पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी. के. मिश्रा यांनी अहमदाबाद विमान अपघात स्थळी मदत आणि बचाव कार्याचा घेतला आढावा


डॉ. पी. के. मिश्रा यांनी सिव्हिल रुग्णालयात  पीडित आणि कुटुंबियांची घेतली भेट

डॉ. पी. के. मिश्रा यांनी अधिकाऱ्यांना पीडितांची ओळख पटवण्याची प्रक्रिया गतिमान करण्याचे दिले निर्देश

प्रविष्टि तिथि: 15 JUN 2025 8:09PM by PIB Mumbai

 

पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी. के. मिश्रा यांनी अलीकडील झालेल्या विमान अपघातानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज अहमदाबादला भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्वरित मदत, सखोल चौकशी तसेच पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांना व्यापक मदत मिळेल याची खात्री करण्यासाठी दिलेल्या निर्देशांना डॉ. मिश्रा यांच्या भेटीमुळे बळकटी मिळाली.

डॉ. मिश्रा यांनी मेघाणी नगर येथील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाजवळील अपघात स्थळाची पाहणी केली. यावेळी राज्य सरकार, विमान अपघात अन्वेषण विभाग  (एएआयबी) आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या अधिकाऱ्यांनी त्यांना अपघाताच्या क्रमवार घडामोडी आणि त्वरित प्रतिसाद उपायांची माहिती दिली.

यानंतर डॉ. मिश्रा यांनी अहमदाबाद येथील सिव्हिल रुग्णालयाला  भेट दऊन अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींच्या शोकग्रस्त कुटुंबियांची भेट घेतली तसेच डीएनए नमुना जुळवणी प्रक्रियेचे निरीक्षण केले आणि या प्रक्रियेत सहानुभूतीपूर्ण आणि प्रभावी मदत देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले . त्यांनी जखमींशी संवाद साधला आणि त्यांच्या वैद्यकीय उपचारांना प्राधान्य देण्याच्या सूचना रुग्णालयातील अधिकाऱ्यांना दिल्या.

गांधीनगर येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत  डॉ. मिश्रा यांनी डीएनए नमुना तपासणीचा आढावा घेतला आणि वैज्ञानिक अचूकता राखून ओळख प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याच्या गरजेवर भर दिला.

अहमदाबाद येथील सर्किट हाऊस येथे आयोजित एका उच्चस्तरीय आढावा बैठकीचे अध्यक्षपद भूषवताना, डॉ. मिश्रा यांनी केंद्र आणि राज्य सरकार, विमान अपघात अन्वेषण विभाग आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सध्या सुरू असलेल्या मदत, बचाव आणि तपास कार्याबाबत चर्चा केली. विमान अपघात अन्वेषण विभागाने सखोल चौकशी सुरू केली आहे तर अपघातग्रस्त विमान अमेरिकन बनावटीचे असल्यामुळे अमेरिकेच्या नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) कडूनही आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलनुसार स्वतंत्र तपास सुरू करण्यात आला आहे. विमानातील फ्लाइट डेटा रेकॉर्डर  आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सापडले आहेत आणि ते सुरक्षित ठेवण्यात आले आहेत, याला  अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.

डॉ. मिश्रा यांनी पंतप्रधानांच्या वतीने पीडित कुटुंबियांना सर्वतोपरी मदत पुरवण्याचे आश्वासन दिले आणि संबंधित सर्व संस्थांमध्ये समन्वित प्रतिसाद सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले. या दौऱ्यात प्रधान सचिवांसोबत पंतप्रधान कार्यालयाचे सल्लागार तरुण कपूर आणि पंतप्रधान कार्यालयाचे उपसचिव मंगेश घिलडियाल  डॉ. मिश्रा यांच्यासोबत सहभागी झाले होते. 

***

S.Kane/S.Mukedkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2136532) आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Malayalam , English , Urdu , हिन्दी , Assamese , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada