पंतप्रधान कार्यालय
दिल्लीमध्ये यशोभूमी इथे सेमिकॉन इंडिया 2025 मध्ये पंतप्रधानांनी केलेले संबोधन
Posted On:
02 SEP 2025 12:55PM by PIB Mumbai
केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी अश्विनी वैष्णव जी, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता जी,ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी जी, केंद्रीय राज्य मंत्री जितिन प्रसाद जी, सेमीचे अध्यक्ष अजित मनोचा जी,देश-विदेशातून आलेले सेमीकंडक्टर उद्योगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांचे सहकारी,विविध देशांतले इथे उपस्थित आमचे अतिथी, स्टार्ट अपशी संबंधित उद्योजक,विविध भागांमधून आलेले माझे युवा विद्यार्थी मित्र, उपस्थित स्त्री-पुरुषहो,
जपान आणि चीनचा दौरा करून काल रात्रीच मी परतलो आहे आणि आज यशोभूमी इथे आकांक्षा आणि आत्मविश्वासाने ओतप्रोत या सभागृहा मध्ये आलो आहे, आपणा सर्वांमध्ये उपस्थित आहे. तंत्रज्ञानाविषयी माझी एक नैसर्गिक आवड आहे हे आपण सर्व जाणताच.आताच्या माझ्या जपान दौऱ्यात पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्यासमवेत टोकियो इलेक्ट्रॉन कारखान्यात जाण्याची संधी मिळाली आणि त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आत्ता आपल्याला इथे सांगत होते की मोदी साहेब आले होते.
मित्रहो,
तंत्रज्ञानाकडे असलेला माझा हा कल मला वारंवार आपल्याकडे आणत आहे.म्हणूनच आज आपणा सर्वांसमवेत इथे येऊन मला अतिशय आनंद होत आहे.
मित्रहो,
इथे जगभरातले सेमीकंडक्टर क्षेत्रातले तज्ञ आहेत, 40-50 पेक्षा जास्त देशांचे हे प्रतिनिधीत्व आहे आणि भारताचा नवोन्मेश आणि युवा शक्तीही इथे दिसून येत आहे. हा जो संयोग झाला आहे,त्याचा एकच संदेश आहे- जगाचा भारतावर भरवसा आहे, जगाचा भारतावर विश्वास आहे आणि भारतासमवेत सेमीकंडक्टरचे भविष्य उभारण्यासाठी जग तयार आहे.
सेमिकॉन इंडियामध्ये आलेल्या आपणा सर्व मान्यवरांचे मी अभिनंदन करतो.विकसित भारताच्या प्रवासात, आत्मनिर्भर भारताच्या प्रवासात आपण सर्वजण आमचे अतिशय महत्वाचे भागीदार आहात.
मित्रहो,
काही दिवसांपूर्वीच, या वर्षीच्या पहिल्या तिमाहीची जीडीपी आकडेवारी आली आहे. भारताने पुन्हा एकदा, प्रत्येक आशा, अपेक्षा, प्रत्येक अनुमानापेक्षा उत्तम कामगिरी केली आहे. एकीकडे जगभरातल्या अर्थव्यवस्था चिंतीत असताना, आर्थिक स्वार्थापोटी निर्माण झालेली आव्हाने असताना अशा वातावरणात भारताने 7.8 टक्के विकास साध्य करून दाखवला आहे आणि ही वृद्धी प्रत्येक क्षेत्रात आहे, उत्पादन,सेवा,कृषी,बांधकाम सर्व क्षेत्रात उत्साह दिसून येत आहे.भारत आज ज्या झपाट्याने प्रगती करत आहे त्यातून आपणा सर्वांमध्ये, उद्योग जगतात,प्रत्येक देशवासीयामध्ये नवी उर्जा संचारली आहे. वृद्धीची ही दिशा, जगातली सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने घोडदौड होत आहे हे निश्चित.
मित्रहो,
सेमीकंडक्टर जगतात असे म्हटले जाते की तेल हे काळे सोने होते,मात्र चिप्स या डिजिटल हिरे आहेत. आपल्या मागील शतकाला तेलाने आकार दिला.तेलाच्या विहिरींद्वारे जगाचे भविष्य निश्चित केले जात होते. तेलाच्या या विहिरींमधून किती पेट्रोलियम निघेल त्याच्या आधारे जागतिक अर्थव्यवस्था वर-खाली होत असे. मात्र 21 व्या शतकाची शक्ती एका छोट्याश्या चीप मध्ये सामावली आहे. ही चीप भले छोटी आहे,मात्र जगाच्या प्रगतीला मोठी चालना देण्याचे सामर्थ्य तिच्यामध्ये आहे आणि म्हणूनच आज सेमीकंडक्टरची जागतिक बाजारपेठ 600 अब्ज डॉलर्सवर पोहोचत आहे आणि येत्या काही वर्षात ती एक ट्रिलियन डॉलर पार करेल. सेमीकंडक्टर क्षेत्रात भारत ज्या झपाट्याने आगेकूच करत आहे ते पाहता या एक ट्रिलीयन बाजारपेठेत भारताचा महत्वाचा वाटा राहणार आहे याचा मला विश्वास आहे.
मित्रहो,
भारताचा वेग काय आहे तोही मी आपणासमोर मांडू इच्छितो.2021 मध्ये आम्ही सेमीकॉन इंडिया कार्यक्रम सुरु केला, 2023 पर्यंत भारताच्या पहिल्या सेमीकंडक्टर प्लांटला मंजुरी मिळाली होती.2024 मध्ये आम्ही काही आणखी प्लांटना मंजुरी दिली.2025 मध्ये आम्ही आणखी 5 प्रकल्पांना मंजुरी दिली. सगळे मिळून सेमीकंडक्टरच्या 10 प्रकल्पांमध्ये 18 अब्ज डॉलर्स म्हणजे दीड लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक होत आहे. जगाचा भारतावरचा वाढता विश्वास यातून प्रतीत होत आहे.
मित्रहो,
सेमीकंडक्टरमध्ये गतीचे महत्व असते हे आपण जाणताच.फाईल ते कारखाना यादरम्यानचा काळ जितका कमी असेल,कागदपत्रांचे काम जितके कमी राहील,वेफर वर्क तितके लवकर सुरु होईल. हाच दृष्टीकोन बाळगत आमचे सरकार काम करत आहे. आम्ही राष्ट्रीय एक खिडकी योजना प्रणाली सुरु केली आहे. याद्वारे केंद्र आणि राज्यांच्या सर्व मंजुऱ्या एकाच मंचावर प्राप्त होत आहेत.यातून आपले गुंतवणूकदार कागदपत्रांच्या मोठ्या जंजाळातून मुक्त झाले आहेत.आज देशभरात प्लग अॅन्ड प्ले पायाभूत सुविधा मॉडेल आधारित सेमीकंडक्टर पार्क्स उभारण्यात येत आहेत.या पार्क्समध्ये जमीन,वीज पुरवठा,बंदरे,विमानतळ या सर्वांच्या कनेक्टीव्हिटीसह एकत्र कुशल कामगार बळ सुविधा उपलब्ध आहेत आणि जेव्हा याला प्रोत्साहनाची जोड मिळते तेव्हा उद्योगाची भरभराट निश्चितच होते.उत्पादनाशी निगडीत प्रोत्साहन असो,डिझाईन निगडीत अनुदान असो,भारत संपूर्ण प्रक्रियेतील क्षमता देऊ करत आहे. भारत आता बॅकएंड पलीकडे जात फूल-स्टॅक सेमीकंडक्टर राष्ट्र बनण्याच्या दिशेने प्रगती करतआहे.भारताची सर्वात छोटी चीप,जगातल्या सर्वात मोठ्या परिवर्तनामध्ये अग्रेसर असेल तो दिवस आता फार दूर नाही. आमचा प्रवास निश्चितच उशिरा सुरु झाला आहे मात्र आता आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. सी जी पॉवरचा प्रायोगिक प्रकल्प 4-5 दिवसात म्हणजे 28 ऑगस्टपासून सुरु झाल्याची माहिती मला देण्यात आली आहे. केन्सचा पथदर्शी प्रकल्पही सुरु होणार आहे.टेस्ट चिप्स तर मायक्रोन आणि टाटा यांच्याकडून आधीच सुरु झाल्या आहेत.मी याआधीही सांगितले आहे की व्यावसायिक चिप्स या वर्षीपासून तयार व्हायला सुरवात होईल. सेमीकंडक्टर क्षेत्रात भारत किती झपाट्याने पुढे जात आहे हे यातून दिसून येत आहे.
मित्रहो,
भारतात सेमी कंडक्टरची यशोगाथा एकाच आधारावर किंवा एकाच तंत्रज्ञानापुरती मर्यादित नाही.आम्ही एक संपूर्ण परिसंस्था उभी करत आहोत एक अशी परिसंस्था ज्यामध्ये डिझाईन, उत्पादन, पॅकेजिंग आणि उच्च तंत्रज्ञान युक्त उपकरण, सर्व काही इथे भारतात उपलब्ध असेल.आमचे सेमीकंडक्टर मिशन केवळ फॅब किंवा चीप निर्मितीपर्यंत सीमित नाही.आम्ही अशी सेमीकंडक्टर परिसंस्था निर्माण करता आहोत जी भारताला आत्मनिर्भर आणि जागतिक पातळीवर स्पर्धात्मक बनवेल.
मित्रहो,
भारताच्या सेमीकंडक्टर मिशनचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. भारत, जगातल्या सर्वात प्रगत तंत्रज्ञानासह या क्षेत्रात पुढे जात आहे. जे नव्याने उदयाला येणारे तंत्रज्ञान आहे त्याला भारतात तयार झालेल्या चिप्सचा आधार मिळावा यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. नोएडा आणि बेंगळूरू इथे तयार होत असलेली आमची डिझाईन सेंटर्स, जगातल्या काही सर्वाधिक प्रगत चिप्स तयार करण्यावर काम करत आहेत.ही अशी चीप आहे ज्यामध्ये अब्जावधी ट्रान्झिस्टर स्टोअर करता येतील. या चिप्सद्वारे 21 व्या शतकातल्या आविष्कारशील तंत्रज्ञानाला नवी शक्ती प्राप्त होईल.
मित्रहो,
जगात आज सेमी कंडक्टरच्या क्षेत्रात जी आव्हाने आहेत त्यावरही भारत सातत्याने काम करत आहे. आज आपण शहरांमध्ये गगनचुंबी इमारती पाहतो,उत्तम भौतिक पायाभूत उभारणी पाहतो.अशा पायाभूत सुविधांचा पाया पोलाद असतो आणि आपल्या डिजिटल पायाभूत सुविधा आहेत त्यांचा आधार महत्वाची खनिजे आहेत.म्हणूनच भारत आज राष्ट्रीय महत्वाची खनिजे मिशन वर काम करत आहे. या दुर्मिळ खनिजांची आपली मागणी इथेच पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.गेल्या चार वर्षात आम्ही महत्वाच्या खनिजांसंदर्भातल्या प्रकल्पांवर बरेच काम केले आहे.
मित्रहो,
सेमीकंडक्टर क्षेत्राच्या विकासात स्टार्ट अप्स आणि एमएसएमई मोठी भूमिका बजावतील असे आमचे सरकार मानते. आज जगातल्या सेमीकंडक्टर डिझाईन प्रतिभेमध्ये भारताचे 20 टक्के योगदान आहे. भारताचा युवावर्ग हा सेमीकंडक्टर उद्योगाचा सर्वात मोठा मानवी भांडवलाचा कारखानाच आहे. मी आपल्या युवा उद्योजक, नवोन्मेषक, स्टार्ट अप्सना आवाहन करतो की त्यांनी पुढे यावे, सरकार तुमच्या खांद्याला खांदा भिडवून चालत आहे. डिझाईन संलग्न प्रोत्साहन योजना आणि चिप्स ते स्टार्ट अप्स कार्यक्रमही आपल्यासाठी आहे. डिझाईन संलग्न प्रोत्साहन योजनेलाही नवे रूप देण्यात येत आहे.या क्षेत्रात भारतीय बौद्धिक संपदा (आयपी ) विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. नुकत्याच सुरवात झालेल्या राष्ट्रीय संशोधन निधीशी संलग्नतेमुळेही आपणाला सहाय्य होईल.
मित्रहो,
इथे अनेक राज्येही सहभागी होत आहेत.अनेक राज्यांनी सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी विशेष धोरण आखले आहे. ही राज्ये आपल्याकडे विशेष पायाभूत सुविधांवर भर देत आहेत.राज्यांनी आपल्याकडे परिसंस्था विकसित करण्यासाठी दुसऱ्या राज्यांसमवेत निकोप स्पर्धा करावी, आपल्या राज्यात गुंतवणुकीला पोषक वातावरण निर्माण करावे असे आवाहन मी सर्व राज्यांना करतो.
मित्रहो,
रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म या मंत्राचा अवलंब करत भारत इथवर पोहोचला आहे. येत्या काळात आम्ही नेक्स्ट जनरेशन सुधारणांचा नवा टप्पा सुरु करणार आहोत. इंडिया सेमीकंडक्टर मिशनच्या पुढच्या टप्प्यावरही आम्ही काम करत आहोत.इथे आलेल्या सर्व गुंतवणूकदारांना मी सांगू इच्छितो,की आम्ही मनमोकळेपणाने आपल्या स्वागतासाठी सज्ज आहोत.तुमच्या भाषेत सांगायचे झाले तर डिझाईन तयार आहे,मास्क अलाईन आहे.आता अचूकतेसह अंमलबजावणी करण्याची आणि व्यापक प्रमाणात वितरण करण्याची वेळ आहे आमची धोरणे ही अल्पकालीन संकेत नव्हेत तर दीर्घकालीन कटिबद्धता आहेत. आपल्या प्रत्येक आवश्यकतांची आम्ही पूर्तता करू.’भारतात डिझाईन केलेले,भारतात तयार तयार झालेले आणि जगाने विश्वास दर्शवलेले’ असे सर्व जग म्हणेल हा दिवस फार दूर नाही. आमच्या प्रयत्नांचा प्रत्येक भाग यशस्वी राहावा,प्रत्येक भाग नवोन्मेशाने युक्त राहावा आणि आमचा प्रवास नेहमीच त्रुटीमुक्त आणि उत्तम कामगिरीने परिपूर्ण असावा या भावनेसह आपणा सर्वाना खूप-खूप शुभेच्छा !
धन्यवाद !
***
जयदेवी पुजारी - स्वामी / निलिमा चितळे/ परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2163276)
Visitor Counter : 18
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam