पाहात होतो, ज्या उत्साहाने तुम्ही ओसंडून  गेला होतात आणि ज्यावेळी मी पाहिले की तुम्ही स्वरचित गीते गायली आणि तुम्ही ज्या प्रकारे ऑपरेशन सिंदूरचे वर्णन केले, कदाचित एखाद्या कवीला देखील ही अनुभूती व्यक्त करता येणार नाही, जे युद्धाच्या मैदानात उभे असलेले जवान करू शकतील. एका बाजूला मी पाहात होतो, सैन्य शक्तीला

मित्रांनो,

ही मोठ-मोठी जहाजे, हवेपेक्षाही जास्त वेगाने उडणारी विमाने, या पाणबुड्या, या आपल्या जागी आहेत. मात्र जो जोश  तुमच्यात आहे ना, तो  त्यांना आणखी जास्त चैतन्यमय  बनवतो. ही जहाजे लोखंडाची असली तरी  जेव्हा तुम्ही त्यावर स्वार होता ना, त्यावेळी ती शूर जिवंत सैन्य बनतात. मी कालपासून तुमच्यामध्ये आहे. प्रत्येक  क्षणात मला  काही ना काही शिकता आले आहे, काही ना काही जाणून घेतले आहे. ज्यावेळी दिल्लीहून निघालो होतो, तेव्हा मनात येत होते की मी देखील या क्षणाचा पुरेपूर आनंद घ्यावा.

पण मित्रांनो,

तुम्हा लोकांचे परिश्रम, तुमची तपश्चर्या, तुम्हा लोकांची साधना, तुम्हा लोकांचे समर्पण इतक्या उंचीवर आहे, इतक्या उंचीवर आहे की मी त्याची अनुभूती घेऊ शकलो नाही. पण नक्कीच जाणून घेऊ शकलो आहे, जाणले आहे. हे जीवन किती खडतर असेल याचा अंदाज मी लावू शकतो. पण ज्यावेळी तुमच्या जवळ राहून तुमच्या डोळ्यातील चमक पाहात होतो, तुमच्या हृदयातील धडधड जाणून घेत होतो, तेव्हा मी रात्री जेव्हा झोपलो, काल थोडा लवकर झोपलो,एरव्ही कधी मी लवकर झोपत नाही. कदाचित लवकर झोपण्याचे हे कारण असू शकेल की तुम्हाला ज्यावेळी काल दिवसभर पाहिले, तेव्हा आतमध्ये समाधानाची जी भावना होती, ती झोप माझी नव्हती, समाधानाची झोप होती.

मित्रांनो, 

समुद्राची गहिरी रात्र आणि सकाळचा सूर्योदय, माझी दिवाळी अनेक अर्थाने विशेष बनली आहे आणि म्हणूनच इथे पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप-खूप शुभेच्छा. तुम्हाला देखील शुभेच्छा आणि आयएनएस विक्रांतच्या या वीर भूमीवरून कोटी-कोटी देशवासियांना देखील दिवाळीच्या खूप-खूप शुभेच्छा आणि विशेषतः तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या खूप-खूप शुभेच्छा.

मित्रांनो,

दिवाळीच्या पर्वात प्रत्येकालाच आपल्या कुटुंबियांसमवेत दिवाळी साजरी करावीशी वाटत असते. मला देखील माझ्या कुटुंबियांसमवेत दिवाळी साजरी करण्याची सवय झाली आहे आणि म्हणूनच तुम्ही जे माझे कुटुंबीय आहात ना, त्यांच्यामध्ये राहून दिवाळी साजरी करण्यासाठी जात असतो. आज तुमच्यासमवेत आलो आहे आणि मी देखील ही दिवाळी माझ्या कुटुंबियांसमवेत साजरी करत आहे आणि म्हणूनच ही दिवाळी माझ्यासाठी विशेष आहे.

मित्रांनो,

मला आठवते की ज्यावेळी आयएनएस विक्रांत देशाकडे  सुपूर्द केली  जात होती, त्यावेळी मी सांगितले होते की विक्रांत विशाल आहे, विराट आहे, विहंगम आहे. विक्रांत विशिष्ट आहे, विक्रांत विशेष देखील आहे, विक्रांत केवळ एक युद्धनौका नाही आहे, ती 21व्या शतकातील भारताचे परिश्रम, प्रतिभा, प्रभाव आणि वचनबद्धतेचा दाखला आहे. आपणा सर्वांना आठवत असेल, ज्या दिवशी देशाला स्वदेशी आयएनएस विक्रांत मिळाली होती, त्याच दिवशी भारतीय नौदलाने गुलामगिरीच्या एका मोठ्या प्रतीक चिन्हाचा त्याग केला होता. आपल्या नौदलाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने नव्या ध्वजाचा स्वीकार केला होता.

