कृषी मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथे भारतरत्न डॉ. एम.एस. स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेचे केले उद्घाटन
"भविष्यातील पिढ्यांचा विचार करूनच नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय अभियानाचा प्रारंभ" - शिवराज सिंह चौहान
Posted On:
07 AUG 2025 10:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील पुसा येथे भारतरत्न डॉ. एम.एस. स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ही परिषद 7 ते 9 ऑगस्ट 2025 दरम्यान नवी दिल्लीतील पुसा कॅम्पसमध्ये, कृषी विज्ञानातील एक द्रष्टे शास्त्रज्ञ आणि अन्न सुरक्षा चळवळीचे प्रणेते प्राध्यापक डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित करण्यात आली आहे. 'सदाहरित क्रांती - जैविक समृद्धीकडे वाटचाल' ही या परिषदेची मुख्य संकल्पना आहे.

डॉ. स्वामीनाथन हे समाजसेवेसाठी आयुष्य वेचणारे महान व्यक्तिमत्व होते असे शिवराज सिंह यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितले. डॉ. स्वामीनाथन यांनी सांगितलेल्या मार्गाचे अनुसरण करून, “आम्ही भारताला किंवा जगाला उपासमार किंवा वंचिततेचा सामना करावा लागणार नाही याची खात्री करू”, असेही ते म्हणाले.
डॉ. स्वामीनाथन हे हरित क्रांतीचे जनक होते आणि त्यांनी उभारलेल्या कृषी संशोधन प्रणाली आजही प्रभावीपणे कार्यरत आहेत, असे चौहान यांनी नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे शेती विकास आणि शेतकऱ्यांचे कल्याण हेच प्रमुख ध्येय असून पंतप्रधानांचा प्रत्येक शब्द हा मार्गदर्शक मंत्रासारखा आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘विकसित कृषी संकल्प अभियान’ अंतर्गत एकूण 2170 शास्त्रज्ञांच्या पथकांची स्थापना करण्यात आली असून या पथकांनी 64,000 हून अधिक गावांना भेटी दिल्या आणि 1 कोटीहून अधिक शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला, अशी माहिती चौहान यांनी दिली.

अन्नधान्य उत्पादनाबाबत बोलताना चौहान यांनी अधोरेखित केले की भारताच्या अन्नधान्याच्या साठ्यात लक्षणीय सुधारणा झाली आहे. “देशात भरपूर तांदूळ आहे, गव्हाच्या बाबतीत देश आत्मनिर्भर आहे आणि मजबूत अन्नधान्य साठवणूक प्रणाली तयार करत आहे”, असेही ते म्हणाले. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सध्या 80 कोटी लोकांना मोफत धान्य पुरवले जात आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
डाळी आणि तेलबियांची प्रति हेक्टर उत्पादकता वाढविण्यावरही चव्हाण यांनी भर दिला. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली सोयाबीन, शेंगदाणे, मोहरी, तीळ, हरभरा, मसूर, उडीद आणि तुरीचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.
आपल्या भाषणाचा समारोप करताना चौहान म्हणाले की, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली 'नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय अभियान' सुरू करण्यात आले आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी जमिनीला अन्नधान्य, फळे आणि भाज्या उत्पादित करण्यासाठी सक्षम ठेवण्याच्या उद्देशाने हे अभियान राबवले जात आहे आणि हे साध्य करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून गांभीर्याने प्रयत्न केले जात आहेत.
* * *
निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2153956)