पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी अंतराळवीर शुभांशु शुक्ला याच्याशी साधला संवाद
आत्मनिर्भरतेसह अंतराळ संबंधी ध्येयांचा पाठपुरावा करण्यात भारताच्या यशाचा मार्ग दडलेला आहे: पंतप्रधान
भविष्यातील अंतराळ मोहिमांचे नेतृत्व करण्यासाठी भारताने 40-50 सुसज्ज अंतराळवीरांचे पथक उभारणे गरजेचे आहे: पंतप्रधान
भारतासमोर आता दोन धोरणात्मक मोहिमा आहेत- अवकाश स्थानक आणि गगनयान: पंतप्रधान
अंतराळवीर शुक्ला याचा हा प्रवास म्हणजे भारताच्या अवकाश आकांक्षांच्या संदर्भातील केवळ पहिले पाऊल आहे: पंतप्रधान
Posted On:
19 AUG 2025 2:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑगस्ट 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ नवी दिल्ली येथे अंतराळवीर शुभांशु शुक्ला याच्याशी संवाद साधला. अंतराळ प्रवासाच्या परिवर्तनकारी अनुभवाबाबत मत व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले की असा महत्त्वाचा प्रवास केल्यानंतर, कोणत्याही व्यक्तीला बदल जाणवतच असेल. आणि अंतराळवीरांना हे परिवर्तन कसे वाटते आणि ते या परिवर्तनाचा कसा अनुभव घेतात हे समजून घ्यायला मला आवडेल. पंतप्रधानांच्या मतावर प्रतिक्रिया व्यक्त करत शुभांशु शुक्ला म्हणाले की अंतराळातील वातावरण अत्यंत वेगळ्या प्रकारचे असून, गुरुत्वाकर्षण शक्तीचा अभाव हा त्यातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
त्यानंतर, अंतराळातील प्रवासादरम्यान एकाच प्रकारची आसनव्यवस्था असते का असा प्रश्न पंतप्रधानांनी विचारला असता त्यावर अनुमोदन देत शुभांशु शुक्ला म्हणाले, “होय सर, ती कायम एकाच पद्धतीची असते.” पुढील चौकशी करताना, अंतराळ वीरांना एकाच विविक्षित स्थितीत 23-24 तास घालवावे लागतात याकडे पंतप्रधान मोदी यांनी निर्देश करताच, शुभांशु शुक्ला यांनी त्यावर होकार दिला. शुक्ला पुढे म्हणाले की एकदा अंतराळात प्रवेश केल्यानंतर अंतराळवीरांना त्यांच्या आसनाचे पट्टे तसेच इतर सुरक्षा लगामासारखे बंध सोडवता येतात आणि अवकाश यानाच्या अंतर्भागात मुक्तपणे हालचाल करता येते.
अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्याशी सुरु असलेला संवाद पुढे नेत तसेच अंतराळ प्रवासाचे शारीरिक आणि मानसिक प्रभाव जाणून घेत पंतप्रधानांनी अवकाश यानातील खोलीमध्ये पुरेशी जागा असते का असा प्रश्न विचारला.यावर उत्तर देत शुभांशु शुक्ला म्हणाले की हे अवकाशयान आतून खूप प्रशस्त नव्हते तरीही आमच्यासाठी बरीच जागा उपलब्ध होती. एखाद्या लढाऊ जेट विमानाच्या कॉकपिटपेक्षा अवकाशयानातील खोली अधिक आरामदायक वाटली अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केल्यावर शुक्ला म्हणाले, “सर, तुम्ही म्हणताय त्याहीपेक्षा अधिक आरामदायक अशी जागा तिथे उपलब्ध होती.”
त्यानंतर, पंतप्रधान मोदी यांना अवकाशात होऊ शकणाऱ्या शारीरिक बदलांविषयी थोडक्यात माहिती देण्यात आली. तेथे हृदयाची गती लक्षात येण्याइतपत मंदावते आणि शरीरात जुळवणीसंदर्भात अनेक बदल होतात हे शुक्ला यांनी अधोरेखित केले. मात्र, चार ते पाच दिवसांत, शरीर नवे बदल स्वीकारते आणि अवकाशातील वातावरणात सामान्यपणे प्रतिसाद देऊ लागते. यावर अधिक स्पष्टीकरण देत शुक्ला म्हणाले की अंतराळातून पुन्हा पृथ्वीवर आल्यानंतर शरीराला अशाच प्रकारचे बदल अनुभवावे लागतात. प्रत्येकाची तंदुरुस्ती कशीही असली तरी सुरुवातीला, प्रत्येकासाठी चालणे ही क्रिया कठीण असते. स्वतःचा अनुभव सांगत शुक्ला म्हणाले की, त्यांना स्वतःला जरी ते व्यवस्थित आहेत असे वाटत होते तरीही सुरुवातीची पावले टाकताना त्यांना अडखळल्यासारखे झाले आणि इतरांचा आधार घ्यावा लागला. आपल्यापैकी प्रत्येकाला चालता येत असले तरीही आपल्या मेंदूला पुनर्निर्देशित करण्यासाठी तसेच नवे वातावरण समजून घेण्यासाठी वेळ लागतो. अवकाश प्रवासासाठी केवळ शारीरिक प्रशिक्षणच नव्हे तर मानसिक तयारीची देखील तेवढीच गरज असते यावर पंतप्रधानांनी अधिक भर दिला. त्यावर सहमती व्यक्त करत शुक्ला यांनी सांगितले की शरीर तसेच स्नायू यांच्यात ताकद असली तरीही आपल्या मेंदूला नवे वातावरण समजून घेण्यासाठी तसेच चालण्यासाठी आवश्यक प्रयत्नांचे पुनर्मूल्यांकन करुन नेहमीच्या पद्धतीने काम करण्यासाठी सगळ्या संबंधित बाबी नव्याने संकलित करण्याची गरज असते.
अवकाश मोहिमांच्या कालावधीच्या अन्वेषणाची चर्चा करताना, पंतप्रधान मोदी यांनी अंतराळात अंतराळवीरांनी व्यतीत केलेल्या सर्वाधिक कालावधीविषयी चौकशी केली. शुभांशु शुक्ला म्हणाले की सध्या काही व्यक्ती सलग आठ महिने अंतराळात वास्तव्य करून आहेत आणि विद्यमान मोहिमेने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या मोहिमेदरम्यान शुक्ला यांना भेटलेल्या अंतराळवीरांविषयी मोदी यांनी प्रश्न विचारला. त्यावर शुक्ला म्हणाले की त्यापैकी काहीजण येत्या डिसेंबर महिन्यात परत येणार आहेत.
अंतराळ स्थानकामध्ये वास्तव्य करत असताना, मूग आणि मेथी यांची लागवड करण्याच्या शुक्ला यांच्या प्रयोगामागील महत्त्व जाणून घेण्याचा प्रयत्न पंतप्रधानांनी केला. अशा काही महत्त्वाच्या घडामोडींविषयी बरेच लोक अनभिज्ञ होते यावर शुक्ला यांनी आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले की अवकाशात मर्यादित जागा आणि महागडा माल यामुळे अवकाश स्थानकांमध्ये अन्न हे एक महत्त्वाचे आव्हान ठरते. त्यामुळे कमीतकमी जागेत अधिकाधिक उष्मांक आणि पोषण साठवण्यावर तेथे अधिक लक्ष केंद्रित केले जाते असे त्यांनी सांगितले. अवकाशात विविध प्रयोग सुरु असून काही प्रकारच्या अन्न धान्याची लागवड तेथे अगदी सोप्या पद्धतीने करता येते असे स्पष्टीकरण शुक्ला यांनी दिले. एखादी लहान ताटली आणि थोडेसे पाणी यांचा वापर करून आठ दिवसांत धान्याला मोड आणता आले- आणि अवकाश स्थानकात असताना शुक्ला यांनी स्वतः वैयक्तिकरित्या हा प्रयोग करून पाहिला. भारताचे अनोखे कृषी नवोन्मेष आता मायक्रोग्रॅव्हीटी मंचांपर्यंत पोहोचू लागले आहेत यावर शुक्ला यांनी अधिक भर दिला.या प्रयोगांमध्ये केवळ अंतराळवीरांसाठीच नव्हे तर पृथ्वीवरील असुरक्षित घटकांसाठी अन्न सुरक्षेच्या संदर्भातील आव्हान सोडवण्याची असलेली क्षमता त्यांनी सर्वांच्या लक्षात आणून दिली.
आंतरराष्ट्रीय अंतराळ वीरांनी भारतीय अंतराळवीराला भेटल्यानंतर कसा प्रतिसाद दिला असा प्रश्न पंतप्रधान मोदी यांनी विचारल्यावर शुक्ला म्हणाले की, गेल्या एका वर्षात जेथे जेथे ते गेले तेथील लोक त्यांना भेटून खरोखरीच आनंदित झाले आणि त्यांना भेटण्यासाठी ते लोक उत्सुक दिसले. त्या सर्वांनी वारंवार भारताच्या अंतराळविषयक कार्यांची माहिती विचारली तसेच ते भारताच्या प्रगतीविषयी उत्तम प्रकारे अवगत होते. त्यांच्यापैकी अनेक जण गगनयान मोहिमेविषयी जाणून घेण्यास विशेष उत्सुक दिसले आणि त्यांना या मोहिमेच्या काळासंदर्भात जाणून घ्यायचे होते. शुक्ला यांच्या सोबत असलेल्या अंतराळवीरांनी स्वाक्षऱ्या केलेल्या नोट्सची मागणी केली आणि भारताच्या या अंतराळयानाच्या प्रक्षेपण प्रसंगी तसेच या यानातून प्रवास करण्यासाठी आमंत्रित केले जावे अशी इच्छा देखील त्यांनी शुक्ला यांच्याकडे व्यक्त केली.
मोदींनी पुढे विचारले, की सर्व लोक शुक्ला यांना प्रतिभावंत असे का संबोधतात ?’ या प्रश्नावर “लोक अतिशय दयाळूपणे बोलत असावेत,”असे नम्रपणे शुक्ला म्हणाले. त्यांच्या या प्रशंसेचे श्रेय, त्यांनी प्रथम भारतीय हवाई दलातील आणि नंतर अंतराळ वैमानिक म्हणून त्यांना दिल्या गेलेल्या कठोर प्रशिक्षणाला दिले -सुरुवातीला त्यांना वाटले,की तेथे शैक्षणिक अभ्यास कमीत कमी असेल परंतु या मार्गासाठी व्यापक प्रशिक्षणाची आवश्यकता आहे,असे शुक्ला यांच्या लक्षात आले. अंतराळ वैमानिक बनणे म्हणजे अभियांत्रिकी शाखेत प्रभुत्व मिळवण्यासारखे आहे,असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी भारतीय शास्त्रज्ञांकडून काही वर्षे प्रशिक्षण घेतले आणि त्यानंतरच मोहिमेसाठी ते पूर्णपणे तयार असल्याचे त्यांना जाणवले.
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी संभाषणादरम्यान अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांना यापूर्वी दिलेल्या "गृहपाठाविषयी” विचारपूस केली. शुक्ला यांनी सांगितले, की त्यांची प्रगती लक्षणीयच होती. त्यामुळे त्यांना देण्यात आलेले काम खरोखरच खूप महत्वाचे होते. त्यांचा प्रवास हा स्वतःविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी होता.
मोहीम यशस्वी झाली आणि टीम सुरक्षित परतली, हा शेवट नव्हे - ही फक्त सुरुवात आहे, यावर त्यांनी भर दिला. हे पहिले पाऊल आहे, यांचा पंतप्रधानांनी देखील पुनरुच्चार केला.शुक्ला यांनीही या भावनेला दुजोरा दिला आणि ते म्हणाले, “होय सर, हे पहिले पाऊल आहे.” शक्य तितके शिकणे आणि ती अंतर्दृष्टी मिळवणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे यावर त्यांनी भर दिला.
भारतात अंतराळवीरांचा मोठा समूह तयार करण्याची गरज पंतप्रधानांनी अधोरेखित केली आणि अशा मोहिमांसाठी 40–50 व्यक्ती तयार असाव्यात असे त्यांनी सुचवले.आतापर्यंत खूप कमी मुलांनी अंतराळवीर होण्याचा विचार केला असेल, परंतु शुक्ला यांच्या प्रवासामुळे कदाचित अधिक विश्वास आणि रस यात निर्माण होईल, असे त्यांनी नमूद केले.
शुक्ला यांना त्यांच्या बालपणाची आठवण झाली आणि ते म्हणाले, की 1984 मध्ये जेव्हा राकेश शर्मा अंतराळात गेले तेव्हा तो राष्ट्रीय कार्यक्रम झाला नसल्यामुळे अंतराळवीर होण्याचा विचार त्यांच्या मनात आलाच नाही. तथापि, त्यांच्या अलीकडील मोहिमेदरम्यान, त्यांनी जेव्हा तीन वेळा मुलांशी संवाद साधला - एकदा प्रत्यक्षातील कार्यक्रमाद्वारे आणि दोनदा रेडिओवरील कार्यक्रमाद्वारे, त्यावेळी या प्रत्येक कार्यक्रमात, किमान एका मुलाने तरी त्यांना विचारले, "सर, मी अंतराळवीर कसा बनू शकतो?".
अंतराळवीर शुक्ला म्हणाले की, ही कामगिरी म्हणजे देशाचे एक मोठे यश आहे, आजच्या भारताला फक्त स्वप्न पाहण्याची गरज नाही - त्यांना माहिती आहे की अंतराळ उड्डाण शक्य आहे,पर्याय उपलब्ध आहेत आणि अंतराळवीर बनणे शक्य आहे. "अंतराळात भारताचे प्रतिनिधित्व करणे ही एक उत्तम संधी होती आणि आता अधिकाधिक लोकांना हा टप्पा गाठण्यास मदत करणे ही माझ्यावरची जबाबदारी आहे", असे शुक्ला पुढे म्हणाले.
भारतासमोर आता दोन प्रमुख मोहिमा आहेत - अंतराळ स्थानक आणि गगनयान आणि या आगामी प्रयत्नांमध्ये शुक्ला यांचा अनुभव खूप मोलाचा ठरेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाअंतर्गत सरकारच्या वचनबद्धतेतील सातत्यपूर्ण कामगिरी पाहता, देशासाठी ही एक मोठी संधी आहे असे सांगत शुक्ला यांनी यास होकारार्थी प्रतिसाद दिला.
चांद्रयान-2 यशस्वी न होणे यासारख्या अडचणी असूनही, सरकारने सातत्याने निधी उपलब्ध करून अंतराळ कार्यक्रमाला पाठिंबा देणे सुरूच ठेवले, ज्यामुळे चांद्रयान-3 यशस्वी झाले,असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
अपयशानंतरही,असे समर्थन दिले जाण्याच्या धोरणाचे जागतिक स्तरावर निरीक्षण केले जात आहे आणि ते अंतराळ क्षेत्रात भारताची क्षमता आणि स्थान प्रतिबिंबित करते यावर त्यांनी भर दिला.
भारत नेतृत्वाची भूमिका घेऊ शकतो आणि इतर राष्ट्रांच्या सहभागासह भारताच्या नेतृत्वातील अंतराळ स्थानक हे एक शक्तिशाली साधन ठरेल असे शुक्ला म्हणाले.
स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी अंतराळ निर्मितीमध्ये आत्मनिर्भरतेबाबत केलेल्या भाषणाचा संदर्भ, शुक्ला यांनी दिला आणि सांगितले, की गगनयान, अंतराळ स्थानक आणि चंद्रावर उतरण्याचे स्वप्न - हे एक विशाल आणि महत्त्वाकांक्षी स्वप्न असून हे सर्व घटक एकमेकांशी जोडलेले आहेत -.
जर भारताने स्वावलंबी होऊन ही उद्दिष्टे साध्य केली तर ते यशस्वी होईल, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.
जयदेवी पुजारी स्वामी/सोनल तुपे/संजना चिटणीस/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2157874)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Nepali
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam