पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील गया येथे 12,000 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे भूमीपूजन आणि उद्घाटन
गयाजींचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा अतिशय प्राचीन आणि समृद्ध : पंतप्रधान
ऑपरेशन सिंदूरने भारताच्या संरक्षण धोरणाला एक नवा आयाम दिला आहे : पंतप्रधान
बिहारचा जलद विकास करण्याला केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे सर्वोच्च प्राधान्य : पंतप्रधान
कोणताही अपवाद न करता प्रत्येक घुसखोराला देशाबाहेर काढले जाईल : पंतप्रधान
Posted On:
22 AUG 2025 7:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 ऑगस्ट 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बिहारमधील गया येथे 12,000 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे भूमीपूजन आणि उद्घाटन झाले. यावेळी पंतप्रधाननांनी ज्ञान आणि मुक्तीचे पवित्र शहर असलेल्या गयाजीला अभिवादन केले आणि विष्णुपद मंदिराच्या या गौरवशाली भूमीतून सर्वांना शुभेच्छाही दिल्या. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. गयाजीची भूमी ही अध्यात्म आणि शांतीची भूमी आहे, असे पंतप्रधान म्हणाले. याच पवित्र भूमीवर भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती, ही बाब त्यांनी अधोरेखित केली. गयाजींचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा अतिशय प्राचीन आणि समृद्ध आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आपल्या शहराचा उल्लेख केवळ गया असा न करता तो आदरपूर्वक गयाजी असा केला जावा अशा, या प्रदेशातील जनतेच्या अपेक्षेचा आणि भावनेचा आदर केल्याबद्दल पंतप्रधानांनी बिहार सरकारचे अभिनंदन केले. केंद्र सरकार आणि बिहारमधील सरकारे गयाजीच्या जलद विकासासाठी सातत्याने काम करत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
आज गयाजीच्या पवित्र भूमीतून एकाच दिवशी 12,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमीपूजन झाल्याची माहिती त्यांनी दिली. हे प्रकल्प ऊर्जा, आरोग्य सेवा आणि शहरी विकासासह महत्त्वाच्या क्षेत्रांशी संबंधित असून, या उपक्रमांमुळे बिहारची औद्योगिक क्षमता वाढेल आणि तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, असे ते म्हणाले. या परिवर्तनकारी प्रकल्पांसाठी त्यांनी बिहारच्या जनतेचे अभिनंदनही केले. राज्यातील आरोग्य सेवा सुविधांचा विस्तार करण्यासाठी आज एका रुग्णालय आणि संशोधन केंद्राचे उद्घाटन करण्यात आल्याची माहितीही पंतप्रधानांनी दिली. यामुळे आता बिहारच्या जनतेला कर्करोगाच्या उपचारांसाठी अतिरिक्त सुविधा उपलब्ध झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
एक लोकसेवक या नात्याने गरीब लोकांच्या आयुष्यातील अडचणी दूर करणे आणि महिलांचे जीवन सुकर करून आपल्याला सर्वाधिक समाधान मिळते, असे त्यांनी सांगितले. गरीबांना पक्की घरे देण्यासाठी आपली वचनबद्धता त्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली. पुन्हा एकदा सांगितले. प्रत्येक गरजू व्यक्तीला पक्के घर मिळेपर्यंत आपण स्वस्थ बसणार नसल्याचे त्यांनी सांगितले. या संकल्पाचे पालन करत, गेल्या 11 वर्षांत देशभरातील गरिबांसाठी 4 कोटी पक्की घरे बांधण्यात आली आहेत, ही बाब त्यांनी अधोरेखित केली. याअंतर्गत केवळ बिहारमध्येच 38 लाखांहून अधिक घरे बांधली गेली असून, गया जिल्ह्यातील 2 लाखांहून अधिक कुटुंबांना त्यांची स्वतःची पक्की घरे मिळाली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली, ही केवळ घरे नसून गरीबांच्या सन्मानाचे प्रतीक आहेत, असे ते म्हणाले. ही घरे वीज, पाणी, शौचालये आणि गॅसच्या जोडणीने सुसज्ज आहेत, यामुळे गरीब कुटुंबेही सोयीस्कर, सुरक्षित आणि सन्मानाने जगू शकतील, असे ते म्हणाले.
हा उपक्रम पुढेही चालूच राहणार आहे, याअंतर्गत बिहारच्या मगध भागातील 16,000 हून अधिक कुटुंबांना आता त्यांची पक्की घरे मिळाली आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. आता ही कुटुंबे यावर्षीची दिवाळी आणि छठ पूजा अधिक उत्साहात साजरी करतील अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ज्या लाभार्थ्यांना घरे मिळाली आहेत त्या सर्व कुटुंबांचे त्यांनी अभिनंदन केले. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अद्यापही लाभाची वाट पाहात असलेल्या प्रत्येक गरीब नागरिकाला पक्के घर मिळेपर्यंत ही मोहीम सुरूच राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.
बिहार ही चंद्रगुप्त मौर्य आणि चाणक्य यांची भूमी आहे. जेव्हा जेव्हा भारतासमोर शत्रूंद्वारे आव्हाने निर्माण केली केली, त्या त्या वेळी बिहार देशासाठी ढाल बनून उभा राहिला असे ते म्हणाले. बिहारच्या भूमीवर घेतलेला कोणताही संकल्प कधीही अपूर्ण राहत नाही, ही बाब त्यांनी नमूद केली. काश्मीरमधील पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संदर्भही त्यांनी आपल्या संबोधनात दिला. या हल्ल्यात निष्पाप नागरिकांना त्यांचा धर्म विचारून मारले गेले, त्यावेळी आपण दहशतवाद संपवण्याची शपथ बिहारच्या भूमीतूनच घेतली होती, याचे स्मरण त्यांनी उपस्थितांना करून दिले. आज जगाला बिहारच्या भूमीवर घेतलेल्या त्या संकल्पाची पूर्तता होताना दिसत आहे, असे ते म्हणाले. पाकिस्तान ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करत होता, त्यावेळी भारताने हवेतच त्या क्षेपणास्त्रांना गवतासारखे उडवत निष्प्रभ केले, असे ते म्हणाले. पाकिस्तानचे एकही क्षेपणास्त्र भारताचे नुकसान करू शकले नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
ऑपरेशन सिंदूरने भारताच्या संरक्षण धोरणाला एक नवा आयाम दिला आहे, आता दहशतवाद्यांना भारतात पाठवून किंवा हल्ले घडवून आणून कोणीही पळून जाऊ शकत नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दहशतवादी अगदी जमीनीच्या पोटात कुठेही लपले तरी भारताची क्षेपणास्त्रे त्यांना तिथेच नेस्तनाबूत करतील असे ते म्हणाले.
बिहारचा झपाट्याने विकास हा केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारचा सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले. बिहार आज सर्वसमावेशक विकासाच्या मार्गावर पुढे जात असून, गेल्या काही वर्षांत अनेक जुने प्रश्न निकाली काढत प्रगतीसाठी नवे मार्ग खुले झाले आहेत, असेही त्यांनी नमूद केले. कंदील राजवटीचा उल्लेख करताना मोदी म्हणाले की त्या काळात हा प्रदेश लाल दहशतीच्या विळख्यात होता आणि नक्षलवादी कारवायांमुळे संध्याकाळनंतर हालचाल करणे कठीण झाले होते. गयाजी सारखी शहरेही त्या काळात अंधारात बुडालेली होती. हजारो गावांत वीजेचे खांबसुद्धा नव्हते, असे सांगून पंतप्रधानांनी ठामपणे नमूद केले की त्या काळात राज्यकर्त्यांनी बिहारचे भविष्य अंधारात ढकलले. शिक्षण वा रोजगार नव्हता त्यामुळे बिहारच्या अनेक पिढ्यांना स्थलांतर करावे लागले.
विरोधी पक्ष आणि त्यांचे सहकारी बिहारच्या लोकांना फक्त मतपेढी म्हणून पाहतात, त्यांना गरिबांच्या सुख-दु:खाची किंवा त्यांच्या प्रतिष्ठेची वा आदराची किंचितही काळजी नाही, अशी टीका मोदी यांनी केली. एका विशिष्ट पक्षाच्या माजी मुख्यमंत्र्यांनी एकदा सार्वजनिकरित्या जाहीर केले होते की बिहारच्या लोकांना त्यांच्या राज्यात प्रवेश करू दिला जाणार नाही, याचा उल्लेख करताना मोदी यांनी अशा नेत्यांची बिहारी जनतेप्रति तिरस्कारपूर्ण वागणूक व खोलवर रुजलेला द्वेष यावर तीव्र शब्दात टीका केली. अशा वागणुकीकडेही विरोधी पक्षांनी दुर्लक्ष केले, असे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सध्याचे बिहार सरकार विरोधी आघाडीच्या फूट पाडणाऱ्या प्रचाराला ठोस उत्तर देत आहे. बिहारमधील मुला-मुलींना राज्यातच रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी अधोरेखित केले. बिहारमध्ये मोठे प्रकल्प उभारले जात असल्याचे सांगून त्यांनी गयाजी जिल्ह्यातील दोभी येथे राज्यातील सर्वात मोठे औद्योगिक क्षेत्र उभे राहत असल्याची माहिती दिली. गयाजीमध्ये एक तंत्रज्ञान केंद्रही स्थापन होत आहे, असे त्यांनी सांगितले. आज बक्सर ऊष्मा विद्युत प्रकल्पाचे उद्घाटन झाले असे सांगतानाच, काही महिन्यांपूर्वी औरंगाबाद येथील नवीनगर सुपर थर्मल पॉवर प्रकल्पाची पायाभरणी झाल्याचेही त्यांनी नमूद केले. भागलपूरच्या पीरपैंती येथे नवा ऊष्मा विद्युत प्रकल्प उभारला जाणार असून या प्रकल्पांमुळे बिहारमधील वीजपुरवठ्यात लक्षणीय वाढ होईल, असे मोदी म्हणाले. वीजउत्पादनात वाढ झाल्यास घरगुती वापरासाठी व उद्योगांसाठी वीजेची उपलब्धता सुधारेल तसेच नवीन रोजगारनिर्मितीही होईल, असेही त्यांनी अधोरेखित केले.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी युवकांना कायमस्वरूपी शासकीय नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी मोठे अभियान हाती घेतल्याचे सांगून, त्यांच्या नेतृत्वामुळेच राज्यातील शिक्षक भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शकतेने पार पडली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. राज्यातील तरुण रोजगारासाठी बाहेर न जाता राज्यातच रोजगार मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. केंद्र सरकारच्या एका नव्या उपक्रमामुळे या प्रयत्नांना मोठी मदत होईल, असे सांगून पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात जाहीर केलेल्या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनाचा उल्लेख केला. या योजनेअंतर्गत खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी स्वीकारणाऱ्या तरुणांना केंद्र सरकारकडून थेट 15,000 रुपये देण्यात येणार आहेत. तसेच युवकांना रोजगार देणाऱ्या खाजगी कंपन्यांनाही आर्थिक सहाय्य मिळणार आहे. या योजनेचा बिहारच्या तरुणांना मोठा लाभ होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
सार्वजनिक निधीचे मोल कधीच न जाणणाऱ्या विरोधी पक्षांवर टीका करताना मोदी म्हणाले की, त्यांच्या दृष्टीने जनतेचा पैसा हा केवळ स्वतःची तिजोरी भरण्याचे साधन होते. त्यांच्या कारकीर्दीत प्रकल्प अनेक वर्षे अपूर्ण राहत असत. योजना जितकी जास्त लांबणीवर पडेल तितका त्यांना आर्थिक फायदा होत असे. मात्र, ही चुकीची मानसिकता आमच्या सरकारने बदलली आहे, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. पायाभरणी झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर काम पूर्ण करण्याचे प्रयत्न आम्ही करतो, असे त्यांनी सांगितले. आजच्या कार्यक्रमाचा उल्लेख करताना मोदी म्हणाले की, त्यांनी औंटा-सिमारिया विभागाची पायाभरणी केली होती आणि आता त्याचे उद्घाटन स्वतःच करत आहेत. हा पूल केवळ रस्त्यांना जोडणार नाही तर उत्तर आणि दक्षिण बिहारला देखील जोडणार आहे. जड वाहनांना यापूर्वी गांधी सेतूमार्गे 150 किलोमीटरचा फेरा मारावा लागत होता, मात्र आता थेट मार्ग उपलब्ध झाला आहे. त्यामुळे व्यापाराला वेग, उद्योगांना बळकटी आणि यात्रेकरूंना प्रवास सुलभता मिळेल, असे त्यांनी सांगितले. आमच्या सरकारकडून सुरू करण्यात आलेले विकास प्रकल्प पूर्ण होतील हे निश्चित आहे, असे पंतप्रधानांनी ठामपणे नमूद केले.
पंतप्रधानांनी नमूद केले की केंद्र आणि राज्यातील त्यांचे सरकार बिहारमध्ये रेल्वे विकासाला गती देण्यासाठी वेगाने काम करत आहेत. अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत, प्रवाशांना विमानतळासारख्या सुविधा पुरवण्यासाठी गयाजी रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण केले जात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. मोदी यांनी सांगितले की गया हे आता राजधानी, जन शताब्दी आणि मेड-इन-इंडिया वंदे भारत गाड्यांनी जोडलेले शहर आहे. गयाजी इथून सासाराम, प्रयागराज आणि कानपूर मार्गे दिल्ली अशी थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी बिहारच्या युवक आणि उद्योजकांसाठी नवीन संधी निर्माण करत आहे यावर त्यांनी भर दिला.
2014 मध्ये पंतप्रधान म्हणून आपला कार्यकाळ सुरू करण्यासाठी दिलेल्या आशीर्वादाबद्दल आणि देशाच्या अतूट विश्वासाप्रति कृतज्ञता व्यक्त करताना, मोदी यांनी अधोरेखित केले की मागील अकरा वर्षांमध्ये त्यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग आढळला नाही. याउलट, स्वातंत्र्यानंतर सहा ते साडेसहा दशके राज्य करणाऱ्या विरोधी सरकारांकडे भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची मोठी यादी आहे असे त्यांनी नमूद केले. बिहारमधील प्रत्येक मुलाला विरोधी पक्षांनी केलेला भ्रष्टाचार माहीत आहे. पंतप्रधानांनी स्पष्टपणे नमूद केले की भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईला तार्किक निष्कर्षापर्यंत नेण्यासाठी कुणालाही कारवाईच्या कक्षेबाहेर ठेवले जाऊ नये. त्यांनी सध्याच्या कायद्याकडे लक्ष वेधले ज्या अंतर्गत 48 तासांसाठी ताब्यात ठेवलेले असल्यास कनिष्ठ सरकारी कर्मचाऱ्यालाही आपोआप निलंबित केले जाते. मुख्यमंत्री किंवा मंत्री तुरुंगात असतानाही सत्तेचे विशेषाधिकार कसे उपभोगू शकतात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांनी अलिकडच्या घटनांचा उल्लेख केला ज्यामध्ये फायलींवर स्वाक्षरी केली जात होती आणि थेट तुरुंगातून अधिकृत आदेश जारी केले जात होते. मोदी म्हणाले की जर हीच राजकीय नेत्यांची वृत्ती असेल तर भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई प्रभावीपणे कशी राबवता येईल.
भारतीय संविधान प्रत्येक लोकप्रतिनिधीकडून प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेची अपेक्षा करते हे अधोरेखित करत , संविधानाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचू देऊ नये यावर पंतप्रधानांनी भर दिला. त्यांनी घोषणा केली की त्यांचे सरकार एक कठोर भ्रष्टाचार विरोधी कायदा आणत आहे जो देशाच्या पंतप्रधानांनाही लागू होईल. ते पुढे म्हणाले की मुख्यमंत्री आणि मंत्री देखील या कायद्याच्या कक्षेत येतील. हे अधिक स्पष्ट करताना मोदी म्हणाले की, एकदा हा कायदा लागू झाला की, अटक झालेल्या कुणाही पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना 30 दिवसांच्या आत जामीन मिळवावा लागेल. जर जामीन मंजूर झाला नाही तर त्यांना 31 व्या दिवशी त्यांचे पद सोडावे लागेल. सरकार असाच कठोर कायदा करण्याच्या उद्देशाने पुढे जात असल्याचे ते म्हणाले .
या कायद्याला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांवर टीका करताना, मोदी म्हणाले की त्यांचा राग भीतीमुळे निर्माण झाला आहे - ज्यांनी चुकीचे कृत्य केले आहे ते इतरांपासून लपवू शकतात, परंतु त्यांना स्वतःला त्यांच्या कृतींची जाणीव आहे. विरोधी पक्षांमधील काही नेते जामिनावर बाहेर आहेत, तर काही घोटाळ्यांशी संबंधित कायदेशीर कारवाईत अडकले आहेत आणि त्या लोकांना भीती आहे की जर ते तुरुंगात गेले तर त्यांची राजकीय स्वप्ने भंग होतील . म्हणूनच ते प्रस्तावित कायद्याला विरोध करत आहेत असे ते म्हणाले. राजेंद्र बाबू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या नेत्यांनी कधीच कल्पना केली नव्हती की सत्तेसाठी लोभी व्यक्ती भ्रष्टाचार करतील आणि तुरुंगात असतानाही पदावर टिकून राहतील . नवीन कायद्यानुसार, भ्रष्ट व्यक्ती केवळ तुरुंगात जाणार नाहीत तर त्यांना त्यांची सत्ताही गमवावी लागेल असे पंतप्रधान म्हणाले. "भारताला भ्रष्टाचारमुक्त करण्याचा संकल्प ही कोट्यवधी नागरिकांची सामूहिक वचनबद्धता आहे - आणि हा संकल्प पूर्ण होईल", असे पंतप्रधानांनी सांगितले.
लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात आपण गंभीर चिंता व्यक्त केली होती - जी बिहारला देखील प्रभावित करते, असे नमूद करून मोदी यांनी देशात घुसखोरांची वाढती संख्या ही गंभीर चिंतेची बाब असल्याचे सांगितले. बिहारच्या सीमावर्ती जिल्ह्यांमधील लोकसंख्या वेगाने वाढत आहे यावर त्यांनी भर दिला आणि घुसखोरांना देशाचे भविष्य ठरवू न देण्याचा निर्धार त्यांच्या सरकारने केला असल्याचे सांगितले. बिहारच्या तरुणांकडून रोजगाराच्या संधी हिरावून घेऊन त्या घुसखोरांना दिल्या जाणार नाहीत यावर पंतप्रधानांनी भर दिला. भारतीय नागरिकांसाठी असलेल्या सुविधा घुसखोरांना लुटू दिल्या जाणार नाहीत यावर त्यांनी भर दिला. या धोक्याचा सामना करण्यासाठी, पंतप्रधानांनी डेमोग्राफी मिशन सुरू करण्याची घोषणा केली, जी लवकरच कार्यान्वित होईल. त्यांनी निक्षून सांगितले की प्रत्येक घुसखोराला देशातून हाकलून लावले जाईल. घुसखोरांना पाठिंबा देणाऱ्या देशातील लोकांपासून सावध राहण्याचे आवाहन त्यांनी बिहारमधील लोकांना केले. बिहारींना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवण्याच्या आणि ते हक्क घुसखोरांना देण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधी पक्षांवर मोदी यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले की तुष्टीकरण आणि मतपेढीच्या राजकारणासाठी, हे पक्ष कोणत्याही थराला जाण्यास तयार आहेत. पंतप्रधानांनी बिहारमधील लोकांना अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन केले.
