पंतप्रधान कार्यालय
संसदेचे पावसाळी अधिवेशन 2025 सुरू होण्यापूर्वी पंतप्रधानांचे संबोधन
Posted On:
21 JUL 2025 11:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जुलै 2025
नमस्कार मित्रहो,
पावसाळी अधिवेशनात माध्यम जगतातील तुम्हा सर्वांचे स्वागत आहे.
मित्रांनो,
मान्सून हा नवीनता आणि नवसृजनाचे प्रतीक आहे, आणि आतापर्यंत मिळालेल्या बातम्यांनुसार देशात हवामान चांगलं आहे, शेतीला अनुकूल हवामानाच्या बातम्या येत आहेत. आणि शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेत, देशाच्या अर्थव्यवस्थेत, ग्रामीण अर्थव्यवस्थेत आणि इतकेच नाही तर प्रत्येक कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेत पाऊस खूप महत्त्वाचा आहे. मला आतापर्यंत दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 10 वर्षांच्या तुलनेत या वेळी पाणीसाठा जवळजवळ तिप्पट झाला आहे, ज्यामुळे येत्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होईल.
मित्रहो,
हे पावसाळी अधिवेशन राष्ट्रासाठी गौरवपूर्ण अधिवेशन आहे. हे पावसाळी अधिवेशन राष्ट्रासाठी विजयोत्सवाचे एक रूप आहे. आणि जेव्हा मी म्हणतो की हे अधिवेशन राष्ट्रीय गौरवाचे आणि विजयोत्सवाचे सत्र आहे, तेव्हा सर्वप्रथम तर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर प्रथमच भारतीय तिरंगा ध्वज फडकणे हा देशातील प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाचा क्षण आहे. देशात विज्ञान आणि तंत्रज्ञानाप्रती, नवोन्मेषाप्रती नवी उमेद आणि उत्साह जागवणारा हा यशस्वी प्रवास ठरला आहे. आता संपूर्ण संसद, लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहे, देशवासी ज्या गौरवाचा अनुभव घेत आहेत त्यात सहभागी होतील. एका सुरात याचे कौतुक केले जाईल, जे भारताला अंतराळात नव्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या भविष्यातील कार्यक्रमांसाठी प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारे असेल.
मित्रहो,
हे पावसाळी अधिवेशन विजयोत्सव आहे. संपूर्ण जगाने भारताच्या सैन्य शक्तीचे, भारताच्या सैन्य सामर्थ्याचे रूप पाहिले आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेने जे लक्ष्य निर्धारित केले होते, ते 100 टक्के साध्य करण्यात आले. ऑपरेशन सिंदूरअंतर्गत अवघ्या 22 मिनिटांत शत्रूच्या हद्दीतच आपले लक्ष्य निष्प्रभ केले. मी बिहारमधील एका कार्यक्रमादरम्यान याची घोषणा केली होती. आपल्या सशस्त्र दलांनी अगदी कमी वेळात हे साध्य केले. आपल्या 'मेड इन इंडिया' सैन्य शक्तीच्या नव्या रूपाने जगाचे लक्ष वेधले आहे. आजकाल, जेव्हा मी जागतिक नेत्यांना भेटतो, तेव्हा भारतात विकसित होणाऱ्या स्वदेशी संरक्षण उपकरणांमध्ये वाढता रस दिसत आहे. माझा ठाम विश्वास आहे की जेव्हा संसद, या अधिवेशनात, या विजयोत्सवाचा एका सुरात जयघोष करेल, या अधिवेशनात त्या ओजस्वी-तेजस्वी भावना प्रकट करेल तेव्हा भारताच्या सैन्यशक्तीला बळ मिळेल, प्रोत्साहन मिळेल, देशवासीयांना प्रेरणा मिळेल आणि संरक्षण क्षेत्रात संशोधन, नवोन्मेष आणि उत्पादनाला चालना मिळेल. 'मेड इन इंडिया' संरक्षण उपकरणे अधिक गती घेतील आणि आपल्या तरुणांसाठी नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करतील.
मित्रांनो,
या दशकाचे वर्णन असे करता येईल की शांतता आणि प्रगती हातात हात घालून पुढे जात आहेत. आपण प्रत्येक पावलावर विकास अनुभवत आहोत. स्वातंत्र्यापासून देशाला विविध प्रकारच्या हिंसाचाराचा सामना करावा लागला आहे - मग तो दहशतवाद असो किंवा नक्षलवाद असो. यातील काही समस्या आधी उद्भवल्या असतील तर काही नंतर. तथापि, आज नक्षलवाद आणि माओवादाच्या प्रभावाचे क्षेत्र झपाट्याने कमी होत आहे. माओवाद आणि नक्षलवाद मुळापासून उपटून टाकण्याच्या दृढ संकल्पाने, आपली सुरक्षा दले जलद गतीने आणि नवीन आत्मविश्वासाने यशाकडे वाटचाल करत आहेत. मी अभिमानाने सांगू शकतो की देशभरातील शेकडो जिल्हे, जे एकेकाळी नक्षलवादाच्या प्रभावाखाली होते, ते आता त्यातून बाहेर पडून मोकळा श्वास घेत आहेत. आपल्याला अभिमान आहे की आपले संविधान बॉम्ब, बंदुका आणि पिस्तूलांवर विजय मिळवत आहे - आपले संविधान विजयी होत आहे. हे स्पष्ट आहे की एकेकाळी रेड कॉरिडॉर म्हणून ओळखले जाणारे प्रदेश आता विकासाच्या क्षेत्रात रूपांतरित होत आहेत, जे राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचे प्रतीक आहेत.
मित्रहो,
एका पाठोपाठच्या अशा या घटना, देशाच्या सेवेसाठी आणि देशकल्याणासाठी ज्यांनी या सभागृहात प्रवेश केला आहे अशा प्रत्येक सन्माननीय संसद सदस्यासाठी अभिमानाचे क्षण आहेत आणि संसदेच्या या अधिवेशनादरम्यान, हे गौरवगान संपूर्ण देश ऐकेल, प्रत्येक संसद सदस्याकडून, प्रत्येक राजकीय पक्षाकडून ऐकेल.
मित्रांनो,
जेव्हा तुम्ही 2014 मध्ये आमच्यावर जबाबदारी सोपवली तेव्हा देश अशा टप्प्यातून जात होता जिथे त्याची गणना पाच नाजूक अर्थव्यवस्थांमध्ये केली जात होती. 2014 पूर्वी, आपण जागतिक अर्थव्यवस्थेत 10 व्या क्रमांकावर होतो. आज, भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वेगाने प्रगती करत आहे. आज 25 कोटी गरिबांना गरिबीतून बाहेर काढण्याचे अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे. 2014 पूर्वी देशात एक काळ असा होता जेव्हा महागाईचा दर दोन अंकी होता. आज, तो 2 टक्क्यांच्या आसपास आल्याने, देशातील सामान्य माणसाला दिलासा मिळाला आहे. उच्च विकासासह कमी महागाई, चांगली, प्रगतीशील विकासयात्रा प्रतिबिंबित करते.
मित्रांनो,
डिजिटल इंडिया, यूपीआय असे भारताचे नवे सामर्थ्य जग आज पाहत आहे, जाणून घेत आहे, आणि बहुतांश देशांमध्ये त्या प्रति आकर्षण निर्माण होत आहे. यूपीआयने फिनटेक जगात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. भारत आता रिअल-टाइम डिजिटल व्यवहारांमध्ये जगात आघाडीवर आहे, हे व्यवहार जगात जितके होत आहेत, त्यापेक्षा अधिक एकट्या भारतात होत आहेत.
मित्रहो,
अलीकडेच, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची एक जागतिक परिषद झाली, जिथे भारताने एक मोठा टप्पा गाठला. आयएलओच्या मते, भारतातील 90 कोटींहून अधिक लोक आता सामाजिक सुरक्षेखाली आहेत - हे एक मोठे यश आहे. त्याचप्रमाणे, जागतिक आरोग्य संघटनेने भारताला ट्रॅकोमापासून मुक्त घोषित केले आहे - हा डोळ्यांचा आजार सामान्यतः पावसाळ्यात अधिक दिसून येतो. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात भारतासाठी ही आणखी एक महत्त्वाची कामगिरी आहे.
मित्रांनो,
पहलगाममधल्या क्रूर हत्या, अत्याचार, नरसंहार याचा धक्का संपूर्ण जगाला बसला. दहशतवादी आणि दहशतवादाचे सूत्रधार यांच्यावर संपूर्ण जगाचे लक्ष केंद्रित झाले. आणि त्यावेळी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून बहुतांश पक्षांच्या आणि राज्यांच्या प्रतिनिधींनी जगभरातल्या विविध देशांना भेटी दिल्या आणि एकजुटीने जगासमोर दहशतवाद्यांचा सूत्रधार पाकिस्तनचा चेहरा उघड करण्यासाठी यशस्वी मोहीम चालवली. राष्ट्रीय हितासाठी केलेल्या या महत्त्वपूर्ण कार्यासाठी त्या सर्व संसद सदस्यांचे आणि राजकीय पक्षांचे मी आज कौतुक करू इच्छितो. यामुळे देशात एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले. भारताचा दृष्टिकोन ऐकण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी जगाने आपले दरवाजे उघडले. यासाठी मी आपल्या संसद सदस्यांचे आणि राजकीय पक्षांचे कौतुक करणे हा माझा बहुमान मानतो.
मित्रांनो,
आपल्याला माहित आहे की ही एकतेची भावना आणि सामूहिक आवाज देशात किती उत्साह भरतो. विजयाचा हा उत्सव पावसाळी अधिवेशनातही त्याच भावनेने प्रतिबिंबित होईल, तो आपल्या सशस्त्र दलांच्या सामर्थ्याचे कौतुक करेल, देशाच्या सामर्थ्याचे गौरवगान गाईल आणि देशाच्या 140 कोटी नागरिकांसाठी प्रेरणेचा एक नवीन स्रोत ठरेल. मला असे ठामपणे वाटते की आपण सर्वांनी एकत्रितपणे संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या या प्रयत्नांना बळ दिले पाहिजे आणि आपल्या सशस्त्र दलांच्या सामर्थ्याचे कौतुक केले पाहिजे. आज, मी देशवासीयांसमोर आणि सर्व राजकीय पक्षांना सांगू इच्छितो की देशाने एकतेची शक्ती आणि एका सामूहिक आवाजाची ताकद पाहिली आहे. माननीय संसद सदस्यांनी देखील सदनात या भावनेला बळ द्यावे, ती संवर्धित करावी. हे वास्तव आहे की राजकीय पक्ष वेगवेगळे आहेत, प्रत्येकाचा स्वतःचा अजेंडा असतो, स्वतःची भूमिका असते. परंतु त्याचबरोबर मला असे वाटते,जरी पक्षीय विचार मिळतेजुळते नसले तरी राष्ट्रीय हितासाठी एकत्र आले पाहिजे. याच भावनेने, या पावसाळी अधिवेशनात देशाच्या विकासयात्रेला बळ देणारी, देशाच्या प्रगतीला चालना देणारी आणि देशाच्या नागरिकांना सक्षम करणारी अनेक महत्त्वाची विधेयके प्रस्तावित आहेत. मला विश्वास आहे की त्यावर सदन सविस्तर चर्चा करेल आणि ती मंजूर करेल.अर्थपूर्ण आणि रचनात्मक चर्चेसाठी सर्व माननीय संसद सदस्यांना माझ्या शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद.
* * *
सोनल तुपे/सोनाली काकडे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2146873)
Visitor Counter : 4
Read this release in:
Malayalam
,
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu