पंतप्रधान कार्यालय
बिहारच्या गया जीमधील विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटनावेळी पंतप्रधानांचे भाषण
Posted On:
22 AUG 2025 3:20PM by PIB Mumbai
विश्व विख्यात, ज्ञान और मोक्ष के पवित्र नगरी गयाजी के हम प्रणाम करअ ही।
विष्णुपद मंदिर के इ गौरवशाली भूमि पर अपने सबके अभिनंदन करीत ही।
बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खानजी, येथील लोकप्रिय मुख्यमंत्री नितीश कुमारजी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी जीतन राम मांझीजी, राजीव रंजन सिंह, चिराग पासवानजी, राम नाथ ठाकूरजी, नित्यानंद रायजी, सतीश चंद्र दुबेजी, राज भूषण चौधरीजी, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरीजी, विजय कुमार सिन्हाजी, बिहार सरकारचे मंत्रीगण, संसदेतील माझे सहकारी उपेंद्र कुशवाहा जी, इतर खासदार आणि बिहारमधील माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो!
गयाजीची ही भूमी अध्यात्म आणि शांततेची भूमी आहे. ही भगवान बुद्धांना ज्ञान देणारी पवित्र भूमी आहे. गयाजीचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा खूप प्राचीन आणि समृद्ध आहे. येथील लोकांची इच्छा होती की या नगरीला गया नव्हे, तर गयाजी म्हणावे. मी या निर्णयाबद्दल बिहार सरकारचे अभिनंदन करतो. मला आनंद आहे की गयाजीच्या जलद विकासासाठी बिहारमधील डबल इंजिन सरकार सातत्याने काम करत आहे.
बंधू-भगिनींनो,
आजही गयाजीच्या पवित्र भूमीवरून एकाच दिवशी 12 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण किंवा पायाभरणी झाली आहे. यामध्ये ऊर्जा, आरोग्य आणि शहरी विकासाशी संबंधित अनेक मोठे प्रकल्प आहेत. यामुळे बिहारच्या उद्योगांना बळ मिळेल आणि तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होतील. मी या प्रकल्पांसाठी बिहारच्या लोकांचे अभिनंदन करतो. बिहारमध्ये चांगल्या आरोग्य सुविधांसाठी आज येथे हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचेही उद्घाटन झाले आहे. आता बिहारच्या लोकांना कर्करोगाच्या उपचारासाठी आणखी एक सुविधा मिळाली आहे.
मित्रांनो,
गरिबांच्या जीवनातील अडचणी दूर करणे, महिलांचे जीवन सुकर बनवणे, जनतेचा सेवक म्हणून हे काम करण्यात मला सर्वात जास्त आनंद होतो. जसे की गरिबांना पक्की घरे देणे...
मित्रांनो,
माझा एक मोठा संकल्प आहे. जोपर्यंत प्रत्येक गरजूला पक्के घर मिळत नाही, तोपर्यंत मोदी शांत बसणार नाही. याच विचाराने गेल्या 11 वर्षांत 4 कोटींहून अधिक गरिबांना पक्की घरे बांधून दिली आहेत. केवळ आपल्या बिहारमध्ये 38 लाखांहून अधिक घरे बांधली गेली. गया जिल्ह्यातही 2 लाखांहून अधिक कुटुंबांना स्वतःचे पक्के घर मिळाले आहे. आणि आम्ही फक्त घरे म्हणजे चार भिंती दिल्या नाहीत, तर या घरांसोबत गरिबांना त्यांचा स्वाभिमान दिला आहे. या घरांमध्ये वीज, पाणी, शौचालय आणि गॅस कनेक्शनच्या सुविधा दिल्या आहेत. म्हणजेच, गरीब कुटुंबांनाही सुविधा, सुरक्षा आणि सन्मानाने जगण्याची हमी मिळाली आहे.
मित्रांनो,
आज हीच वाटचाल पुढे सुरू ठेवत बिहारच्या मगध भागातील 16 हजारांहून अधिक कुटुंबांना स्वतःचे पक्के घर दिले आहे. म्हणजेच, या वेळी या कुटुंबांमध्ये दिवाळी आणि छठ पूजा अधिक आनंददायी असेल. स्वतःचे घर मिळालेल्या सर्व लाभार्थी कुटुंबांचे मी खूप खूप अभिनंदन करतो. आणि जे लोक अजूनही पीएम आवास योजनेचा लाभ घेऊ शकले नाहीत, त्यांना मी ग्वाही देतो की, जोपर्यंत प्रत्येक गरिबाला स्वतःचे पक्के घर मिळत नाही, तोपर्यंत पीएम आवास अभियान सुरूच राहील.
मित्रांनो,
बिहार चंद्रगुप्त मौर्य आणि चाणक्याची भूमी आहे. जेव्हा जेव्हा एखाद्या शत्रूने भारताला आव्हान दिले आहे, तेव्हा बिहार देशाची ढाल बनून उभा राहिला आहे. बिहारच्या भूमीवर केलेला प्रत्येक संकल्प, ही या भूमीची ताकद आहे, या भूमीवर केलेला प्रत्येक संकल्प कधीही व्यर्थ जात नाही.
आणि म्हणूनच, बंधू-भगिनींनो,
जेव्हा काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता, तेव्हा आपल्या निर्दोष नागरिकांना त्यांचा धर्म विचारून मारले गेले, तेव्हा मी बिहारच्या याच भूमीवरून दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करण्याविषयी बोललो होतो. आज जग पाहत आहे, बिहारच्या या भूमीवरून घेतलेला तो संकल्प पूर्ण झाला आहे. तुम्हाला आठवत असेल, तिकडून पाकिस्तान आपल्यावर ड्रोन हल्ले करत होता, क्षेपणास्त्रांचा मारा करत होता, आणि इकडे भारत पाकिस्तानच्या क्षेपणास्त्रांना हवेत गवताच्या काडीसारखे विखुरत होता. पाकिस्तानचे एकही क्षेपणास्त्र आपली हानी करू शकले नाही.
मित्रांनो,
ऑपरेशन सिंदूरने भारताच्या संरक्षण धोरणाची नवी रेषा आखली आहे. आता भारतात दहशतवादी पाठवून, हल्ले करून कोणीही वाचू शकणार नाही. दहशतवादी पाताळात जरी लपले तरी भारताची क्षेपणास्त्रे त्यांना गाडूनच टाकतील.
मित्रांनो,
बिहारचा जलद विकास ही केंद्रातील एनडीए सरकारच्या सर्वाधिक प्राधान्यक्रमाची बाब आहे. त्यामुळेच आज बिहार चहुबाजूने विकासाच्या मार्गावर पुढे जात आहे. गेल्या काही वर्षांत जुन्या समस्यांवर उपाय शोधले गेले आहेत आणि प्रगतीचे नवे मार्गही तयार केले आहेत. तुम्हाला आठवत असेल, लालटेन राजमध्ये येथील अवस्था कशी होती. लालटेन राजमध्ये हा भाग लाल दहशतवादाच्या विळख्यात होता. माओवाद्यांमुळे संध्याकाळनंतर बाहेर जाणे-येणे कठीण झाले होते. गयाजीसारखी शहरे लालटेन राजमध्ये अंधारात बुडालेली होती. अशी हजारो गावे होती, जिथे विजेचे खांबही पोहोचले नव्हते. लालटेनवाल्यांनी संपूर्ण बिहारचे भविष्य अंधारात ढकलले होते. ना शिक्षण होते, ना रोजगार होता, बिहारच्या कितीतरी पिढ्यांना या लोकांनी बिहारमधून स्थलांतर करण्यास भाग पाडले होते.
मित्रहो,
राजद आणि त्यांचे मित्र पक्ष बिहारमधील लोकांना फक्त त्यांची मतपेढी मानतात, त्यांना गरिबांच्या सुख-दु:खाची, गरिबांच्या प्रतिष्ठा-आदराची जराही काळजी नाही. तुम्हाला आठवत असेल, काँग्रेसच्या एका मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिकरित्या जाहीर केले होते की ते बिहारच्या लोकांना त्यांच्या राज्यात प्रवेश देणार नाहीत. बिहारच्या लोकांप्रति काँग्रेसचा इतका तिरस्कार, बिहारी जनतेप्रति इतका द्वेष कोणीही विसरू शकत नाही. बिहारमधील लोकांबद्दल काँग्रेसचे गैरवर्तन पाहूनही येथील राजदचे लोक पूर्णपणे दुर्लक्ष करत होते.
बंधू आणि भगिनींनो,
बिहारमधील एनडीए सरकार काँग्रेस आणि इंडी आघाडीच्या या द्वेषपूर्ण मोहिमेला उत्तर देत आहे. बिहारमधील युवक-युवतींना येथेच रोजगार मिळावा, सन्मानाचे जीवन मिळावे, त्यांना त्यांच्या पालकांची काळजी घेता यावी या विचाराने आम्ही काम करत आहोत. आता बिहारमध्ये मोठे प्रकल्प उभारले जात आहेत. गयाजी जिल्ह्यातील दोभी येथे बिहारमधील सर्वात मोठे औद्योगिक क्षेत्र उभे राहत आहे. गयाजीमध्ये एक तंत्रज्ञान केंद्र देखील स्थापन केले जात आहे. आज येथे बक्सर औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटनही करण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वीच मी औरंगाबादमध्ये नवीनगर सुपर थर्मल पॉवर प्रकल्पाची पायाभरणी केली होती. भागलपूरमधील पीरपैंती येथे एक नवीन औष्णिक ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे. या ऊर्जा प्रकल्पामुळे बिहारमध्ये वीज पुरवठा वाढेल. आणि विद्युत निर्मिती वाढली की काय होते हे तुम्ही सर्व जाणतातच. घरगुती वापराचा विद्युत पुरवठा वाढतो आणि उद्योगांनाही अधिकाधिक वीज उपलब्ध होते. आणि यामुळे रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होतात.
मित्रहो,
बिहारमधील तरुणांना कायमस्वरूपी सरकारी नोकऱ्या देण्यासाठी नितीशजींनी एक मोठी मोहीम सुरू केली आहे. नितीशजींमुळेच येथे शिक्षकांची भर्तीही पूर्ण पारदर्शकतेने झाली.
मित्रहो,
येथील लोकांना बिहारमध्येच रोजगार मिळावा, नोकरीसाठी त्यांना स्थलांतर करावे लागू नये यासाठी केंद्र सरकारची एक नवीन योजना मदतगार ठरणार आहे. गेल्या आठवड्यातच, 15 ऑगस्टपासून देशभरात प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना लागू करण्यात आली आहे. याअंतर्गत, जेव्हा आपल्या तरुणांना खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळेल तेव्हा केंद्र सरकार त्यांना 15,000 रुपये देईल. तसेच युवकांना रोजगार देणाऱ्या खाजगी कंपन्यांना देखील सरकार आर्थिक सहाय्य करेल. बिहारमधील तरुणांनाही या योजनेचा मोठा लाभ होईल.
मित्रहो,
आपल्या देशात, मग ते काँग्रेस असो वा राजद, त्यांच्या सरकारांना सार्वजनिक निधीचे मोल कधी उमगलेच नाही. त्यांच्यासाठी जनतेचा पैसा म्हणजे स्वतःची तिजोरी भरणेच आहे. म्हणूनच काँग्रेस-राजद सरकारच्या काळात वर्षानुवर्षे प्रकल्प पूर्ण होत नव्हते. एखाद्या प्रकल्पाला जितका विलंब व्हायचा तितकाच काळ त्यांना पैसे कमावता यायचे. आता ही चुकीची मानसिकताही एनडीए सरकारने बदलली आहे. आता पायाभरणी झाल्यानंतर, वेळेच्या मर्यादेत काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. आजचा कार्यक्रम देखील याचे एक उत्तम उदाहरण आहे. बिहारच्या लोकांनी मला औंटा-सिमारिया विभागाची पायाभरणी करण्याचा बहुमान दिला. आणि तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या आपुलकीने ज्या पुलाची पायाभरणी तुम्ही मला करायला सांगितली होती, आज तुम्ही मला त्याचे उद्घाटन करण्याची संधीही दिली आहे. हा पूल केवळ रस्तेच जोडणार नाही तर संपूर्ण उत्तर आणि दक्षिण बिहारलाही जोडेल. गांधी सेतूमधून 150 किलोमीटरचा लांब वळसा घेणारी जड वाहने आता थेट मार्गस्थ होतील. यामुळे व्यापार वाढेल, उद्योगांना बळ मिळेल आणि यात्रेकरूंना पोहोचणे सोपे होईल. एनडीए सरकारच्या काळात ज्या विकास प्रकल्पांची पायाभरणी झाली आहे ते निश्चितपणे पूर्ण होतील.
मित्रहो,
एनडीएचे डबल इंजिन सरकार येथे रेल्वेच्या विकासासाठीही वेगाने काम करत आहे. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत गयाजी रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण केले जात आहे. यामुळे गयाजी रेल्वे स्थानकावर प्रवाशांना विमानतळासारख्या सुविधा उपलब्ध होतील. आज गया हे असे शहर आहे जिथे राजधानी, जन शताब्दी आणि मेड इन इंडिया वंदे भारत सारख्या गाड्यांची सुविधा उपलब्ध आहे. गयाजी, सासाराम, प्रयागराज, कानपूर मार्गे दिल्लीशी थेट संपर्क बिहारमधील तरुणांसाठी, येथील शेतकऱ्यांसाठी आणि येथील व्यापाऱ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध करत आहे.
बंधू आणि भगिनींनो,
तुमच्या आशीर्वादाने, देशाच्या अढळ विश्वासामुळे, 2014 मध्ये प्रारंभ झालेला माझा पंतप्रधानपदाचा कार्यकाळ निरंतर सुरू आहे. इतक्या वर्षात, आमच्या सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग लागलेला नाही. तर स्वातंत्र्यानंतर 60-65 वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारकडे भ्रष्टाचाराची एक मोठी यादी आहे. बिहारमधील प्रत्येक मुलाला राजदच्या भ्रष्टाचाराची माहिती आहे. माझा स्पष्ट विश्वास आहे की जर भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईला तार्किक निष्कर्षापर्यंत नेण्यासाठी कुणालाही कारवाईच्या कक्षेबाहेर ठेवले जाऊ नये. आपणच पहा, आज कायदा असा आहे की जर एखाद्या कनिष्ठ सरकारी कर्मचाऱ्याला 50 तास कोठडीत ठेवले तर तो आपोआप निलंबित होतो, मग तो ड्रायव्हर असो, छोटा लिपिक असो, शिपाई असो, त्याचे आयुष्य कायमचे उद्ध्वस्त होते.
पण जर कुणी मुख्यमंत्री, मंत्री किंवा पंतप्रधान असेल, आणि तो कारागृहात राहूनही सत्तेचा उपभोग घेत असेल, तर हे कसं शक्य आहे? आपण काही काळापूर्वीच पाहिलं आहे की कसे कारागृहातूनच कागदपत्रांवर सह्य केल्या जात होत्या, कारागृहातूनच सरकारी आदेश निघत होते. नेत्यांचा जर हा असा दृष्टिकोन असेल, तर भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई कशी लढली जाऊ शकते?
मित्रहो,
राज्यघटना प्रत्येक लोकप्रतिनिधीकडून प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेची अपेक्षा करते. आपण संविधानाची सीमा चिरडून टाकतांना पाहू शकत नाहीत. म्हणूनच राष्ट्रीय लोकशाही आघाडी- एनडीए सरकार भ्रष्टाचाराविरुद्ध असा एक कायदा घेऊन आले आहे, ज्याच्या कक्षेत देशाचा पंतप्रधानसुद्धा आहे. या कायद्यात मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनाही समाविष्ट केलं आहे. हा कायदा झाल्यावर, पंतप्रधान असो किंवा मुख्यमंत्री किंवा कोणताही मंत्री, त्याला अटकेच्या 30 दिवसांच्या आत जामिन घ्यावा लागेल. आणि जर जामिन मिळाला नाही, तर 31 व्या दिवशी त्याला खुर्ची सोडावी लागेल. तुम्ही सांगा बांधवांनो, जो कारागृहामध्ये जाईल त्याने खुर्ची सोडली पाहिजे की नाही ? तो पदावर राहू शकतो का? तो सरकारी कागदपत्रांवर सही करू शकतो का? तो कारागृहामधून सरकार चालवू शकतो का? आणि म्हणूनच असा कठोर कायदा करण्याच्या दिशेने आपण पुढे जात आहोत.
पण मित्रहो,
हे राष्ट्रीय जनता दलचे लोक, हे काँग्रेसचे लोक, हे डावे लोक या कायद्याला विरोध करत आहेत. ते खूप संतप्त आहेत, मात्र, त्यांना कशाची भीती आहे हे कोणाला माहित नाही? ज्याने पाप केले आहे, तो आपल्या पापाला इतरांपासून लपवतो, पण तो स्वतः जाणून आहे, की त्याने कोणता खेळ खेळला आहे. या सर्वांचा हिशोब एकच आहे. हे राजद आणि काँग्रेसचे लोक, काही जामिनावर आहेत, काही रेल्वेच्या खेळात कोर्टाच्या फेऱ्या मारत आहेत. आणि जे जामिनावर आहेत, ते आज या कायद्याला विरोध करत आहेत. त्यांना वाटते की जर ते तुरुंगात गेले तर त्यांची सर्व स्वप्ने धुळीस मिळतील. आणि म्हणूनच, सकाळ-संध्याकाळ हे लोक मोदींना विविध प्रकारे शिवीगाळ करत आहेत. आणि ते इतके संतप्त आहेत, इतके संतप्त आहेत की ते सार्वजनिक हितासाठी या कायद्याला विरोध करत आहेत. आमचे राजेंद्र बाबू, बाबासाहेब आंबेडकर यांनी कधीही विचार केला नव्हता, कधीच कल्पना केली नव्हती की सत्तेचे भुकेले लोक तुरुंगात गेल्यानंतरही भ्रष्टाचार करतील आणि त्यांच्या पदावर टिकून राहतील. पण आता भ्रष्टाचारी तुरुंगात जातील आणि त्यांचे पदही गमावतील. देशातील कोट्यवधी लोकांनी भारताला भ्रष्टाचारमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. आणि हा संकल्प पूर्ण होईल.
मित्रहो,
मी लाल किल्ल्यावरून आणखी एका धोक्याची चर्चा केली. आणि हा धोका बिहारवरही आहे. देशात घुसखोरांची वाढती संख्या ही चिंतेची बाब आहे. बिहारच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये लोकसंख्याशास्त्र वेगाने बदलत आहे. म्हणूनच, एनडीए सरकारने निर्णय घेतला आहे की आम्ही घुसखोरांना देशाचे भविष्य ठरवू देणार नाही. आम्ही घुसखोरांना बिहारच्या तरुणांच्या नोकऱ्या हिसकावू देणार नाही. त्यांना भारतीय जनतेच्या हक्काच्या सुविधा लुटू देणार नाही. या धोक्याचा तोंड देण्यासाठी, मी लोकसंख्याशास्त्र अभियान सुरू करण्याबद्दल बोललो आहे. लवकरच हे अभियान आपले काम सुरू करेल, आम्ही प्रत्येक घुसखोराला देशातून हाकलून लावू. तुम्ही मला सांगा, या घुसखोरांना हाकलून लावावे की नाही? हे घुसखोर तुमचा रोजगार हिसकावून घेतात हे तुम्हाला मान्य आहे का? एक घुसखोर तुमची जमीन हिसकावून घेतो हे तुम्हाला मान्य आहे का? तो तुमचे हक्क हिसकावून घेतो हे तुम्हाला मान्य आहे का? बिहारमधील सर्व लोकांनी देशात बसलेल्या घुसखोरांच्या समर्थकांपासून सावध राहावे, घुसखोरांच्या पाठीशी कोण उभे आहे हे जाणून घ्या. काँग्रेस आणि राजद सारखे पक्ष बिहारमधील लोकांचे हक्क हिरावून घेऊन घुसखोरांना देऊ इच्छितात. तुष्टीकरणासाठी, मतपेटी वाढवण्यासाठी, काँग्रेस-राजदचे लोक काहीही करू शकतात, कोणत्याही खालच्या थराला जाऊ शकतात. म्हणून, म्हणून बिहारच्या लोकांनी खूप सतर्क राहायला हवे.
मित्रहो,
आपल्या बिहारला काँग्रेस-राजदच्या वाईट नजरेपासून वाचवायचे आहे. बिहारसाठी हा काळ खूप महत्त्वाचा आहे. बिहारच्या कल्याणासाठी आपण केंद्र सरकार आणि नितीशजींसोबत खांद्याला खांदा लावून काम करत आहोत, जेणेकरून बिहारमधील तरुणांची स्वप्ने पूर्ण होतील, बिहारमधील लोकांच्या आकांक्षा नवीन नवीन भरारी घेतील . बिहारमध्ये विकासाची गती कायम राहावी यासाठी डबल इंजिन सरकार सातत्याने कठोर परिश्रम करत आहे. आजचे विकास प्रकल्प या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. मी पुन्हा एकदा या प्रकल्पांसाठी बिहारचे अभिनंदन करतो. माझ्यासोबत म्हणा,-
भारत माता की जय।
भारत माता की जय।
भारत माता की जय।
खूप-खूप धन्यवाद.
***
निखिल देशमुख/सुषमा काणे/शैलेश पाटील/वासंती जोशी/राज दळेकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2160145)