माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ईशान्य भारताचे सक्षमीकरण: राष्ट्रीय भारतीय चित्रपट (NFDC) महामंडळाच्या वतीने युवावर्गासाठी मोफत निवासी व्हीएफएक्स (VFX) व ॲनिमेशन प्रशिक्षण


3D ॲनिमेशन व व्हीएफएक्स (VFX) अंतर्गत 8 महिन्यांचे मोफत निवासी प्रशिक्षण, 100 उमेदवारांची निवड केली जाणार

Posted On: 02 AUG 2025 11:05AM by PIB Mumbai

 

केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय भारतीय चित्रपट विकास महामंडळाने (NFDC), विशेष करुन ईशान्य भारतातील होतकरू व्यावसायिक तंज्ञांसाठी 3D ॲनिमेशन व व्हिज्युअल इफेक्ट्स (VFX) या विषयातील निवासी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे.

हा कार्यक्रम ईशान्य भारतातील सर्व आठ राज्यांमधील (अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम व त्रिपुरा) व्यक्तींसाठी खुला आहे.

हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर, सर्व सहभागींना राष्ट्रीय भारतीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC) व राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण तसेच प्रशिक्षण परिषदेकडून(NCVET) संयुक्त प्रमाणपत्र दिले जाईल.

याचा लाभ घेण्यासाठी 1 जून 2025 पर्यंत अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणासाठी किमान पात्रतेअंतर्गत 10+2 उत्तीर्ण किंवा 10वी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता असेल, तर संबंधित व्यवसाय - उद्योगातील किमान तीन वर्षांचा अनुभव गरजेचा असणार आहे. अर्ज प्रक्रियेसाठी 1,180 रुपये (करांसह) इतके नाममात्र, परत न मिळणारे नोंदणी शुल्क लागू असेल.

इच्छुक उमेदवार राष्ट्रीय भारतीय चित्रपट विकास महामंडळाच्या www.nfdcindia.com, या अधिकृत संकेतस्थळावर किंवा https://skill.nfdcindia.com/Specialproject. या थेट, यासाठी समर्पित नोंदणी पोर्टलवर जाऊन नोंदणी करू शकतात. नोंदणीसाठी अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2025 आहे. अर्ज प्रक्रियेसंदर्भात कोणत्याही प्रश्नांसाठी उमेदवार skillindia@nfdcindia.com या ईमेलवर संपर्क साधू शकतात.

या 8 महिन्यांच्या निवासी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी, स्क्रीनिंग व मूल्यांकन प्रक्रियेद्वारे एकूण 100 उमेदवारांची निवड केली जाईल. हे प्रशिक्षण राष्ट्रीय भारतीय चित्रपट विकास महामंडळाचे प्रशिक्षण भागीदार अ‍ॅपटेक लि. (Aptech Ltd.) यांच्या सहकार्याने दिले जाणार आहे.

हा कार्यक्रम उत्तर प्रदेशातील गाझियाबाद मधील पूर्ण सुसज्ज प्रशिक्षण केंद्रात आयोजित केला जाईल व दोन भागात राबवला जाईल. याअंतर्गत पहिल्या भागात सहा महिन्यांचे 3D ॲनिमेशन व व्हीएफएक्स (VFX) मधील सखोल वर्गशिक्षण, त्यानंतर दोन महिन्यांच्या प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून थेट यासंबंधीच्या व्यवसाय - उद्योगाचा अनुभव असा दुसरा भाग असेल. या प्रशिक्षणाअंतर्गत - प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून शिकण्यासंबंधीची प्रारुपे, व्यवसाय उद्योगाशी संबंधित प्रकल्प व फिल्म स्टुडिओ तसेच आशय निर्मिती कंपन्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्यक्ष कामकाजाचा समावेश असेल.

निवडलेल्या प्रत्येक सहभागीला संपूर्ण कार्यक्रमादरम्यान शिक्षणासाठी एक उच्च-कार्यक्षमतेचा लॅपटॉप दिला जाईल.

महत्त्वाचे म्हणजे, निवास व भोजन यासह संपूर्ण प्रशिक्षण पूर्णपणे मोफत दिले जाणार आहे. निवडलेल्या उमेदवारांना निवासाची विनामूल्य सोय, दिवसातून तीन वेळा जेवण व कोणत्याही आर्थिक भाराशिवाय प्रशिक्षण संसाधने तसेच मार्गदर्शकांचे सहकार्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. आर्थिक व भौगोलिकदृष्ट्या मागासलेल्या भागातील होतकरू तरुणांना भारताच्या वाढत्या डिजिटल अर्थव्यवस्थेत समान संधी मिळवून द्यावी, हा या उपक्रमाचा उद्देश  आहे.

ईशान्य भारतातील राज्यांमध्ये असलेली प्रचंड पण अप्रयुक्त सर्जनशील क्षमता लक्षात घेऊन, राष्ट्रीय भारतीय चित्रपट विकास महामंडळाने व्यावसायिक प्रशिक्षण व कौशल्य विकासाच्या पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेशी संबंधित प्रादेशिक विषमता दूर करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. ईशान्य भारतातील युवा वर्गासाठी राष्ट्रीय भारतीय चित्रपट महामंडळाचा हा तिसरा निवासी कार्यक्रम असणार आहे. या प्रदेशातून प्रतिभावान डिजिटल कलाकार व ॲनिमेशन व्यावसायिकांची जडणघडण करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यासोबतच या प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्यांना मोठी मागणी असलेल्या तांत्रिक कौशल्यांनी सुसज्ज करण्याच्या बरोबरीनेच, रोजगार, उद्योजकता तसेच दीर्घकालीन आर्थिक सक्षमीकरणासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा देखील या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

केंद्र सरकारचे एक महत्वाचे आस्थापन असलेले राष्ट्रीय भारतीय चित्रपट विकास महामंडळ म्हणजे देशातील चित्रपट व सर्जनशील परिसंस्थेतील एक प्रमुख संस्था आहे. अर्थपूर्ण भारतीय चित्रपटांची निर्मिती व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ओळखली जाणारी ही संस्था कौशल्य विकासाच्या उपक्रमांची विश्वसनीय अंमलबजावणी करणारी संस्था म्हणूनही उदयाला आली आहे. प्रशिक्षण, मूल्यांकन, प्रमाणीकरण व प्रत्यक्ष रोजगारावर रुजु करण्यातल्या सहाय्यासह अनेक बाबतीत या संस्थेच्या वतीने पाठबळ दिले जाते. ॲनिमेशन, चित्रपट दिग्दर्शन, व्हीएफएक्स, गेमिंग, डिजिटल आशय निर्मिती व जाहिरात अशा विविध क्षेत्रांतील माध्यम तसेच मनोरंजन उद्योग क्षेत्राच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी विशेषतः आखलेले कार्यक्रम सर्वदूर पोहचवण्यात या संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

***

शिल्पा पोफळे/तुषार पवार/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2151704)