पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशला भेट देणार


'स्वस्थ नारी सशक्त परिवार'आणि '8 व्या राष्ट्रीय पोषण माह'अभियानाचा पंतप्रधानांच्या हस्ते होणार प्रारंभ

देशातील महिला आणि मुलांसाठी आतापर्यंतचे सर्वात मोठे आरोग्य अभियान

17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत देशभरातील सरकारी सुविधांमध्ये एक लाखाहून अधिक आरोग्य शिबिरांचे आयोजन

पंतप्रधान मध्यप्रदेशसाठी आदिवासी भागात सेवा-केंद्रित उपक्रमांची मालिका आदि सेवा पर्व राबवणार

मध्यप्रदेशमध्ये एक कोटीव्या सिकलसेल तपासणी आणि समुपदेशन कार्डचे पंतप्रधानांच्या हस्ते होणार वाटप

पंतप्रधान धार येथे पंतप्रधान मित्र पार्कचे करणार उद्घाटन

Posted On: 16 SEP 2025 6:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशला भेट देणार आहेत. त्यांच्या हस्ते दुपारी 12 वाजता धार येथे 'स्वस्थ नारी सशक्त परिवार' आणि '8 व्या राष्ट्रीय पोषण माह' अभियानाचा प्रारंभ होईल. यावेळी ते इतर अनेक उपक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील आणि उपस्थितांना संबोधित करतील.

आरोग्य, पोषण, तंदुरुस्ती आणि 'स्वस्थ आणि सशक्त भारत' या त्यांच्या वचनबद्धतेनुसार, पंतप्रधान 'स्वस्थ नारी सशक्त परिवार' आणि '8 व्या राष्ट्रीय पोषण माह' मोहिमेचा प्रारंभ करतील. ही मोहीम 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान देशभरातील आयुष्मान आरोग्य मंदिरे, सामुदायिक आरोग्य केंद्रे (सीएचसी), जिल्हा रुग्णालये आणि इतर सरकारी आरोग्य सुविधांमध्ये आयोजित केली जाईल. एक लाखाहून अधिक आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील, ज्यामुळे ही देशातील महिला आणि मुलांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी आरोग्य सेवा ठरेल. देशभरातील सर्व सरकारी आरोग्य सुविधांमध्ये दररोज आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील.

ही देशव्यापी मोहीम समुदाय पातळीवर महिला-केंद्रित प्रतिबंधात्मक, प्रोत्साहनात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सेवा प्रदान करण्याचा प्रयत्न करते. यामुळे असंसर्गजन्य रोग, अशक्तपणा, क्षयरोग आणि सिकलसेल रोगांसाठी तपासणी, लवकर निदान आणि उपचार सुविधा बळकट होतील, तसेच प्रसूतीपूर्व काळजी, लसीकरण, पोषण, मासिक पाळीदरम्यान  स्वच्छता, जीवनशैली आणि मानसिक आरोग्य जागरूकता उपक्रमांद्वारे माता, बाल आणि किशोरवयीन आरोग्याला प्रोत्साहन मिळेल. वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये, केंद्र सरकारी संस्था आणि खाजगी रुग्णालयांद्वारे स्त्रीरोग, बालरोग, नेत्र, ईएनटी, दंत, त्वचारोग आणि मानसोपचार यासारख्या विशेषज्ञ सेवा एकत्रित केल्या जातील.

या मोहिमेअंतर्गत देशभरात रक्तदान मोहीम देखील आयोजित केली जाईल. देणगीदारांची ई-रक्तकोष पोर्टलवर नोंदणी केली जाईल आणि माय गव्ह द्वारे प्रतिज्ञा मोहिमा चालवल्या जातील. लाभार्थ्यांची नोंदणी पीएम-जेएवाय, आयुष्मान वय वंदना आणि आभा अंतर्गत केली जाईल. कार्ड पडताळणी आणि तक्रार निवारणासाठी आरोग्य शिबिरांमध्ये हेल्पडेस्क असतील. महिला आणि कुटुंबांसाठी समग्र आरोग्य आणि निरोगीपणाच्या पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी योग सत्रे, आयुर्वेद सल्लामसलत आणि इतर आयुष सेवा आयोजित केल्या जातील. या मोहिमेत समुदायांना निरोगी जीवनशैलीच्या पद्धतींकडे आकर्षित केले जाईल ज्यामध्ये लठ्ठपणा प्रतिबंध, सुधारित पोषण आणि स्वेच्छेने रक्तदान यावर विशेष भर दिला जाईल. संपूर्ण समाज दृष्टिकोनातून क्षयरोग रुग्णांना पोषण, समुपदेशन आणि काळजी घेण्यास मदत करण्यासाठी समर्पित मंचावर (www.nikshay.in) निक्षय मित्र म्हणून नोंदणी करण्यास नागरिकांना प्रोत्साहित केले जाईल. पंतप्रधान एका क्लिकद्वारे देशभरातील पात्र महिलांच्या बँक खात्यात प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत दिला जाणारा निधी थेट जमा करतील. या योजनेतून देशातील सुमारे दहा लाख महिलांना लाभ मिळणार आहे.

माता आणि बाल आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘सुमन सखी चॅटबॉट’चा प्रारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होईल. हे चॅटबॉट ग्रामीण तसेच दुर्गम भागातील गर्भवती महिलांना आवश्यक आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी योग्य आणि वेळेवर माहिती प्रदान करेल.

याशिवाय, देशाच्या सिकल सेल ॲनिमिया या आजाराविरुद्धच्या सामूहिक लढ्याला पुढे नेत, पंतप्रधान मध्य प्रदेशाचे एक कोटीवे सिकल सेल तपासणी आणि समुपदेशन कार्ड वितरित करतील.

‘आदी कर्मयोगी अभियाना’चा एक भाग म्हणून, पंतप्रधान मध्य प्रदेशसाठी ‘आदी सेवा पर्वा’चा प्रारंभ करतील. हा उपक्रम आदिवासी अभिमान आणि राष्ट्र उभारणीच्या भावनेच्या संगमाचे प्रतिक ठरेल. या उपक्रमात आदिवासी भागात आरोग्य, शिक्षण, पोषण, कौशल्य विकास, उपजीविका वाढ, स्वच्छता, जलसंधारण आणि पर्यावरण संरक्षण यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या सेवा-केंद्रित उपक्रमांची मालिका समाविष्ट असेल. प्रत्येक गावासाठी दीर्घकालीन विकास आराखडे तयार करण्याच्या उद्देशाने ‘आदिवासी गाव कृती आराखडा’ आणि ‘आदिवासी गाव दृष्टिकोन 2030’ वर विशेष भर दिला जाईल.

त्यांच्या 5F दृष्टिकोन - शेतीपासून तंतू निर्मितीपर्यंत (फार्म टू फायबर), तंतू निर्मितीपासून कारखान्यापर्यंत (फायबर टू फॅक्टरी), कारखान्यापासून फॅशन पर्यंत (फॅक्टरी टू फॅशन) आणि फॅशन पासून परदेशापर्यंत (फॅशन टू फॉरेन) - च्या अनुषंगाने, पंतप्रधान धार येथील ‘प्रधानमंत्री मित्र पार्क’चे उद्घाटन करतील. 2150 एकरांहून अधिक जागेवर पसरलेला हा पार्क जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज असेल, ज्यामध्ये सामायिक उत्सर्जन शुद्धीकरण प्रकल्प, सौर ऊर्जा प्रकल्प, आधुनिक रस्ते इत्यादींचा समावेश असेल ज्यामुळे ते एक आदर्श औद्योगिक नगर बनेल. परिणामी, या प्रदेशातील कापूस उत्पादकांना त्यांच्या उत्पादनांना चांगले मूल्य मिळून त्यांचे उत्पन्न वाढेल आणि त्यांना लक्षणीय फायदा होईल.

विविध वस्त्रोद्योग कंपन्यांनी 23,140 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे गुंतवणूक प्रस्ताव सादर केले आहेत. यामुळे नवीन उद्योगांना चालना मिळेल आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. तसेच निर्यातीला लक्षणीयरीत्या चालना मिळून जवळजवळ 3 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

पर्यावरण संवर्धन आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाप्रति त्यांच्या वचनबद्धतेनुसार, पंतप्रधान राज्याच्या ‘एक बागिया माँ के नाम’ उपक्रमांतर्गत महिला बचत गटाच्या लाभार्थ्याला एक रोप भेट देतील. मध्य प्रदेशातील 10,000 हून अधिक महिला 'माँ की बागिया' विकसित करतील. वनस्पतींचे संरक्षण व्हावे म्हणून महिलांच्या गटांना आवश्यक असलेली सर्व साधने आणि संसाधने देखील पुरवली जात आहेत.

 

शैलेश पाटील/वासंती जोशी/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2167285) Visitor Counter : 2