पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानमधील मियागी या राज्यातील सेंडाय येथील सेमीकंडक्टर प्रकल्पाला दिली भेट

Posted On: 30 AUG 2025 11:52AM by PIB Mumbai

 

भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान माननीय श्री. शिगेरू इशिबा यांच्यासह आज मियागी राज्यामधील सेंडाय चा दौरा केला. सेंडायमध्ये दोन्ही नेत्यांनी टोकियो इलेक्ट्रॉन मियागी लिमिटेड (TEL Miyagi) या सेमीकंडक्टर क्षेत्रातील आघाडीच्या जपानी कंपनीला भेट दिली. TEL कंपनीची जागतिक सेमीकंडक्टर मूल्यसाखळीत असलेली भूमिका, तिची प्रगत उत्पादन क्षमता तसेच भारतासोबत सध्या सुरू असलेल्या आणि नियोजित सहकार्याबाबत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती देण्यात आली. या कारखान्याच्या भेटीद्वारे दोन्ही नेत्यांना सेमीकंडक्टर पुरवठा साखळी, उत्पादन (फॅब्रिकेशन) आणि चाचणी( टेस्टिंग) या क्षेत्रांत भारत–जपान यांच्यातील सहकार्याच्या संधींचा प्रत्यक्ष आढावा घेता आला.

सेंडायच्या भेटीत भारताची वाढती अर्धसंवाहक (सेमीकंडक्टर) उत्पादन परिसंस्था आणि जपानची, प्रगत अर्धसंवाहक उपकरणे तसेच तंत्रज्ञान यामधील क्षमता, या दोन्हींची परस्परपूरक ताकद अधोरेखित झाली. दोन्ही देशांनी या क्षेत्रातील सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्याची वचनबद्धता पुन्हा स्पष्ट केली. यासाठी, भारत–जपान अर्धसंवाहक पुरवठा साखळी भागीदारीवरील या आधीचा सामंजस्य करार, भारत–जपान औद्योगिक स्पर्धात्मकता भागीदारी (जागतिक स्पर्धेत तग धरण्याच्या दृष्टीने केलेली भागिदारी), आणि आर्थिक सुरक्षा संवाद, यावर भर देण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिगेरु इशिबा यांची या प्रकल्पाला दिलेली संयुक्त भेट, ही भारत–जपान यांची मजबूत, लवचिक आणि विश्वासार्ह अर्धसंवाहक (सेमिकंडक्टर) पुरवठा साखळी उभारण्याच्या सामायिक ध्येयाची ठोस झलक ठरली. या भेटीत आपल्या सोबत आल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी इशिबा यांचे मनःपूर्वक आभार मानले आणि भारत या धोरणात्मक क्षेत्रात जपानसोबत घनिष्ठ सहकार्य करण्यास तयार असल्याची पुनर्पुष्टी केली.

सेंडाय येथे पंतप्रधान इशिबा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ भोजनाचे आयोजन केले. या प्रसंगी मियागी राज्याचे गव्हर्नर इतर मान्यवरांसह उपस्थित होते.

***

यश राणे / आशुतोष सावे / परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2162197) Visitor Counter : 42