पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

ब्राझीलमध्ये रिओ दि जानेरो येथील ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी क्युबाच्या राष्ट्राध्यक्षांची घेतली भेट

प्रविष्टि तिथि: 07 JUL 2025 5:19AM by PIB Mumbai

ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथील सतराव्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज क्युबाचे अध्यक्ष महामहिम मिगुएल डियाझ-कॅनेल बर्मुडेझ यांची भेट घेतली. यापूर्वी 2023 मध्ये जोहान्सबर्ग येथे झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत राष्ट्राध्यक्ष  डियाझ-कॅनेल यांची पंतप्रधानांनी भेट घेतली होती, ज्यावेळी क्युबा विशेष आमंत्रित सदस्य म्हणून   उपस्थित होता.
यादरम्यान,दोन्ही नेत्यांनी आर्थिक सहकार्य, विकासातील भागीदारी , वित्तीय तंत्रज्ञान, क्षमता बांधणी, विज्ञान आणि तंत्रज्ञान, आपत्ती व्यवस्थापन तसेच आरोग्यसेवा या क्षेत्रातील द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला. डिजिटल क्षेत्रातील भारताच्या कौशल्याची दखल घेत, अध्यक्ष डियाझ-कॅनेल यांनी भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि यूपीआयमध्ये रुची व्यक्त केली. क्युबाने आयुर्वेदाला दिलेल्या मान्यतेबद्दल पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली  आणि क्युबाच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत आयुर्वेदाचा समावेश  करण्यासाठी पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली. क्युबाने भारतीय औषधकोशाला मान्यता देण्याचा प्रस्ताव पंतप्रधानांनी मांडला, ज्यामुळे तेथे भारतीय जेनेरिक औषधांची उपलब्धताही होऊ शकेल.

आरोग्य, महामारी आणि हवामान बदल यासारख्या क्षेत्रांसह ग्लोबल साउथ  देशांपुढील आव्हानांच्या मुद्द्यांवर काम करण्यास दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शविली. बहुपक्षीय मंचांवर  दोन्ही देशांमधील सहकार्याची देखील त्यांनी प्रशंसा केली.

***

NilimaC/SampadaP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2142809) आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Bengali-TR , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam