पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानांची घेतली भेट

Posted On: 24 JUL 2025 10:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 जुलै 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 आणि 24 जुलै 2025 या कालावधीत युनायटेड किंग्डमच्या आपल्या अधिकृत भेटीदरम्यान, आज युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान सर कीर  स्टार्मर यांची भेट घेतली.  बकिंगहॅमशायरमधील चेकर्स येथील युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी आगमन झाल्यावर पंतप्रधान स्टार्मर यांनी मोदी यांचे हार्दिक स्वागत केले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली  तसेच शिष्टमंडळ स्तरावरील चर्चाही  झाली.

दोन्ही पंतप्रधानांनी ऐतिहासिक भारत-युनायटेड किंग्डम व्यापक  आर्थिक आणि व्यापार करारावर (सीईटीए) स्वाक्षरी झाल्याचे स्वागत केले. या करारामुळे व्यापक धोरणात्मक भागीदारी एका नवीन स्तरावर पोहोचणार असून दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक, आर्थिक सहकार्य आणि रोजगार निर्मितीमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. 

दोन्ही देशांनी दुहेरी योगदान करारावर चर्चा  करण्यासही सहमती दर्शविली असून हा करार सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारा (सीईटीए) सोबत लागू होणार आहे. यामुळे दोन्ही देशातील व्यावसायिक आणि सेवा क्षेत्रातील उद्योगांना स्पर्धात्मकता वाढवता येईल आणि वाणिज्यिक  संस्थांसाठी व्यवसाय करण्याचा खर्च कमी करून दोन्ही देशांमधील व्यावसायिक आणि सेवा उद्योगांना सुविधा देईल.भांडवल बाजार आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील वाढत्या सहकार्याची नोंद घेत, पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले की दोन्ही देश गुजरातमधील GIFT सिटी या भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र आणि ब्रिटनच्या गतिमान आर्थिक परिसंस्थेमध्ये अधिक संवाद वाढविण्यासाठी काम करू शकतात.

दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या संपूर्ण व्याप्तीचा आढावा घेतला आणि भारत-यूके 2035 दृष्टिकोनाचा स्वीकार केला. दृष्टिकोन 2035 दस्तऐवज पुढील 10 वर्षात अर्थव्यवस्था आणि विकास, तंत्रज्ञान, नवोन्मेष, संशोधन, शिक्षण, संरक्षण आणि सुरक्षा, हवामान बदल, आरोग्य आणि लोकांमधील परस्पर संबंध या प्रमुख क्षेत्रांमध्ये व्यापक धोरणात्मक भागीदारीमध्ये अधिक महत्त्वाकांक्षा आणि नवीन चैतन्य निर्माण करेल.

दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशांमधील तसेच जागतिक बाजारपेठेतील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी संरक्षण उत्पादनांच्या संयुक्त-डिझाइन, सह-विकास आणि सह-उत्पादनात सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी संरक्षण औद्योगिक मार्गदर्शक आराखड्याला अंतिम रूप देण्याचे स्वागत केले. दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांच्या नियमित संवादाचे स्वागत करत पंतप्रधानांनी संरक्षण आणि सुरक्षा भागीदारीच्या वाढत्या प्रमाणाबाबत समाधान व्यक्त केले.

दोन्ही नेत्यांनी नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानातील वाढत्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले तसेच तंत्रज्ञान आणि सुरक्षा उपक्रमा च्या जलद अंमलबजावणीचे आवाहन केले. या उपक्रमात दूरसंचार, महत्वाची खनिजे, कृत्रिम बुद्धिमत्ता, जैवतंत्रज्ञान आणि आरोग्य तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर, प्रगत साहित्य आणि क्वांटम तंत्रज्ञान यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तंत्रज्ञान आणि सुरक्षा उपक्रमाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे.  

दोन्ही पंतप्रधानांनी शिक्षण क्षेत्रातील भारत आणि युकेमधील वाढत्या भागीदारीचे स्वागत केले, नवीन शिक्षण धोरण (एनईपी) अंतर्गत युकेची सहा विद्यापीठे भारतात विद्यासंकुले उघडण्यासाठी काम करत आहेत. 16 जून 2025 रोजी गुरुग्राममध्ये आपले संकुल उघडणारे साउथहॅम्प्टन विद्यापीठ हे एनईपी अंतर्गत भारतात आपले विद्यासंकुल उघडणारे पहिले परदेशी विद्यापीठ ठरले आहे.

दोन्ही बाजूंनी शिक्षण, कला, साहित्य, वैद्यक, विज्ञान, क्रीडा, व्यवसाय आणि राजकारण या क्षेत्रांत युकेमधील भारतीय समुदायाच्या मौल्यवान योगदानाची प्रशंसा केली. हा सजीव  सेतू  भारत-युके संबंधांमधील वाढ आणि विकासाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे, यावर त्यांनी सहमती दर्शविली.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनतेला दिलेल्या भक्कम पाठिंब्याबद्दल आणि एकजुटीबद्दल पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान स्टार्मर यांचे आभार मानले. दोन्ही नेत्यांनी दहशतवादाविरुद्धच्या जागतिक लढ्याला  बळकटी देण्याची वचनबद्धता व्यक्त केली. दोन्ही समाजांसाठी कट्टरतावादाचा असलेला धोका लक्षात घेऊन, या धोक्याचा सामना करण्यासाठी द्विपक्षीय सहकार्य आणखी वाढविण्यावर त्यांनी सहमती दर्शविली. आर्थिक गुन्हेगार तसेच फरार गुन्हेगारांना न्यायप्रक्रियेत आणण्यासाठी पंतप्रधान मोदींनी युकेचे सहकार्य मागितले.

दोन्ही नेत्यांनी परस्परहिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण केली, ज्यामध्ये हिंद-प्रशांत, पश्चिम आशिया आणि रशिया-युक्रेन संघर्ष या घडामोडींचा समावेश आहे.

पंतप्रधानांनी पंतप्रधान स्टार्मर यांचे त्यांच्या स्नेहपूर्ण आदरातिथ्याबद्दल आभार मानले आणि त्यांना लवकरात लवकर भारत भेटीवर येण्याचे आमंत्रण दिले.

भेटीदरम्यान दोन्ही बाजूंनी खालील कागदपत्रांवर स्वाक्षरी/स्वीकार करण्यात आला:

  • व्यापक आर्थिक आणि व्यापार करार [CETA]
  • भारत-युके व्हिजन 2035 [लिंक]
  • संरक्षण औद्योगिक पथदर्शक आराखडा
  • तंत्रज्ञान आणि सुरक्षा उपक्रम निवेदन [लिंक]
  • केंद्रीय अन्वेषण ब्युरो,भारत आणि युकेची राष्ट्रीय गुन्हे विषयक एजन्सी यांच्यातील सामंजस्य करार

निलीमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2148120)