पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

सायप्रसच्या अध्यक्षांसमवेतच्या संयुक्त पत्रकार परिषदेतले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य

Posted On: 18 JUN 2025 9:32AM by PIB Mumbai

महामहीम,आदरणीय अध्यक्ष,

दोन्ही देशांचे सन्माननीय प्रतिनिधी,

माध्यमक्षेत्रातले मित्र,

नमस्कार !

कालीम्मेरा !

सर्वप्रथम स्नेहपूर्ण स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मी  आदरणीय राष्ट्राध्यक्षांचे मनःपूर्वक आभार मानतो.सायप्रसच्या भूमीवर काल पाऊल ठेवल्यापासून, राष्ट्राध्यक्ष आणि या देशाच्या जनतेचा स्नेह आणि आपुलकी याने मी भारावून गेलो आहे.  

थोड्याच वेळापूर्वी सायप्रसचा प्रतिष्ठेचा सन्मान मला प्रदान करण्यात आला. हा सन्मान माझा एकट्याचा नव्हे तर  140 कोटी भारतीयांचा हा सन्मान आहे. भारत आणि सायप्रस यांच्यातल्या अतूट संबंधांचे हे प्रतिक आहे.या सन्मानाबद्दल मी पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार मानतो. 

मित्रहो,

सायप्रससमवेतच्या संबंधाना आम्ही अतिशय महत्व देतो. लोकशाही आणि कायद्याचे राज्य या मुल्यांप्रती आपली सामायिक कटीबद्धता हा आपल्या भागीदारीचा भक्कम पाया आहे.भारत आणि सायप्रस यांच्यातली मैत्री ही परिस्थितीजन्य किंवा सीमांनी बद्ध नव्हे. तर

काळाच्या कसोटीवर पुन्हा पुन्हा सिद्ध झालेली मैत्री आहे. प्रत्येक काळात आम्ही सहकार्य,आदर आणि परस्पर समर्थनाची भावना जपली आहे. परस्परांचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आम्ही सन्मान केला आहे.

मित्रहो,  

गेल्या दोन दशकात भारताच्या पंतप्रधानांनी सायप्रसला दिलेली ही पहिली भेट आहे. आपल्या द्विपक्षीय संबंधांमध्ये नवा अध्याय लिहिण्याची ही सुवर्णसंधी आहे. माननीय राष्ट्राध्यक्ष आणि मी आज दोन्ही देशांच्या  भागीदारीच्या सर्व पैलूंवर विस्तृत चर्चा केली.

सायप्रसचे ‘व्हिजन 2035’ आणि आपला ‘विकसित भारत 2047’ हा दृष्टीकोन यात अनेक बाबींमध्ये साम्य आहे. म्हणूनच आपल्या भविष्याला आकार देण्यासाठी आपण एकत्र काम करायला हवे. आपल्या भागीदारीला धोरणात्मक दिशा देण्यासाठी येत्या पाच वर्षांकरिता आम्ही मजबूत  आराखडा विकसित करू.

संरक्षण आणि सुरक्षा सहयोग आणखी दृढ करण्यासाठी द्विपक्षीय संरक्षण सहकार्य कार्यक्रमाअंतर्गत संरक्षण उद्योग सहयोगावर लक्ष केंद्रित करण्यात येईल.सायबर  आणि सागरी सुरक्षेवर वेगळा संवाद सुरु करण्यात येईल.

सीमापार दहशतवादाविरोधातल्या भारताच्या लढ्याला सातत्याने पाठींबा दिल्याबद्दल आम्ही सायप्रसचे आभारी आहोत.दहशतवाद,अंमली पदार्थ आणि शस्त्रांस्त्रांची तस्करी यांना आळा  घालण्यासाठी तात्काळ माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी  आमच्या संबंधित एजन्सीमध्ये यंत्रणा उभारण्यात येईल. द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक वृद्धीसाठी अपार संधी आहेत यावर दोन्ही देश सहमत आहेत.

माननीय राष्ट्राध्यक्षांसमवेत काल संवाद साधताना दोन्ही देशांच्या  आर्थिक संबंधांबाबत व्यापार समुदायामध्ये मला मोठा उत्साह आणि उर्जा जाणवली.या वर्षीच्या अखेरपर्यंत परस्पराना लाभदायक भारत-युरोपियन संघ मुक्त व्यापार करार संपन्न करण्यासाठी आम्ही काम करत आहोत.

या वर्षी ‘भारत-सायप्रस-ग्रीस व्यापार आणि गुंतवणूक परिषद’सुरु झाली आहे.असे उपक्रम द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देतील.

तंत्रज्ञान,नवोन्मेश,आरोग्य,कृषी,नविकरणीय उर्जा आणि न्याय्य हवामान यासारख्या क्षेत्रात सहकार्य वृद्धिंगत करण्यावर आम्ही तपशीलवार चर्चा केली. सायप्रसमध्ये योग आणि आयुर्वेद लोकप्रिय होत असल्याबद्दल आम्ही उत्साहित आहोत.

भारतीय पर्यटकांसाठी सायप्रस हे पसंतीचे ठिकाण आहे. त्यांचा प्रवास सुलभ करण्यासाठी थेट हवाई संपर्कासाठी आम्ही काम करू.मोबिलिटी कराराला अंतिम स्वरूप देण्याच्या कामाला वेग देण्याचा निर्धार आम्ही केला आहे.  

मित्रहो,

युरोपियन महासंघामध्ये सायप्रस हा आमचा विश्वासार्ह भागीदार आहे. युरोपियन महासंघाच्या पुढच्या वर्षीच्या अध्यक्षपदासाठी आम्ही सायप्रसला शुभेच्छा देतो.आपल्या अध्यक्षतेखाली भारत-युरोपियन महासंघ संबंध नव्या उंचीवर पोहोचतील याचा आम्हाला विश्वास आहे.

संयुक्त राष्ट्र महासंघ अधिक  प्रातिनिधिक व्हावा यासाठी सुधारणांच्या आवश्यकतेवर  दोन्ही देशांचे विचार समान आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्वासाठी भारताला पाठींबा  देत असल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.  

पश्चिम आशिया आणि युरोपमध्ये सध्या सुरु असलेल्या संघर्षाबद्दल आम्ही चिंता व्यक्त केली आहे.या संघर्षाचा प्रतिकूल परिणाम केवळ त्यांच्या प्रदेशापुरताच मर्यादित नाही. हा युद्धाचा काळ नव्हे असे  आमचे दोघांचेही मत आहे.

संवाद आणि स्थैर्य पुन्हा स्थापित करणे ही मानवतेची हाक आहे. भूमध्य प्रदेशात  कनेक्टीव्हिटी वाढविण्यावरही आम्ही चर्चा केली. भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर या प्रदेशात शांतता आणि समृद्धीचा मार्ग खुला करेल यावर आम्ही सहमत आहोत.

माननीय राष्ट्राध्यक्ष,

 मी,आपणाला भारतभेटीचे निमंत्रण देत आहे. लवकरच भारतात आपले स्वागत करण्याची संधी मिळेल अशी आशा करतो.

आपण केलेले  विशेष स्वागत आणि सन्मानाबद्दल पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार.   

***

JPS/NC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2137585)