पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली

Posted On: 25 JUL 2025 8:48PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माले येथील राष्ट्राध्यक्ष कार्यालयात मालदीव प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइज्जू यांची भेट घेतली. या बैठकीपूर्वी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांनी पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले आणि रिपब्लिक स्क्वेअर येथे त्यांचे औपचारिक स्वागत केले. ही भेट स्नेहमय होती, आणि दोन्ही देशांमधील खोलवर रुजलेल्या मैत्रीचा दाखला देणारी  होती.

पंतप्रधानांनी आपले  आणि शिष्टमंडळाचे आदरातिथ्य केल्याबद्दल  मनापासून प्रशंसा केली, आणि मालदीवच्या स्वातंत्र्याच्या 60 व्या वर्षाच्या ऐतिहासिक प्रसंगी, तसेच दोन्ही देशांमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले, त्याला 60 वर्षे पूर्ण झाल्या निमित्त विशेष प्रसंगी शुभेच्छा दिल्या.

दोन्ही नेत्यांनी शतकानुशतकांपासून  निर्माण झालेल्या मैत्री आणि विश्वासाच्या खोलवर रुजलेल्या बंधांवर चिंतन केले, जे परस्परांच्या नागरिकांमधील मजबूत संबंधांमुळे अधिक दृढ झाले आहेत. ऑक्टोबर 2024 मध्ये मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीदरम्यान स्वीकारण्यात आलेल्या 'व्यापक आर्थिक आणि सागरी सुरक्षा भागीदारी'प्रति भारत-मालदीव संयुक्त दृष्टीकोनाच्या अंमलबजावणीमधील प्रगतीचा देखील दोन्ही नेत्यांनी आढावा घेतला. "शेजारी प्रथम" आणि ‘व्हिजन महासागर (MAHASAGAR) धोरणाला अनुसरून, मालदीव बरोबरचे संबंध अधिक दृढ करण्याप्रति भारताच्या वचनबद्धतेचा पंतप्रधान मोदी यांनी पुनरुच्चार केला. राष्ट्राध्यक्ष  मुइझ्जू यांनी, कोणत्याही संकट काळी, मालदीवला प्रथम प्रतिसाद देणाऱ्या भारताच्या वचनबद्धतेची प्रशंसा केली. दोन्ही नेत्यांनी विकास भागीदारी, पायाभूत सुविधा सहाय्य, क्षमता विकास, हवामान कृती आणि आरोग्य क्षेत्रातील सहकार्यावर चर्चा केली. संरक्षण आणि सागरी सुरक्षा सहकार्य अधिक बळकट करण्याचे आवाहनही त्यांनी केले आणि या संदर्भात कोलंबो सुरक्षा परिषदेअंतर्गत दोन्ही देशांमधील सहकार्याची नोंद घेतली.

उभय नेत्यांनी दोन्ही देशांमधील आर्थिक भागीदारीचाही आढावा घेतला. प्रस्तावित मुक्त व्यापार करार आणि द्विपक्षीय गुंतवणूक करार दोन्ही बाजूंसाठी नवीन संधींचा मार्ग मोकळा करतील, यावर पंतप्रधानांनी भर दिला. दोन्ही देशांनी, विशेषतः पर्यटनाला चालना देण्यासाठी डिजिटल अर्थव्यवस्थेचा लाभ घ्यायला हवा, असे नमूद करून त्यांनी यूपीआय स्वीकारणे, रुपे कार्ड स्वीकारणे आणि स्थानिक चलनातील व्यापाराबाबत परस्परांमध्ये नुकत्याच झालेल्या सामंजस्याचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केले की दोन्ही देशांमधील घनिष्ठ विकास भागीदारी, परस्परांच्या जनतेमध्ये आधीच मजबूत असलेल्या संबंधांमध्ये मोलाची भर घालत आहे.

दोन्ही नेत्यांनी नमूद केले की, ग्लोबल साऊथ मधील भागीदार म्हणून, ते पृथ्वी ग्रह आणि तिथल्या लोकांच्या हितासाठी हवामान बदल, अक्षय ऊर्जेला प्रोत्साहन, आपत्ती जोखीम कमी करणे आणि हवामान विज्ञान यासारख्या मुद्द्यांवर काम करत राहतील.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केल्याबद्दल आणि दहशतवादाविरोधातील लढाईत भारताप्रति एकात्मतेची भावना प्रदर्शित केल्याबद्दल पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष मुइझ्झू यांचे आभार मानले.

दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत मच्छीमारी आणि  एक्वाकल्चर , हवामानशास्त्र, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, यूपीआय, इंडियन फार्माकोपिया आणि सवलतीच्या कर्जमर्यादेसंबधी क्षेत्रासह  एकूण 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. नवीन कर्ज मर्यादे अंतर्गत भारताने मालदीवमधील पायाभूत सुविधा विकास आणि इतर उपक्रमांसाठी 4850 कोटी रुपये [सुमारे 550 दशलक्ष  अमेरिकन डॉलर] देऊ  केले आहेत. विद्यमान कर्ज मर्यादांमध्ये सुधारणा करणाऱ्या करारावरही स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामुळे मालदीवची वार्षिक कर्ज परतफेड 40% ने कमी होईल. [ 5.1 कोटी अमेरिकन डॉलर्स वरून 2.9 कोटी अमेरिकन डॉलर्स]. दोन्ही देशांनी प्रस्तावित मुक्त व्यापार कराराच्या संदर्भ अटींची देवाणघेवाण केली.

दोन्ही नेत्यांनी अड्डू शहरातील रस्ते आणि सांडपाणी प्रणाली  प्रकल्प आणि इतर शहरातील 6 उच्च प्रभावी सामुदायिक विकास प्रकल्पांचे दूरदृश्य प्रणालीमार्फत उद्घाटन केले. पंतप्रधानांनी मालदीवसाठी 3,300 सामाजिक गृहनिर्माण युनिट्स आणि मालदीव राष्ट्रीय संरक्षण दल आणि इमिग्रेशन अधिकाऱ्यांसाठी 72 वाहने सुपूर्द केली.

पंतप्रधानांनी आरोग्य मैत्री हेल्थ क्यूब [BHISHM] संचाचे दोन युनिट्स मालदीव सरकारला सुपूर्द केले. अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज हे क्यूब 200 जखमींना तत्काळ वैद्यकीय मदत पुरवू शकते तसेच 6 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या पथकाला 72 तासांपर्यंत काम करण्यासाठी अंगभूत आधार देऊ शकते.

निसर्ग संवर्धनाप्रती असलेल्या दृढ बांधिलकीचे प्रतीक म्हणून दोन्ही नेत्यांनी भारताच्या "एक पेड माँ के नाम" आणि मालदीवच्या "50 लाख वृक्षारोपणाची प्रतिज्ञा" मोहिमेचा भाग म्हणून आंब्याची रोपे लावली.

पंतप्रधानांनी मालदीव आणि तेथील लोकांना त्यांच्या गरजा आणि प्राधान्यांनुसार मदत करण्याच्या  तसेच हिंद महासागर क्षेत्रात शांतता, प्रगती आणि समृद्धीसाठी सहयोग देण्याच्या  भारताच्या  वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

***

निलिमा चितळे/राजश्री आगाशे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2148718)