पंतप्रधान कार्यालय
मुंबईत येथे आयोजित ‘ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हल’ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
Posted On:
09 OCT 2025 5:52PM by PIB Mumbai
माननीय पंतप्रधान कीर स्टार्मर, आरबीआयचे गव्हर्नर, फिनटेक विश्वातील नवप्रवर्तक, नेतेमंडळी, उद्योग जगतातील दिग्गज आणि गुंतवणूकदार, भगिनी आणि बंधूंनो! मुंबईत आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे.
मित्रांनो,यापूर्वी मी जेव्हा या कार्यक्रमासाठी आलो होतो, तेव्हा 2024 च्या निवडणुका व्हायच्या होत्या. परंतु, त्याच दिवशी मी सांगितले होते की, मी पुढच्या कार्यक्रमाला नक्कीच येईन आणि तेव्हा तुम्ही सर्वात जास्त टाळ्या वाजवल्या होत्या. त्यावेळी, येथे उपस्थित असलेले राजकीय तज्ञ धरुन चालले होते की, मोदी येत आहेत.
ऊर्जावंत शहर, उद्योगांचे शहर आणि अमर्याद संधींचे शहर असलेल्या मुंबईत, मी माझे मित्र पंतप्रधान स्टार्मर यांचे विशेष अभिनंदन करतो. त्यांनी या ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हल (जागतिक आर्थिक तंत्रज्ञान महोत्सव) साठी वेळ काढला, मी त्यांचा आभारी आहे.
आजपासून 5 वर्षांपूर्वी जेव्हा हा ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हल सुरू झाला होता, तेव्हा जग जागतिक महासाथीशी लढत होते. आज हा महोत्सव, आर्थिक नवोन्मेष आणि आर्थिक सहकार्याचे एक जागतिक व्यासपीठ बनले आहे.
यावेळी या महोत्सवामध्ये इंग्लंड, भागीदार देश म्हणून सहभागी झाला आहे. जगातील दोन मोठ्या लोकशाहीं मधील ही भागीदारी, जागतिक आर्थिक परिदृश्य अधिक चांगले बनवेल. मी येथे जे वातावरण पाहत आहे, येथे जी ऊर्जा आणि धडाडी आहे, हे सर्व खरोखरच खूप अद्भुत आहे. हे भारताची अर्थव्यवस्था आणि भारताच्या वाढीविषयी असलेल्या जागतिक विश्वासाचे प्रतीक आहे. मी क्रिस गोपाळकृष्णन जी, आरबीआय चे गव्हर्नर संजय मल्होत्रा जी, तसेच सर्व आयोजक आणि सहभागींचे या शानदार आयोजनाबद्दल खूप खूप अभिनंदन करतो.
मित्रांनो,
भारत लोकशाहीची जननी आहे. जेव्हा आपण लोकशाहीविषयी बोलतो, तेव्हा ती केवळ निवडणुका किंवा धोरण निर्मितीपर्यंतच मर्यादित नसते. भारताने या लोकशाहीच्या भावनेला राज्यकारभाराचा एक मजबूत आधारस्तंभ बनवले आहे आणि त्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे तंत्रज्ञान आहे. जगात फार पूर्वीपासून तंत्रज्ञानाच्या विषमतेबाबत बोलले जात होते, आणि भारताला त्यावेळी त्यापासून हा विषय वर्ज्य नव्हता. परंतु, गेल्या एका दशकात भारताने तंत्रज्ञानाचे देखील लोकशाहीकरण केले आहे. आजचा भारत सर्वाधिक तंत्रज्ञानदृष्ट्या समावेशक समाजापैकी एक आहे. आम्ही डिजिटल तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करून, ते देशाच्या प्रत्येक नागरिक आणि प्रदेशासाठी सहज उपलब्ध होईल, असे बनवले आहे. आज हीच गोष्ट भारताच्या उत्तम राज्यकारभाराचे वैशिष्ट्य बनले आहे.
हा एक असा नमुना आहे, जिथे सरकार जनहितासाठी डिजिटल पायाभूत सुविधा विकसित करते आणि नंतर त्या आधारावर खाजगी क्षेत्र आपल्या नवोन्मेषाने नवीन उत्पादने तयार करते. तंत्रज्ञान केवळ सुविधा नाही, तर समानतेचे साधन देखील बनू शकते, हे भारताने दाखवून दिले आहे. या समावेशक दृष्टिकोनाने आपल्या बँकिंग प्रणालीचा देखील कायापालट केला आहे. पूर्वी बँकिंग एक विशेषाधिकार होता, पण डिजिटल तंत्रज्ञानाने आता ते सक्षमीकरणाचे माध्यम बनवले आहे.
आज भारतात डिजिटल व्यवहार एक नित्यक्रम बनला आहे आणि याचे सर्वात मोठे श्रेय जाम ट्रिनिटी (JAM Trinity) म्हणजेच जन धन, आधार आणि मोबाइल या त्रयीला जाते. तुम्ही यूपीआय (Unified Payments Interface - युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) चे व्यवहारच बघा, आज दर महिन्याला 20 अब्ज व्यवहार होत आहेत. त्यांची किंमत 25 ट्रिलियन रुपयां (25 लाख कोटी रुपये) पेक्षा अधिक आहे. आज जगातील प्रत्येक 100 रियल टाइम डिजिटल ट्रान्झॅक्शनपैकी (तात्काळ डिजिटल व्यवहारांपैकी) 50 व्यवहार भारतात होतात. यावेळची ग्लोबल फिनटेक फेस्टची जी संकल्पना आहे, ती देखील भारताच्या याच लोकशाही भावनेला पुढे नेते आणि मजबूत करते.
आज भारताच्या डिजिटल स्टॅकचा बोलबाला संपूर्ण जगात आहे. भारताच्या, यूपीआय ही आधार आधारीत देयक प्रणाली, भारत बिल पेमेंट सिस्टम, भारत-क्युआर, डिजिलॉकर, डिजीयात्रा, गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस म्हणजेच जेम , या सर्व व्यवस्था, भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. मला आनंद आहे की इंडिया स्टॅक आता नवीन मुक्त परिसंस्थांना जन्म देत आहे. ओएनडीसी अर्थात ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स हे डिजिटल व्यापाराचे खुले जाळे, छोटे दुकानदार आणि एमएसएमई (मायक्रो-स्माॅल-मिडीयम) अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी वरदान बनत आहे. ते आता संपूर्ण देशाच्या बाजारापेठांपर्यंत पोहोचू शकत आहेत, तर ओसीईएन - ओपन क्रेडिट इनेबलमेंट नेटवर्क हे मुक्त कर्ज सक्षमीकरण जाळे, लघुउद्योजकांना पत उपलब्ध करणे, सोपे करत आहे. ही प्रणाली एमएसएमईच्या पत तुटवड्याच्या समस्येचे निराकरण करत आहे. भारतीय रिझर्व्ह बँक ज्या डिजिटल चलनाच्या दिशेने वाटचाल करत आहे, त्यामुळेही गोष्टी खूप चांगल्या होतील, असा मला विश्वास आहे. हे सर्व प्रयत्न भारताच्या न वापरल्या गेलेल्या क्षमतेला आपल्या विकास कथेची ताकद बनवतील.
इंडिया स्टॅक ही भारताची एकात्मिक डिजिटल व्यवस्था, केवळ भारताच्या यशाची कहाणी नाही. ही जगासाठी, आणि विशेषतः ग्लोबल साउथ या विकसनशील देशांसाठी आशेचा एक किरण आहे. भारत आपल्या डिजिटल नवोन्मेषांच्या माध्यमातून जगात डिजिटल सहकार्य आणि डिजिटल भागीदारी वाढवू इच्छितो. म्हणूनच आम्ही आमचे अनुभव आणि मुक्त स्रोत दोन्हीही जागतिक सार्वजनिक हितासाठी खुले करत आहोत. भारतात तयार झालेला ‘MOSIP’ हा आधुनिक मुक्त स्रोत ओळख मंच याचे ठळक उदाहरण आहे. आपली सार्वभौम डिजिटल ओळख प्रणाली तयार करण्यासाठी पंचवीसपेक्षा जास्त देशांनी मॉसिपचा उपयोग केला आहे. इतर देशांना तंत्रज्ञान वापरण्यासाठी देण्याबरोबरच आपण आता त्यांना तंत्रज्ञान विकसित करण्यासाठीदेखील मदत करत आहोत. ही डिजिटल मदत नाही बरं का, नाहीतर जगातल्या काही देशांना आपण मदत देतोय असं सांगण्याची हौस आहे...ज्यांना माझ्या बोलण्याचा रोख समजायला हवा त्यांना तो समजला आहे... आम्ही डिजिटल सक्षमीकरणामध्ये सहाय्य करत आहोत.
मित्रांनो,
भारतातल्या फिनटेक विशेषज्ञांच्या प्रयत्नांमुळे आपल्या स्वदेशी पर्यायांना जागतिक मान्यता मिळत आहे. अंतर्गत कार्यक्षमता असलेले क्यूआर नेटवर्क, खुला व्यापार, आणि खुले वित्तीय आराखडे यामधल्या इथल्या स्टार्टअप्सच्या प्रगतीची आज अख्खं जग दखल घेत आहे. यावर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमधेच सर्वात जास्त निधी मिळालेल्या पहिल्या तीन फिनटेक प्रणालींमध्ये भारताचा समावेश झाला आहे. हे तुमचं यश आहे.
मित्रांनो,
मोठमोठ्या संख्या हेच केवळ भारताचं वैशिष्ट्य नाही. आम्ही समावेशकता, लवचिकता, शाश्वतता आणि संख्यात्मक प्रमाण यांची सांगड घातली. यासाठी कृत्रिम प्रज्ञेचा उपयोग सुरू केला. कृत्रिम प्रज्ञेमुळे निर्णयातील पक्षपात कमी होऊ शकतो, फसवणूक वेळीच ओळखली जाऊ शकते. इतर वित्तीय सुविधा आणखी चांगल्या करण्यामध्येही कृत्रिम प्रज्ञा उपयोगात आणली जाऊ शकते. आपले हे सामर्थ्य उपयोगात आणण्यासाठी आपल्याला माहिती, कौशल्य आणि प्रशासन यामध्ये एकत्रितपणे गुंतवणूक करावीच लागेल.
मित्रांनो,
कृत्रिम प्रज्ञेबाबतचा भारताचा दृष्टीकोन समान उपलब्धता, लोकसंख्येनुसार कौशल्य विकास आणि जबाबदार वापर या तीन तत्त्वांवर आधारित आहे. प्रत्येक नवसंशोधकाला आणि स्टार्टअपना तंत्रज्ञान सुविधा स्वस्तात तसंच सुलभतेने मिळाव्यात यासाठी भारताच्या कृत्रिम प्रज्ञा अभियानांतर्गत आपण उच्च कार्यक्षमता असलेली संगणकीय प्रणाली तयार करत आहोत. कृत्रिम प्रज्ञाचे फायदे प्रत्येक जिल्ह्यापर्यंत, सर्व तऱ्हेच्या भाषिकांपर्यंत पोहोचावेत यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आपली सर्वोत्कृष्टता केंद्रं, कौशल्यविकास संकुल आणि स्वदेशी कृत्रिम प्रज्ञा प्रारुपांमुळे हे प्रयत्न सफल होत आहेत.
मित्रांनो,
भारतानं नेहमीच नैतिक कृत्रिम प्रज्ञा वापराबाबतच्या जागतिक आराखड्याला पाठिंबा दर्शवला आहे. आपला डिजिटल पायाभूत सुविधांमधला अनुभव आणि आपले ज्ञानभांडार जगासाठी उपयुक्त ठरू शकते. सध्या आपण डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा जशा रितीने उपयोगात आणत आहोत तशाच पद्धतीने कृत्रिम प्रज्ञा विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा एआय चा अर्थ जगापेक्षा वेगळा आहे. आमच्यासाठी एआय म्हणजे ‘ऑल इनक्लुजिव्ह’ अर्थात सर्व समावेशक असा अर्थ आहे.
मित्रांनो,
सध्या जगात कृत्रिम प्रज्ञेविषयी विश्वास आणि सुरक्षेबाबत वादविवाद सुरू आहेत. भारतानं मात्र आधीच यासाठी विश्वासार्हता स्तर तयार केला आहे. भारताच्या कृत्रिम प्रज्ञा अभियानामध्ये माहिती आणि गोपनीयता या दोन्हीही बाबी हाताळण्याची क्षमता आहे. ज्यावर नवोन्मेषक समावेशकता प्रणाली विकसित करता येईल असे मंच कृत्रिम प्रज्ञेच्या क्षेत्रातही तयार करण्याची आमची इच्छा आहे. आर्थिक व्यवहार मंचाबाबत आमचे प्राधान्य वेग आणि हमी यांना आहे. पतपुरवठ्याबाबत आमचं उद्दीष्ट मंजूरी आणि परवडणारे व्याजदर यांना आहे. विमाक्षेत्रात आम्ही पॉलिसी आणि वेळेत परतावा हे उद्दीष्ट ठेवलं आहे. गुंतवणूक क्षेत्रात आपल्याला सुलभता आणि पारदर्शकता या गोष्टी साध्य करायच्या आहेत. ही सगळी उद्दीष्टं साध्य करताना आवश्यक बदल घडवण्यामध्ये कृत्रिम प्रज्ञेचा चांगला वापर होऊ शकतो. कृत्रिम प्रज्ञा ऍपची रचना लोकांचे हित लक्षात घेऊन, लोकांना प्राधान्य देणारी असली पाहिजे. पहिल्यांदाच डिजिटल वित्तीय सेवा वापरणाऱ्या व्यक्तीला त्याच्या वापरातील त्रुटी लगेचच दुरुस्त केल्या जातील असा विश्वास वाटला पाहिजे. हा विश्वासच वित्तीय सेवांमधल्या डिजिटल रुपांतरणावरचा भरवसा आणखी भक्कम करेल.
मित्रांनो,
काही वर्षांपूर्वी युनायटेड किंग्डममध्ये पहिल्यांदा कृत्रिम प्रज्ञा सुरक्षा परिषदेची सुरुवात झाली. पुढच्या वर्षी कृत्रिम प्रज्ञा परिणाम शिखर परिषद भारतात होणार आहे. सुरक्षेबाबतची चर्चा युनायेड किंग्डममध्ये सुरू झाली आणि आता परिणामांबाबतची चर्चा भारतात होईल. जागतिक व्यापार आणि दोन्ही देशांसाठी लाभदायी व्यापाराचा मार्ग भारत आणि युनायटेड किंग्डम यांनी जगाला दाखवून दिला आहे. कृत्रिम प्रज्ञा आणि वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रातली आमची भागीदारी हा दृष्टीकोन आणखी सशक्त करत आहे. युनायटेड किंग्डममधलं संशोधन आणि जागतिक वित्तीय कौशल्य तसंच भारतातलं कौशल्य आणि तुलनात्मक सक्षमता यांच्या संयोगातून संपूर्ण जगासाठी संधींचे नवे दरवाजे खुले होऊ शकतात. स्टार्टअप्स, शैक्षणिक संस्था आणि नवोन्मेष संकुलांमधले परस्परसंबंध आणखी मजबूत करण्याचा निश्चय आम्ही केला आहे. युके-भारत वित्ततंत्रज्ञान भागीदारीमुळे नवीन स्टार्टअप्स सुरू करण्याची आणि वाढवण्याची संधी मिळेल. याशिवाय लंडन शेअर बाजार आणि गिफ्ट सिटी अर्थात गुजरात आंतरराष्ट्रीय वित्त तंत्रज्ञान शहर यांच्यातील सहकार्याचे नवे मार्ग प्रशस्त होऊ शकतात. दोन्ही देशांमधल्या या वित्तीय समावेशकतेमुळे इथल्या कंपन्यांना मुक्त व्यापार कराराचा जास्तीत जास्त फायदा करुन घेता येईल.
मित्रांनो,
आपल्या सर्वांवर एक खूप मोठी जबाबदारी आहे. या मंचावरुन मी आज यूकेसोबतच जगातल्या इतर देशांनाही भारताबरोबर भागीदारी करण्यासाठी आमंत्रित करतो. भारताच्या प्रगतीसोबत विकास करण्याचे आवाहन सर्व गुंतवणुकदारांना करतो. तंत्रज्ञानामुळे नागरिक आणि पृथ्वी दोन्हींचा विकास होईल अशा रितीनं आपल्याला फिनटेक विश्व निर्माण करायचे आहे. या विश्वात नवोन्मेषाचा उद्देश केवळ विकास नाही तर कल्याणाचादेखील असेल, संख्यात्मक वित्तीय प्रगतीसह मानवतेच्या कल्याणाचाही विचार असेल. या आवाहनासह तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
रिझर्व्ह बँकेचेही खूप खूप अभिनंदन! धन्यवाद.
***
सुवर्णा बेडेकर / आशुतोष सावे / सुरेखा जोशी / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2177248)
Visitor Counter : 11
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam