राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

इइपीसीच्या हीरक महोत्सवी सोहळ्याला राष्ट्रपतींची उपस्थिती

Posted On: 08 SEP 2025 2:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 सप्टेंबर 2025

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (8 सप्टेंबर 2025) नवी दिल्ली इथे झालेल्या अभियांत्रिकी निर्यात प्रोत्साहन मंडळाच्या (इइपीसी) हीरक महोत्सवी समारंभात सहभागी झाल्या.

या समारंभात बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, प्राचीन काळी आध्यात्मिक व व्यापारी क्षेत्रातही भारत जगाचे नेतृत्व करत होता. पुन्हा एकदा भारताला ज्ञान आणि व्यापाराचे प्रमुख केंद्र बनविण्याचा निर्धार सर्व नागरिकांनी मिळून केला पाहिजे. आर्थिक क्षेत्रातील महत्वाचा घटक असलेल्या इइपीसीने दृढनिश्चयाने असा निर्धार करावा.

गेल्या 10 वर्षांत भारताची अभियांत्रिकी निर्यात 70 अब्ज डॉलर्सवरुन वाढून 115 अब्ज  डॉलर्सवर गेली आहे असे त्यांनी अभिमानाने नमूद केले. गेल्या दशकातील आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रासमोरील आव्हाने पाहता निर्यातीतील ही वाढ आणखीनच उल्लेखनीय ठरते. या यशातील इइपीसीच्या योगदानाची त्यांनी प्रशंसा केली.

राष्ट्रपती म्हणाल्या की, इइपीसी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ  आणि भारतीय निर्यातदार यांच्यातील दुवा बनून काम करत आहे. जागतिक मूल्य साखळीतील भारताच्या आणि भारतीय निर्यातदारांच्या योगदानात सातत्याने वाढ करत राहा, असे आवाहन त्यांनी इइपीसीला केले. जागतिक व्यापार व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेत बदल घडत असताना इइपीसीची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

राष्ट्रपती म्हणाल्या की, आपल्या देशाकडे असलेल्या उत्कृष्ट क्षमतांचा वापर करुन जागतिक व्यापार क्षेत्रातील आव्हानांचे संधींमध्ये रुपांतर करायला हवे. गेल्या सात दशकांच्या काळात भारताच्या अभियांत्रिकी निर्यातीच्या ठिकाणांमध्ये लक्षणीय बदल घडून आला आहे.

राष्ट्रपती म्हणाल्या की, कमी दरातील उच्च दर्जाची अभियांत्रिकी सेवा व उत्पादने ही भारताची मोठी ताकद आहे. जगातल्या बड्या कंपन्यांची जागतिक क्षमता केंद्रे भारतात आहेत. इइपीसीसारख्या संस्थांनी पुढाकार घेऊन भारताला जागतिक नवोन्मेष केंद्र बनविण्याची संकल्पना साकारली पाहिजे. यासाठी योग्य प्रोत्साहन देऊन एक परिसंस्था उभारली पाहिजे. इइपीसीच्या सर्व घटकांनी भारताला आघाडीची नवोन्मेष अर्थव्यवस्था बनविण्याची शपथ घ्यावी. भारतातील कौशल्य व उर्जा यांना सक्षम बनविणारी परिसंस्था निर्माण करावी.  


सुषमा काणे/सुरेखा जोशी/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2164611) Visitor Counter : 2