पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आयटीयू– जागतिक दूरसंचार मानकीकरण महासभा 2024 च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

Posted On: 15 OCT 2024 1:39PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 ऑक्‍टोबर 2024

 

माझे मंत्रिमंडळातील सहकारी ज्योतिरादित्य शिंदे जी, चंद्रशेखर जी, आयटीयू चे सरचिटणीस, विविध देशांचे मंत्री, भारतातल्या विविध राज्यांचे मंत्री, उद्योग जगतातले नेते, दूरसंचार क्षेत्रातले तज्ञ, स्टार्ट-अप जगतातले तरुण उद्योजक, देश-विदेशातील प्रतिष्ठित पाहुणे, बंधू आणि भगिनींनो,

इंडिया मोबाईल परिषदेमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे! मी आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या (ITU) सहकाऱ्यांचेही विशेष स्वागत करू इच्छितो. तुम्ही पहिल्यांदाच जागतिक दूरसंचार मानकीकरण सभेसाठी भारताची निवड केली आहे. मी तुमचा आभारी आहे आणि तुमच्या निर्णयाचे कौतुक करतो.

मित्रांनो, आज दूरसंचार आणि संबंधित तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत जगातल्या सर्वात वेगवान घडामोडी होत असलेल्या देशांपैकी एक आहे. भारतात 120 कोटी किंवा 1200 दशलक्ष मोबाईल फोन वापरकर्ते आहेत. भारतात 95 कोटी किंवा 950 दशलक्ष इंटरनेट वापरकर्ते आहेत. भारतात जगातील 40 टक्क्यांहून अधिक प्रत्यक्ष काळातले डिजिटल व्यवहार होतात. भारताने डिजिटल कनेक्टिव्हिटीला शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचे प्रभावी साधन बनवले आहे. इथे जागतिक दूरसंचार मानके आणि भविष्यावर चर्चा करणे हे जागतिक कल्याणाचेही माध्यम ठरेल. मी तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा देतो.

मित्रांनो,

जागतिक दूरसंचार मानकीकरण महासभा आणि इंडिया मोबाईल परिषद एकत्र होत आहेत, हे देखील महत्त्वाचे आहे. जागतिक दूरसंचार मानकीकरण महासभेचे उद्दिष्ट जागतिक मानकांवर काम करणे आहे, तर इंडिया मोबाईल परिषद सेवांमध्ये महत्वाची भूमिका बजावते. त्यामुळे, आजच्या या कार्यक्रमाने मानके आणि सेवा या दोन्हींना एकाच व्यासपीठावर आणले आहे. भारत आता दर्जेदार सेवांवर खूप लक्ष केंद्रित करत आहे. आम्ही आमच्या मानकांवरही भर देत आहोत. या संदर्भात,जागतिक दूरसंचार मानकीकरण महासभाचा अनुभव भारतासाठी नवीन ऊर्जा घेऊन येईल.

मित्रांनो,

जागतिक दूरसंचार मानकीकरण महासभा परस्पर सहमतीतून जगाला सक्षम करण्याबद्दल बोलते. इंडिया मोबाईल परिषद संपर्काद्वारे जगाला सक्षम करण्याबद्दल बोलते. या कार्यक्रमात सहमती आणि संपर्क दोन्ही एकत्र येत आहेत. आजच्या संघर्षांनी भरलेल्या जगात हे दोन्ही किती महत्त्वाचे आहेत, हे तुम्हाला माहितच आहे. हजारो वर्षांपासून, भारत वसुधैव कुटुंबकम् (जग एक कुटुंब आहे) या अमर संदेशावर जगत आला आहे. जेव्हा आम्हाला जी-20 चे नेतृत्व करण्याची संधी मिळाली, तेव्हा आम्ही एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य हा संदेशही दिला. भारत जगाला जोडण्यासाठी आणि संघर्ष सोडवण्यासाठी वचनबद्ध आहे. प्राचीन रेशीम मार्गापासून ते आजच्या तंत्रज्ञान मार्गापर्यंत, भारताचे ध्येय नेहमीच एकच आहे: जगाला जोडणे आणि प्रगतीचे नवीन मार्ग खुले करणे. या संदर्भात, जागतिक दूरसंचार मानकीकरण महासभा आणि IMC यांच्यातील भागीदारी देखील एक प्रेरणादायी आणि उत्कृष्ट संदेश देते. जेव्हा स्थानिक आणि जागतिक दोन्ही एकत्र येतात, तेव्हा त्याचा फायदा केवळ एका देशालाच नाही, तर संपूर्ण जगाला होतो आणि हेच आमचे ध्येय आहे.

मित्रांनो,

21 व्या शतकात, भारताचा मोबाईल आणि दूरसंचार क्षेत्रातील प्रवास संपूर्ण जगासाठी एक अभ्यासाचा विषय आहे. जागतिक स्तरावर मोबाईल आणि दूरसंचाराकडे एक सोय म्हणून पाहिले गेले आहे. पण भारताचे मॉडेल वेगळे आहे. भारतात, आम्ही दूरसंचाराकडे केवळ संपर्काचे साधन म्हणून पाहिले नाही, तर समानता आणि संधीचे माध्यम म्हणून पाहिले आहे. हे माध्यम गावे आणि शहरे, आणि श्रीमंत व गरीब यांच्यातील दरी कमी करायला मदत करत आहे. मला आठवते, 10 वर्षांपूर्वी देशासमोर डिजिटल इंडियाची संकल्पना मांडताना मी म्हटले होते की आपण तुकड्या-तुकड्यांमध्ये काम न करता सर्वांगीण दृष्टिकोनाने काम केले पाहिजे. आम्ही डिजिटल इंडियाचे चार स्तंभ निश्चित केले. पहिला, उपकरणाची किंमत कमी असावी. दुसरा, डिजिटल संपर्क देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा. तिसरा, डेटा सर्वांसाठी सहज उपलब्ध

असावा. आणि चौथा, डिजिटल प्रथम हे आपले ध्येय असावे. आम्ही या चारही स्तंभांवर एकाच वेळी काम सुरू केले आणि त्याचे परिणाम आपण पाहिले आहेत.

मित्रांनो, 

जोपर्यंत आम्ही भारतात फोन बनवायला सुरुवात केली नाही, तोपर्यंत ते स्वस्त होऊ शकले नाहीत. 2014 मध्ये भारतात फक्त दोन मोबाईल उत्पादन युनिट्स होती, पण आज 200 हून अधिक उत्पादन युनिट्स आहेत. पूर्वी आपण बहुतेक फोन आयात करायचो, पण आता आपण भारतात सहापट जास्त फोन तयार करत आहोत, आणि आपली ओळख मोबाईल निर्यातदार म्हणून झाली आहे. पण आम्ही इथेच थांबलो नाही. आता चिप्सपासून ते तयार उत्पादनांपर्यंत, आम्ही जगाला संपूर्ण मेड इन इंडिया फोन देण्याच्या दिशेने काम करत आहोत. आम्ही भारतातील सेमीकंडक्टर परिसंस्थेमध्येही मोठी गुंतवणूक करत आहोत.

मित्रांनो,

संपर्काच्या स्तंभावर काम करताना, आम्ही भारतातील प्रत्येक घर जोडले जाईल याची खातरजमा केली आहे. आम्ही देशभरात मोबाईल टॉवर्सचे एक मजबूत जाळे तयार केले आहे. आदिवासी भागात, डोंगराळ प्रदेशात आणि सीमावर्ती भागात, कमी वेळात हजारो मोबाईल टॉवर्स बसवण्यात आले आहेत. आम्ही रेल्वे स्टेशन आणि इतर सार्वजनिक ठिकाणी वाय-फाय सुविधा पुरवली आहे. आम्ही अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीपसारख्या बेटांना समुद्राखालील केबल्सद्वारे जोडले आहे. अवघ्या 10 वर्षांत, भारताने पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतराच्या आठपट लांबीची ऑप्टिकल फायबर टाकली आहे! मी तुम्हाला भारताच्या गतीचे एक उदाहरण देतो. आम्ही दोन वर्षांपूर्वी मोबाईल परिषदेमध्ये 5G लाँच केले. आज भारतातील जवळपास

प्रत्येक जिल्हा 5जी सेवेने जोडलेला आहे. आज भारत जगातील दुसरी सर्वात मोठी 5G बाजारपेठ बनला आहे, आणि आता आम्ही 6जी तंत्रज्ञानावर वेगाने काम करत आहोत.

मित्रांनो, भारतातील दूरसंचार क्षेत्रातील सुधारणा आणि नवनवीन शोध अकल्पनीय आणि अभूतपूर्व आहेत. परिणामी, डेटाचे दर लक्षणीयरीत्या कमी झाले आहेत. आज भारतात इंटरनेट डेटाची किंमत प्रति जीबी सुमारे 12 सेंट आहे, तर अनेक देशांमध्ये एक जीबी डेटाची किंमत 10 ते 20 पट जास्त आहे. प्रत्येक भारतीय दरमहा सरासरी 30 जीबी डेटा वापरत आहे. मित्रांनो, या सर्व प्रयत्नांना आमच्या चौथ्या स्तंभाने डिजिटल फर्स्टच्या भावनेने एका नव्या उंचीवर नेले आहे. भारताने डिजिटल तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण केले आहे. आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केले आहेत, आणि या प्लॅटफॉर्मवरील नवनवीन शोधांनी लाखो नवीन संधी निर्माण केल्या आहेत. जॅम त्रिमूर्ती (जन धन, आधार आणि मोबाईल) अनेक नवनवीन शोधांचा पाया बनली आहे. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस ने अनेक नवीन कंपन्यांसाठी संधी निर्माण केल्या आहेत. आजकाल, ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स चीही अशीच चर्चा होत आहे, आणि ते डिजिटल व्यापारामध्ये एक नवीन क्रांती घडवेल. कोरोना महामारीच्या काळात, आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मने सर्व काही कसे सोपे केले ते आपण पाहिले - मग ते गरजू लोकांना पैसे पाठवणे असो, कोविड-19 शी सामना करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी रिअल-टाइम मार्गदर्शक तत्त्वे पाठवणे असो, लसीकरण प्रक्रिया सुलभ करणे असो, किंवा डिजिटल लसीकरण प्रमाणपत्रे देणे असो - भारतात सर्व काही सुरळीतपणे घडले. आज भारताकडे एक असा डिजिटल गुच्छ आहे, जो जागतिक स्तरावर कल्याणकारी योजनांना नवीन उंचीवर नेऊ शकतो. म्हणूनच,जी-20 अध्यक्षपदाच्या काळात, भारताने डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांवर भर दिला. आणि आज, मी पुन्हा सांगू इच्छितो की, भारताला युपीआयशी संबंधित आपला अनुभव आणि ज्ञान सर्व देशांना द्यायला आनंदच होईल.

मित्रांनो, 

जागतिक दूरसंचार मानकीकरण महासभा मध्ये नेटवर्क ऑफ वुमन या उपक्रमावर चर्चा होईल. हा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे. भारत महिलांच्या नेतृत्वाखालील विकासासाठी गांभीर्याने काम करत आहे. जी-20 अध्यक्षपदाच्या काळात, आम्ही या विषयावरील आमची बांधिलकी पुढे नेली. तंत्रज्ञान क्षेत्राला सर्वसमावेशक बनवण्याचे आणि तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मद्वारे महिलांना सक्षम करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. आपण पाहिले आहे की, आपल्या अंतराळ मोहिमांमध्ये आमच्या महिला शास्त्रज्ञांनी मोठी भूमिका बजावली आहे. आमच्या स्टार्टअप्समधील महिला सह-संस्थापकांची संख्या सातत्याने वाढत आहे. आज भारतातील 40 टक्क्यांहून अधिक STEM शिक्षण घेणाऱ्या आमच्या मुली आहेत. भारत तंत्रज्ञान नेतृत्वात महिलांसाठी अधिकाधिक संधी निर्माण करत आहे. तुम्ही सरकारच्या नमो ड्रोन दीदी कार्यक्रमाबद्दल ऐकले असेलच. हा कार्यक्रम शेतीत ड्रोनच्या वापराला प्रोत्साहन देतो, आणि याचे नेतृत्व भारतातील गावांमधील महिला करत आहेत. घरोघरी डिजिटल बँकिंग आणि डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही बँक सखी कार्यक्रमही सुरू केला आहे. याचा अर्थ, महिलांनीच डिजिटल जनजागृतीच्या उपक्रमाचे नेतृत्व केले आहे. आमच्या प्राथमिक आरोग्यसेवेत, प्रसूती आणि बालसंगोपनात, आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आज या कार्यकर्त्या टॅब्लेट आणि ॲप्सद्वारे या सर्व कामांचा मागोवा घेतात. आम्ही महिला उद्योजकांसाठी महिला ई- हाट हा ऑनलाइन मार्केटिंग प्लॅटफॉर्म कार्यक्रमही चालवत आहोत. याचा अर्थ, आज भारतातील महिला एकेकाळी अकल्पनीय असलेल्या गावांमध्येही तंत्रज्ञानासोबत काम करत आहेत. भविष्यात आम्ही हा उपक्रम आणखी वाढवणार आहोत. मी जिथे प्रत्येक मुलगी एक टेक लीडर बनेल अशा भारताचे स्वप्न पाहतो आहे.

मित्रांनो,

भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या काळात, आम्ही जगासमोर एक गंभीर विषय मांडला होता. मला हा विषय जागतिक दूरसंचार मानकीकरण महासभा सारख्या जागतिक व्यासपीठावरही मांडायचा आहे. विषय आहे - डिजिटल तंत्रज्ञानासाठी जागतिक आराखडा आणि जागतिक मार्गदर्शक तत्त्वे. जागतिक संस्थांनी जागतिक प्रशासनासाठी याचे महत्त्व ओळखण्याची वेळ आली आहे. तंत्रज्ञानासाठी जागतिक स्तरावर काय करावे आणि काय करू नये याचा एक संच असणे आवश्यक आहे. आज सर्व डिजिटल साधने आणि ॲप्लिकेशन्स कोणत्याही देशाच्या सीमा आणि मर्यादांच्या पलीकडे काम करतात. कोणताही एक देश एकट्याने आपल्या नागरिकांना सायबर धोक्यांपासून वाचवू शकत नाही. आपण सर्वांनी मिळून काम केले पाहिजे आणि जागतिक संस्थांनी जबाबदारी घेतली पाहिजे. आम्हाला आमच्या अनुभवावरून माहित आहे, ज्याप्रमाणे आम्ही हवाई वाहतूक क्षेत्रातील नियम आणि कायद्यांसाठी एक जागतिकआराखडा तयार केला आहे, तसाच आराखडा डिजिटल जगासाठीही आवश्यक आहे. जागतिक दूरसंचार मानकीकरण महासभा ने या संदर्भात अधिक सक्रियपणे काम करणे आवश्यक आहे. मी प्रत्येक जागतिक दूरसंचार मानकीकरण महासभा सदस्याला आवाहन करतो की, दूरसंचार सर्वांसाठी कसा सुरक्षित बनवता येईल याचा विचार करावा. या एकमेकांशी जोडलेल्या जगात, सुरक्षिततेचा विचार नंतर करून चालणार नाही. भारताचा डेटा संरक्षण कायदा आणि राष्ट्रीय सायबर सुरक्षा धोरण ही एक सुरक्षित डिजिटल परिसंस्था निर्माण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेची अभिव्यक्ती आहे. मी या सभेच्या सदस्यांना आवाहन करतो की, अशी मानके तयार करा जे सर्वसमावेशक, सुरक्षित आणि भविष्यातील प्रत्येक आव्हानाला अनुकूल असतील. तुम्ही नैतिक एआय आणि डेटा गोपनीयतेसाठी जागतिक मानक विकसित केले पाहिजेत, जे विविध देशांच्या विविधतेचा आदर करतील.

मित्रांनो,

या तंत्रज्ञान क्रांतीमध्ये आपण तंत्रज्ञानाला मानवकेंद्रित आयाम देण्याचा सतत प्रयत्न करणे खूप महत्त्वाचे आहे. ही क्रांती जबाबदार आणि शाश्वत असेल, याची खात्री करणे ही आपली जबाबदारी आहे. आपण आज जे मानक ठरवू, तेच आपल्या भविष्याची दिशा ठरवतील. त्यामुळे, सुरक्षा, सन्मान आणि समानता ही तत्त्वे आपल्या चर्चेच्या केंद्रस्थानी असली पाहिजेत. या डिजिटल युगात कोणताही देश, कोणताही प्रदेश आणि कोणताही समुदाय मागे राहणार नाही, हे सुनिश्चित करणे आपले ध्येय असले पाहिजे. आपले भविष्य तांत्रिकदृष्ट्या मजबूत आणि नैतिकदृष्ट्या सुदृढ असेल, त्याच्या केंद्रस्थानी नवनिर्मिती आणि सर्वसमावेशकता असेल, याची आपण खातरजमा केली पाहिजे.

मित्रांनो, मी जागतिक दूरसंचार मानकीकरण सभेच्या यशासाठी माझ्या शुभेच्छा आणि पाठिंबा देतो. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा! खूप खूप धन्यवाद!

 

* * *

आशिष सांगळे/निखिलेश चित्रे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2179949) Visitor Counter : 7