पंतप्रधान कार्यालय
ब्राझीलच्या राष्ट्रपतींसोबत संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी पत्रकारांना दिलेल्या निवेदनाचा मराठी मजकूर
Posted On:
09 JUL 2025 12:54AM by PIB Mumbai
महामहिम, माझे जिवलग मित्र राष्ट्रपती लूला, आणि
दोन्ही देशांतील माध्यम प्रतिनिधींनो!
नमस्कार
"बोआ तार्ज"!
रिओ आणि ब्राझिलियामध्ये अतिशय जिव्हाळ्याने केलेल्या माझ्या स्वागताबद्दल मी माझे मित्र, राष्ट्राध्यक्ष लुला यांचे मनापासून आभार मानतो. अमेझॉनच्या सौंदर्याने आणि तुमच्या सह्रदयतेने आम्ही खरोखरच प्रभावित झालो आहोत.
आज, ब्राझीलच्या राष्ट्रपतींकडून ब्राझीलच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित होणे हा केवळ माझ्यासाठीच नाही तर 140 कोटी भारतीयांसाठी खूप अभिमानाचा आणि सौख्याचा क्षण आहे. या सन्मानाबद्दल मी राष्ट्रपती, ब्राझील सरकार आणि ब्राझीलच्या जनतेचे मनापासून आभार मानतो.
मित्र हो,
माझे मित्र राष्ट्रपती लूला हे भारत आणि ब्राझीलमधील धोरणात्मक भागीदारीचे मुख्य शिल्पकार आहेत. त्यांनी आमचे संबंध अधिक दृढ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.त्यांच्यासोबत झालेल्या प्रत्येक भेटीत मला दोन्ही राष्ट्रांच्या प्रगती आणि कल्याणासाठी अधिक मेहनत करण्याची प्रेरणा मिळाली आहे. मी हा सन्मान भारताप्रती असलेल्या त्यांच्या दृढ वचनबद्धतेला आणि आमच्यातील शाश्वत मैत्रीला समर्पित करतो.
मित्र हो,
आजच्या चर्चेत, आम्ही सर्व क्षेत्रांमधील सहकार्य मजबूत करण्यावर सहमती दर्शविली आहे. पुढील पाच वर्षांत आमचा द्विपक्षीय व्यापार 20 अब्ज डॉलर्सपर्यंत पुढे नेण्याचे ध्येय आम्ही समोर ठेवले आहे.
मित्र हो,
जसा क्रिकेट हा भारतातील लोकांना आवडतो, तसाच फुटबॉल हा ब्राझीलचा आवडता खेळ आहे. चेंडू सीमा ओलांडून नेणे असो किंवा गोलमध्ये नेणे असो, जेव्हा दोघेही एकत्र एकाच संघात येतात,जिंकणे सहजशक्य असते, त्याचप्रमाणे एकत्रितपणे 20 अब्ज डॉलर्सची भागीदारी साध्य करणे कठीण नसते. दोघे मिळून एकत्रितपणे, आम्ही भारत-मर्कोसुर व्यापार प्राधान्य करार (पीटीए,PTA) विस्तारित करण्याचे काम देखील करू शकू .
मित्र हो,
ऊर्जा क्षेत्रातील आमचे सहकार्य सातत्याने वाढत आहे. आमचे दोन्ही देश पर्यावरण आणि स्वच्छ ऊर्जेला अधिक प्राधान्य देतात. या क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी आज स्वाक्षरी केलेला करार हा आमच्या हरित उद्दिष्टांना नवीन दिशा आणि गती देईल. या वर्षाच्या अखेरीस ब्राझीलमध्ये होणाऱ्या आगामी COP-30 शिखर परिषदेसाठी मी राष्ट्रपती लुला यांना शुभेच्छा देतो.
मित्र हो,
संरक्षण क्षेत्रातील आमचे वाढते सहकार्य दोन्ही देशांमधील परस्पर विश्वासाचे प्रतिबिंब आहे. आम्ही आमच्या संरक्षण उद्योगांना जोडण्यासाठी आणि हे सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरूच ठेवू.
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सुपरकॉम्प्युटरच्या क्षेत्रातील आपले सहकार्य वाढत आहे.हे सहकार्य सर्वसमावेशक विकास आणि मानव-केंद्रित नवोन्मेष याविषयीचे आमचे समान दृष्टिकोन प्रतिबिंबित करत आहे.
ब्राझीलमध्ये UPI चा अवलंब करण्यावरही दोन्ही बाजू एकत्र काम करत आहेत. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि अवकाश यासारख्या क्षेत्रात भारताचा यशस्वी अनुभव ब्राझीलसोबत शेअर/ सामायिक करण्यास आम्हाला आनंद होईल.
शेती आणि पशुसंवर्धन क्षेत्रात आमचे सहकार्य अनेक दशकांपासून आहे. आम्ही आता कृषी संशोधन आणि अन्न प्रक्रिया यासारख्या क्षेत्रात एकत्र काम करत आहोत. आरोग्य क्षेत्रातही आम्ही आमचे परस्पर लाभदायी सहकार्य वाढवत आहोत. ब्राझीलमध्ये आयुर्वेद आणि पारंपारिक औषधांच्या विस्तारावरही आम्ही भर दिला आहे.
मित्रांनो,
लोकांमधील संबंध हे आपल्या नात्याचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. दोन्ही देशांमध्ये खेळांबद्दलची आमची सामायिक आवड आपल्याला जोडणारे एक मजबूत बंध म्हणून काम करते.
भारत-ब्राझील संबंध कार्निव्हलसारखे उत्साही, फुटबॉलसारखे उत्स्फूर्त आणि सांबासारखे हृदयस्पर्शी असावेत अशी आमची इच्छा आहे - ते सुद्धा व्हिसा काउंटरवरील लांब रांगांशिवाय! या भावनेने, आम्ही आमच्या दोन्ही राष्ट्रांमधील, विशेषतः पर्यटक, विद्यार्थी, खेळाडू आणि व्यावसायिकांसाठी, लोकांमधील देवाणघेवाण सुलभ करण्यासाठी एकत्र काम करू.
मित्रांनो,
जागतिक पातळीवर, भारत आणि ब्राझील नेहमीच समन्वयाने काम करत आले आहेत. दोन प्रमुख लोकशाही देश म्हणून, आमचे सहकार्य केवळ ग्लोबल साऊथसाठीच नाही तर संपूर्ण मानवतेसाठी देखील प्रासंगिक आहे. जागतिक दक्षिणेच्या चिंता आणि प्राधान्यक्रम जागतिक व्यासपीठावर आणणे ही आमची नैतिक जबाबदारी आहे असा आमचा ठाम विश्वास आहे.
आज, जग तणाव आणि अनिश्चिततेच्या काळातून जात असताना... माझ्या मित्राने आधीच याबद्दल सविस्तरपणे सांगितले आहे म्हणून मी ते पुन्हा सांगणार नाही... भारत-ब्राझील भागीदारी स्थिरता आणि संतुलनाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. सर्व वाद हे संवाद आणि राजनैतिक कूटनीतिद्वारे सोडवले पाहिजेत यावर आमचे एकमत आहे.
दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आमचा दृष्टिकोन समान आहे - शून्य सहिष्णुता आणि शून्य दुहेरी मानके. दहशतवादाच्या बाबतीत दुहेरी मानकांना स्थान नाही यावर आमचा ठाम विश्वास आहे. आम्ही दहशतवादाचा आणि त्याला पाठिंबा देणाऱ्यांचाही तीव्र विरोध करतो.
महामहिम,
पुन्हा एकदा, १.४ अब्ज भारतीयांच्या वतीने, मी या सर्वोच्च राष्ट्रीय सन्मानाबद्दल आणि तुमच्या शाश्वत मैत्रीबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. या विशेष संधिच्या निमित्त मी तुम्हाला भारत भेटीसाठी आमंत्रित करतो.
धन्यवाद.
"खूप खूप धन्यवाद!"
***
ST/JPS/SP/HK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2143343)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam