ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने रॅपिडो या ऑनलाईन प्रवास प्रदान करणाऱ्या कंपनीवर दिशाभूल करणारी जाहिरात केल्याबद्दल 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला
ग्राहकांना नुकसानभरपाई दिली की नाही ते सुनिश्चित करावे आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती बंद कराव्यात : केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण
Posted On:
21 AUG 2025 3:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 ऑगस्ट 2025
ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने रॅपिडो (रोपेन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड) या ऑनलाईन प्रवास प्रदान करणाऱ्या कंपनीवर दिशाभूल करणारी जाहिरात प्रकाशित केल्याबद्दल आणि अनुचित व्यापार पद्धतीबद्दल 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आह.
याशिवाय ज्या ग्राहकांनी "पाच मिनिटात रिक्षा अन्यथा 50 रुपये मिळवा" या ऑफरचा पर्याय निवडला होता आणि त्यांना आश्वासन दिल्याप्रमाणे नुकसान भरपाई म्हणून 50 रुपये दिले नाहीत, त्यांना ती संपूर्ण रक्कम अधिक विलंबाशिवाय विनाशर्त अदा करावी असे निर्देश प्राधिकरणाने दिले आहेत.
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने रॅपिडो कंपनीच्या "पाच मिनिटात रिक्षा अन्यथा 50 रुपये मिळवा" आणि "रिक्षाची हमी" या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीची दखल घेतली आहे. तपशीलवार परीक्षणानंतर ही जाहिरात चुकीची, दिशाभूल करणारी आणि ग्राहकांची फसवणूक करणारी असल्याचे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने म्हटले आहे तसेच तात्काळ प्रभावाने ही दिशाभूल करणारी जाहिरात बंद करावी, असे निर्देश दिले आहेत.
राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन (NCH) मधील डेटा दर्शवितो:
एप्रिल 2023 ते मे 2024 दरम्यान रॅपिडोविरुद्ध 575 तक्रारी.
जून 2024 ते जुलै 2025 दरम्यान 1,224 तक्रारी.
रॅपिडोच्या जाहिरातींमध्ये "T&C Apply अर्थात अटी आणि शर्ती लागू " हा अस्वीकरण (डिस्क्लेमर ) अत्यंत लहान आणि वाचता न येणार्या फॉन्टमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता, असे प्राधिकरणाच्या तपासात आढळून आले. तसेच आश्वासन दिल्यानुसार 50 रुपये फायदा प्रत्यक्ष चलनात (रुपयांमध्ये) नव्हता तर "रॅपिडो कॉइन्स" च्या स्वरूपात होता, आणि तरीही, फायदा " 50 रुपयांपर्यंत" होता आणि प्रत्यक्ष 50 रुपये नव्हता. ही नाणी फक्त रॅपिडो बाईक राईड्सवरच रिडीम करता येत होती आणि त्यांची वैधता फक्त 7 दिवस होती. अशा निर्बंधांमुळे ऑफरचे मूल्य लक्षणीयरीत्या कमी झाले आणि ग्राहकांना अवास्तव कमी वेळेत रॅपिडोची दुसरी सेवा वापरण्यास भाग पाडले. अशा चुकांमुळे खात्रीशीर सेवेची चुकीची छाप निर्माण झाली आणि ग्राहकांना रॅपिडो निवडण्यास भाग पाडले गेले.
याशिवाय "पाच मिनिटात रिक्षा अन्यथा 50 रुपये मिळवा" अशा प्रकारे जाहिरात केली असली तरी अटी आणि शर्तींमध्ये लिहिल्याप्रमाणे ही हमी त्या वाहनाच्या चालकाने वैयक्तिक स्तरावर प्रदान करण्याची जबाबदारी होती आणि रॅपिडोची नव्हे. या परस्परविरोधी भूमिकेमुळे कंपनीकडून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न झाला, जाहिरातीत दिलेल्या आश्वासनाबद्दलच ग्राहकांची दिशाभूल करण्यात आली.
दिशाभूल करणार्या जाहिरातींना प्रतिबंध आणि दिशाभूल करणार्या जाहिरातींचे समर्थन याबाबत मार्गदर्शक तत्त्वे 2022’ नुसार जाहिरातींमधील अस्वीकरण जाहिरातीच्या मूळ दाव्याच्या परस्परविरोधी असता कामा नये, त्याद्वारे भौतिक माहिती लपवण्याचा प्रयत्न केला जाऊ नये किंवा दिशाभूल करणारा दावा दुरुस्त करण्यासाठी त्याचा वापर केला जाऊ नये. रॅपिडोच्या बाबतीत, 'गॅरंटीड ऑटो' आणि '5 मिनिटांत ऑटो किंवा 50 रुपये मिळवा' या दाव्यांमुळे असा समज निर्माण झाला की जर 5 मिनिटांत ऑटो पाठवली नाही तर ग्राहकांना नेहमीच 50 रुपये मिळतील. मात्र लाभ '50 रुपयांपर्यंत' मर्यादित असेल आणि ते देखील रॅपिडो नाण्यांच्या स्वरूपात ज्याला कमी वैधता असेल हा भौतिक मर्यादेचा भाग एकतर वगळला गेला होता किंवा समान प्राधान्यक्रमाने दर्शवला नव्हता. या लपवाछपवीमुळे आणि स्पष्टतेच्या अभावामुळे जाहिरात फसवी ठरली, जी मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवश्यकतांचे थेट उल्लंघन करते.
गेल्या दोन वर्षात राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनला रॅपिडो च्या विरोधात मिळणाऱ्या तक्रारींचे प्रमाण वाढल्याचे सीसीपीएच्या निदर्शनाला आले आहे. यापैकी अनेक तक्रारी सेवांमधील कमतरता, देय रक्कम परत न करणे, जास्त शुल्क आकारणे, वचन दिलेल्या सेवा प्रदान करण्यात अयशस्वी होणे आणि हमी दिलेल्या "5-मिनिटांच्या" सेवेची पूर्तता न होणे यांसारख्या आहेत. अशा तक्रारींमध्ये सतत वाढ होत असल्याने ग्राहकांच्या असंतोषाचे प्रमाण वाढत आहे, ज्यामुळे सीसीपीएला ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी कठोर कारवाई करण्यास प्रवृत्त केले आहे. रॅपिडोला या विषयी सांगूनही यापैकी बहुतेक तक्रारींचे निराकरण झालेले नाही.
रॅपिडो 120 हून अधिक शहरांमध्ये कार्यरत आहे आणि ही दिशाभूल करणारी जाहिरात देशभरातील अनेक प्रादेशिक भाषांमध्ये जवळजवळ दीड वर्षे (सुमारे 548 दिवस) सक्रियपणे चालवली जात होती. या मोहिमेची व्यापक पोहोच आणि दीर्घ कालावधी लक्षात घेता, ग्राहक संरक्षण कायदा, 2019, च्या कलम 10 अंतर्गत स्थापन झालेल्या केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाला (CCPA) ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी हस्तक्षेप करणे आवश्यक वाटले. कायद्याच्या कलम 10, 20 आणि 21 अंतर्गत अधिकारप्राप्त, सीसीपीएला ग्राहक हक्कांचे संरक्षण, प्रोत्साहन आणि अंमलबजावणी करण्याचे अधिकार आहेत, ज्यामध्ये दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि अनुचित व्यापार पद्धतींना आळा घालण्यासाठी कारवाई करणे समाविष्ट आहे.
मोठी आश्वासने देणाऱ्या आणि अटी स्पष्ट न करता "गॅरंटीड" किंवा "आश्वासन" सारखे शब्दप्रयोग करणाऱ्या जाहिरातींपासून ग्राहकांनी सावध राहावे असे आवाहन सीसीपीएने केले आहे.
ग्राहकांना दिशाभूल करणाऱ्या जाहिराती किंवा अनुचित व्यापार पद्धतींचा सामना करावा लागत असेल तर त्यांनी खालील गोष्टी कराव्यात :
राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन (1915) वर दूरध्वनी करा.
तक्रारी दाखल करण्यासाठी एनसीएच ॲप किंवा वेबसाइट वापरा.
नाना मेश्राम/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2159008)