पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान 2 ऑगस्ट रोजी वाराणसीला भेट देणार


पंतप्रधान वाराणसीमध्ये सुमारे 2200 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची करणार पायाभरणी आणि उद्घाटन

या प्रकल्पांमध्ये पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्यसेवा, पर्यटन, शहरी विकास, सांस्कृतिक वारसा यासह विविध क्षेत्रांचा समावेश

स्मार्ट वितरण प्रकल्प तसेच जमिनीखालील विद्युत पायाभूत सुविधा अंतर्गत विविध कामांची पंतप्रधान करणार पायाभरणी

सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या जलसाठ्यांचे जतन करण्याच्या उद्देशाने, पंतप्रधान विविध कुंडांच्या ठिकाणी जलशुद्धीकरण आणि देखभालीच्या कामांची करणार पायाभरणी

पंतप्रधानांच्या हस्ते पीएम-किसान योजनेचा 20 वा हप्ता जारी करण्यात येणार असून 9.7 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 20,500 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी हस्तांतरित केला जाणार

पीएम-किसान योजनेअंतर्गत सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण वितरण 3.90 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडणार

Posted On: 31 JUL 2025 8:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 जुलै 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 ऑगस्ट रोजी सकाळी 11 च्या सुमारास उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे सुमारे 2200 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील.

हे प्रकल्प वाराणसीमध्ये  समग्र शहरी परिवर्तन, सांस्कृतिक पुनरुज्जीवन, सुधारित संपर्क व्यवस्था आणि जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्यसेवा, पर्यटन, शहरी विकास आणि सांस्कृतिक वारसा यासह अनेक क्षेत्रांशी निगडित आहेत.

वाराणसीमध्ये रस्ते संपर्क व्यवस्था सुधारण्याप्रति आपल्या वचनबद्धतेला अनुसरून , पंतप्रधान अनेक प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. ते वाराणसी-भदोही तसेच  छितौनी-शूल टंकेश्वर रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण आणि मोहन सराय-अदलपुरा रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हरदत्तपूर येथील रेल्वे ओव्हरब्रिजचे उद्घाटन करतील. ते दालमंडी, लहरतारा-कोटवा, गंगापूर, बाबतपूर यांसह  ग्रामीण आणि शहरी कॉरिडॉरमध्ये व्यापक रस्ते  रुंदीकरण आणि मजबुतीकरण तसेच  लेव्हल क्रॉसिंग 22C आणि खालिसपूर यार्ड येथील रेल्वे ओव्हरब्रिजचे भूमिपूजन करतील.

या प्रदेशातील विजेसंबंधी पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी, पंतप्रधान स्मार्ट वितरण प्रकल्प तसेच जमिनीखालील विद्युत पायाभूत सुविधा अंतर्गत  880 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध कामांची पायाभरणी करतील.

पर्यटनाला मोठी चालना देण्यासाठी, पंतप्रधान नदीकाठच्या 8 कच्च्या  घाटांचा पुनर्विकास, कालिका धाम येथील विकास कामे, शिवपूर येथील रंगीलदास कुटिया येथील तलाव आणि घाटाचे सुशोभीकरण आणि दुर्गाकुंडचा जीर्णोद्धार आणि जलशुद्धीकरणाचे उद्घाटन करतील. ते कर्दमेश्वर महादेव मंदिरातील जीर्णोद्धार कामाची पायाभरणी करतील; तसेच अनेक स्वातंत्र्यसैनिकांचे जन्मस्थान असलेल्या कारखियांवचा विकास; सारनाथ, ऋषी मांडवी आणि रामनगर क्षेत्रात  शहर सुविधा केंद्रे; लमही येथील मुन्शी प्रेमचंद यांच्या वडिलोपार्जित घराचा पुनर्विकास आणि  संग्रहालय म्हणून त्याचे  उन्नतीकरण यासह विविध कामांची पायाभरणी करतील. ते कांचनपूर येथे शहरी मियावाकी वनाच्या विकासासाठी आणि शहीद उद्यान तसेच इतर 21 उद्यानांच्या पुनर्विकास आणि सुशोभीकरणासाठी पायाभरणी करतील.

याशिवाय, सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या जलस्रोतांचे जतन करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान रामकुंड, मंदाकिनी, शंकुलधारा आणि इतर अशा विविध कुंडांवर जलशुद्धीकरण आणि देखभाल कामांची पायाभरणी करतील, तसेच चार तरंगते पूजामंच बसवण्याच्या कामाचा शुभारंभही त्यांच्या हस्ते होईल. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी पंतप्रधान जलजीवन मिशन अंतर्गत 47 ग्रामीण पेयजल योजनांचे उद्घाटन देखील करतील.

सर्वांसाठी दर्जेदार शिक्षणाचे आपले स्वप्न पुढे नेत पंतप्रधान महानगरपालिका हद्दीतील 53 शाळा इमारतींच्या उन्नतीकरणाचे उद्घाटन करतील. ते अनेक शैक्षणिक प्रकल्पांची पायाभरणी देखील करतील, ज्यात नवीन जिल्हा ग्रंथालयाचे बांधकाम आणि लालपूरच्या जाखिनी येथील सरकारी उच्च माध्यमिक शाळांचे पुनरुज्जीवन यांचा समावेश आहे.

आरोग्य पायाभूत सुविधांना मोठी चालना देण्याच्या दृष्टीने पंतप्रधान महामना पंडित मदन मोहन मालवीय कर्करोग केंद्र आणि होमी भाभा कर्करोग रुग्णालयात रोबोटिक शस्त्रक्रिया आणि सीटी स्कॅन सुविधांसह प्रगत वैद्यकीय उपकरणे बसवण्याचे उद्घाटन करतील. ते होमिओपॅथिक महाविद्यालय आणि रुग्णालयाची पायाभरणी देखील करतील. शिवाय, प्राणी जन्म नियंत्रण केंद्र आणि त्याच्याशी संलग्न श्वान  काळजी केंद्राचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे.

वाराणसीमध्ये जागतिक दर्जाच्या क्रीडा पायाभूत सुविधांच्या आपल्या दृष्टिकोनाला पुढे नेत, पंतप्रधान डॉ. भीमराव आंबेडकर क्रीडा स्टेडियममध्ये सिंथेटिक हॉकी टर्फचे उद्घाटन करतील. कायदा अंमलबजावणी कर्मचाऱ्यांच्या सुविधांमध्ये वाढ व्हावी, यादृष्टीने पंतप्रधान रामनगर येथील प्रादेशिक सशस्त्र कॉन्स्टेब्युलरी (पीएसी) येथे 300 क्षमतेच्या बहुउद्देशीय सभागृहाचे  उद्घाटन करतील आणि जलद प्रतिसाद चमूसाठी (क्यूआरटी) बरॅक्सची पायाभरणी करतील.

शेतकरी कल्याणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून पंतप्रधान पीएम-किसान योजनेचा 20 वा हप्ता जारी करतील. देशभरातील 9.7 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 20,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम थेट हस्तांतरित केली जाईल. या निधीसह, योजनेच्या प्रारंभापासून  आतापर्यंत एकूण वितरण 3.90 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडणार आहे. 

काशी संसद प्रतियोगिता अंतर्गत रेखाटन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, छायाचित्रण स्पर्धा, खेल-कूद प्रतियोगिता, ज्ञान प्रतियोगिता आणि रोजगार मेळा यासह विविध कार्यक्रम आणि स्पर्धांसाठीच्या नोंदणी पोर्टलचे पंतप्रधान उद्घाटन करतील.पंतप्रधान विविध दिव्यांगजन आणि वयस्क लाभार्थ्यांना 7,400 हून अधिक सहाय्यक साहित्याचे वाटप देखील करतील.


सोनाली काकडे/सुषमा काणे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2151083)