छत्रपती शिवाजी महाराज की जय! छत्रपती शिवाजी महाराज की जय! छत्रपती शिवाजी महाराज की जय! 

मित्रांनो,

आपली आयएनएस विक्रांत आज आत्मनिर्भर भारत आणि मेड इन इंडियाचे खूप मोठे प्रतीक आहे. महासागराच्या लाटांना कापत जाणारी, स्वदेशी आयएनएस विक्रांत भारतीय सैन्याच्या क्षमतेचे प्रतिबिंब आहे. अगदी काही महिन्यांपूर्वीच आपण पाहिले आहे, विक्रांतने आपल्या नावानेच संपूर्ण पाकिस्तानची झोप उडवली होती. जिचे केवळ नावच शत्रूच्या साहसाचा अंत करेल, ती आहे आयएनएस विक्रांत! ती आहे आयएनएस विक्रांत!

मित्रांनो, 

या प्रसंगी मी आपल्या सैन्यदलांना विशेषत्वाने सॅल्यूट करत आहे. भारतीय नौदलाने निर्माण केलेले भय, जे भय निर्माण केले आहे. भारतीय नौदलाने दर्शन घडवलेल्या अद्भुत कौशल्याने, भारतीय सैन्याच्या धाडसाने, तिन्ही सैन्यदलांच्या जबरदस्त समन्वयाने ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानला इतक्या लवकर गुडघे टेकायला भाग पाडले होते आणि म्हणूनच मित्रांनो, आज मी पुन्हा एकदा आयएनएस विक्रांतच्या या पवित्र साधना स्थळावरून, पराक्रम स्थळावरून, तिन्ही सैन्यदलांच्या शूर जवानांना पुन्हा एकदा सॅल्यूट करतो.

मित्रांनो,

ज्यावेळी शत्रू समोर असेल, युद्धाची शक्यता असेल, ज्यावेळी आपल्या स्वतःच्या बळावर युद्ध करण्याची ज्याच्याकडे ताकद असेल त्याचे पारडे नेहमीच जड असते. सैन्यदले सशक्त होण्यासाठी त्यांचे आत्मनिर्भर बनणे अतिशय आवश्यक आहे. हे वीर जवान या मातीत जन्माला आले आहेत, याच भूमीवर  मोठे झाले आहेत, ज्या मातेच्या कुशीतून त्यांनी जन्म घेतला आहे, ती माता देखील याच मातीत वाढली आहे आणि म्हणूनच या मातीसाठीच आहुती देण्यासाठी , या मातीच्या सन्मानासाठी स्वतःला समर्पित करण्याची प्रेरणा तो राखून आहे. जगातील साडेसहा फुटांचे तंदुरुस्त ताकदवान जवानांना आणून मी उभे करेन आणि सांगेन, तुम्हाला खूप पैसे देईन, युद्ध करा. ते तुमच्यासारखे प्राणांची बाजी लावण्यासाठी  तयार होतील? तुमच्यासारखे बलिदान देतील ? जी ताकद तुमच्या भारतीय असण्यात आहे, जी ताकद तुमचे जीवन भारताच्या मातीशी ज्या प्रकारे जोडलेले आहे, तशाच प्रकारे आपले प्रत्येक अवजार, आपले प्रत्येक शस्त्र, त्याचा  प्रत्येक सुटा भाग जस-जसा भारतीय होत जाईल, तसतशी आपली ताकद चहुबाजूने वाढेल. गेल्या एका दशकापासून आपले सैन्यदल अतिशय वेगाने आत्मनिर्भरतेच्या दिशेने पावले टाकत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आपल्या सशस्त्र दलांनी अशा हजारो वस्तूंची यादी तयार केली आणि त्यांची आयात न करण्याचा निर्णय घेतला. परिणामी, लष्करासाठी आवश्यक असलेली बहुतेक उपकरणे आता स्वदेशातच बनवली जातात. गेल्या अकरा वर्षांमध्ये आपले संरक्षण उत्पादन तिप्पटीपेक्षा जास्त  झाले आहे. गेल्या वर्षी ते विक्रमी दीड लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले होते. मी आणखी एक उदाहरण सांगू इच्छितो: 2014 सालापासून, नौदलाला भारतीय शिपयार्डमधून 40 पेक्षा जास्त स्वदेशी युद्धनौका आणि पाणबुड्या मिळाल्या आहेत. नागरिक हो, तुम्ही जिथे जिथे माझे बोलणे ऐकत असाल तिथे ही आकडेवारी लक्षात ठेवा. आज हे ऐकल्यानंतर तुमचे दिवाळीचे दिवे आणखी तेजाने उजळतील याची मला खात्री आहे. मला जे सांगायचे आहे ते म्हणजे, आज आपली क्षमता काय आहे: सरासरी दर 40 दिवसांत एक नवीन स्वदेशी युद्धनौका किंवा पाणबुडी नौदलात समाविष्ट केली जात आहे - दर 40 दिवसांत एक.

मित्रहो,

ब्रह्मोस आणि आकाश सारख्या आपल्या क्षेपणास्त्रांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये त्यांची क्षमता सिद्ध केली आहे. ब्रह्मोसचा फक्त उल्लेखच अनेक लोकांना ते येते आहे की काय अशी  चिंता निर्माण करतो! आता जगभरातील अनेक देशांना ही क्षेपणास्त्रे खरेदी करायची आहेत. मला जगभरात भेटणाऱ्या प्रत्येकाची एक समान इच्छा आहे: त्यांच्याकडे ती असावीत. भारत तिन्ही सशस्त्र दलांसाठी शस्त्रे आणि उपकरणे निर्यात करण्याची क्षमता निर्माण करत आहे. जागतिक स्तरावर अव्वल संरक्षण निर्यातदारांपैकी एक बनण्याचे आमचे ध्येय आहे. गेल्या दशकात आमची संरक्षण निर्यात 30 पटीपेक्षा जास्त झाली  आहे आणि या यशात संरक्षण स्टार्टअप्स आणि स्वदेशी संरक्षण एककांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आज, आमचे स्टार्टअप्स देखील त्यांची ताकद दाखवत आहेत.

मित्रहो,

भारताला शक्ती आणि सामर्थ्याची परंपरा लाभली आहे - ज्ञानाय दानाय चा रक्षणाय! म्हणजेच, आपले विज्ञान, आपली समृद्धी आणि आपली शक्ती मानवतेच्या सेवेसाठी आणि संरक्षणासाठी आहे. आज, परस्परांशी जोडलेल्या जगात, देशांची अर्थव्यवस्था आणि प्रगती समुद्री मार्गांवर अवलंबून आहे, अशा काळात भारतीय नौदल जागतिक स्थैर्यामध्ये  महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आज, जगातील 66 टक्के तेल पुरवठा आणि जगातील 50 टक्के कंटेनर शिपमेंट हिंदी महासागरातून जातात. या मार्गांचे संरक्षण करण्यासाठी भारतीय नौदल हिंद महासागराच्या संरक्षकाप्रमाणे तैनात आहे. मित्रहो, आपण  हे काम करत आहात. याशिवाय, मिशन-आधारित तैनाती, चाचेगिरीविरोधी गस्त आणि मानवतावादी मदत परिचालनाद्वारे, भारतीय नौदल या संपूर्ण प्रदेशात जागतिक सुरक्षा भागीदाराची भूमिका बजावत आहे.

मित्रहो,

आपल्या बेटांच्या सुरक्षेत आणि अखंडतेत सुद्धा आपले नौदल मोठी भूमिका बजावते आहे. काही काळापूर्वी, आपण 26 जानेवारी रोजी देशातील प्रत्येक बेटावर तिरंगा फडकवण्याचा निर्णय घेतला. आपले नौदल दर 26 जानेवारीला अभिमानाने तो राष्ट्रीय संकल्प पूर्ण करते. मी नौदलाचे अभिनंदन करतो! आज, नौदल भारताच्या प्रत्येक बेटावर तिरंगा फडकवत आहे.

