पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान 22 ऑगस्ट रोजी बिहार आणि पश्चिम बंगालला भेट देणार


पंतप्रधान गया येथे सुमारे 13,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची करणार पायाभरणी आणि उद्घाटन

वीज, रस्ते, आरोग्य, शहरी विकास आणि पाणीपुरवठा अशा विविध क्षेत्रांशी हे प्रकल्प संबंधित

पंतप्रधान उत्तर आणि दक्षिण बिहारमधील संपर्क वाढविण्यासाठी गंगा नदीवरील औंटा-सिमरिया पूल प्रकल्पाचे करणार उद्घाटन

अवजड वाहनांना वळसा घालून जावे लागणारे 100 किमीपेक्षा जास्त अंतर या नवीन पुलामुळे होणार कमी, सिमरिया धामपर्यंत पोहोचणे सुलभ होणार

पंतप्रधान गया आणि दिल्ली दरम्यान अमृत भारत एक्सप्रेस तसेच वैशाली आणि कोडरमा दरम्यान बुद्धिस्ट सर्किट ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार

पंतप्रधान कोलकाता येथे 5,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची करणार पायाभरणी आणि उद्घाटन

पंतप्रधान कोलकाता येथे नव्याने बांधलेल्या मार्गांवर मेट्रो ट्रेन सेवांना हिरवा झेंडा दाखवणार

Posted On: 20 AUG 2025 4:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2025

पंतप्रधान  नरेंद्र मोदी 22 ऑगस्ट रोजी बिहार आणि पश्चिम बंगालला भेट देणार आहेत. ते सकाळी 11 च्या सुमारास  बिहारमधील गया येथे सुमारे 13,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध  विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. तसेच ते दोन गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील  आणि उपस्थितांना संबोधित करतील. त्यानंतर, ते गंगा नदीवरील औंटा-सिमरिया  पूल प्रकल्पाला भेट देऊन त्याचे उद्घाटन करतील.

पंतप्रधान कोलकाता येथे सायंकाळी 4:15  वाजता नव्याने बांधलेल्या विभागात  मेट्रो रेल्वे सेवांना हिरवा झेंडा दाखवतील आणि जेसोर रोड मेट्रो स्टेशन ते जय हिंद बिमानबंदर आणि तिथून परत असा मेट्रोने प्रवास करतील. तसेच  ते कोलकाता येथे 5,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधित देखील करतील.

पंतप्रधानांचे बिहारमधले कार्यक्रम  

कनेक्टिव्हिटी सुधारण्याप्रति वचनबद्धतेनुसार, पंतप्रधान राष्ट्रीय महामार्ग -31 वरील  8.15 किमी लांबीच्या औंटा-सिमरिया पूल प्रकल्पाचे उद्घाटन करतील, ज्यामध्ये गंगा नदीवरील 1.86 किमी लांबीचा 6 पदरी पूल समाविष्ट आहे, जो 1,870  कोटी रुपयांपेक्षा अधिक  खर्चून बांधला आहे. यामुळे पाटण्यातील मोकामा आणि बेगुसराय दरम्यान थेट कनेक्टिव्हीटी उपलब्ध होईल.

हा पूल जुन्या मोडकळीस आलेल्या "राजेंद्र सेतू" या 2-पदरी रेल्वे-कम-रस्ते  पुलाला समांतर बांधण्यात आला आहे जो खराब स्थितीत असल्यामुळे जड वाहनांना मार्ग बदलावा लागतो. नवीन पूल उत्तर बिहार (बेगुसराय, सुपौल, मधुबनी, पूर्णिया, अररिया इ.) आणि दक्षिण बिहार क्षेत्र (शेखपुरा, नवादा, लखीसराय इ.) दरम्यान प्रवास करणाऱ्या अवजड वाहनांसाठी 100 किमीपेक्षा अधिक  अंतर कमी करेल. या वाहनांना वळसा घालून जावे लागत असल्यामुळे प्रदेशाच्या इतर भागांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या कमी करण्यास देखील यामुळे मदत होईल.

या नव्या पुलाच्या उभारणीमुळे लगतच्या परिसरात, विशेषतः आवश्यक कच्चा माल मिळवण्यासाठी दक्षिण बिहार तसेच झारखंड यांच्यावर अवलंबून असलेल्या बिहारच्या उत्तर भागात आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे सिमरीया धाम या सुप्रसिद्ध तीर्थस्थळापर्यंत पोहोचण्याची अधिक उत्तम सोय होणार आहे. हे तीर्थस्थळ प्रख्यात कवी दिवंगत रामधारी सिंह दिनकर यांचे जन्मस्थळ देखील आहे.

