मंत्रिमंडळ
azadi ka amrit mahotsav

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या यशस्वी परतीचे स्वागत करणारा ठराव केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत संमत

Posted On: 16 JUL 2025 6:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 जुलै 2025

 

भारताच्या अनंत आकांक्षांचे प्रतिनिधित्व करणारे, ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला  त्यांच्या अंतराळातील प्रवासातून 15 जुलै 2025 रोजी,सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले.हा क्षण संपूर्ण देशासाठी अभिमानाचा,गौरवाचा आणि आनंदाचा क्षण आहे.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील 18 दिवसांच्या ऐतिहासिक मोहिमेच्या यशस्वी पूर्ततेनंतर, ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या पृथ्वीवर परतण्याच्या आनंदात देशासोबत मंत्रिमंडळही  सामील झाले आहे.

25 जून 2025 रोजी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नेतृत्वात  सुरू झालेल्या  मिशन पायलट या अंतराळ मोहिमेने एक महत्त्वाचा क्षण साकारला – या निमित्ताने पहिल्यांदाच भारतीय अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर प्रवास करत होता. हा प्रवास भारताच्या अंतराळ कार्यक्रमातील एका नवीन अध्यायाची सुरुवात असून आपल्या भविष्यातील अंतराळ कार्यक्रमाची सोनेरी झलक दर्शविते.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि आपले शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांच्या संपूर्ण समुदायाचे मंत्रिमंडळ या निमित्ताने अभिनंदन करत आहे; ज्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाले आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात असताना, ग्रुप कॅप्टन शुक्ला यांनी अ‍ॅक्सिओम-4 समूह आणि एक्सपिडिशन 73 मधील सहकारी सदस्यांसोबत अखंड परिश्रम केले, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ सहकार्यात भारताच्या वाढत्या नेतृत्वाने मूर्त स्वरूप  धारण केले.

स्नायूंची पुनरुत्पत्ती, शैवाल आणि सूक्ष्मजीवांची वाढ, पीकांची तग धरून रहाण्याची शक्ती, सूक्ष्मजीवांची जिवंत रहाण्याची क्षमता, अवकाशातील संज्ञानात्मक कार्यक्षमता आणि सायनोबॅक्टेरियाची वर्तणूक  यासारख्या विषयांवर सूक्ष्मगुरुत्वाकर्षणावर आधारित  अनेक प्रयोग त्यांनी करून पाहिले. हा अभ्यास मानवी अंतराळ उड्डाण आणि सूक्ष्मगुरुत्वाकर्षण विज्ञानाची जागतिक समज वाढवतील आणि भारताच्या भविष्यातील मोहिमांसाठी महत्त्वपूर्ण माहिती प्रदान करतील.

या यशस्वी मोहिमेमुळे अंतराळ संशोधनातील भारताचे जागतिक स्थान लक्षणीयरीत्या उंचावले आहे.गगनयान आणि भारतीय अंतरिक्ष स्थानकासह भारताच्या स्वदेशी मानवी अंतराळ उड्डाण महत्त्वाकांक्षेच्या दिशेने उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.मानवी अंतराळ संशोधनात अग्रेसर राहण्याच्या भारताच्या दृढनिश्चयाला हे दुजोरा देत आहे.

पंतप्रधानांची धोरणात्मक दूरदृष्टी,भारताच्या अंतराळ क्षमतेवरील अढळ विश्वास आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे देश अशी उत्तुंग भरारी घेऊ शकला आहे आणि अंतराळ संशोधन करणाऱ्या देशांमध्ये एक अग्रेसर नेतृत्व म्हणून उदयास आला आहे; याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी आणि निश्चयी  नेतृत्वाची मंत्रिमंडळ प्रशंसा करत आहे.

23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ चंद्रयान-3 याच्या ऐतिहासिक लँडिंगसह भारताच्या अलिकडील  ऐतिहासिक अंतराळ कामगिरीचेही मंत्रिमंडळ अभिमानाने स्मरण करत‌ आहे. हा दिवस भारताचा राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून इतिहासात कोरला गेला आहे. त्याचप्रमाणे, 2023 मध्ये सुरू झालेल्या भारताच्या आदित्य-L1या मोहिमेने मानवाला सूर्यावरील घडामोडींबद्दलच्या आकलनात लक्षणीय वाढ केली आहे.ही कामगिरी उल्लेखनीय विज्ञान आणि राष्ट्रीय आत्मनिर्भरतेची भावना प्रतिबिंबित करतात.

अंतराळ क्षेत्रातील सातत्यपूर्ण सुधारणांद्वारे, सरकारने भारताच्या अवकाश अर्थव्यवस्थेने अभूतपूर्व विकास केला आहे. या क्षेत्रात सुमारे 300 नवीन स्टार्ट-अप्सच्या उदयामुळे केवळ मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे इतकेच नव्हे तर नवोन्मेष, उद्योजकता आणि तंत्रज्ञान-आधारित विकासाची एक सजीव परिसंस्था देखील निर्माण झाली आहे. ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांची ध्येयपूर्ती हा  केवळ वैयक्तिक विजय  नाही तर  तो तरुण भारतीयांच्या नवीन पिढीसाठी प्रेरणादायी किरण आहे. हा किरण वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करेल, उत्सुकता वाढवेल आणि असंख्य तरुणांना विज्ञानात करिअर करण्यासाठी आणि नवोन्मेष स्वीकारण्यासाठी प्रेरित करेल.

पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार, 2047 पर्यंत विकसित भारत निर्माण करण्याच्या राष्ट्रीय संकल्पाला हे अभियान बळकटी देईल, असा मंत्रिमंडळाचा दृढ विश्वास आहे.

 

* * *

शैलेश पाटील/संपदा पाटगावकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2145313) Visitor Counter : 5