पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आसाममध्ये गोलाघाट येथील पॉलीप्रॉपिलीन प्रकल्पाच्या पायाभरणी प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 14 SEP 2025 5:16PM by PIB Mumbai

भारत माता की जय!
आसामचे लोकप्रिय मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा जी, केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल जी, हरदीपसिंह पुरी जी, आसाम सरकारमधील मंत्री, खासदार, आमदार आणि मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या बंधू-भगिनींनो!
मी सर्व आसामवासीयांना शारदीय दुर्गापूजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो. महापुरुष श्रीमंत शंकरदेव यांच्या जयंतीनिमित्त, मी त्यांना आणि आपल्या सर्व गुरुजनांना आदरांजली अर्पण करतो.

मित्रांनो,
मी गेल्या दोन दिवसांपासून ईशान्य भारतात आहे. जेव्हा-जेव्हा मी ईशान्य भारतात येतो, तेव्हा मला विलक्षण असे प्रेम आणि आशीर्वाद मिळतो. विशेषतः आसामच्या या भागात जो स्नेह, आपुलकी आणि जिव्हाळा अनुभवायला मिळतो, तो विलक्षण आहे. मी तुम्हा सर्व जनतेचे मनःपूर्वक खूप खूप आभार मानतो.

मित्रांनो,
विकसित आसाम आणि विकसित भारताच्या यशस्वी वाटचालीसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आज जवळपास 18 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प आसामला मिळाले आहेत. काही वेळापूर्वी मी दरांग येथे होतो. तिथे मला दळणवळण-संपर्क सुविधा आणि आरोग्याशी संबंधित प्रकल्पांची पायाभरणी करण्याची संधी मिळाली. आता इथे ऊर्जा सुरक्षिततेशी निगडित प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन झाले आहे. ही सर्व धडपड विकसित आसामची वाटचाल आणखी बळकट करेल.

मित्रांनो,
आसाम ही भारताच्या ऊर्जा सामर्थ्याला बळ देणारी भूमी आहे. इथून निघणारी पेट्रोलियम उत्पादने देशाच्या विकासाला गती देतात. आसामच्या या शक्तीला नव्या उंचीवर नेण्यासाठी भाजपा-एनडीए सरकार प्रयत्नशील आहे. या मंचावर येण्यापूर्वी मी जवळच झालेल्या एका कार्यक्रमात गेलो होतो. तिथे बांबूपासून बायो-इथेनॉल तयार करणाऱ्या आधुनिक प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.  आसामसाठी ही अभिमानाची बाब आहे. इथेनॉल प्रकल्पाच्या लोकार्पणाबरोबरच आज इथे पॉली-प्रॉपिलीन प्रकल्पाची पायाभरणीही झाली आहे. हे प्रकल्प आसाममधील उद्योगांना बळकटी देतील, विकासाला गती देतील, शेतकरी आणि तरुणाईसह सर्वांसाठी नव्या संधी निर्माण करतील. इतके प्रकल्प मिळाल्याबद्दल मी आपणा सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो.

मित्रांनो,
आज भारत हा जगातील सर्वात वेगाने विकसित होणारा देश आहे. भारत जसजसा प्रगत होत आहे, तसतशी आपली वीज, गॅस आणि इंधनाची गरजसुद्धा वाढत आहे. आतापर्यंत आपण या गोष्टींसाठी परदेशांवर अवलंबून राहिलो आहोत. आपण मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल आणि वायू, परदेशातून आयात करतो आणि त्याबदल्यात दरवर्षी भारताला लाखो-कोटी रुपये अन्य देशांना द्यावे लागतात. आपल्या पैशांतून परदेशात रोजगार निर्माण होतो, तिथल्या लोकांची कमाई वाढते. ही परिस्थिती बदलणे आवश्यक होते. म्हणूनच भारत आपल्या ऊर्जा गरजांसाठी स्वावलंबी होण्याच्या मार्गावर निघाला आहे.

मित्रांनो,
एकीकडे आपण देशात कच्चे तेल आणि वायू यांचे नवीन साठे शोधत आहोत, तर दुसरीकडे हरीत अर्थात पर्यावरणपूरक ऊर्जेतील (ग्रीन एनर्जी) आपले सामर्थ्य वाढवत आहोत. आपण सगळ्यांनी ऐकले असेल, यावेळी लाल किल्यावरून मी ‘समुद्र मंथन’ प्रकल्पाची घोषणा केली आहे. तज्ञ सांगतात की आपल्या समुद्रातही मोठ्या प्रमाणात तेल आणि वायुचे साठे असू शकतात. या साधनसंपत्तीचा देशाला फायदा व्हावा, त्यांचा शोध घेतला जावा, यासाठी आपण ‘नॅशनल डीप वॉटर एक्सप्लोरेशन मिशन’ ही राष्ट्रीय खोल समुद्रातील उत्खनन मोहीम सुरु करत आहोत.

मित्रांनो,
हरित ऊर्जा निर्मितीत भारतही वेगाने पावले उचलत आहे. एका दशकापूर्वी भारत सौरऊर्जेच्या बाबतीत खूप मागे होता, पण आज सौरऊर्जेच्या क्षेत्रात भारत जगातील पहिल्या पाच देशांमध्ये आला आहे.

मित्रांनो,
बदलत्या काळात भारताला तेल आणि वायु यांना पर्याय म्हणून इतर इंधनांचीही गरज भासत आहे. असाच एक पर्याय म्हणजे इथेनॉल. आज येथे बांबूपासून इथेनॉल तयार करणाऱ्या प्रकल्पाची सुरुवात झाली आहे. याचा मोठा फायदा आसाममधील शेतकऱ्यांना, माझ्या आदिवासी बंधूभगिनींना आणि त्यांच्या कुटुंबांना होईल.

मित्रांनो,
जैव इथेनॉल प्रकल्प चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या बांबूची तरतूदही केली जात आहे. सरकार, स्थानिक शेतकऱ्यांना बांबूची शेती करण्यास मदत करेल आणि बांबुची खरेदीही करेल. येथे बांबू चिपिंगशी (बांबूचे छोटे तुकडे करणे) संबंधित लहान-मोठे कारखाने उभारले जातील. दरवर्षी या क्षेत्रात सुमारे 200 कोटी रुपये खर्च केले जातील. या एका प्रकल्पामुळे इथल्या हजारो लोकांना थेट लाभ होईल.

मित्रांनो,
आता आपण बांबूपासून इथेनॉल तयार करणार आहोत. पण आपल्याला तो दिवसही विसरता येणार नाही, जेव्हा काँग्रेसचे सरकार बांबू कापल्यास लोकांना तुरुंगात टाकत  असे. तोच बांबू, जो आपल्या आदिवासींच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे, त्यावर बंदी होती. आमच्या सरकारने बांबू कापण्यावरची ही बंदी हटवली आणि आज या निर्णयामुळे ईशान्य भारतातील लोकांना मोठा लाभ मिळत आहे.

मित्रांनो,
आपल्या दैनंदिन जीवनात आपण प्लास्टिकपासून बनलेल्या अनेक वस्तू वापरतो. प्लास्टिकच्या बादल्या, कप, चेंडू, खुर्च्या, मेज, बांधणीसाठीची सामुग्री (पॅकेजिंग मटेरियल)—अशा कितीतरी गोष्टींची रोज आपल्याला गरज भासते. या सगळ्या वस्तू तयार करण्यासाठी जी गोष्ट आवश्यक आहे ती म्हणजे ‘पॉली-प्रॉपिलीन’. पॉली-प्रॉपिलीनशिवाय आजच्या जीवनाची कल्पना करणेही कठीण आहे. ह्याच पदार्थापासून गालिचे (कार्पेट), दोरी, पिशव्या, फायबर, मुखपट्टी (मास्क), वैद्यकीय संच (मेडीकल किट), कापड, अगदी गाड्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू, वैद्यकीय उपकरणे आणि शेतीसाठी लागणारी साधने तयार होतात. आज आसामला या आधुनिक पॉली-प्रॉपिलीन प्रकल्पाची भेट मिळणार आहे. या प्रकल्पामुळे ‘मेक इन आसाम, मेक इन इंडिया’(आसामनिर्मित-भारतनिर्मित उत्पादने) यांची भक्कम पायाभरणी होईल आणि इथल्या इतर उत्पादन उद्योगांनाही बळ मिळेल.

मित्रांनो,
आसाम जसे  ‘गामोसा’ (पारंपरिक शेला किंवा उपरणे यासारखे मानाचे वस्त्र) साठी ओळखले जाते, ‘एरी’ आणि ‘मुगा’ रेशीम यासाठी प्रसिद्ध आहे, तसेच आता ‘पॉली-प्रॉपिलीनपासून तयार होणारे कापड’ आसामची नवी ओळख म्हणून समाविष्ट होणार आहे

मित्रांनो,
आपला देश आत्मनिर्भर भारत अभियान या स्वावलंबी भारताच्या मोहिमेसाठी  परिश्रमांची पराकाष्ठा करून दाखवत आहे. आसाम, या अभियानाच्या प्रमुख केंद्रस्थानांपैकी एक राज्य आहे. मला आसामच्या सामर्थ्यावर खूप विश्वास आहे. म्हणूनच आम्ही आसामची निवड एका मोठ्या अभियानासाठी केली आहे आणि ते अभियान म्हणजे ‘सेमीकंडक्टर मिशन’. आसाममवरील माझा विश्वासही या अभियानाइतकाच मोठा आहे.

गुलामगिरीच्या काळात आसामच्या चहाची तितकी विशेष ओळख नव्हती, मात्र पाहता पाहता आसामच्या भूमीने आणि आसाममधील लोकांनी आसामच्या चहाला जागतिक स्तरावरील ब्रांड बनवले. आता नवे युग सुरू होत आहे, भारताला आत्मनिर्भर बनण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत, एक म्हणजे ऊर्जा आणि दुसरी सेमीकण्डक्टर्स, आणि आसाम यामध्ये खूप मोठी भूमिका निभावत आहे.

मित्रांनो,
आज बँकांच्या कार्ड्स पासून मोबाईल फोन, कार, विमान आणि अंतराळ मोहिमेपर्यंत प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा आत्मा एका छोट्या इलेक्ट्रॉनिक चीपमध्ये सामावलेला असतो. जर आपल्याला या सगळ्या वस्तू भारतात तयार करायचा असतील तर त्या चीप देखील आपणच बनवलेल्या असल्या पाहिजेत. म्हणूनच भारताने  सेमीकंडक्टर अभियान सुरू केले आहे आणि या अभियानाचा महत्त्वपूर्ण आधार आसाम हे राज्य आहे. मोरीगाव येथे सेमी कण्डक्टर कारखाना उभारणीचे काम जलद गतीने सुरू आहे. या कारखान्याच्या उभारणीवर 27 हजार कोटी रुपये खर्च केला जात आहे, ही आसामसाठी अभिमानास्पद बाब आहे.

मित्रांनो,
काँग्रेसने देशावर दीर्घकाळासाठी सत्ता गाजवली आहे. येथे आसाममध्ये देखील काँग्रेसने अनेक दशके सरकार चालवले आहे. मात्र जोवर काँग्रेसचे सरकार सत्तेत होते तोवर येथील विकासाची गती खूपच कमी होती आणि येथील वारसा देखील संकटात होता. भाजपाचे डबल इंजिनचे सरकार आसामची जुनी ओळख मजबूत करत आहे आणि आसामला आधुनिक ओळख देखील मिळवून देत आहे. काँग्रेसने आसामला, ईशान्य कडील इतर राज्यांना वेगळेपणाची वागणूक दिली, हिंसा दिली आणि विवाद दिले. भाजपा आसामला विकास आणि वारसाने समृद्ध असणारे राज्य बनवत आहे. हे आमचेच सरकार आहे ज्याने आसामी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. आसाम मधील भाजपाचे सरकार नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जलद गतीने अमलात आणत आहे, याचा मला आनंद आहे. येथे स्थानिक भाषांमधून शिक्षणाला प्रोत्साहन दिले जात आहे.

मित्रांनो,
काँग्रेसने ईशान्य कडील राज्यांच्या, आसामच्या महान सुपुत्रांना कधीही सन्मान दिला नाही. या धरतीवर वीर लासित बोरफुकन यांच्यासारख्या शूर योध्यांनी जन्म घेतला, मात्र त्यांचा जो सन्मान व्हायला हवा होता तो काँग्रेसने कधीच केला नाही. आमच्या सरकारने लासित बोरफुकन यांच्या वारशाचा सन्मान केला. आमच्या सरकारने त्यांची 400 वी जयंती राष्ट्रीय स्तरावर साजरी केली. आमच्या सरकारने त्यांचे जीवन चरित्र तब्बल 23 भाषांमध्ये प्रकाशित केले आहे. मला येथे जोरहाटमध्ये त्यांच्या विशाल पुतळ्याचे अनावरण करण्याची संधी देखील मिळाली होती. काँग्रेसने ज्यांना दुर्लक्षित केले त्यांना आम्ही सर्वोच्च स्थानी स्थापित केले आहे.

मित्रांनो,
येथील शिवसागर चे ऐतिहासिक रंगघर देखील उपेक्षित राहिले आहे, आमच्या सरकारने त्याचे नूतनीकरण केले आहे. आमचे सरकार श्रीमंत शंकरदेव यांचे जन्मस्थळ असलेल्या बटाद्रवा या ठिकाणाला जागतिक स्तरावरील पर्यटन केंद्र बनवण्यासाठी काम करत आहे. ज्याप्रमाणे वाराणसीमध्ये काशी विश्वनाथ धाम परिसर बनवण्यात आला आहे, उज्जैन मध्ये महाकाल महालोक बनवण्यात आले आहे, त्याच धर्तीवर आसाम मध्ये आमचे सरकार माँ कामाख्या कॉरिडॉर देखील बनवत आहे.

मित्रांनो,
आसामच्या संस्कृती आणि इतिहासाशी जोडलेली अशी अनेक प्रतीके आहेत, अनेक अशी ठिकाणे आहेत ज्यांना भाजपाचे सरकार नव्या पिढीसाठी जतन करत आहे. यामुळे आसामच्या वारशाचा फायदा तर होतच आहे पण सोबतच आसाममधील पर्यटनाच्या व्यापकतेला देखील चालना मिळत आहे. आसाम मध्ये जितक्या जास्त प्रमाणात पर्यटन वाढेल तितकाच जास्त प्रमाणात आपल्या नवयुकांना रोजगार प्राप्त होईल.

मित्रांनो,
विकासाच्या या प्रयत्नांदरम्यान आसाम समोर एक मोठे आव्हान विक्राळ रूप धारण करत आहे. हे आव्हान आहे घुसखोरीचे. जेव्हा येथे काँग्रेसचे सरकार होते तेव्हा त्या सरकारने घुसखोरी करणाऱ्यांना जमिनी दिल्या, अवैध कब्जेदारीला संरक्षण दिले. काँग्रेसने मतपेढीच्या लालसेने आसाममध्ये लोकसंख्याशास्त्रीय संतुलन बिघडवून टाकले. मात्र आता भाजप सरकार आसाम मधील लोकांच्या सोबतीने या आव्हानाचा मुकाबला करत आहे. आम्ही घुसखोरांकडून तुमच्या जमिनी मुक्त करत आहोत. ज्यांच्याजवळ जमीन नाही, ज्या आदिवासी कुटुंबांना गरज आहे, असं ना आमचे सरकार जमिनीचे तुकडे देत आहे. मी मिशन बसुंधरा साठी आसाम सरकारची प्रशंसा करतो. या अभियानाअंतर्गत लाखो परिवारांना जमिनीचे तुकडे देण्यात आले आहेत. अहोम, कोच राजबोंगशी आणि गोरखा समुदायाच्या भूमी अधिकारांना काही आदिवासी क्षेत्रांमध्ये मान्यता देण्यात आली आहे, त्यांना संरक्षित वर्गाच्या यादीमध्ये सामील करण्यात आले आहे. आदिवासी समाजाबाबत जो ऐतिहासिक अन्याय झाला आहे भाजपा तो अन्याय दूर करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे.

मित्रांनो,
भाजपा सरकारचा विकासाचा एकच मंत्र आहे, तो म्हणजे - नागरिक देवो भव:, नागरिक देवो भव:. म्हणजे देशातील नागरिकांना कसलीही असुविधा नसावी, त्यांच्या छोट्या छोट्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना इथे- तिथे भटकावे लागू नये. काँग्रेसच्या शासन काळात दीर्घकाळासाठी गरिबांना त्रास दिला गेला, त्यांची प्रतारणा केली गेली. कारण एका विशिष्ट वर्गाचे तुष्टीकरण करून काँग्रेसचा स्वार्थ पूर्ण होत होता. त्यांना सत्ता मिळत होती. मात्र भाजपा तुष्टीकरण नाही तर संतुष्टीकरणावर भर देते. कोणताही गरीब, कोणतेही क्षेत्र मागे राहू नये या भावनेने आम्ही काम करत आहोत. आज आसाम मध्ये गरिबांसाठी पक्की घरे बांधण्याचे काम जलद गतीने सुरू आहे, आजवर आसाम मध्ये वीस लाखाहून अधिक पक्की घरे गरिबांना देण्यात आली आहेत. प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पोहोचवण्याचे काम देखील आसाममध्ये जलद गतीने केले जात आहे.

मित्रांनो,
भाजपा सरकार चालवत असलेल्या गरीब कल्याणाच्या योजनांचा लाभ येथे चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या माझ्या बंधू आणि भगिनींना देखील होत आहे. चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या श्रमिकांचे हित याला आम्ही प्राधान्य देत आहोत. चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या महिला आणि त्यांच्या मुलांना सरकारकडून मदत दिली जात आहे. महिलांचे स्वास्थ्य, मुलांचे शिक्षण यावर आम्ही भर देत आहोत. येथे माता मृत्यू दर आणि शिशु मृत्यू दर कमीत कमी असावा यासाठी देखील सरकार अनेक योजना चालवत आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांना चहा कंपन्यांच्या व्यवस्थापनाच्या भरोशावर सोडून देण्यात आले होते. मात्र भाजपा सरकार त्यांच्या घरांची, त्यांच्या घरामध्ये वीज जोडणी असावी, घरामध्ये पाण्याची सोय असावी, त्यांचे स्वास्थ्य ठीक असावे याची चिंता करत आहे. या सर्व योजनांवर कोट्यवधी  रुपये खर्च करण्यात येत आहेत.

मित्रांनो,
आसामच्या विकासाचे नवीन पर्व सुरू झाले आहे, आसाम व्यापार आणि पर्यटनाचे मोठे केंद्र बनेल. आपण सर्वजण मिळून विकसित आसामची निर्मिती करू, विकसित भारताची निर्मिती करू. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना विकासाच्या या योजनांसाठी अनेक अनेक शुभेच्छा देतो. माझ्यासोबत म्हणा, भारत माता की जय!  हात वर करून पूर्ण ताकदीनिशी म्हणा, भारत माता की जय! भारत माता की जय! भारत माता की जय! खूप खूप धन्यवाद!

***

SushamaKane/AshutoshSave/ShraddhaMukhedkar/DineshYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2166687)