कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दिल्ली येथील आयसीएआर पुसा संस्थेत राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आभासी पद्धतीने केले संबोधित

Posted On: 23 AUG 2025 4:35PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली 23 ऑगस्ट 2025

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) पुसा संस्थेत राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला आभासी पद्धतीने संबोधित केले.’कृषी क्षेत्रातील परिवर्तनासाठी अंतराळ तंत्रज्ञानात संशोधन आणि विकास’ ही आजच्या या कार्यक्रमाची मुख्य संकल्पना होती.

केंद्रीय मंत्री चौहान म्हणाले की आयसीएआरमध्ये राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा होताना बघण्यासाठी ते उत्सुक आहेत. “अंतराळ विज्ञानाच्या माध्यमातून, आपण भारत देश आणि जगात बदल घडवून आणत आहोत. कृषी क्षेत्रात तंत्रज्ञान आणि विज्ञानाला किती महत्त्व आहे हे आपण जाणतोच आणि आपल्याला यात आणखी प्रगती करायची आहे,” असे ते म्हणाले.

वैज्ञानिकांना “आधुनिक महर्षी ” असे संबोधत केंद्रीय मंत्री म्हणाले, “आपण शेतीच्या पद्धती, त्यांची दिशा बदलली आहे आणि शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणले आहे. आपण जनतेसाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित केली आहे. आपण विक्रमी प्रमाणात अन्नधान्य उत्पादन साध्य करून दाखवले आहे आणि अंतराळ विज्ञानाचे यामध्ये अतुलनीय योगदान आहे. अवकाशसंबंधी सुविधा आता शेतीच्या केंद्रस्थानी आहेत – पिकाच्या उत्पादनाचा हिशोब, लागवड यंत्रणा, गहू,तांदूळ,मोहोरी,कापूस,ऊस यांचे उत्पादन, दर एकरी मूल्यांकन ते हवामानविषयक माहिती अशा प्रत्येक बाबतीत अवकाश तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची आहे.” 

काही प्रसंगी ज्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत नाही आणि ज्यांचे काहीच नुकसान झालेले नाही त्यांना भरपाई मिळते. मात्र आता उपग्रहावर आधारित दूरस्थ संवेदकांच्या सहाय्याने पिकांचे नुकसान अचूकपणे मोजता येते आणि उपग्रहांकडून प्राप्त प्रतिमांच्या आधारे हक्काची नुकसानभरपाई देणे शक्य होते,” केंद्रीय मंत्री म्हणाले.

वाढते तापमान, वादळे किंवा पूर इत्यादी आपत्तींचे इशारे योग्य वेळी देण्यात मदत करून  अवकाश विज्ञान आपत्ती व्यवस्थापन आणि पिकांचे संरक्षण यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. कोणतीही माहिती शेतकऱ्यांपर्यंत थेटपणे पोहोचली पाहिजे आणि जागरुकता निर्माण होणे महत्त्वाचे आहे असे त्यांनी सांगितले.

***

सुषमा काणे/संजना चिटणीस/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2160176)