पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रीय क्रीडा दिनी बिहारमधील राजगीर इथे सुरू होत असलेल्या पुरुष हॉकी आशिया चषक 2025 या स्पर्धेसाठी पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
Posted On:
28 AUG 2025 10:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरुष हॉकी आशिया कप 2025 मध्ये सहभागी झालेल्या आशियातील सर्व संघांना, खेळाडूंना, अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या समर्थकांना मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. बिहारमधील राजगीर या ऐतिहासिक शहरात उद्या 29 ऑगस्ट रोजी या स्पर्धेला सुरुवात होईल. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारचेही कौतुक केले आहे. बिहार हे अलिकडच्या काळात एक बहुआयामी क्रीडा केंद्र म्हणून उदयाला आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बिहारने खेलो इंडिया युथ गेम्स 2025, 20 वर्षांखालील आशिया रग्बी सेव्हन्स अजिंक्यपद स्पर्धा 2025, आंतरराष्ट्रीय सेपाकटकरॉ महासंघाची (ISTAF - International Sepaktakraw Federation) सेपाकटकरॉ विश्वचषक स्पर्धा 2024 आणि महिला आशियाई अजिंक्यपद चषक 2024 यांसारख्या महत्त्वाच्या स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, X या समाज माध्यमावरून सामायिक केलेला संदेश -
उद्या, 29 ऑगस्ट (जो राष्ट्रीय क्रीडा दिन आणि मेजर ध्यानचंद यांची जयंती देखील आहे), बिहारमधील राजगीर या ऐतिहासिक शहरात पुरुष हॉकी आशिया चषक 2025 या स्पर्धेला सुरुवात होत आहे. आशियातील सर्व सहभागी संघ, खेळाडू, अधिकारी आणि समर्थकांना मी मनापासून शुभेच्छा देतो.
हॉकीला कायमच भारत आणि आशियातील लाखो लोकांच्या हृदयात एक विशेष स्थान राहीले आहे. ही स्पर्धा रोमांचक सामने, विलक्षण प्रतिभा आणि अविस्मरणीय क्षणांनी परिपूर्ण असेल, हे सर्व क्रीडाप्रेमींच्या भावी पिढ्यांना प्रेरणा देतील असा मला विश्वास आहे.
पुरुष हॉकी आशिया चषक 2025 चे यजमानपद बिहारने भूषवणे, ही खूप आनंदाची बाब आहे. अलिकडच्या काळात बिहार एक बहुआयामी क्रीडा केंद्र बनले आहे. खेलो इंडिया युथ गेम्स 2025, 20 वर्षांखालील आशिया रग्बी सेव्हन्स अजिंक्यपद स्पर्धा 2025, आंतरराष्ट्रीय सेपाकटकरॉ महासंघाची (ISTAF - International Sepaktakraw Federation) सेपाकटकरॉ विश्वचषक स्पर्धा 2024 आणि महिला आशियाई अजिंक्यपद चषक 2024 यांसारख्या महत्त्वाच्या स्पर्धांचे आयोजन बिहारमध्ये सातत्याने झाले आहे. या सातत्यपूर्ण गतीमधून बिहारमधील वाढत्या पायाभूत सुविधा, तळागाळातील लोकांचा उत्साह आणि क्रीडा क्षेत्राशी संबंधित विविध घटकांमधील प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या वचनबद्धतेचे दर्शन घडते.
सुषमा काणे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2161718)
Visitor Counter : 17