पंतप्रधान कार्यालय
रोजगार मेळाव्या अंतर्गत 51,000 हून अधिक उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
प्रविष्टि तिथि:
29 OCT 2024 2:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर 2024
नमस्कार!
देशाच्या विविध भागातून आमच्याशी जोडले गेलेले माझे मंत्रिमंडळातील सहकारी, संसद सदस्य, विधानसभेचे सदस्य, देशातील माझे तरुण मित्र-मैत्रिणी आणि उपस्थित स्त्री-पुरुष हो!
आज धन्वंतरी जयंती अर्थात धनत्रयोदशीचा शुभ सण आहे आणि मी या निमित्ताने सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो. दोन दिवसांनी आपण दीपावलीचा सणही साजरा करणार आहोत आणि या वर्षाची दिवाळी अत्यंत विशेष आहे. 'दरवर्षीच तर दिवाळी असते, यात विशेष काय?' असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर मी तुम्हाला सांगतो, या वर्षीची दिवाळी विशेष का आहे: 500 वर्षांनंतर प्रभू श्री राम (राम लल्ला) आता अयोध्या येथील त्यांच्या भव्य मंदिरात विराजमान झाले आहेत. या भव्य मंदिरात राम लल्लांची प्रतिष्ठापना झाल्यानंतरची ही पहिली दिवाळी आहे. हा असा क्षण आहे, ज्यासाठी अगणित पिढ्यांनी प्रतीक्षा केली, आणि लाखो लोकांनी त्याग… कष्ट सहन केले. अशा या विलक्षण आणि असाधारण दिवाळीचे साक्षीदार होण्याचे भाग्य खरोखर आपल्याला लाभले आहे.
या उत्सवी वातावरणात, या शुभ दिनी, रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून, 51,000 तरुण-तरुणींना सरकारी नोकरीची नियुक्ती पत्रे दिली जात आहेत. मी तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो.
मित्रांनो,
केंद्र सरकार देशभरातील लाखो तरुणांना कायमस्वरूपी सरकारी नोकऱ्या देण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू ठेवत आहे. भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) शासित राज्यांमध्येही लाखो तरुणांना नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत. नुकतेच, हरियाणात नवीन सरकार स्थापन होताच 26,000 तरुणांना रोजगार मिळाला. ज्यांना हरियाणाची माहिती आहे, त्यांना कळेल की सध्या तिथे उत्सवाचे वातावरण आहे आणि तरुण-तरुणी उत्साहाने भरलेले आहेत. हरियाणातील आमच्या सरकारची एक विशेष ओळख आहे – ते कोणताही खर्च किंवा गैरव्यवहार न करता रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देते. आज मी, हरियाणा सरकारने नियुक्ती पत्रे दिलेल्या त्या 26,000 तरुण-तरुणींचे विशेष अभिनंदन करू इच्छितो. हरियाणात 26,000 नवीन नियुक्त्या आणि आजच्या कार्यक्रमातून अतिरिक्त 51,000 नियुक्त्या, ही खूप मोठी प्रगती आपण आनंदाने अनुभवत आहोत.
मित्रांनो,
देशातील तरुणाईसाठी रोजगाराच्या संधी जास्तीत जास्त वाढवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. या सरकारच्या धोरणांचा आणि निर्णयांचा थेट परिणाम रोजगार निर्मितीवर होत आहे. आज देशभरात दृतगती महामार्ग (एक्सप्रेस-वे), महामार्ग, रस्ते, रेल्वेमार्ग, बंदरे, विमानतळे, तसेच फायबर लाईन्स आणि मोबाईल टॉवर्सचे जाळे उभारण्याचे काम सुरू आहे. आम्ही देशाच्या कानाकोपऱ्यात नवीन उद्योग वाढवत आहोत, नवीन औद्योगिक शहरे उभारत आहोत आणि पाणी तसेच गॅसच्या वाहिन्या टाकत आहोत. मोठ्या संख्येने नवीन शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे देखील स्थापन केली जात आहेत. या पायाभूत सुविधांमध्ये केलेल्या गुंतवणुकीतून सरकारचा उद्देश, मालवाहतुकीवरील (लॉजिस्टिक्स) खर्च कमी करणे हा आहे. या उपक्रमांमुळे नागरिकांची सोय तर वाढत आहेच, पण त्याचबरोबर लाखो नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.
मित्रांनो,
कालच, मी वडोदरा येथे होतो, जिथे मला संरक्षण क्षेत्रासाठी विमाने बनवणाऱ्या एका कारखान्याचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली. या एका कारखान्यातूनच हजारो लोकांना थेट रोजगार मिळणार आहे. पण याव्यतिरिक्त, यामुळे निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधींची संख्या खूप जास्त आहे, कारण विमान उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात सुटे भाग लागतात. हे भाग बनवण्यासाठी आणि पुरवण्यासाठी अनेक लहान कारखान्यांचे जाळे उभे राहील. देशभरातील आपल्या एमएसएमई ना हे घटक बनवण्याचे काम मिळेल आणि मागणी पूर्ण करण्यासाठी नवीन एमएसएमई देखील उदयास येतील. एका विमानात 15,000 ते 25,000 लहान-मोठे भाग असतात, याचा अर्थ प्रत्येक उत्पादन प्रकल्पाला पुरवठा करण्यासाठी देशातील हजारो कारखाने सक्रिय होतील. याचा आपल्या एमएसएमई क्षेत्राला किती मोठा आधार मिळेल आणि यामुळे किती असंख्य रोजगाराच्या संधी निर्माण होतील, याची आपण कल्पना करू शकता.
मित्रांनो,
आज जेव्हा आम्ही एखादी योजना सुरू करतो, तेव्हा आमचे लक्ष केवळ लोकांना मिळणाऱ्या फायद्यांवर केंद्रीत नसते; तर आम्ही त्याहून मोठा व्यापक परिणाम बघतो. आम्ही एक अशी परिसंस्था तयार करण्याचाही विचार करतो, जी रोजगार निर्माण करेल. उदाहरणार्थ, पीएम सूर्यघर मोफत वीज योजना घ्या. वरवर पाहता, ही योजना घरांना मोफत वीज पुरवण्यासाठी तयार करण्यात आली आहे, असे वाटेल, पण बारकाईने पाहिल्यास यात खूप काही दडलेले आहे. गेल्या सहा महिन्यांतच सुमारे सव्वा ते दीड कोटी ग्राहकांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे. आवश्यक प्रतिष्ठापनेचे काम करण्यासाठी 9,000 हून अधिक विक्रेते जोडले गेले आहेत, आणि 5 लाखांहून अधिक घरांमध्ये आधीच सौर तबकड्या बसवण्यात आल्या आहेत. यापुढे, या योजनेअंतर्गत मॉडेल म्हणून देशाच्या विविध भागांमध्ये सौर-शक्तीवर चालणारी 800 गावे विकसित करण्याची योजना आहे. याव्यतिरिक्त, 30,000 लोकांना, छप्परांवर सौर तबकड्या बसवण्याचे (रूफटॉप सोलर इन्स्टॉलेशन) प्रशिक्षण देण्यात आले आहे. थोडक्यात, या एकाच योजनेने उत्पादक, विक्रेते, प्रतिष्ठापना करणारे आणि दुरुस्ती करणाऱ्यांसाठी लाखो रोजगाराच्या संधी खुल्या केल्या आहेत. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना देशभरात लाखो नवीन रोजगार निर्माण करण्यासाठी सज्ज आहे.
मित्रांनो,
मी तुम्हाला आणखी एक उदाहरण देतो, आणि आज मी लहान गावांशी संबंधित उदाहरणांवर लक्ष केंद्रीत करत आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून खादी आपल्या देशात चर्चेचा विषय राहिली आहे. पण आज खादी ग्रामोद्योगात झालेला उल्लेखनीय बदल विचारात घ्या. गेल्या 10 वर्षांत, आमच्या सरकारच्या धोरणांमुळे खादी ग्रामोद्योगाला पूर्णपणे नवसंजीवनी मिळाली आहे, केवळ त्याची प्रतिमाच बदलली नाही, तर ग्रामीण भागातील या कामात गुंतलेल्या लोकांचे नशीबही पालटले आहे. आज खादी ग्रामोद्योग वर्षाला 1.5 लाख कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळवत आहे. जर आपण याची दहा वर्षांपूर्वीच्या परिस्थितीशी तुलना केली – जसे डॉ. जितेंद्र सिंह यांनी नुकतेच मागील आणि सध्याच्या सरकारमधील सरकारी नोकऱ्यांची आकडेवारी सांगितली – तर फरक आश्चर्यकारक आहे. उदाहरणार्थ, आज खादीची विक्री यूपीए- संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळापेक्षा 400 टक्के जास्त आहे. या वाढीचा अर्थ असा की कारागीर, विणकर आणि व्यापारी यांना मोठा फायदा होत आहे. या क्षेत्रात नवीन संधी उदयास येत आहेत, ज्यामुळे मोठ्या संख्येने रोजगार निर्माण होत आहेत.
त्याचप्रमाणे, आमच्या लखपती दीदी योजनेने ग्रामीण महिलांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराचे नवे मार्ग खुले केले आहेत. गेल्या दशकात, 10 कोटी महिला स्वयंसहाय्यता गटांमध्ये सहभागी झाल्या आहेत, आर्थिक ऊलाढालींद्वारे त्यांच्या कामातून उत्पन्न मिळवत आहेत. या 10 कोटी महिला आता त्यांच्या मेहनतीमुळे रोजगार आणि स्वयंरोजगाराद्वारे त्यांच्या घरांमध्ये पैसा आणत आहेत. 10 कोटींची ही प्रभावी संख्या अनेकदा लोकांच्या नजरेतून सुटते. सरकारने त्यांना पूर्ण पाठबळ दिले आहे, साधनसामुग्री आणि आर्थिक मदत पुरवली आहे. या महिला विविध प्रकारच्या रोजगारातून उत्पन्न मिळवत आहेत. आमच्या सरकारने या महिलांपैकी 3 कोटी महिलांना 'लखपती दीदी' बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे, ज्याचा उद्देश केवळ उत्पन्न निर्माण करणे नाही, तर ते वाढवणे आहे. आतापर्यंत, सुमारे 1.25 कोटी महिलांनी हा टप्पा गाठला आहे, त्या प्रत्येक वर्षी 1 लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न मिळवत आहेत.
मित्रांनो,
आज भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. ही प्रगती पाहून, तरुणांना स्वाभाविकपणे प्रश्न पडतो की सध्याचा वेग आणि विकासाची पातळी यापूर्वी का साध्य झाली नाही. उत्तर सोपे आहे: मागील सरकारांमध्ये यासाठी आवश्यक धोरणे आणि इच्छाशक्ती दोन्हीचा अभाव होता.
मित्रांनो,
तुम्हाला आठवत असेल, तंत्रज्ञानासह अनेक क्षेत्रांमध्ये भारत कसा मागे होता. जगभरात नवीन तंत्रज्ञान उदयास येत असताना, ते आपल्यापर्यंत कधी पोहोचेल, याची भारताला नेहमीच प्रतिक्षा करावी लागत असे. भारतात ते येईपर्यंत, पाश्चात्त्य देशांमध्ये ते जुने झालेले असे. आपल्या देशात आधुनिक तंत्रज्ञान विकसित होऊ शकत नाही, अशी मानसिकता रुजली होती आणि या दृष्टिकोनामुळे खूप मोठे नुकसान झाले. भारत केवळ आधुनिक विकासाच्या शर्यतीतच मागे पडला नाही, तर रोजगाराचे महत्त्वाचे स्रोतही गमावले. रोजगार निर्माण करणारे आधुनिक उद्योग नसतील, तर आपण नोकऱ्या कशा निर्माण करणार? म्हणून, आम्ही देशाला मागील सरकारांच्या कालबाह्य विचारसरणीतून मुक्त करण्याचे काम सुरू केले. अंतराळ क्षेत्रापासून ते अर्धसंवाहकां (सेमीकंडक्टर) पर्यंत, इलेक्ट्रॉनिक्सपासून ते विजेवर चालणाऱ्या वाहनांपर्यंत, आम्ही प्रत्येक नवीन तांत्रिक क्षेत्रात 'मेक इन इंडिया' ला (स्वदेश निर्मित प्रोत्साहन दिले. आम्ही 'आत्मनिर्भर भारत'च्या दिशेने काम केले आणि नवीन तंत्रज्ञान तसेच थेट परदेशी गुंतवणूक (FDI) आकर्षित करण्यासाठी उत्पादनानुसार प्रोत्साहन (पीएलआय-PLI) योजना सुरू केली. 'मेक इन इंडिया' आणि पीएलआय (PLI) योजना यांनी एकत्रितपणे रोजगार निर्मितीला प्रचंड गती दिली आहे. आज प्रत्येक क्षेत्रातील उद्योगांना गती मिळत आहे, ज्यामुळे तरुणाईसाठी विविध क्षेत्रांमध्ये नवीन संधी खुल्या होत आहेत. मोठी गुंतवणूक होत आहे, आणि विक्रमी संधी उदयास येत आहेत. गेल्या आठ वर्षांत 1.5 लाखांहून अधिक नवंउद्योग (स्टार्टअप्स) सुरू झाले आहेत, ज्यामुळे भारत जगातील तिसरी सर्वात मोठी नवउद्योग परिसंस्था (स्टार्टअप इकोसिस्टम) बनला आहे. या सर्व घडामोडींमुळे, आपल्या तरुणाईला प्रगती करण्याची आणि रोजगार मिळवण्याची संधी मिळत आहे.
मित्रांनो,
भारतातील तरुणांची क्षमता वाढवण्यासाठी, सरकार कौशल्य विकासावर खूप लक्ष केंद्रीत करत आहे. यामुळेच कौशल्य युक्त भारत ('स्किल इंडिया') सारखे उपक्रम सुरू झाले. आज देशभरातील शेकडो कौशल्य विकास केंद्रांमध्ये तरुणाईला प्रशिक्षण दिले जात आहे. अनुभव आणि संधी मिळवण्यासाठी आपल्या तरुणाईला संघर्ष करावा लागू नये, याची हमी आम्ही निश्चित केली आहे. प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना या आंतरवासितेसाठीच्या योजनेअंतर्गत , भारतातील अग्रगण्य 500 कंपन्यांमध्ये सशुल्क इंटर्नशिपची तरतूद करण्यात आली आहे, ज्यामध्ये प्रत्येक शिकाऊ कर्मचाऱ्याला (इंटर्न) महिन्याला दरमहा 5,000 रुपये मिळतील. विविध क्षेत्रांमधील वास्तविक व्यावसायिक अनुभव घेता येण्यासाठी पुढील पाच वर्षांत एक कोटी तरुणांना इंटर्नशिपच्या संधींचा लाभ मिळावा, हे आमचे उद्दिष्ट आहे. हा अनुभव त्यांच्या कारकिर्दीसाठी अमूल्य ठरेल.
मित्रांनो,
भारतीय तरुणांना परदेशात अधिक सहजपणे नोकरी मिळण्यास मदत करण्यासाठी भारत सरकार नवीन संधींची कवाडे उघडी करत आहे. नुकतेच, तुम्ही वर्तमानपत्रांमध्ये वाचले असेल, जर्मनीने विशेषतः भारतासाठी 'कुशल मनुष्यबळ धोरण जारी केले आहे. यापूर्वी, जर्मनी दरवर्षी 20,000 कुशल भारतीय तरुणांना व्हिसा देत असे. आता त्यांनी ही संख्या वाढवून 90,000 करण्याचा निर्णय घेतला आहे, म्हणजे दरवर्षी 90,000 तरुणांना जर्मनीमध्ये काम करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे आपल्या तरुणांना खूप फायदा होईल. अलिकडच्या वर्षांत, भारताने आखाती राष्ट्रांसह आणि जपान, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, मॉरिशस, इस्रायल, इंग्लंड आणि इटली यांसारख्या आर्थिकदृष्ट्या प्रगत देशांसह एकूण 21 देशांसोबत स्थलांतर आणि रोजगार करार केले आहेत. दरवर्षी 3,000 भारतीय, इंग्लंड मध्ये दोन वर्षांकरिता, कामाच्या आणि अभ्यासाच्या व्हिसासाठी पात्र आहेत आणि 3,000 भारतीय विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियामध्ये अभ्यास करण्याची संधी मिळेल. भारतातील गुणवत्ता केवळ देशाच्या प्रगतीसाठीच नाही, तर जगाच्या प्रगतीतही महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे आणि आम्ही त्या दिशेने वाटचाल करत आहोत.
मित्रांनो,
आज, सरकारची भूमिका अशी आधुनिक व्यवस्था निर्माण करण्याची आहे जिथे प्रत्येक तरुणाला संधी मिळू शकेल आणि तो आपली स्वप्ने पूर्ण करू शकेल. म्हणून, तुम्ही ज्या कोणत्याही पदावर कम कराल, तुमचे उद्दिष्ट तरुण आणि नागरिकांना जास्तीत जास्त पाठबळ आणि सुविधा पुरवणे हे असले पाहिजे.
मित्रांनो,
या देशातील करदात्यांनी आणि नागरिकांनी तुम्हाला सरकारी पद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आपले पद आणि संधी या बाबी आपल्याला त्यांच्यामुळेच मिळाल्या आहेत आणि आपली नियुक्ती केवळ लोकांच्या सेवेसाठी आहे. खर्च आणि वशिल्याशिवाय, गुणवत्तेवर आधारित नोकऱ्यांची ही नवीन संस्कृती एका जबाबदारीसह येते: नागरिकांच्या जीवनातील अडचणी कमी करून त्यांच्या उपकारांची परतफेड करणे. आपले पद किंवा भूमिका काहीही असो—टपालवाला असो वा प्राध्यापक—आपले कर्तव्य या देशातील लोकांची, विशेषतः गरीब, वंचित, शोषित, आदिवासी, महिला आणि तरुणांची सेवा करणे, हे आहे. ज्या कुणाची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळेल, ते आपले भाग्य समजा आणि त्यासाठी स्वतःला समर्पित करा.
तुम्ही अशा वेळी भारत सरकारच्या सेवेमध्ये रुजू होत आहात, जेव्हा देश एका नवीन भारताच्या निर्मितीसाठी कटिबद्ध आहे. हे साध्य करण्यासाठी, आपल्याला प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करावी लागेल आणि तुमच्यासारख्या तरुण सहकाऱ्यांच्या योगदानाशिवाय हे शक्य होणार नाही. म्हणून, तुमचे उद्दिष्ट केवळ चांगले काम करणे नसून, उत्कृष्ट काम करणे असले पाहिजे. आपल्या देशातील सरकारी कर्मचाऱ्यांनी असे आदर्श निर्माण करावेत, जे जगभर मान्यता मिळवतील. साहजिकच, देशाला आपल्याकडून अपेक्षा आहेत आणि आकांक्षित भारताच्या भावनेमुळे या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. तथापि, या अपेक्षा आपल्यावर ठेवलेल्या विश्वासाचे प्रतीक आहेत, ज्यामुळे देशाला प्रगतीसाठी प्रेरणा मिळते. हा विश्वासच लोकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याची आपली जबाबदारी वाढवतो.
मित्रांनो,
या नियुक्तीसह, तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनातही एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहात. मी तुम्हाला नम्र राहण्याचे आवाहन करतो, हे लक्षात ठेवा की आपण सेवक आहोत, शासक नाही. या संपूर्ण प्रवासात, शिकणे कधीही थांबवू नका; नवीन कौशल्ये आत्मसात करत राहा. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी, केंद्र सरकार आय-गॉट कर्मयोगी मंचावर विविध अभ्यासक्रम उपलब्ध करुन देते. तुमच्या वेळेनुसार तुम्ही, तुम्हाला स्वारस्य असलेल्या विषयांवरील हे डिजिटल प्रशिक्षण कार्यक्रम, ऑनलाइन पूर्ण करू शकता. आपले ज्ञान वाढवण्यासाठी या साधनांचा पूर्ण उपयोग करा.
मला खात्री आहे, मित्रांनो, तुमच्या प्रयत्नांतून भारत 2047 पर्यंत विकसित राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करेल. आज तुम्ही 20, 22, किंवा 25 वर्षांचे असाल; भारत विकसित राष्ट्र बनेल तेव्हा तुम्ही तुमच्या कारकिर्दीच्या शिखरावर असाल. तेव्हा, तुम्ही अभिमानाने सांगू शकाल की तुमच्या 25 वर्षांच्या कठोर परिश्रमांनी विकसित भारताला आकार देण्यात मदत केली. ही किती मोठी संधी आणि सन्मानाची गोष्ट आहे! तुम्हाला केवळ रोजगार मिळाला नाही; तुम्हाला एक महत्त्वपूर्ण संधी मिळाली आहे. या संधीचा लाभ उठवण्यासाठी, तुमची स्वप्ने अधिक मजबूत करण्यासाठी आणि संकल्पपूर्तीचे ध्येय घेऊन जगण्यासाठी,मी तुम्हाला प्रोत्साहन देतो . विकसित भारताचे आपले स्वप्न साकार होईपर्यंत आपल्याला स्वस्थ बसायचे नाही. समर्पित लोकसेवेद्वारे आपण आपली जबाबदारी पूर्ण करू.
आज ज्या सर्व मित्रांना त्यांची नियुक्ती पत्रे मिळाली आहेत, त्यांचे मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आज तुमचे कुटुंबियही या विशेष आनंदात सहभागी होतील आणि मी त्यांनाही माझ्या शुभेच्छा देतो. दिवाळी अगदी तोंडावर आली असताना आणि ही नवीन संधी मिळाल्याने, तुमच्यासाठी हा खऱ्या अर्थाने दुहेरी उत्सव झाला आहे. या क्षणाचा आनंद घ्या, मित्रांनो, आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद.
* * *
नेहा कुलकर्णी/आशुतोष सावे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2178193)
आगंतुक पटल : 17
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam