पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे 5,200 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन


कोलकातासारखी शहरे भारताचा इतिहास आणि भविष्याची समृद्ध ओळख आहे : पंतप्रधान

भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने आगेकूच करत असताना, दमदम आणि कोलकातासारखी शहरे या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावतील : पंतप्रधान

21 व्या शतकातील भारताला 21 व्या शतकातील वाहतूक व्यवस्थेची गरज आहे, म्हणूनच, आज देशभरात, रेल्वेपासून रस्त्यांपर्यंत , मेट्रोपासून विमानतळांपर्यंत आधुनिक वाहतूक सुविधा केवळ विकसित केल्या जात नाहीत तर वेगवान कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी त्या एकमेकांशी जोडल्या देखील जात आहेत: पंतप्रधान

Posted On: 22 AUG 2025 8:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 ऑगस्ट 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे 5,200  कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध  विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, पश्चिम बंगालच्या विकासाला गती देण्याची संधी त्यांना पुन्हा एकदा मिळाली आहे. नोआपारा ते जय हिंद विमानतळ या कोलकाता मेट्रो प्रवासाचा अनुभव सामायिक करताना मोदी म्हणाले की, या प्रवासात  त्यांनी अनेक सहकाऱ्यांशी संवाद साधला आणि कोलकात्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या आधुनिकीकरणाबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांनी सहा पदरी उन्नत कोना एक्सप्रेसवेची पायाभरणी देखील केली. या हजारो  कोटी रुपयांच्या प्रकल्पांसाठी त्यांनी कोलकात्याच्या जनतेचे आणि पश्चिम बंगालच्या सर्व नागरिकांचे हार्दिक अभिनंदन केले.

"कोलकातासारखी शहरे भारताचा इतिहास आणि भविष्याचे समृद्ध प्रतीक आहेत, भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने आगेकूच करत असताना, दमदम आणि कोलकाता सारखी शहरे महत्त्वाची भूमिका बजावतील", असे मोदी म्हणाले. आजच्या कार्यक्रमाचा संदेश मेट्रोचे उद्घाटन आणि महामार्गाची  पायाभरणी पुरताच  मर्यादित नाही. तर आधुनिक भारत त्याच्या शहरी परिदृश्यात कशा प्रकारे परिवर्तन  घडवून आणत आहे याचा हा कार्यक्रम दाखला आहे असे पंतप्रधानांनी नमूद केले. भारतीय शहरांमध्ये हरित गतिशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, तसेच  इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट्स आणि इलेक्ट्रिक बसेसची संख्या देखील वाढत आहे यावर त्यांनी भर दिला. ते पुढे म्हणाले की 'वेस्ट टू वेल्थ' उपक्रमांतर्गत, शहरे आता शहरी कचऱ्यापासून वीज निर्मिती करत आहेत. मेट्रो सेवांचा विस्तार होत आहे आणि मेट्रो नेटवर्क देखील विस्तारत आहे हे अधोरेखित करत  मोदी यांनी भारताकडे आता जगातील तिसरे सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क आहे याबद्दल  अभिमान व्यक्त केला. त्यांनी निदर्शनास आणून दिले की 2014 पूर्वी देशात केवळ 250 किलोमीटरचे मेट्रो मार्ग होते, तर आज भारतातील मेट्रो नेटवर्क 1,000  किलोमीटरपेक्षा अधिक विस्तारले आहे. कोलकात्यानेही आपल्या मेट्रो प्रणालीचा सतत विस्तार होताना पाहिला आहे असे त्यांनी सांगितले.  पंतप्रधानांनी माहिती दिली की कोलकात्याच्या मेट्रो रेल्वे नेटवर्कमध्ये सुमारे 14 किलोमीटरच्या नवीन मार्गिका  जोडल्या जात आहेत, तर कोलकाता मेट्रोमध्ये सात नवीन स्थानके जोडली जात आहेत.  या सर्व विकास कामांमुळे कोलकात्यातील लोकांचे जीवन सुखकर होईल तसेच प्रवास सुलभ होईल.

"21 व्या शतकातील भारताला 21 व्या शतकातील वाहतूक व्यवस्थेची गरज  आहे. म्हणूनच, आज देशभरात, रेल्वेपासून रस्त्यांपर्यंत, मेट्रोपासून विमानतळांपर्यंत - आधुनिक वाहतूक सुविधा विकसित केल्या जात आहेत आणि एकमेकांशी जोडल्या जात आहेत", असे मोदी यांनी अधोरेखित केले. सरकारचा प्रयत्न केवळ एका शहराला दुसऱ्या शहराशी जोडणे हा नाही तर लोकांच्या घराजवळ अखंड  वाहतूक सुविधा सुनिश्चित करण्याचा आहे यावर त्यांनी भर दिला. कोलकात्याच्या मल्टि- मोडल  कनेक्टिव्हिटीमध्ये या दृष्टिकोनाची झलक दिसून येते असे त्यांनी नमूद केले. देशातील सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी दोन - हावडा आणि सिलदाह  आता मेट्रोने जोडले गेले आहेत असे पंतप्रधानांनी नमूद केले.

यापूर्वी या स्थानकांदरम्यानचा प्रवास दीड तासांचा होता, तो आता मेट्रोने केवळ काही मिनिटांचा असेल, याकडे त्यांनी लक्ष वेधले. हावडा स्टेशन भुयारी मार्ग देखील मल्टी-मोडल कनेक्टिविटी सुनिश्चित करत आहे, असे त्यांनी सांगितले. पूर्वी प्रवाशांना पूर्व रेल्वे किंवा दक्षिण-पूर्व रेल्वेवरून गाड्या पकडण्यासाठी लांबचा वळसा घालावा लागत होता, असे सांगून मोदी म्हणाले की, या भुयारी मार्गाच्या उभारणीमुळे इंटरचेंजचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल. कोलकाता विमानतळ आता मेट्रो नेटवर्कशी जोडले गेले आहे, त्यामुळे शहराच्या दूरच्या भागातील लोकांना विमानतळापर्यंत पोहोचणे सोपे होईल, अशी घोषणा पंतप्रधानांनी केली.

पश्चिम बंगालच्या विकासासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असे सांगून मोदी म्हणाले की, पश्चिम बंगाल आता अशा राज्यांपैकी एक आहे जिथे 100% रेल्वे विद्युतीकरण साध्य झाले आहे. पुरुलिया ते हावडा दरम्यान मेमू ट्रेनची दीर्घकाळापासूनची मागणी लक्षात घेत, भारत सरकारने लोकांची ही मागणी पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी माहिती दिली की, पश्चिम बंगालमध्ये सध्या विविध मार्गांवर नऊ वंदे भारत गाड्या धावत आहेत आणि राज्यातील लोकांसाठी दोन अतिरिक्त अमृत भारत गाड्या देखील धावत आहेत.

गेल्या अकरा वर्षांत भारत सरकारने या भागातील अनेक मोठे महामार्ग प्रकल्प पूर्ण केले आहेत, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, इतर अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांवरही काम सुरू आहे. सहा पदरी कोना एक्स्प्रेसवे पूर्ण झाल्यावर बंदर कनेक्टिविटीमध्ये लक्षणीय सुधारणा होईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आपल्या भाषणाचा समारोप करताना ते म्हणाले की. या वाढीव कनेक्टिविटीमुळे कोलकाता आणि पश्चिम बंगालच्या चांगल्या भविष्याचा पाया मजबूत होईल.

पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ. सी. व्ही. आनंद बोस, केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर, रवनीत सिंह बिट्टू, डॉ. सुकांता मजूमदार, यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पार्श्वभूमी

जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि विकसित शहरी संपर्काच्या आपल्या वचनबद्धतेला अनुसरून, पंतप्रधानांनी कोलकाता येथे मेट्रो रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन केले. 13.61 किमी लांबीच्या नव्याने बांधण्यात आलेल्या मेट्रो नेटवर्कचे उद्घाटन केले जाईल, आणि या मार्गांवर मेट्रो सेवा सुरू केली जाईल. त्यांनी जेसोर रोड मेट्रो स्टेशनला भेट दिली, जिथे ते जेसोर रोडवरून नोआपारा-जय हिंद बिमानबंदर मेट्रो सेवेला हिरवा झेंडा दाखवतील. याशिवाय व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सियालदह-एस्प्लेनेड मेट्रो सेवा आणि बेलेघाटा-हेमंता मुखोपाध्याय मेट्रो सेवेलाही ते हिरवा झेंडा दाखवतील. त्यांनी जेसोर रोड मेट्रो स्टेशन ते जय हिंद बिमानबंदर आणि परतीचा मेट्रो प्रवास केला.

सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधानांनी हावडा मेट्रो स्थानकात या मेट्रो विभागांचे आणि नव्याने बांधण्यात आलेल्या भुयारी मार्गाचे उद्घाटन केले. नोआपारा-जय हिंद विमानबंदर मेट्रो सेवेमुळे विमानतळापर्यंत पोहोचण्याच्या सुविधेत लक्षणीय सुधारणा होईल. सियालदह-एस्प्लेनेड मेट्रोमुळे दोन ठिकाणांदरम्यानचा प्रवासाचा वेळ सुमारे चाळीस मिनिटांवरून केवळ अकरा मिनिटांवर येईल. बेलेघाटा-हेमंत मुखोपाध्याय मेट्रो विभाग आयटी हबशी कनेक्टिविटी वाढवण्यात महत्वाची  भूमिका बजावेल. हे मेट्रो मार्ग कोलकात्यातील काही सर्वात वर्दळीच्या भागांना जोडतील, प्रवासाच्या वेळेत लक्षणीय घट करतील आणि मल्टीमोडल कनेक्टिविटी मजबूत करतील, ज्याचा लाभ लाखो दैनंदिन प्रवाशांना मिळेल.

या प्रदेशातील रस्ते पायाभूत सुविधांना मोठी चालना देण्यासाठी, पंतप्रधानांनी 1,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 7.2 किमी लांबीच्या सहा पदरी उन्नत कोना एक्सप्रेसवेची पायाभरणी देखील केली. यामुळे हावडा, आसपासचा ग्रामीण भाग आणि कोलकाता दरम्यानची  कनेक्टिविटी वाढेल, प्रवासाच्या तासांची बचत होईल आणि या भागातील व्यापार, वाणिज्य व्यवहार आणि पर्यटनाला लक्षणीय चालना मिळेल.


शैलेश पाटील/सुषमा काणे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2159960)