पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्रातील मुंबई येथे अनेक विकास प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 08 OCT 2025 10:32PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर  2025

 

महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी रामदास आठवले जी, के.आर. नायडू जी, मुरलीधर मोहोळ जी, महाराष्ट्र सरकारचे उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे जी, अजित पवार जी, अन्य मंत्रीगण, जपानचे भारतातील राजदूत केइची ओनो आणि इतर मान्यवर, बंधू आणि भगिनींनो!

विजयादशमी झाली, कोजागरी पौर्णिमा झाली आणि आता दहा दिवसांनी दिवाळी, तुम्हाला  सर्वांना या सणासाठी  मनःपूर्वक शुभेच्छा.

मित्रहो,

आज, मुंबईची दीर्घ प्रतीक्षा संपली आहे. मुंबईचे आता दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. आशियातील सर्वात मोठे कनेक्टिव्हिटी केंद्र म्हणून या प्रदेशाची स्थापना करण्यात हे विमानतळ मोठी भूमिका निभावेल. आज, मुंबईत पूर्णपणे भूमिगत मेट्रो प्रणाली देखील आहे, ज्यामुळे मुंबईतील प्रवास सुलभ होईल आणि लोकांचा वेळ वाचेल. ही भूमिगत मेट्रो प्रणाली विकसनशील भारताचे जिवंत प्रतीक आहे. ही भव्य मेट्रो भूमिगत बांधली गेली आहे, मुंबईसारख्या व्यग्र शहरातील ऐतिहासिक इमारतींचे जतन करत ही भूमिगत भव्य मेट्रो प्रणाली उभारण्यात आली आहे. याच्याशी निगडित श्रमिक आणि अभियंत्यांचे देखील मी आज अभिनंदन करतो.

मित्रहो,

भारतातील तरुणांसाठी हा अगणित संधींचा काळ आहे. काही दिवसांपूर्वीच देशातील असंख्य आयटीआयची उद्योगांशी सांगड घालण्यासाठी 60,000 कोटी रुपयांची पीएम सेतू योजना सुरू करण्यात आली. आजपासून, महाराष्ट्र सरकारने शेकडो आयटीआय आणि तंत्रनिकेतन विद्यालयांमध्ये नवीन कार्यक्रम सुरू केले आहेत. यामुळे शालेय विद्यार्थ्यांना ड्रोन, रोबोटिक्स, इलेक्ट्रिक वाहने, सौर ऊर्जा, हरित हायड्रोजन आणि इतर असंख्य नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेता येईल. मी महाराष्ट्रातील तरुणांना खूप खूप शुभेच्छा देतो.

मित्रहो,

या महत्त्वाच्या प्रसंगी, मला महाराष्ट्राचे सुपुत्र, लोकनेते दि. बा. पाटील यांचीही आठवण येत आहे. समाज आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी दाखवलेला सेवाभाव आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे जीवन सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना नेहमीच प्रेरणा देईल.

मित्रहो,

आज, संपूर्ण देश विकसित भारताच्या संकल्पपूर्तीत व्यग्र  आहे. विकसित भारत म्हणजे असा भारत जिथे गती आणि प्रगती दोन्हीचा अंतर्भाव असेल, जिथे जनहित सर्वोपरि असेल आणि जिथे सरकारी योजना नागरिकांचे जीवन सुकर करतील. गेल्या 11 वर्षांच्या प्रवासाचा तुम्ही आढावा घेतला तर तुम्हाला भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात याच भावनेने जलद प्रगती दिसून येईल. जेव्हा वंदे भारत अर्ध-जलद-गती रेल्वे रुळांवर धावतात, जेव्हा बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू होते, जेव्हा रुंद महामार्ग आणि एक्सप्रेसवे नवीन शहरांना जोडतात, जेव्हा डोंगरांमधून लांब बोगदे बांधले जातात, जेव्हा लांब आणि उंच समुद्री पूल समुद्राच्या दोन किनाऱ्यांना जोडतात, तेव्हा भारताचा वेग आणि भारताची प्रगती दिसून येते. तेव्हा भारतातील तरुणांना झेप घेण्यासाठी नवीन बळ मिळते.

मित्रहो,

आजचा कार्यक्रम देखील या प्रक्रियेला पुढे नेतो. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा असाच एक प्रकल्प आहे जो विकसित भारताचे द्योतक आहे. तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर बांधला गेला आहे आणि त्याचा आकार कमळाच्या फुलासारखा आहे, जो संस्कृती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. हे नवीन विमानतळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना युरोप आणि मध्य पूर्वेतील सुपरमार्केटशी देखील जोडेल. त्यामुळे शेतकऱ्यांची ताजी उत्पादने, फळे, भाज्या आणि मच्छिमारांची उत्पादने जागतिक बाजारपेठेत शीघ्रतेने पोहोचतील. हे विमानतळ स्थानिक लघु आणि मध्यम आकाराच्या उद्योगांसाठी निर्यात खर्च कमी करेल, गुंतवणूक वाढवेल आणि नवीन उद्योग आणि उपक्रमांच्या उदयाला चालना देईल. या विमानतळाबद्दल मी महाराष्ट्र आणि सर्व मुंबईकरांचे अभिनंदन करतो.

मित्रहो,

जेव्हा स्वप्नपूर्तीचा दृढनिश्चय असतो, जेव्हा जलद विकासाचे फायदे देशवासीयांपर्यंत पोहोचवण्याची आस असते, तेव्हा परिणाम साध्य होतात. आपली हवाई सेवा आणि त्याच्याशी संबंधित उद्योग हे याचे एक उत्तम द्योतक आहे. तुम्हाला आठवत असेल की 2014 मध्ये, जेव्हा देशाने मला संधी दिली, तेव्हा मी म्हटले होते की माझे स्वप्न होते की हवाई चप्पल घालणाऱ्यांनाही विमानाने प्रवास करता यावा. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, देशात नवीन विमानतळ बांधणे अत्यंत निकडीचे होते. आमच्या सरकारने या मोहिमेवर गांभीर्याने काम करण्यास सुरुवात केली. गेल्या 11 वर्षांत, देशभरात एकामागून एक नवीन विमानतळ बांधले गेले आहेत. 2014 मध्ये, आपल्या देशात फक्त 74 विमानतळ होते. आज, भारतात विमानतळांची संख्या 160 पेक्षा जास्त झाली आहे.

मित्रहो,

जेव्हा लहान शहरांमध्ये विमानतळ बांधले जातात, तेव्हा तेथील लोकांना हवाई प्रवासाचा पर्याय उपलब्ध होतो आणि आर्थिक भार कमी करण्यासाठी, आम्ही उडान योजना सुरू केली, ज्यामुळे लोकांना परवडणाऱ्या किमतीत विमान तिकिटे मिळू लागली. उडान योजनेमुळे गेल्या दशकात लाखो लोकांनी पहिल्यांदाच विमान प्रवास करून त्यांची स्वप्ने पूर्ण केली आहेत.

मित्रहो,

नवीन विमानतळांच्या बांधकामामुळे आणि उडान योजनेमुळे लोकांना केवळ सुविधाच मिळाल्या नाहीत तर भारत जगातील तिसरा सर्वात मोठा देशांतर्गत विमान वाहतूक बाजार देखील बनला आहे. आता, आपल्या विमान कंपन्यांचा सतत विस्तार होत आहे. एकट्या भारतातील विमान उत्पादक कंपन्यांकडे सध्या जवळजवळ 1,000 नवीन विमानांसाठी मागणी आहे ही माहिती जगभरातील लोकांना  कळल्यावर त्यांना आश्चर्य वाटते. यामुळे नवीन पायलट, केबिन क्रू, अभियंते आणि कर्मचाऱ्यांसाठी नवीन संधी निर्माण होत आहेत.

मित्रहो,

विमानांची संख्या वाढत असताना, देखभाल आणि दुरुस्तीही वाढते. याकरितादेखील आम्ही देशात नवीन सुविधा निर्माण करत आहोत. या दशकाच्या अखेरीस भारताला एक प्रमुख ‘एमआरओ’  केंद्र  बनवण्याचे आमचे ध्येय आहे. यातूनही भारतातील तरुणांसाठी अनेक नवीन रोजगाराच्या संधी देखील निर्माण होत आहेत.
आज भारत जगातील सर्वात युवा देश आहे. आपली ताकत म्हणजे आपल्याकडील युवा वर्ग आहे. म्हणूनच, आमच्या प्रत्येक धोरणाचा केंद्रबिंदू युवकांना जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात हा असतो. ज्यावेळी पायाभूत सुविधांवर अधिक गुंतवणूक केली जातो, त्यावेळी रोजगाराच्या संधी निर्माण होतात. ज्यावेळी 76 हजार कोटी रूपये खर्च करून वाढवण सारखे बंदर तयार केले जाते, त्यावेळी त्या भागामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होतात. ज्यावेळी व्यापार वाढेल, ज्यावेळी मालाची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होईल आणि यासंबंधीच्या क्षेत्राला गती मिळते, त्याचवेळी तिथे असंख्य रोजगार निर्माण होतात.

बंधू आणि भगिनींनो,

आम्ही अशा काही संस्कारामध्ये लहानाचे -मोठे झालो आहोत की, जिथे राष्ट्राचे धोरण- राष्ट्रनीती हाच राजकारणाचा आधार आहे. आमच्यासाठी पायाभूत सुविधांवर खर्च होणारा अगदी पैसा न् पैसा हा देशवासियांच्या सुविधा आणि त्यांचे सामर्थ्य वाढविण्याचे माध्यम आहे. परंतु दुसरीकडे देशामध्ये एक अशा राजकारणाचा प्रवाहही आहे. त्या प्रवाहानुसार जनतेला सुविधा दिल्या जात नाहीत, तर सत्तेची सुविधा सर्वात उच्च स्थानी ठेवली जाते. असेच लोक विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करतात. कामे थांबवतात. व्यवहारांमध्ये घोटाळे -गडबड करून विकास प्रकल्पांची चांगली सुरू  असलेली गाडी चांगल्या  मार्गावरून खाली घसरवतात. या कृतींनी अनेक दशके त्यांनी विकास कामे रखडवून खूप मोठे नुकसान केलेले देशाने पाहिले आहे.

मित्रांनो,

आज ज्या मेट्रो मार्गिकेचे लोकार्पण झाले आहे, हे काम अशा लोकांनी केलेल्या कारवायांचे स्मरण करून देत आहेत. या प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालो होतो. त्यावेळी मुंबईतील लक्षावधी कुटुंबांच्या अनेक आशा-आकांक्षा पल्लवीत झाल्या होत्या. आता त्यांचा त्रास कमी होईल, असे त्यांना वाटत होते. परंतु काही कालावधीसाठी जे सरकार महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आले, त्यांनी हे कामच थांबवले. त्यांना सत्ता मिळाली परंतु देशाचे हजारो कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले. इतकी वर्षे सर्वांना गैरसोय सहन करावी लागली. काम थांबवल्याने खूप वर्षे सुविधा लोकांना मिळू शकली नाही. आता ही मेट्रो मार्गिका तयार झाल्यामुळे दोन-अडीच तास ज्या प्रवासाला लागते होते, तो प्रवास आता 30 ते 40 मिनिटांमध्ये होईल. ज्या मुंबईमध्ये प्रत्येक क्षण, प्रत्येक मिनीट महत्वाचा आहे, तिथे तीन-चार वर्षे या सुविधेपासून मुंबईकर वंचित राहिले गेले. काम थांबवून असा प्रकल्पाला विलंब करणे ही गोष्ट काही एखादे पाप करण्यापेक्षा कमी नाही.

मित्रांनो,

गेल्या 11 वर्षांमध्ये देशवासियांचे जीवनमान अधिक सुलभ बनविण्यासाठी म्हणजेच त्यांच्या राहणीमानात सुलभता आणण्यासाठी विविध कामे करण्यावर सरकारकडून भर दिला जात आहे. आणि म्हणूनच रेल-मार्ग, रस्ते मार्ग, हवाई वाहतूक, मेट्रो, इलेक्ट्रिक बस अशा विविध सुविधा निर्माण करण्यासाठी प्रचंड प्रमाणावर गुंतवणूक केली जात आहे. अटल सेतू आणि सागरकिनारी मार्ग यासारख्या प्रकल्पांचे काम केले गेले आहे.

मित्रांनो,

आम्ही वाहतुकीच्या सर्व प्रकारच्या माध्यमांना एकमेंकांशी जोडत आहोत. आमचा असा प्रयत्न आहे की, जनतेला विनाव्यत्यय, कोणत्याही त्रासाशिवाय प्रवास करता आला पाहिजे. एका माध्यमातून दुस-या प्रवासी साधनांसाठी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती करावी लागू नये, याचा आम्ही विचार करीत आहोत. आज देश ‘वन नेशन, वन मोबिलिटी‘ या दिशेने पुढे जात आहे. मुंबई वन अॅप सुद्धा याच दिशेने केलेला प्रयत्न आहे. आता मुंबईकरांना तिकिटासाठी लांबच लांब रांगांमध्ये तासंतास उभे रहावे लागणार नाही.  मुंबई वन अॅपच्या माध्यमातून एकदा तिकीट काढले की, त्याच तिकिटाच्या मदतीने उपनगरी रेल सेवा, बस, मेट्रो अथवा टॅक्सी यांनी प्रवास करणे शक्य होणार आहे.

मित्रांनो,

मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे, त्याचबरोबर भारतातील सर्वाधिक चैतन्य, उत्साह असलेले,  सळसळते शहर आहे. म्हणूनच 2008 मध्ये दहशतवाद्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर हल्ले करण्यासाठी मुंबई शहराची निवड केली. परंतु त्यावेळी सत्तेवर असलेल्या कॉंंग्रेस सरकारने आपल्या दुर्बलतेचा संदेश दिला. दहशवाद्यांसमोर गुडघे टेकवण्याचा संदेश दिला. अगदी अलिकडेच  देशाच्या  गृहमंत्री पदाचा कार्यभार सांभाळलेल्या  एका मोठ्या  काँग्रेस नेत्याने, एका मुलाखतीमध्ये याविषयी खूप मोठा खुलासा केला आहे. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार , मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आपल्या सशस्त्र सेनेने पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी सिद्धता केली होती. आणि संपूर्ण देशाला  त्यावेळी आपण पाकिस्तानला सडेतोड हल्ल्याने उत्तर द्यावे असे वाटत होते. परंतु त्यावेळी प्रत्यक्षात काय घडले हे सांगताना त्या काँग्रेस नेत्याने सांगितले की, कुणा दुस-या एखाद्या देशाच्या दबावामुळे त्यावेळी काँग्रेस सरकारने भारताच्या लष्कराला पाकिस्तानवर हल्ला करण्यापासून रोखले होते. काँग्रेसने आता हे स्पष्ट केले पाहिजे की, परदेशी दबावाखाली असा निर्णय घेतला, ते होते तरी कोण? परक्या देशांच्या दबावाखाली निर्णय घेणारे काँग्रेसमधले व्यक्ती कोण आहेत, हे जाणून घेण्याचा देशाचा अधिकार आहे. काँग्रेसच्या या कमकुवतपणामुळे दहशतवादी अधिक मजबूत झाले. देशाची सुरक्षा कूचकामी ठरली, त्याची किंमत देशाला वारंवार मोजावी लागली. दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमुळे अनेकजणांना प्राण गमवावे लागले.

मित्रांनो,

आपल्यासाठी, देश आणि देशवासीय यांच्या सुरक्षेपेक्षा कोणतीही गोष्ट मोठी नाही. आजचा भारत दमदार, सडेतोड उत्तर देणारा आहे. आजचा भारत शत्रूच्या घरामध्ये घुसून त्यांना मारणारा आहे. ही गोष्ट संपूर्ण जगाने ऑपरेशन सिंदूरच्या वेळी पाहिली आहे. आणि आपल्या सैनिकांनी केलेल्या अभिमानास्पद कामगिरीचा अनुभव घेतला आहे.

मित्रांनो,

गरीब असो अथवा नवमध्यम वर्ग असो किंवा मध्यम वर्ग असो या सर्वांचे सशक्तीकरण व्हावे, यासाठी सरकारचे प्राधान्य आहे. ज्यावेळी या कुटुंबाना सुविधा मिळतात, सन्मान मिळतो त्यावेळी त्यांचे सामर्थ्य वाढत असते. देशवासियांच्या सामर्थ्यामुळे देश सशक्त होत आहे. आता अलिकडेच जीएसटी मध्ये ‘पुढच्या पिढीतील सुधारणा घडूवन आणल्या आहेत. त्यानुसार ज्या ज्या गोष्टी स्वस्त झाल्या आहेत, त्यामुळेही देशातील लोकांचे सामर्थ्य वाढले आहे. बाजारपेठांकडून आलेली आकडेवारी सांगते की, यंदा नवरात्रीच्या काळामध्ये झालेल्या विक्रीने अनेक वर्षांचे विक्रम मोडीत काढले आहेत. विक्रमी संख्येने लोक स्कूटर, मोटारसायकल, टी.व्ही., फ्रिज, वॉशिंग मशिन अशा बऱ्याच वस्तू खरेदी करत आहेत.

मित्रांनो,

ज्या गोष्टींमुळे देशवासियांचे जीवन अधिक सुखकर होते, ज्यामुळे देशाला ताकद मिळते, त्या गोष्टी करण्यासाठी यापुढेही आमचे सरकार विविध पावले उचलत राहील. परंतु माझा आपल्या सर्वांना एक आग्रह आहे. तुम्ही सर्वांनी स्वदेशीचा स्वीकार करावा. अभिमानाने  सांगा, ही गोष्ट स्वदेशी आहे, ही गोष्ट आपल्या देशात, घरामध्ये तयार झाली आहे. प्रत्येक बाजारपेठेचा जणू हा मंत्र बनला पाहिजे. प्रत्येक देशवासियाने स्वदेशी कपडे, चप्पला यांची खरेदी केली पाहिजे, स्वदेशी सामानच घरी आणले जाईल, हे कटाक्षाने पाहिले पाहिजे. तसेच जर कोणाला भेटवस्तू द्यायची असेल तर ती स्वदेशीच असावी, असे केले तरच देशाचा पैसा देशामध्येच राहील, देशामध्ये फिरेल. यामुळे भारतातील श्रमिकांना काम मिळेल. भारताच्या तरुणांना रोजगार मिळेल. कल्पना करा, ज्यावेळी संपूर्ण भारताने, सर्व भारतीयांनी स्वदेशीचा पूर्णपणे स्वीकार केला तर आपल्या देशाचे सामर्थ्य किती वाढेल.

मित्रांनो,

महाराष्ट्र राज्य देशाच्या विकासाला गती देण्याच्या कामामध्ये नेहमीच आघाडीवर राहिले आहे. ‘एनडीए‘चे डबल इंजिन सरकार, महाराष्ट्रातील प्रत्येक शहरांचे आणि गावांचे सामर्थ्य वाढविण्याचे काम निरंतर करणार आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे नवीन विकास कामांबद्दल खूप खूप अभिनंदन करतो. तुम्हा सर्वांना अनेक-अनेक शुभेच्छा देतो. माझ्याबरोबर सर्वांनी जयघोष करावा....

भारत माता की जय!

दोन्ही हात वर उचलून विजयाचा उत्सव साजरा करावा.

भारत माता की जय !

भारत माता की जय!

खूप-खूप धन्यवाद!!


सुवर्णा बेडेकर/नेहा कुलकर्णी/वासंती जोशी/सुवर्णा बेडेकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2176791) Visitor Counter : 18