मित्रहो,

आज, भारत वेगाने प्रगती करत असताना, ग्लोबल साउथ देशांनीही आपल्यासोबत वेगाने प्रगती करावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यासाठी आम्ही "महासागर सागरी दृष्टीकोनावर वेगाने काम करत आहोत. आम्ही अनेक देशांच्या विकासात भागीदार होत आहोत आणि गरज पडल्यास, जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात मानवतावादी मदत देण्यासाठी हजर असतो. आफ्रिकेपासून आग्नेय आशियापर्यंत, जग आपत्ती आणि प्रतिकूल परिस्थितीत भारताकडे जागतिक मित्र म्हणून पाहते. 2014 मध्ये मालदीव या आपल्या शेजारी देशाला पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागला आणि आम्ही ऑपरेशन नीर सुरू केले. आमचे नौदल स्वच्छ पाणी घेऊन मालदीवमध्ये पोहोचले. 2017 मध्ये श्रीलंकेला विनाशकारी पुराचा तडाखा बसला आणि मदतीचा हात पुढे करणारा भारत पहिला होता. 2018 मध्ये, इंडोनेशियाला त्सुनामीचा तडाखा बसला. मदत आणि बचाव कार्यात भारत इंडोनेशियाच्या लोकांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिला. त्याचप्रमाणे, म्यानमारमधील भूकंपामुळे झालेला विध्वंस असो किंवा 2019 मध्ये मोझांबिक आणि 2020 मध्ये मादागास्करमधील संकट असो, भारत सेवेच्या भावनेने पुढे आला  आहे.

मित्रहो,

आपल्या  सैन्याने परदेशात अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी वेळोवेळी ऑपरेशन्स राबवली आहेत. येमेनपासून सुदानपर्यंत, जिथे गरज असेल तिथे, तुमच्या शौर्य आणि धाडसाने जगभरातील भारतीयांचा विश्वास बळकट झाला आहे. आम्ही हजारो परदेशी नागरिकांचे प्राण देखील वाचवले आहेत. केवळ भारतीयच नाही तर आम्ही त्या देशांमध्ये अडकलेल्या इतर अनेक देशांच्या नागरिकांना सुद्धा वाचवले आहे आणि परत आणले आहे, त्यांना त्यांच्या घरी पोहोचवले आहे.

मित्रहो,

आपल्या सशस्त्र दलांनी जमिनीवर आणि हवेत, प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येक आघाडीवर त्यांनी समर्पणाने आणि पूर्ण संवेदनशीलतेने देशाची सेवा केली आहे. समुद्रात, आपले नौदल देशाच्या सागरी सीमा आणि व्यावसायिक हितांचे रक्षण करण्यासाठी तैनात आहे. आकाशात, आपले हवाई दल भारताच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध आहे आणि जमिनीवर, उष्ण वाळवंटांपासून ते ग्लेशियरपर्यंत, आपले सैन्य, आपले बीएसएफ आणि आपले आयटीबीपी जवान  अभेद्य  खडकाप्रमाणे ठामपणे उभे आहेत. त्याचबरोबर विविध आघाड्यांवर, एसएसबी, आसाम रायफल्स, सीआरपीएफ, गुप्तचर संस्थां,सीआयएसएफचे जवान देखील एक युनिट म्हणून अखंडपणे भारतमातेच्या सेवेसाठी उभे आहेत. आज, मी भारतीय तटरक्षक दलाचेही कौतुक करू इच्छितो! ते ज्या प्रकारे नौदलाशी समन्वय साधत आपला किनारा सुरक्षित करण्यासाठी दिवसरात्र तैनात राहतात, राष्ट्रीय संरक्षणाच्या या महान यज्ञात त्यांचे योगदान मोठे आहे.

मित्रहो,

आपल्या सुरक्षा दलांच्या शौर्यामुळे आणि धाडसामुळे, देशाने अलिकडच्या वर्षांत आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे. हा टप्पा म्हणजे माओवादी दहशतीचा नायनाट! आज देश नक्षलवादी-माओवादी दहशतीपासून मुक्तीच्या मार्गावर आहे; मुक्ती दार ठोठावत आहे, मित्रांनो. 2014 पूर्वी देशभरातील सुमारे  125 जिल्हे माओवादी हिंसाचाराच्या विळख्यात होते. गेल्या 10 वर्षांच्या कठोर परिश्रमामुळे या 125 जिल्ह्यांची संख्या सातत्याने घटते आहे, त्यांचे प्रमाण कमी होत चालले आहे, सतत कमी होते आहे.

आणि आता सव्वाशेवरून घटून फक्त 11 राहिले आहेत. त्या 11 पैकीही ज्या जिल्ह्यांमध्ये अजून थोडाफार त्यांचा प्रभाव दिसतो आहे, अशा जिल्ह्यांची संख्या फक्त 3 आहे. म्हणजे 125 पैकी फक्त 3. शंभरहून अधिक जिल्हे माओवादी दहशतीतून पूर्णपणे मुक्त होऊन पहिल्यांदाच मोकळ्या हवेत श्वास घेत आहेत. यंदा ते शानदार दिवाळी साजरी करत आहेत. कोट्यवधी लोक अनेक पिढ्यानंतर  पहिल्यांदाच भीतीच्या सावटातून बाहेर पडून विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होत आहेत. ज्या भागांत माओवादी नक्षलवादी रस्ते बनू देत नव्हते, शाळा उघडू देत नव्हते, रुग्णालये बनू देत नव्हते, बांधलेल्या शाळा उडवून देत होते, डॉक्टरांवर गोळ्या झाडत होते, मोबाईल टॉवर लावू देत नव्हते, त्या भागांत आता महामार्ग बनत आहेत, नवे उद्योग उभे राहत आहेत, शाळा आणि रुग्णालये त्या भागातील मुलांचे भविष्य घडवत आहेत. देशाला हे  यश आपल्या सर्व सुरक्षा दलांच्या तप, त्याग आणि शौर्यामुळेच मिळाली आहे आणि मला आनंद आहे की अनेक जिल्ह्यांमध्ये आज पहिल्यांदाच लोक अभिमानाने, सन्मानाने दिवाळी साजरी करत आहेत.

मित्रहो,

मी आज वीर सैनिकांमध्ये उभा आहे. आपण नौसैनिक आहात, प्राण हाती घेऊन चालणे हा तुमच्यासाठी डाव्या हातचा खेळ असतो. पण हे पोलिस दलाचे जवान, जे फक्त हातात लाठी घेऊन चालतात, ज्यांच्याकडे फार साधने नसतात, ज्यांचे प्रशिक्षण नागरिकांबरोबर सौहार्दाने काम करण्याचे असते, त्यांनी बीएसएफ असो, सीआरपीएफ असो, सर्व दलांच्या जवानांनी नक्षलवाद्यांशी जी लढाई लढली आहे, ती कौतुकास्पद आहे. मी आज दिवाळीच्या या पवित्र पर्वावर माझ्या पोलीस दलाच्या जवानांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. मी असे अनेक जवान पाहिले आहेत, ज्यांनी   पाय गमावले आहेत , पण त्यांचे आत्मबल तसेच आहे; कोणाचा हात कापला गेला आहे, कोणाला चाकाच्या खुर्चीवरून उतरणेही अवघड झाले आहे. मी अशा अनेक कुटुंबांना ओळखतो ज्यांना माओवादी नक्षलवाद्यांनी लक्ष्य बनवले, हात -पाय कापले, गावात जगणे कठीण केले. अशा असंख्य लोकांनी शांततेसाठी, नागरिकांचे जीवन सुधारण्यासाठी, मुलांचे भविष्य उज्ज्वल व्हावे म्हणून आपले जीवन अर्पण केले आहे.

मित्रहो,

कदाचित स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पोलिस दलासमोर एवढी मोठी आव्हाने आली 50 वर्षांची ही भयंकर व्याधी संपवून टाकण्यात ते यशस्वी होतील याचा मला विश्वास आहे आणि 90 टक्के प्रकरणांत ते आधीच यशस्वी झाले आहेत. तुम्हाला युद्धाचे चांगले ज्ञान आहे, पण जेव्हा घराच्या आत युद्ध लढावे लागते तेव्हा किती संयम लागतो, किती धैर्य लागते, हे तुम्हाला ठाऊक आहे. एखाद्या निरपराधाचा प्राण  जाऊ नये याची काळजी घेत, त्यांच्या स्वप्नांचे रक्षण करत जे कार्य झाले आहे ते अद्भुत आहे. एक दिवस येईल जेव्हा यावर मोठमोठे ग्रंथ लिहिले जातील आणि `गुरिल्ला` युद्ध करणारे जगभरातील लोक यांच्याकडून शिकतील. अशा प्रकारे नक्षलवाद संपवण्यासाठी, माओवादी दहशत नष्ट करण्यासाठी देशाच्या सामर्थ्याने जे पराक्रम केले आहेत, त्याचा सर्व देशवासीयांना अभिमान आहे. हे आपल्या मातीत घडत आहे, आपल्या देशात घडत आहे.

मित्रहो,

जीएसटी बचत उत्सवात या जिल्ह्यांमध्ये विक्रमी विक्री आणि खरेदी होत आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये माओवादी दहशतीमुळे राज्यघटनेचे नाव घेणेही शक्य नव्हते, राज्यघटनेचे दर्शनही मिळत नव्हते, त्या जिल्ह्यांत आज स्वदेशीचा मंत्र निनादत आहे. आणि जे तरुण पूर्वी भरकटले होते ते आज `थ्री नाॅट थ्री` सोडून राज्यघटनेसमोर नतमस्तक होत  आहेत.

मित्रहो,

आज भारत झपाट्याने पुढे जात आहे. आम्ही  140 कोटी देशवासीयांच्या स्वप्नांची पूर्तता करत आहोत. जमिनीतून अवकाशापर्यंत, जे पूर्वी कल्पनेतही नव्हते, ते यश, आपण आज आपल्या डोळ्यांसमोर पाहत आहोत. ही गती, ही प्रगती, हे परिवर्तन, हा देशाचा विश्वास आणि त्या विश्वासातून जन्मलेला विकासाचा मंत्र आहे. राष्ट्रनिर्माणाच्या या महान कार्यात आपल्या सैन्य दलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्ही प्रवाहाबरोबर वाहणारे नाही. `गंगा कहे गंगादास, जमुना कहे जमुनादास` अर्थात प्रवाहाबरोबर वाहुन जाणे, हे आपल्या सैन्याच्या रक्तात नाही. तुम्ही प्रवाहाला दिशा देणारे आहात, प्रवाहाला वळवणारे आहात! तुमच्यात काळाला मार्ग दाखवण्याचे साहस आहे! तुमच्यात अनंताला  ओलांडण्याचा पराक्रम आहे! तुमच्यात अडथळे पार करण्याचे धैर्य आहे! आपल्या सैन्याचे जवान ज्या पर्वतशिखरांवर तैनात आहेत, ती शिखरे भारताच्या विजयस्तंभांसारखी उभी आहेत. तुम्ही ज्या समुद्रावर उभे आहात, त्या समुद्राच्या महान लाटा सुद्धा भारताचा जयघोष करत आहेत, भारत माता की जय! फक्त तुम्हीच नाही, प्रत्येक लाट हा जयघोष करत  आहे, तुम्हीच शिकवले आहे, तुम्ही या लाटांनाही भारतमातेचा जयजयकार करायला शिकवले आहे. या निनादातून एकच स्वर उमटतो, समुद्राच्या प्रत्येक लाटेतून, पर्वतांच्या वाऱ्यांतून, वाळवंटातील मातीच्या कणांतून, जर कान देऊन ऐकले आणि अंतकरणापासून   पाहिले, तर मातीच्या प्रत्येक कणातून, पाण्याच्या प्रत्येक थेंबातून एकच आवाज येतो, भारत माता की जय! भारत माता की जय!याच उत्साहाने आणि विश्वासाने मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना, तुमच्या कुटुंबांना  आणि 140 कोटी देशवासीयांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आपणा  सर्वांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा! विजयश्रीसोबत नेहमी विजयाला आपल्या अंतकरणात  जोपासा, विश्वास वाढवत राहा, संकल्पाला सामर्थ्यवान बनवत राहा, आणि तुमची स्वप्ने उंच भरारी घेऊ देत. या शुभेच्छांसह माझ्यासोबत जयघोष करा,  भारत माता की जय! भारत माता की जय! भारत माता की जय! वंदे मातरम! वंदे मातरम! वंदे मातरम! वंदे मातरम! वंदे मातरम! वंदे मातरम! वंदे मातरम! वंदे मातरम! खूप खूप धन्यवाद!

निलीमा चितळे/शैलेश पाटील/माधुरी पांगे/नितीन गायकवाड/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 


(Release ID: 2181207) Visitor Counter : 5