विरोधी पक्षांच्या हानिकारक हेतूंपासून बिहारचे रक्षण केले पाहिजे, असे सांगून मोदी म्हणाले की, बिहारसाठी हा अत्यंत महत्त्वाचा काळ आहे. बिहारच्या तरुणांची स्वप्ने पूर्ण होतील, अशी आशा व्यक्त करून, बिहारच्या जनतेच्या आकांक्षांना नवे पंख द्यायला हवेत, असेही ते म्हणाले. यासाठी केंद्र सरकार नितीशकुमार यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असल्याचे अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी शेवटी सांगितले की, बिहारमधील विकासाची गती कायम ठेवण्यासाठी, केंद्र आणि राज्यातील त्यांची सरकारे सतत कठोर परिश्रम करत आहेत, आणि आजचे विकास प्रकल्प हे त्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.
बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह, जीतनराम मांझी, गिरीराज सिंह, चिराग पासवान, नित्यानंद राय, रामनाथ ठाकूर, डॉ. राजभूषण चौधरी, सतीश चंद्र दुबे, यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पार्श्वभूमी
कनेक्टिविटी (संपर्कव्यवस्था) सुधारण्याच्या आपल्या वचनबद्धतेला अनुसरून, पंतप्रधानांनी राष्ट्रीय महामार्ग -31 वरील 8.15 किमी लांबीच्या आंटा - सिमरिया पूल प्रकल्पाचे उद्घाटन केले, ज्यामध्ये गंगा नदीवरील 1.86 किमी लांबीच्या 6 पदरी पुलाचा समावेश असून, यासाठी 1,870 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला. यामुळे पाटणा मधील मोकामा आणि बेगूसराय दरम्यान थेट कनेक्टिविटी मिळेल.
हा पूल जुन्या दोन पदरी मोडकळीला आलेल्या "राजेंद्र सेतू", या रेल्वे-रस्ते पुलाला समांतर बांधण्यात आला असून त्याची दूरवस्था झाली आहे. त्यामुळे अवजड वाहनांना आपला मार्ग बदलावा लागतो. नवीन पुलामुळे उत्तर बिहार (बेगूसराय, सुपौल, मधुबनी, पूर्णिया, अररिया इ.) आणि दक्षिण बिहार भाग (शेखपुरा, नवादा, लखीसराय इ.) दरम्यान प्रवास करणाऱ्या अवजड वाहनांचा 100 किमी पेक्षा जास्त अतिरिक्त प्रवास कमी होईल. तसेच या वाहनांना वळसा घालून जावे लागल्यामुळे इतर भागात होणारी वाहतूक कोंडीची समस्या कमी व्हायला मदत होईल.
यामुळे लगतच्या भागात, विशेषत: उत्तर बिहारमध्ये आर्थिक विकासाला चालना मिळेल, जो प्रदेश आवश्यक कच्च्या मालासाठी दक्षिण बिहार आणि झारखंडवर अवलंबून आहे. या पुलामुळे प्रसिद्ध कवी दिवंगत रामधारीसिंह दिनकर यांचे जन्मस्थान असलेल्या सिमरिया धाम या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राशी देखील चांगली कनेक्टिविटी उपलब्ध होईल.
पंतप्रधानांनी राष्ट्रीय महामार्ग -31 च्या बख्तियारपूर ते मोकामा दरम्यानच्या सुमारे 1,900 कोटी रुपयांच्या चार पदरी मार्गाचे उद्घाटन केले, ज्यामुळे गर्दी कमी होईल, प्रवासाचा वेळ कमी होईल आणि प्रवासी आणि मालवाहतूक वाढेल. याशिवाय, बिहारमधील राष्ट्रीय महामार्ग-120 च्या विक्रमगंज-दावाथ-नवानगर-डुमराव या कच्च्या मार्गाच्या दुपदरीकरणामुळे, ग्रामीण भागातील दळणवळण सुधारेल आणि स्थानिक जनतेला अर्थार्जनाच्या नवीन संधी उपलब्ध होतील.
बिहारमधील ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी, पंतप्रधान सुमारे 6,880 कोटी रुपये किमतीच्या बक्सर औष्णिक विद्युत प्रकल्पाचे (660×1 मेगावॅट) उद्घाटन करतील. यामुळे वीजनिर्मिती क्षमतेत लक्षणीय वाढ होईल, ऊर्जा सुरक्षा सुधारेल आणि या भागातील विजेची वाढती मागणी पूर्ण होईल.
आरोग्य पायाभूत सुविधांना मोठी चालना देण्यासाठी, पंतप्रधानांनी मुझफ्फरपूर येथे होमी भाभा कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्राचे उद्घाटन केले. या केंद्रात प्रगत ऑन्कोलॉजी ओपीडी, आयपीडी वॉर्ड, ऑपरेशन थिएटर, आधुनिक प्रयोगशाळा, रक्तपेढी आणि 24 खाटांचा आयसीयू (इंटेन्सिव्ह केअर युनिट) आणि एचडीयू (हाय डिपेंडन्सी युनिट) याचा समावेश आहे. या अत्याधुनिक सुविधेमुळे बिहार आणि शेजारच्या राज्यांमधील रुग्णांना प्रगत आणि परवडण्याजोगी कर्करोग उपचार सेवा उपलब्ध होणार असून, उपचारांसाठी दूरच्या महानगरांमध्ये जाण्याची गरज कमी होईल.
स्वच्छ भारत आणि गंगा नदीची अविरल आणि निर्मल धारा सुनिश्चित करण्याच्या आपल्या दृष्टीकोनाला पुढे नेत पंतप्रधानांनी मुंगेर येथे नमामि गंगे अंतर्गत बांधलेल्या 520 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) आणि सांडपाणी नेटवर्कचे उद्घाटन केले. यामुळे गंगा नदीतील प्रदूषण कमी व्हायला मदत होईल आणि या प्रदेशातील स्वच्छता सुविधांमध्ये सुधारणा होईल.
पंतप्रधानांनी सुमारे 1,260 कोटी रुपयांच्या शहरी पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी देखील केली. यामध्ये औरंगाबादमधील दौडनगर आणि जहानाबाद येथील एसटीपी आणि सांडपाणी नेटवर्क, लखीसरायमधील बाराहिया आणि जमुई येथील एसटीपी आणि इंटरसेप्शन आणि डायव्हर्शनची कामे यांचा समावेश आहे.
पंतप्रधान अमृत 2.0 अंतर्गत, औरंगाबाद, बोधगया आणि जहानाबाद येथील पाणीपुरवठा प्रकल्पांचे भूमिपूजन करतील. या प्रकल्पांमुळे पिण्याचे शुद्ध पाणी, आधुनिक मलनिस्सारण व्यवस्था आणि सुधारित स्वच्छता उपलब्ध होईल, ज्यामुळे या भागातील आरोग्याचा दर्जा आणि जीवनमान सुधारेल.
या भागातील रेल्वे कनेक्टिविटीला चालना देण्यासाठी पंतप्रधानांनी दोन गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. गया ते दिल्ली दरम्यान अमृत भारत एक्सप्रेस जी आधुनिक सुविधा, आराम आणि सुरक्षिततेसह प्रवाशांची सुविधा सुधारेल. तसेच वैशाली आणि कोडरमा दरम्यान बौद्ध सर्किट ट्रेन, ज्यामुळे या प्रदेशातील प्रमुख बौद्ध स्थळांच्या ठिकाणी पर्यटन आणि धार्मिक प्रवासाला चालना मिळेल.
पीएमएवाय-ग्रामीण अंतर्गत 12,000 लाभार्थी आणि पीएमएवाय-शहरी अंतर्गत 4,260 लाभार्थ्यांचा गृहप्रवेश सोहळाही पार पडला, ज्यामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते काही लाभार्थ्यांना प्रतिकात्मक चावी सुपूर्द करण्यात आली, आणि हजारो कुटुंबांचे स्वतःच्या मालकीच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले.
शैलेश पाटील/तुषार पवार/राज दळेकर/सुषमा काणे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
(Release ID: 2159911)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam