पंतप्रधान कार्यालय
जिनिव्हा येथे आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी वित्तपुरवठा विषयक मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेत भारताने ठोस, कालबद्ध परिणाम आणि तांत्रिक सहाय्य तसेच ज्ञानाच्या देवाण-घेवाणीसह उत्प्रेरक निधीपुरवठ्यासाठी एक जागतिक सुविधा निर्माण करण्याचे केले आवाहन.
भारताची आपत्ती जोखीम कमी करणारी वित्तपुरवठा प्रणाली जगातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय स्तरावरील प्रमुख यंत्रणांपैकी एक आहे - डॉ. पी. के. मिश्रा
लवचिकता मूळ आधार असलेल्या मजबूत आणि प्रतिसादक्षम आपत्ती जोखीम कमी करणाऱ्या वित्तीय रचनेवर भारताचा विश्वास - डॉ. पी. के. मिश्रा
आपत्ती जोखीम न्यूनीकरण वित्तपुरवठा राष्ट्रीय स्तरावर मालकी आणि संचालित असावा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याने पूर्ण केला पाहिजे - डॉ. पी. के. मिश्रा
Posted On:
06 JUN 2025 11:27AM by PIB Mumbai
पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी. के. मिश्रा, यांनी 4 जून 2025 रोजी जिनिव्हा येथे आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी (डीआरआर) वित्तपुरवठा विषयक मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेत आपले विचार मांडले. ही महत्त्वपूर्ण चर्चा आयोजित केल्याबद्दल डॉ. मिश्रा यांनी संयुक्त राष्ट्र आपत्ती जोखीम कमी करण्याबाबतचे कार्यालय (यूएनडीआरआर) आणि त्यांच्या भागीदारांचे कौतुक केले. ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेने आपल्या जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात जागतिक संवाद सुरू ठेवण्यात दिलेले योगदान भारताने अधोरेखित केले.
आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी वित्तपुरवठा हा केवळ पूरक मुद्दा नसून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्रणालींच्या प्रभावी कार्यासाठी तसेच वाढत्या हवामान बदलांना आणि आपत्ती जोखमींना तोंड देताना विकासात्मक लाभाचे संरक्षण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे हे डॉ. मिश्रा यांनी अधोरेखित केले. मजबूत आणि प्रतिसाद देणारी आपत्ती जोखीम कमी करण्यासाठीची वित्तपुरवठा रचना ही लवचिकतेचा मूलाधार आहे या भारताच्या विश्वासाला त्यांनी दुजोरा दिला.
डीआरआर वित्तपुरवठातील भारताच्या प्रवासाबाबत बोलताना त्यांनी नमूद केले की सुरुवातीच्या वित्त आयोगांनी प्रारंभिक वाटप सुमारे 6 कोटी रुपये (सुमारे 7 लाख अमेरिकी डॉलर) इतके केले होते. आज, 15 व्या वित्त आयोगाअंतर्गत संचयी खर्च 2.32 ट्रिलियन रुपये (अंदाजे 28 अब्ज अमेरिकी डॉलर) पेक्षा जास्त आहे.
2005 च्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याद्वारे समर्थित, राष्ट्रीय ते राज्य आणि जिल्हा स्तरांवर पूर्व-निर्धारित, नियम-आधारित वाटपाचे महत्त्व डॉ. मिश्रा यांनी अधोरेखित केले. या परिवर्तनामुळे आपत्ती वित्तपुरवठा प्रतिक्रियात्मक नसून संरचित आणि अंदाज वर्तवण्याजोगी आहे याची खात्री झाली असे डॉ. मिश्रा यांनी सांगितले.
चार प्रमुख तत्त्वांवर आधारित भारताच्या डीआरआर वित्तपुरवठा दृष्टिकोनाची रूपरेषा अधोरेखित करताना मिश्रा यांनी पुढील चार तत्वे सांगितली. पहिले तत्व म्हणजे तयारी, शमन, मदत आणि पुनर्प्राप्तीसाठी समर्पित आर्थिक खिडक्या. दुसरे तत्व, प्रभावित लोक आणि वंचित समुदायांच्या गरजांना प्राधान्य देणे. तिसरे तत्व, सर्व सरकारी स्तरांवर - म्हणजे केंद्र, राज्य आणि स्थानिक - आर्थिक संसाधनांची उपलब्धता. चौथे तत्व म्हणजे जबाबदार, पारदर्शक आणि सर्व खर्चाचे मार्गदर्शन करणारे मापनयोग्य परिणाम.
आपत्ती जोखीम वित्तपुरवठा राष्ट्रीय मालकीचा तसेच राष्ट्राद्वारे संचालित आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याने पूरक असला पाहिजे, यावर डॉ. मिश्रा यांनी भर दिला. प्रत्येक देशाने आपली प्रणाली आपल्या प्रशासनिक आराखड्यानुसार, आर्थिक संदर्भ आणि जोखीमेच्या प्रमाणानुसार तयार केली पाहिजे. याशिवाय जागतिक मापदंड आणि मार्गदर्शन आवश्यक आहे.
सार्वजनिक वित्तपुरवठ्याव्यतिरिक्त विविध आर्थिक साधनांची गरज अधोरेखित करून डॉ. मिश्रा यांनी नमूद केले की जोखीम सामायिकीकरण , विमा आणि नवोन्मेषी आर्थिक साधने यासारख्या यंत्रणा स्थानिकांना परवडणाऱ्या आणि वित्तीय शाश्वततेशी सुसंगतपणे विकसित केल्या पाहिजेत.
जागतिक स्तरावरील एक महत्त्वाची तफावत डॉ. मिश्रा यांनी सर्वांसमोर मांडली, ती म्हणजे - डीआरआर वित्तपुरवठा प्रणालींची स्थापना आणि बळकटीकरण करण्यात सहयोग देण्यासाठी समर्पित आंतरराष्ट्रीय वित्तीय यंत्रणेचा अभाव. डॉ . मिश्रा यांनी उत्प्रेरक निधी, तांत्रिक सहाय्य आणि ज्ञानाची दिवाण-घेवाण करता यावी यासाठी एक व्यासपीठ प्रदान करण्यासाठी संयुक्त राष्ट्र प्रणाली आणि बहुपक्षीय वित्तीय संस्थांच्या सहयोगातून जागतिक सुविधा निर्माण करण्याचे आवाहन केले.
मंत्रीस्तरीय गोलमेज बैठकीने विधानांपेक्षा ठोस, कालबद्ध परिणामांवर लक्ष केंद्रित करावे असे आवाहन भारताने केले. डॉ. मिश्रा यांनी राष्ट्रीय स्तरावर संचालित परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर सहयोग प्राप्त असणारी डीआरआर वित्तपुरवठा चौकट विकसित करण्यात नेतृत्व आणि सहकार्यासाठी भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
***
S.Kane/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2134524)
Visitor Counter : 2
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam