पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

फिजीच्या पंतप्रधानांसमवेत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन

Posted On: 25 AUG 2025 1:35PM by PIB Mumbai

महामहिम पंतप्रधान राबुकाजी,

दोन्ही राष्ट्रांचे प्रतिनिधी

माध्यम सहकारी,

नमस्कार!

बुला विनाका!

 

पंतप्रधान राबुका आणि त्यांच्या प्रतिनिधींचे मी भारतामध्ये हार्दिक स्वागत करतो.

2014 मध्ये, 33 वर्षांनी एखाद्या भारतीय पंतप्रधानांनी फिजीच्या भूमीवर पाऊल ठेवले होते. ते सौभाग्य मला प्राप्त झाले याचा मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो.

त्यावेळी आम्ही फोरम फॉर इंडिया - पॅसिफिक आयलंड कोऑपरेशन (पॅसिफिक बेटांच्या सहकार्यासंबंधीचा भारतासाठी मंच) म्हणजे 'फिपिक'चा प्रारंभ केला. त्या पुढाकाराने केवळ भारत- फिजी संबंधच नव्हे, तर संपूर्ण पॅसिफिक क्षेत्रासमवेत असलेल्या आमच्या संबंधांना नवीन ताकद प्राप्त झाली. आणि आज पंतप्रधान राबुका यांच्या या दौऱ्याच्या माध्यमातून या सहसंबंधांमध्ये नवा आयाम जोडला जातो आहे.

 

दोस्तहो,

भारत आणि फिजी यांच्या दरम्यान जवळीकीचे गहिरे नाते जुळले आहे. एकोणीसाव्या शतकामध्ये, भारतातून गेलेल्या साठ हजाराहून अधिक गिरमिटीया (करारबद्ध कामगार) बंधू-भगिनींनी, फिजीच्या समृद्धीमध्ये आपल्या परिश्रमाने आणि घाम गाळून योगदान दिले आहे. त्यांनी फिजीच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विविधतेमध्ये नवीन आयाम/पैलू जोडले आहेत. फिजीच्या एकता आणि अखंडत्वाला सातत्याने त्यांनी भक्कम केले आहे.

 

आणि हे सर्व करतानाच, त्यांनी आपल्या मुळांशी घट्ट नाते जोडून ठेवले. आपली संस्कृती जपून ठेवली. फिजीतील रामायण मंडळीची परंपरा याचे जिवंत उदाहरण आहे. पंतप्रधान राबुका यांनी घोषित केलेल्या 'गिरमिट दिना'चे मी स्वागत करतो. हा आपल्या समग्र इतिहासाचा सन्मान आहे. आपल्या मागील पिढ्यांच्या स्मृतींना वाहिलेली श्रद्धांजली आहे.

 

मित्रांनो,

आज आम्ही केलेल्या व्यापक चर्चेमध्ये, अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. एक निरोगी राष्ट्रच समृद्ध राष्ट्र बनू शकते, असा आमचा विश्वास आहे. त्यामुळे आम्ही ठरवले आहे की, 'सुवा'मध्ये 100 खाटांचे अति विशेषोपचार रुग्णालय बांधण्यात येईल. डायलिसिस युनिटस् आणि सागरी रुग्णवाहिका पाठवल्या जातील. आणि जन औषधी केंद्रे सुरू करण्यात येतील, जेणेकरून प्रत्येक घरापर्यंत स्वस्त आणि उत्तम गुणवत्तेची औषधे पोहोचू शकतील. स्वप्नांचा पाठलाग करताना कोणालाच थांबावे लागू नये अशी आमची इच्छा असल्याने, फिजीमध्ये 'जयपूर फूट'चे शिबिर भरवण्यात येईल.

 

कृषी क्षेत्रातही, भारतातून गेलेली चवळी, फिजीच्या जमिनीत चांगल्या प्रकारे रूजली आहे. भारताकडून आता 12 कृषी ड्रोन आणि 2 मोबाईल परीक्षण प्रयोगशाळा देखील भेट देण्यात येतील. फिजीमध्ये भारतीय तुपाला मान्यता देण्याच्या फिजी सरकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.

 

मित्रांनो,

आम्ही संरक्षण आणि सुरक्षा या क्षेत्रांमध्येही परस्पर सहकार्य भक्कम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. फिजीच्या सागरी सुरक्षेला बळकट देण्यासाठी भारत प्रशिक्षण आणि उपकरण यांबाबत साहाय्य करेल. सायबर सुरक्षा आणि डेटा (माहिती)संरक्षण या क्षेत्रांमध्ये आपला अनुभव सामायिक करण्यास आम्ही तयार आहोत.

दहशतवाद हा संपूर्ण मानवतेसमोरचे खूप मोठे आव्हान आहे, यावर आमचे एकमत झाले. दहशतवादाविरोधातल्या आपल्या लढाईत सहकार्य आणि समर्थन देण्यासाठी आम्ही पंतप्रधान राबुका आणि फिजी सरकार यांचे आभार मानतो.

 

मित्रांनो,

क्रीडा हे असे क्षेत्र आहे मैदानातून लोकांच्या मनांना जोडते. फिजीमध्ये रग्बी आणि भारतामध्ये क्रिकेट हे याचे उदाहरण आहे. 'स्टार ऑफ रग्बी सेव्हन्स', वाइसेले सेरेबी यांनी भारताच्या रग्बी संघाला प्रशिक्षण दिले. आता भारतीय प्रशिक्षक फिजी क्रिकेट संघाला नव्या उंचीवर घेऊन जातील. 

फिजी विद्यापीठामध्ये हिंदी आणि संस्कृत शिकवण्यासाठी भारतीय शिक्षकांना पाठवण्यात येईल, यावरही संमती झाली आहे. आणि फिजीचे पंडित भारतात येऊन प्रशिक्षण घेतील आणि गीता महोत्सवातही सहभाग नोंदवतील. म्हणजेच भाषेपासून संस्कृतीपर्यंत सहसंबंध अधिक घट्ट होतील.

 

मित्रांनो,

हवामान बदल ही फिजीसाठी एक गंभीर समस्या आहे. या संदर्भातही आम्ही नवीकरणीय ऊर्जा, विशेषतः सौर ऊर्जा क्षेत्रा एकत्रित काम करत आहोत. आंतरराष्ट्रीय सौर संघटना, आपत्ती प्रतिबंधक पायाभूत सुविधांसाठी आघाडी आणि जागतिक जैव इंधनासाठीच्या युतीमध्येही आम्ही एकत्रित काम करतो आहोत. आपण आता आपत्ती प्रतिसादामध्येही फिजीच्या क्षमता वृद्धिंगत करण्यामध्ये साहाय्य करणार आहोत.

 

मित्रांनो,

पॅसिफिक बेटांवरील देशांसमवेतच्या सहकार्याचे केंद्र म्हणून आम्ही फिजीकडे पाहातो आहोत. दोन्ही देश मुक्, खुल्या,सर्वसमावेशक, सुरक्षित आणि समृद्ध इंडो-पॅसिफिकला समर्थन देत आहेत. पंतप्रधानांचा 'शांततेचे महासागर' हा अत्यंत सकारात्मक दृष्टीकोन आहे. भारताच्या इंडो-पॅसिफिक महासागर उपक्रमात सामील झाल्याबद्दल आम्ही फिजीचे स्वागत करतो.

 

भारत आणि फिजी दरम्यान भलेही महासागरांचे अंतर असेल मात्र आमच्या आकांक्षा एकाच नावेतून प्रवास करताहेत.

 

ग्लोबल साउथच्या विकासाच्या प्रवासातले आम्ही सहप्रवासी आहोत. जिथे ग्लोबल साउथच्या स्वातंत्र्य, कल्पना आणि ओळख यांचा आदर/सन्मान केला जाईल, अशा जागतिक व्यवस्थेच्या उभआरणीतले आम्ही सहभागीदार आहोत.

 

कोणताही आवाज दुर्लक्षित केला जाऊ नये आणि कोणताही देश मागे पडू नये, यावर आमचा विश्वास आहे.

 

महामहिम,

हिंद महासागरापासून ते पॅसिफिक महासागरापर्यंत, आपली भागीदारी सागराला सांधणारा पूल आहे. ती वेलिओमनीमध्ये रुजलेली आहे, आणि विश्वास आणि आदर यांच्यावर आधारलेली आहे.

 

तुमच्या भेटीमुळे या बंधांना अधिक बळकटी मिळेल. तुमच्या मैत्रीसाठी खूप खूप आभार

 

 

विनाका वाकालेवू!

*** 

JaydeviPujariSwami/Vijayalaxmi/DineshYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2160809)