यावेळी, राष्ट्रीय महामार्ग क्र.31 वरील बख्तियारपूर ते मोकामा टप्प्यातील चौपदरी रस्त्याचे उद्घाटन देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. सुमारे 1,900 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या रस्त्यामुळे या भागातील वाहतूक  कोंडी कमी होईल, प्रवासाच्या वेळेची बचत होईल तसेच प्रवासी आणि माल यांच्या वाहतुकीत सुधारणा होईल. तसेच, बिहारमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्र.120 वरील विक्रमगंज-दावत-नवानगर-डूमराव या विभागातील  दुपदरी रस्त्याची पेव्ह शोल्डर्स सह सुधारणा झाल्यामुळे, ग्रामीण भागातील रस्ते वाहतूक व्यवस्था सुधारेल आणि स्थानिक जनतेसाठी नव्या आर्थिक संधी उपलब्ध होतील.

बिहारमधील वीज निर्मिती क्षेत्राला बळकट करत, सुमारे 6,880 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या बक्सर औष्णिक उर्जा प्रकल्पाचे (660x1 मेगावॉट) उद्घाटन पंतप्रधान करतील.या प्रकल्पामुळे त्या भागातील वीजनिर्मिती क्षमतेत सुधारणा होईल, उर्जा सुरक्षेत वाढ होईल तसेच त्या भागाच्या वाढत्या वीजविषयक मागणीची पूर्तता करता येईल.

आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांना मोठी चालना देत, पंतप्रधान मुझफ्फरपुर येथील होमी भाभा कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्राचे उद्घाटन करतील. या  केंद्रामध्ये अत्याधुनिक आँकॉलॉजी बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण वॉर्ड्स, शस्त्रक्रिया कक्ष, आधुनिक चाचणी प्रयोगशाळा, रक्त पेढी तसेच 24 खाटांचे आयसीयु (आपत्कालीन सेवा कक्ष) आणि एचडीयु  यांचा  समावेष आहे. या अत्याधुनिक आरोग्य केंद्रामुळे बिहार आणि शेजारील राज्यांमधील रुग्णांना उपचारासाठी प्रवास करून दूरवरच्या महानगरांमध्ये पोहोचण्याची दगदग कमी करत, त्यांच्याच परिसरात अत्याधुनिक तसेच किफायतशीर दरात कर्करोगावरील उपचार मिळणे शक्य होणार आहे.

स्वच्छ भारत संकल्पनेचा विस्तार करत आणि गंगा नदीचा अविरल आणि निर्मळ ओघ वाहणे सुनिश्चित करत, पंतप्रधान मोदी मुंगेर येथे सांडपाणी प्रक्रिया संयंत्र (एसटीपी) आणि सांडपाणी नेटवर्कचे उद्घाटन करतील. नमामि गंगे उपक्रमांतर्गत 520 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्चून उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प गंगा नदीवरील प्रदूषणाचा भार  कमी करेल आणि त्या भागातील स्वच्छतेच्या सोयींमध्ये सुधारणा घडवून आणेल.

या दौऱ्यात पंतप्रधान 1,260 कोटी रुपये खर्चाच्या शहरी पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या मालिकेची पायाभरणी करतील. औरंगाबादमधील दाउदनगर आणि जेहानाबाद येथे एसटीपी तसेच सांडपाणी नेटवर्क; लखीसराय आणि जामुई येथील बहारीया मध्ये एसटीपी आणि इंटरसेप्शन आणि डायव्हर्जन कार्ये यांचा या मालिकेत समावेश आहे. यानंतर पंतप्रधान मोदी,  अमृत 2.0 अंतर्गत औरंगाबाद, बोधगया आणि जेहानाबाद येथील पाणीपुरवठा प्रकल्पांची कोनशीला ठेवतील. या  प्रकल्पामुळे जनतेला स्वच्छ पेयजल, आधुनिक सांडपाणी यंत्रणा आणि अधिक स्वच्छता यांचा लाभ होऊन त्या भागातील जनतेची आरोग्य मानके आणि जीवनमान यांच्यात सुधारणा घडून येईल.

या भागातील रेल्वे संपर्क जोडणीचा चालना देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान दोन रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. यांपैकी पहिली गाडी ही गया आणि दिल्ली दरम्यान धावणारी अमृत भारत एक्सप्रेस असेल. या गाडीमुळे प्रवाशांना आधुनिक सुविधा, आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळेल. दुसरी गाडी ही वैशाली आणि कोडरमा दरम्यान धावणारी बौद्ध सर्किट ट्रेन असेल. या गाडीमुळे या भागातील महत्त्वाची बौद्ध स्थळे परस्परांशी जोडली जातील, त्यामुळे पर्यटन आणि धार्मिक प्रवासाला चालना मिळेल.

याचबरोबर, पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण अंतर्गत 12,000 ग्रामीण लाभार्थ्यांचा आणि पंतप्रधान आवास योजना-शहरी योजनेअंतर्गत 4,260 लाभार्थ्यांचा गृहप्रवेश सोहळाही आयोजित केला जाणार आहे. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते काही लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घराच्या चाव्या सुपूर्द केल्या जातील, या माध्यमातून हजारो कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे.

पश्चिम बंगालमधील पंतप्रधानांचे कार्यक्रम

​जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि विकसित शहरी संपर्क जोडणी उपलब्ध देण्याच्या आपल्या वचनबद्धतेच्या पूर्तीच्या अनुषंगाने  पंतप्रधान कोलकाता येथील मेट्रो रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन करतील. याअंतर्गत 13.61 किलोमीटर लांबीच्या नवीन मेट्रो रेल्वे जाळ्याचे उद्घाटन होईल, तसेच या मार्गांवरून प्रत्यक्ष मेट्रो सेवेचा प्रारंभही केला जाईल. आपल्या पश्चिम बंगाल भेटीत पंतप्रधान जेस्सोर रोड मेट्रो स्थानकाला भेट देतील आणि तिथून ते नोआपारा-जय हिंद बिमानबंदर मेट्रो सेवेला हिरवा झेंडा दाखवतील. याशिवाय, ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सियालदह - एस्प्लेनेड मेट्रो सेवा आणि बेलेघाटा-हेमंता मुखोपाध्याय मेट्रो सेवांनाही हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पंतप्रधान जेस्सोर रोड मेट्रो स्टेशन ते जय हिंद बिमानबंदरपर्यंत आणि तिथून परतीचा मेट्रो रेल्वे प्रवासही करणार आहेत.

या भेटीत पंतप्रधान एका ​सार्वजनिक कार्यक्रमात, मेट्रो विभागाचे  आणि हावडा मेट्रो स्थानकावरील नवीन भुयारी मार्गाचे उद्घाटन करतील. नोआपारा-जय हिंद बिमानबंदर मेट्रो सेवेमुळे विमानतळासोबतच्या संपर्क जोडणीत मोठ्या प्रमाणात सुधारणा घडून येणार आहे. सियालदह-एस्प्लेनेड मेट्रो मार्गामुळे या दोन ठिकाणांमधील प्रवासाचा वेळ 40 मिनिटांवरून फक्त 11 मिनिटांपर्यंत येणार आहे, तर बेलेघाटा-हेमंता मुखोपाध्याय मेट्रो विभाग माहिती तंत्रज्ञान केंद्रासोबतच्या संपर्क जोडणीचा विस्तार करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावू शकणार आहे. या  मेट्रो मार्गामुळे कोलकातामधील सर्वाधिक वर्दळीचे काही भाग परस्परांशी जोडले जाणार असून, त्यामुळे प्रवासाच्या वेळेची मोठी बचत होऊ शकेल, तसेच बहु-मार्गी संपर्क जोडणी व्यवस्थाही अधिक मजबूत होणार आहे. या सर्व सुविधांचा लाभ इथल्या लाखो प्रवाशांना होणार आहे.

या भागातील रस्ते पायाभूत सुविधांना मोठी चालना देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान 1,200 कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणाऱ्या 7.2 किलोमीटर लांबीच्या सहा-पदरी कोन द्रुतगती महामार्गाची पायाभरणीही करणार आहेत. या द्रुतगती महामार्गामुळे हावडा, आसपासचे ग्रामीण भाग आणि कोलकाता या भागांच्या परस्पर संपर्क जोडणीत मोठी सुधारणा होऊन, प्रवासाच्या अनेक तासांची बचत होईल, तसेच या भागातील व्यापार, वाणिज्य आणि पर्यटनालाही मोठी चालना मिळू शकेल.


‍निलीमा चितळे/सुषमा काणे/संजना चिटणीस/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2158434)