पंतप्रधान कार्यालय
कौशल दीक्षांत समारंभप्रसंगी विविध युवा केंद्रित उपक्रमांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
Posted On:
04 OCT 2025 11:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर 2025
बिहारचे लोकप्रिय मुख्यमंत्री नितीश कुमार जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी जुएल ओरामजी, राजीव रंजनजी, जयंत चौधरी जी, सुकांता मुजुमदारजी, बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी जी, विजयकुमार सिन्हा, बिहार सरकारचे मंत्रीगण, संसदेतील माझे सहकारी संजय झा जी, अन्य लोकप्रतिनिधी आणि देशभरातल्या आयटीआयशी निगडित लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनी, बिहारचे लाखो विद्यार्थी आणि शिक्षक गण, स्त्री आणि पुरुष गण…
काही वर्षांपूर्वी आमच्या सरकारने आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी व्यापक स्तरावर दीक्षांत सोहळ्याची नवी परंपरा सुरू केली होती. आज या परंपरेच्या आणखी एका सोहळ्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. मी भारताच्या कानाकोपऱ्यातून सहभागी झालेल्या आयटीआयच्या सर्व युवा मित्रांना माझ्या शुभेच्छा देतो.
मित्रहो,
आजचा समारंभ या गोष्टीचे प्रतीक आहे की आजचा भारत कौशल्याला किती प्राधान्य देत आहे. आज देशभरातल्या युवकांसाठी शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या आणखी दोन मोठ्या योजनांचा प्रारंभ झाला आहे.
मित्रहो,
या दीक्षांत समारंभाच्या मागे मनात जो विचार होता तो हाच होता की जोपर्यंत आपण परिश्रमाला प्रतिष्ठा देणार नाही, कौशल्यासाठी जे लोक काम करतात, ज्यांच्यात सामर्थ्य आहे जर त्यांचा सार्वजनिक जीवनात सन्मान केला गेला नाही, तर ते कदाचित स्वतःला कमकुवत समजतील आणि एक मानसिकता बदलण्याचे हे एक अभियान आहे. आम्ही “श्रमेव जयते” देखील म्हणतो आणि आम्ही “श्रमेव पूज्यते” देखील म्हणतो आणि म्हणूनच तीच भावना घेऊन देशभरात आयटीआयचे जे शिक्षार्थी आहेत त्यांच्यात देखील एक विश्वास निर्माण होईल की ते कुठे जाऊ शकले नाहीत म्हणून इथे आलेत असं नाही, इथे देखील त्यांच्यासाठी उत्तम भविष्याचा मार्ग आहे म्हणून ते इथे आले आहेत आणि राष्ट्र निर्मिती कौशल्याचे खूप मोठे योगदान असते. म्हणूनच मी आयटीआयच्या सर्व मित्रांचे तितक्यात सन्मानाने आज अभिनंदन करतो. आज आणखी दोन मोठ्या योजनांचा जो प्रारंभ झाला आहे, 60000 कोटी रुपयांच्या पीएम सेतु योजनेमुळे आपल्या आयटीआय आता उद्योगाबरोबर थेट आणि भक्कमपणे जोडल्या जातील. देशभरात नवोदय विद्यालये आणि एकलव्य आदर्श शाळांमध्ये 1200 कौशल्य प्रयोगशाळांचे देखील आज उद्घाटन करण्यात आले.
मित्रहो,
जेव्हा या कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली तेव्हा मूळ कार्यक्रम तर हाच होता की इथे विज्ञान भवनात दीक्षांत समारंभाचे आयोजन निश्चित झालं होतं, मात्र म्हणतात ना, सोने पे सुहागा, तसंच इथे देखील झाले. नितीशजी यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव महाउत्सव बनवण्याचा प्रस्ताव आला आणि म्हणूनच आज एका कार्यक्रमाचे दोन कार्यक्रम तयार झाले. एक आयटीआयचा भारत सरकारचा कार्यक्रम आणि बिहार मधील अनेकविध कार्यक्रम. आज बिहारच्या युवकांसाठी देखील या मंचावरून अनेक योजना आणि प्रकल्पांचा शुभारंभ झाला आहे. बिहारमध्ये नवीन कौशल्य प्रशिक्षण विद्यापीठ, अन्य विद्यापीठांमध्ये सुविधांचा विस्तार, युवकांसाठी युवा आयोग, हजारो युवकांना कायमस्वरूपी सरकारी नोकरीचे नियुक्तीपत्र हे सर्व बिहारच्या युवकांच्या उत्तम भविष्याची हमी आहे.
मित्रहो,
काही दिवसांपूर्वीच बिहारच्या भगिनींसाठी रोजगार आणि आत्मनिर्भरतेशी संबंधित एका खूप मोठ्या कार्यक्रमात सहभागी होण्याची मला संधी मिळाली होती. त्यामध्ये लाखो भगिनी सहभागी झाल्या होत्या. आज बिहारच्या युवकांच्या सशक्तिकरणाचा हा भव्य कार्यक्रम आहे. यावरून दिसून येते की सरकार बिहारच्या युवकांना, बिहारच्या महिलांना किती प्राधान्य देत आहे.
मित्रहो,
भारत ज्ञान आणि कौशल्याचा देश आहे. हीच बौद्धिक ताकद आपली सर्वात मोठी ताकद आहे आणि जेव्हा हे कौशल्य, हे ज्ञान देशाच्या गरजांशी जोडले जाते, देशाच्या गरजा पूर्ण करण्याशी जोडले जाते, तेव्हा त्यांची ताकद अनेक पटीने वाढते. आज एकविसाव्या शतकाची गरज आहे की आपण देशाच्या गरजा ध्यानात घेऊन स्थानिक गुणवत्ता, स्थानिक साधन संपत्ती, स्थानिक कौशल्य आणि स्थानिक ज्ञानाला वेगाने पुढे न्यावे आणि यामध्ये आपल्या हजारो आयटीआयची खूप मोठी भूमिका आहे. आज या आयटीआयमध्ये सुमारे 170 कौशल्य प्रकारांमध्ये आपल्या युवकांना प्रशिक्षण दिले जात आहे. मागील अकरा वर्षांमध्ये दीड कोटींहून अधिक युवक या विविध प्रकारांमध्ये प्रशिक्षित झाले आहेत. म्हणजेच त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रांमधील कौशल्य, त्यातील तांत्रिक पात्रतेशी जोडण्यात आले आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की या युवकांना त्यांच्या स्थानिक भाषांमध्ये त्यांचे कौशल्य शिकवण्यात आले आहे. यावर्षी देखील दहा लाखांहून अधिक विद्यार्थी अखिल भारतीय कौशल्य चाचणीमध्ये सहभागी झाले. त्यापैकी 45 हून अधिक अशा यशस्वी मित्रांना सन्मानित करण्याची संधी मला मिळाली आहे.
मित्रहो,
माझ्यासाठी हा अभिमानाचा क्षण यासाठी देखील आहे कारण यामध्ये मोठ्या संख्येने ते युवा मित्र आहेत, जे ग्रामीण भारतातून आले आहेत, दुर्गम भागातून आले आहेत. त्यांना पाहिले की वाटते, जणू काही लघु भारत इथे बसला आहे. यामध्ये आपल्या मुली देखील आहेत, आपले दिव्यांग मित्र देखील आहेत आणि या सर्वांनी आपल्या परिश्रमाने हे यश संपादन केले आहे.
मित्रहो,
आपल्या आयटीआय औद्योगिक शिक्षणात देखील सर्वोत्तम संस्था तर आहेतच, त्या आत्मनिर्भर भारताची कार्यशाळा देखील आहेत. म्हणूनच त्यांची संख्या वाढवण्याबरोबरच सातत्याने त्यांचे उन्नतीकरण करण्यावर देखील आमचा भर आहे. 2014 पर्यंत आपल्या देशात दहा हजार आयटीआय स्थापन झाल्या होत्या. मात्र मागील एका दशकात सुमारे पाच हजार नवीन आयटीआय देशात स्थापन करण्यात आल्या, म्हणजेच देश स्वतंत्र झाल्यानंतर दहा हजार आणि मोदी आल्यानंतर नवीन 5000. उद्योग क्षेत्राला आज कशा प्रकारचे कौशल्य हवे आहे, दहा वर्षानंतर कशा प्रकारचे कौशल्य आवश्यक असेल, यासाठी आयटीआय जाळे निर्माण केले जात आहे. यासाठी उद्योग आणि आयटीआय यांच्यात ताळमेळ वाढवला जात आहे. आज आम्ही या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. आज पीएम सेतू योजनेचा प्रारंभ करण्यात आला आहे. देशभरात आपल्या एक हजाराहून अधिक आयटीआय संस्थाना याचा लाभ होईल. पीएम सेतू योजनेच्या माध्यमातून या आयटीआयचे उन्नतीकरण केले जाईल. इथे नवीन यंत्रसामग्री येईल, अत्याधुनिक यंत्रे येतील. औद्योगिक क्षेत्रातील प्रशिक्षण तज्ञ येथे येतील, अभ्यासक्रम देखील आजच्या आणि भविष्याच्या मागणीनुसार अद्ययावत केला जाईल. एक प्रकारे पीएम सेतू योजना जगाच्या कौशल्य मागणीशी भारताच्या युवकांना जोडेल.
माझ्या युवा मित्रांनो,
तुम्ही पाहत असाल, आजकाल अनेक देशांबरोबर आपले जे करार होत आहेत, त्यामध्ये त्यांचा एक मुद्दा असतो की आम्हाला तुमच्या देशातल्या कुशल मनुष्यबळाची गरज आहे. आपल्या युवकांसाठी जगात नवीन संधी खुल्या होत आहेत.
मित्रहो,
आज या कार्यक्रमाद्वारे, बिहारचे हजारो युवक देखील आपल्याबरोबर जोडले गेले आहेत. या पिढीला तेवढी कल्पना नसेल की दोन अडीच दशकांपूर्वी बिहारमध्ये किती वाईट शिक्षण व्यवस्था होती. प्रामाणिकपणे ना शाळा उघडल्या जात होत्या, ना भर्ती केली जात होती.
कोणत्या आई-वडिलांना आपल्या मुलाने इथेच शिक्षण घ्यावे आणि इथेच प्रगती करावी, असे वाटत नाही. मात्र लाखो मुलांना नाईलाजाने बिहारच्या बाहेर पडून वाराणसी, दिल्ली, मुंबईला जावे लागले. हीच पलायनाची खरी सुरुवात होती.
मित्रांनो,
ज्या झाडाच्या मूळांना कीड लागते त्या झाडाला नवजीवन देणे, ही फार मोठी गोष्ट असते. राजद पक्षाच्या वाईट राज्यकारभाराने बिहारची स्थिती त्या झाडासारखीच करून ठेवली होती. सुदैवाने बिहारच्या लोकांनी नितीशजींवर सरकारची जबाबदारी सोपवली आणि रालोआच्या संपूर्ण संघाने एकत्र येऊन बिघडत चाललेल्या यंत्रणा पुन्हा रुळावर कशा आणल्या याचे आपण सर्वच जण साक्षीदार आहोत. आज, इथे, या कार्यक्रमात देखील आपल्याला याची झलक दिसते आहे.
मित्रांनो,
आजच्या कौशल पदवीदान समारंभात बिहारला एक नवीन कौशल्य विद्यापीठ मिळाले आहे, याचा मला आनंद आहे. नितीशजींनी भारतरत्न लोकनायक कर्पुरी ठाकूरजी यांच्या नावावरून या विद्यापीठाचे नामकरण केले आहे; आणि कर्पुरी ठाकूरजींना लोकनायक या समाज माध्यमांच्या ट्रोल करणाऱ्या समूहाने नाही बनवले तर बिहारच्या लोक-लोकांनी कर्पुरी ठाकूरजींना लोकनायक मानले तेही त्यांचे जीवन पाहून त्यांना लोकनायक मानले. आणि मी तर बिहारच्या लोकांना सांगेन की जरा सावध राहा, लोकनायक हे पद कर्पुरी ठाकूर यांच्यासाठीच आहे, आजकाल लोक लोकनायक पदवीची देखील चोरी करायला लागले आहेत. आणि म्हणून मी बिहारच्या लोकांना जागरुक राहण्याचा आग्रह करतो आहे, जेणेकरून आपल्या कर्पुरी ठाकूर साहेबांना जनतेने दिलेला हा सन्मान दुसऱ्याच कोणी चोरून न्यायला नको. भारतरत्न कर्पुरी ठाकूरजी यांनी स्वतःचे संपूर्ण जीवन समाजाची सेवा आणि शिक्षण क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी समर्पित केले. समाजातील सर्वात दुबळ्या व्यक्ती देखील आयुष्यात पुढे आल्या पाहिजेत यावर त्यांनी नेहमीच अधिक भर दिला. त्यांच्या नावाने स्थापन होत असलेले हे कौशल्य विद्यापीठ, याच स्वप्नाच्या पूर्ततेच्या दिशेने पुढे जाण्याचे सशक्त माध्यम बनेल.
मित्रांनो,
रालोआचे दुहेरी इंजिन सरकार, बिहारच्या शिक्षण संस्थांना आधुनिक स्वरूप देण्याचा सतत प्रयत्न करत आहे. आयआयटी पाटणा मध्ये पायाभूत सुविधांच्या विस्ताराचे काम देखील सुरु झाले आहे. आजही, बिहारच्या अनेक मोठमोठ्या शिक्षण संस्थांमध्ये आधुनिकीकरणाच्या कार्याला सुरुवात झाली आहे. एनआयटी पाटणाच्या बिहता संस्थेने देखील आपल्या होतकरु विद्यार्थ्यांसाठी दारे उघडली आहेत. याशिवाय, पाटणा विद्यापीठ, भूपेंद्र मंडळ विद्यापीठ, जयप्रकाश विश्वविद्यालय, छपरा आणि नालंदा मुक्त विद्यापीठ या सर्व संस्थांनी नव्या शैक्षणिक सुविधांचा पाया रचला आहे.
मित्रांनो,
चांगल्या संस्थांच्या उभारणीसोबतच नितीशजी यांचे सरकार बिहारमधील तरुणांच्या शिक्षणाचा खर्च देखील कमी करत आहे. उच्च शिक्षण घेण्यात विद्यार्थ्यांना शुल्काची चिंता भेडसावू नये याची देखील काळजी घेण्यात येत आहे. विद्यार्थी क्रेडीट कार्डच्या माध्यमातून बिहार सरकार मुलांना उच्च शिक्षणासाठी मदत करत आहे. आता आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या क्रेडीट कार्डच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या शैक्षणिक कर्जावरील व्याज माफ करण्यात आले आहे, हे कर्ज व्याजमुक्त करण्यात आले आहे; आणि हा बिहार सरकारचा निर्णय आहे. इतकेच नाही तर विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत देखील वाढ करून ती 1800 रुपयांवरुन वाढवून 3600 रुपये करण्यात आली आहे.
मित्रांनो,
आज भारत जगातील तरुण देशांपैकी एक आहे. आणि लोकसंख्येच्या गुणोत्तराच्या बाबतीत अधिक तरुण असलेल्या राज्यांमध्ये बिहारचा समावेश होतो. म्हणूनच जेव्हा बिहारच्या युवकांचे, तरुणांचे सामर्थ्य वाढते तेव्हा स्वाभाविकपणे देशाचे सामर्थ्य देखील वाढते. बिहारमधील तरुणांची ताकद आणखी वाढवण्यासाठी रालोआ सरकार संपूर्ण कटिबद्धतेसह काम करत आहे. राजद-काँग्रेसच्या सत्ता काळाच्या तुलनेत आता बिहारसाठी शिक्षण विषयक तरतुदीत कित्येक पटींनी वाढ करण्यात आली आहे.आज बिहारमध्ये जवळजवळ प्रत्येक गाव-खेड्यात एक शाळा स्थापन झाली आहे, अभियांत्रिकी महाविद्यालय असो, वैद्यकीय महाविद्यालय असो, या सगळ्यांची देखील संख्या कित्येक पटींनी वाढली आहे. नुकतेच केंद्र सरकारने बिहारमधील 19 जिल्ह्यांसाठी केंद्रीय विद्यालये मंजूर केली आहेत. एकेकाळी, बिहारमध्ये क्रीडा क्षेत्राशी संबंधित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा देखील नव्हत्या. आज बिहारमध्ये क्रीडाविषयक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आयोजित होत आहेत.
मित्रांनो,
बिहार सरकारने गेल्या दोन दशकांमध्ये 50 लाख तरुणांना बिहारमध्ये रोजगार उपलब्ध करून दिले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये बिहारमधील तरुणांना सुमारे 10 लाख कायमस्वरुपी सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. तुम्ही शिक्षण क्षेत्रातच पहा, किती मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या नेमणुका होत आहेत. गेल्या 2 वर्षांमध्ये बिहार राज्यात अडीच लाखांहून अधिक शिक्षकांची नेमणूक झाली आहे. यातून तरुणांना नोकऱ्या मिळाल्या आणि शिक्षण प्रणालीचा दर्जा देखील उंचावला.
मित्रांनो,
बिहार सरकार आता नव्या उद्दिष्टांसह काम करत आहे. राज्य सरकारने गेल्या 20 वर्षांमध्ये जितके रोजगार निर्माण केले, आणि आत्ताच नितीशजींनीदेखील त्यांच्या भाषणात सांगितले, तसे,त्या रोजगारांच्या दुप्पट रोजगार येत्या पाच वर्षामध्ये निर्माण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. बिहारच्या तरुणांना बिहारमध्येच नोकऱ्या मिळाव्यात, बिहारमध्येच कामकाज करता यावे, हाच आपला निर्धार आहे.
मित्रांनो,
हा काळ बिहारच्या तरुणांसाठी दुप्पट बोनस मिळण्याचा काळ आहे. सध्या देशात जीएसटी बचत सोहोळा सुरु आहे. मला कोणीतरी म्हणाले की मोटारसायकल आणि स्कूटरवरील जीएसटी कमी झाल्यामुळे बिहारमधील तरुण वर्ग खूप आनंदित झाला आहे. कित्येक तरुणांनी धनत्रयोदशीच्या दिवशी ही वाहने खरेदी करण्याचे नियोजन देखील केले आहे. मी बिहारच्या युवकांचे, देशातील युवकांचे त्यांच्या गरजेच्या गोष्टींवरील जीएसटी कमी झाल्याबद्दल देखील खूप खूप अभिनंदन करतो.
मित्रांनो,
जेव्हा कौशल्ये वाढतात तेव्हा देश स्वावलंबी होतो, निर्यातीत वाढ होते, तसेच रोजगाराच्या संधी देखील वाढतात. 2014 पूर्वी भारताला फ्रजाईल फाईव्ह अर्थव्यवस्था म्हटले जायचे, म्हणजेच विकास कमी प्रमाणात होता, रोजगार देखील फार कमी होते. आज भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होऊ घातली आहे. म्हणजेच देशाचे उत्पादन वाढत आहे, रोजगार वाढत आहेत. मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक्स, वाहन उद्योग आणि संरक्षण क्षेत्रात देखील उत्पादन आणि निर्यातीत अभूतपूर्व वाढ दिसून आली आहे. मोठ्या उद्योगांपासून आपल्या एमएसएमईजपर्यंत सर्वत्र प्रचंड प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे. याचा सर्वात मोठा फायदा आपल्या तरुणांना, खास करून आयटीआयमधून कौशल्य शिकलेल्या तरुणांना झाला आहे. मुद्रा योजनेने देखील कोट्यवधी तरुणांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यास मदत केली आहे. आत्ताच भारत सरकारने एक लाख कोटी रुपयांची पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना देखील सुरु केली आहे. यातून देशातील सुमारे साडेतीन कोटी तरुणांना खासगी क्षेत्रात रोजगार मिळवण्यात मदत होईल.
मित्रांनो,
हा कालावधी देशातील प्रत्येक तरुणासाठी संधींनी ओसंडून वाहत आहे. प्रत्येक गोष्टीचा पर्याय असू शकतो मात्र कौशल्याचा, नवोन्मेषाचा, मेहनतीचा कोणताही पर्याय नाही. या सर्व गोष्टी तुम्हा भारताच्या तरुणांकडे आहेत. तुम्हा सर्वांची शक्ती, विकसित भारताची ताकद बनेल याच विश्वासासह देशभरातील आयटीआयमधील तरुण माझ्यासोबत जोडले गेले आहेत आणि बिहारच्या तरुणांना बिहार सरकारने विविध, नवीन उपहार दिले आहेत त्यासाठी मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. खूप-खूप धन्यवाद.
* * *
शिल्पा नीलकंठ/सुषमा काणे/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2174980)
Visitor Counter : 6