पंतप्रधान कार्यालय
भोपाळ येथील देवी अहिल्याबाई महिला सशक्तिकरण महासंमेलनात विविध प्रकल्पांच्या शुभारंभाच्या वेळी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणातील मजकूर
Posted On:
31 MAY 2025 4:18PM by PIB Mumbai
मध्य प्रदेशचे राज्यपाल श्री मंगूभाई पटेल, आमचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री मोहन यादव जी, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आमच्याशी जोडलेले केंद्रीय मंत्री इंदूरचे तोखन साहू जी, दतियाहून राम मोहन नायडू जी, सतना इथून मुरलीधर मोहोळ जी, राज्याचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा जी, राजेंद्र शुक्ला जी, लोकसभेतील माझे सहकारी व्ही. डी. शर्मा जी, इतर मंत्री महोदय, लोकप्रतिनिधी आणि येथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो….
सर्वप्रथम, मी भारताची मातृशक्ती, भारतमातेला वंदन करतो. आज इतक्या मोठ्या संख्येने माता, भगिनी आणि कन्या मला आशीर्वाद देण्यासाठी आल्या आहेत. तुम्हा सर्व भगिनींचे दर्शन घेऊन मी धन्य झालो आहे.
बंधू आणि भगिनींनो,
आज लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर जी यांची 300 वी जयंती आहे. 140 कोटी भारतीयांसाठी हा प्रसंग, प्रेरणादायी आहे…राष्ट्र उभारणीसाठी केल्या जाणाऱ्या अथक प्रयत्नांमध्ये योगदान देण्याची संधी आहे. देवी अहिल्याबाई म्हणायच्या की राज्यकारभाराचा खरा अर्थ म्हणजे लोकांची सेवा करणे आणि त्यांचे जीवन सुधारणे. आजचा कार्यक्रम त्यांच्या विचारांना पुढे घेऊन जातो. आज इंदूर मेट्रोचे उद्घाटन झाले आहे. दतिया आणि सतना देखील आता हवाई सेवेशी जोडले गेले आहेत. या सर्व प्रकल्पांमुळे मध्य प्रदेशात सुविधा वाढतील, विकासाला गती मिळेल आणि रोजगाराच्या अनेक नवीन संधी निर्माण होतील. आज, या शुभदिनी, मी तुम्हा सर्वांचे, संपूर्ण मध्य प्रदेशचे, या सर्व विकासकामांसाठी अभिनंदन करतो.
मित्रांनो,
लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांचे नाव ऐकताच मनात आदराची भावना….श्रद्धा निर्माण होते. त्यांच्या महान व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलण्यासाठी शब्द कमी पडतात. देवी अहिल्याबाई हे एक प्रतीक आहेत…जेव्हा इच्छाशक्ती असते, दृढनिश्चय असतो तेव्हा परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी हवे ते परिणाम साध्य करता येतात. अडीच ते तीनशे वर्षांपूर्वी, जेव्हा देश गुलामगिरीच्या बेड्यांमध्ये जखडलेला होता, तेव्हा इतके महान कार्य करणे की येणाऱ्या अनेक पिढ्यांमध्ये त्याचा गवगवा होत राहील… हे सांगणे तर सोपे आहे, परंतु करणे सोपे नाही.
मित्रांनो,
लोकमाता अहिल्याबाईंनी कधीही देवाची सेवा आणि लोकसेवा वेगळी मानली नाही. असे म्हटले जाते की त्या नेहमीच स्वतः सोबत शिवलिंग बाळगत असत. त्या आव्हानात्मक कठीण अशा काळात राज्याचे नेतृत्व करणे म्हणजे काटेरी मुकुट घालण्यासारखे होते…याची कल्पना करता येते….. जणू काट्यांचा मुकुट पेलण्यासारखेच ते काम…. परंतु लोकमाता अहिल्याबाईंनी आपल्या राज्याच्या समृद्धीला एक नवीन दिशा दिली. त्यांनी गरिबातील गरिबांना सक्षम बनवण्याचे काम केले. देवी अहिल्याबाई, भारताच्या वारशाच्या महान रक्षक होत्या. जेव्हा देशाच्या संस्कृतीवर, आपल्या मंदिरांवर, आपल्या तीर्थस्थळांवर हल्ले होत होते, तेव्हा या लोकमातेने त्यांचे संरक्षण करण्याचा विडा उचलला. त्यांनी काशी विश्वनाथासह देशभरातील आपली अनेक मंदिरे, आपल्या तीर्थस्थळांचा जीर्णोद्धार केला. आणि हे माझे सद्भाग्य आहे की ज्या काशीमध्ये लोकमाता अहिल्याबाईंनी विकासाची इतकी कामे केली, त्या काशीने मलाही सेवा करण्याची संधी दिली आहे. आज, जर तुम्ही काशी विश्वनाथ महादेवाचे दर्शन घेण्यासाठी गेलात तर तुम्हाला तिथे देवी अहिल्याबाईंची मूर्ती देखील दिसेल.
मित्रांनो,
माता अहिल्याबाईंनी राज्यकारभाराचा असा एक उत्तम नमुना स्वीकारला ज्यामध्ये गरीब आणि वंचितांना सर्वोच्च प्राधान्य दिले जात असे. त्यांनी रोजगार आणि उद्योग वाढवण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या. त्यांनी शेती आणि वनउत्पादनांवर आधारीत कुटीर उद्योग आणि हस्तकला यांना प्रोत्साहन दिले. शेतीला चालना देण्यासाठी त्यांनी लहान लहान कालव्यांचे जाळे निर्माण केले आणि ते विकसित केले…त्या काळी….विचार करा… 300 वर्षांपूर्वी! जलसंधारणाला चालना देण्यासाठी त्यांनी अनेक तलाव बांधले आणि आज आपण सतत म्हणत आहोत की, पाऊस अडवा, पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा. देवी अहिल्याजींनी आपल्याला 250-300 वर्षांपूर्वी या कामाबद्दल सांगितले होते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांनी कापूस आणि मसाल्यांच्या लागवडीला प्रोत्साहन दिले. आज, 250-300 वर्षांनंतरही, आपल्याला शेतकऱ्यांना वारंवार सांगावे लागते की पीकांचे वैविध्यीकरण खूप महत्वाचे आहे. आपण फक्त भात किंवा ऊस लागवडीत अडकून पडू नये. आपण वैविध्य आणून देशाला आवश्यक असलेल्या गरजांचे, सर्व गोष्टींचे उत्पादन घेतले पाहिजे. आदिवासी समाज आणि भटक्या जमातींसाठी, पडीक असलेल्या जमिनींवर शेती करण्याची योजना त्यांनी आखली. आज भारताच्या राष्ट्रपती पदावर विराजमान झालेल्या एका आदिवासी कन्येच्या मार्गदर्शनाखाली माझ्या आदिवासी बंधू-भगिनींची सेवा करण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य आहे. देवी अहिल्याबाई यांनी जगप्रसिद्ध माहेश्वरी साडीसाठी नवीन उद्योग उभारले आणि फार कमी लोकांना माहीत असेल की देवी अहिल्याजींना कलाकौशल्याची पारख होती आणि त्यांनी गुजरातमधील जुनागढ येथून काही कुटुंबांना माहेश्वर येथे आणले आणि त्यांना एकत्र करून त्यांनी अडीचशे तीनशे वर्षांपूर्वी माहेश्वरी साडीचे काम पुढे नेले, जे आजही अनेक कुटुंबांसाठी एक अलंकार बनले आहे आणि ज्याचा आपल्या विणकरांना खूप फायदा झाला आहे.
मित्रांनो,
देवी अहिल्याबाई, अनेक मोठ्या सामाजिक सुधारणांसाठी देखील नेहमीच स्मरणात राहतील. जेव्हा आपण आज मुलींच्या लग्नाच्या वयाबाबत बोलतो तेव्हा आपल्या देशातील काही लोकांना धर्मनिरपेक्षता धोक्यात येताना दिसते. त्यांना वाटते की हे आपल्या धर्माच्या विरुद्ध आहे. आता हे देवी अहिल्याजींचे पहा…..मातृशक्तीचा सन्मान राखण्यासाठी, त्या काळात त्या मुलींच्या लग्नाच्या वयाबद्दल विचार करत असत. त्यांचे स्वतःचे लग्न लहान वयात झाले होते, परंतु त्यांना, मुलींच्या विकासाचा मार्ग काय असावा याबाबत सर्व काही माहीत होते. या देवी अहिल्याजी होत्या…. ज्यांनी.. महिलांना मालमत्तेचे अधिकार असले पाहिजेत…ज्या महिलांच्या पतीचे अकाली निधन झाले आहे, त्यांना पुनर्विवाह करता आला पाहिजे….याचा विचार केला. त्या काळात या गोष्टींबद्दल बोलणे देखील खूप कठीण होते. परंतु देवी अहिल्याबाईंनी या सामाजिक सुधारणांना पूर्ण पाठबळ दिले. त्यांनी माळव्याच्या सैन्यात महिलांची एक विशेष तुकडी देखील तयार केली. पाश्चात्य जगातील लोकांना हे माहीत नाही.
आम्हाला दोष देत राहतात, आमच्या माता भगिनींच्या हक्कांच्या नावावर आमचा अपमान करू पाहतात. अडीचशे-तीनशे वर्षांपूर्वी आपल्या देशातील महिला सैन्यात होत्या, मित्रहो, महिलांच्या सुरक्षेसाठी गावोगावी महिला संरक्षण पथके स्थापन करण्याचे कामही त्यांनी केले. म्हणजेच माता अहिल्याबाई, म्हणजे राष्ट्रउभारणीमधील आपल्या स्त्रीशक्तीच्या अमूल्य योगदानाचे प्रतीक आहेत. आज मी समाजात इतका मोठा बदल घडवून आणणाऱ्या देवी अहिल्याजी यांना आदरपूर्वक नमन करतो. मी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो, आणि त्यांना प्रार्थना करतो की तुम्ही जिथे कुठे असाल, तिथून आम्हा सर्वांवर आशीर्वादाचा वर्षाव करा.
मित्रहो,
देवी अहिल्या यांचं एक प्रेरणादायी वक्तव्य आहे, जे आपण कधीच विसरू शकत नाही. आणि जर मी ते विधान संक्षिप्तपणे सांगायचे झाले तर त्याचा मतितार्थ असा होता की आपल्याला जे काही मिळाले आहे ते जनतेने दिलेले कर्ज आहे, ते आपल्याला परत करायचे आहे. आज आमचे सरकार लोकमाता अहिल्याबाईंच्या या मूल्यांचे पालन करून काम करत आहे. नागरिक देवो भव, हा आजच्या प्रशासनाचा मंत्र आहे. आमचे सरकार महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या दृष्टिकोनाला विकासाचा साथीदार बनवत आहे. सरकारच्या प्रत्येक मोठ्या योजनेच्या केंद्रस्थानी माता, भगिनी आणि कन्या आहेत. तुम्हाला हे देखील माहिती आहे की, गरिबांसाठी चार कोटी घरे बांधली गेली आहेत आणि यातील बहुतेक घरे आमच्या माता आणि भगिनींच्या नावावर आहेत, मालकी हक्क माझ्या माता आणि भगिनींना देण्यात आले आहेत. यापैकी बहुतेक महिला अशा आहेत ज्यांच्या नावावर प्रथमच मालमत्तेची नोंदणी झाली आहे. म्हणजेच, देशातील कोट्यवधी भगिनी पहिल्यांदाच घराच्या मालकिणी बनल्या आहेत.
मित्रहो,
आज, सरकार प्रत्येक घरात नळाचे पाणी पुरवत आहे जेणेकरून आपल्या माता आणि भगिनींची कोणतीही गैरसोय होऊ नये आणि कन्या त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील. यापूर्वी कोट्यवधी भगिनींकडे वीज, एलपीजी गॅस, शौचालय अशा सुविधाही नव्हत्या. या सुविधाही आमच्या सरकारने पुरवल्या. आणि या केवळ सुविधा नाहीत, तर आपल्या माता आणि भगिनींचा आदर करण्याचा आमचा एक नम्र प्रयत्न आहे. यामुळे गावातील गरीब कुटुंबातील माता-भगिनींच्या जीवनातील अनेक अडचणी कमी झाल्या आहेत.
मित्रहो,
पूर्वी, माता आणि बहिणींना त्यांचे आजार लपवावे लागत होते. त्या गरोदरपणात रुग्णालयात जाणे टाळायच्या. त्यांना असे वाटायचे की, यामुळे कुटुंबावर ओझे पडेल आणि म्हणून त्या त्रास सहन करायच्या, पण कुटुंबातील कोणाला सांगायच्या नाहीत. आयुष्मान भारत योजनेने यांची ही चिंता दूर केली आहे. आता त्या देखील रुग्णालयात 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळवू शकतील.
मित्रहो,
महिलांसाठी शिक्षण आणि औषधांबरोबरच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे उत्पन्न. जेव्हा महिलेचे स्वतःचे उत्पन्न असते तेव्हा घरात तिचा सन्मान वाढतो आणि घरातील निर्णयांमध्ये तिचा सहभागही वाढतो. गेल्या 11 वर्षांत आमच्या सरकारने देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. तुम्ही कल्पना करू शकता, 2014 पूर्वी, तुम्ही मला सेवा करण्याची संधी देण्यापूर्वी, 30 कोटींहून अधिक भगिनी अशा होत्या, ज्यांचे बँक खातेही नव्हते. आमच्या सरकारने त्या सर्वांची बँकांमध्ये जन धन खाती उघडली आणि आता सरकार विविध योजनांचे पैसे थेट या खात्यांमध्ये जमा करत आहे. आता गाव असो की शहर, त्या स्वत:चे काही तरी काम करत आहेत, पैसे कमवत आहेत, स्वयंरोजगार करत आहेत. त्यांना मुद्रा योजनेतून विना तारण कर्ज मिळत आहे. मुद्रा योजनेच्या 75 टक्क्यांहून अधिक लाभार्थी आमच्या माता, भगिनी आणि कन्या आहेत.
मित्रहो,
आज देशातील 10 कोटी भगिनी बचत गटांशी जोडल्या गेल्या आहेत, ज्या काही ना काही आर्थिक उपक्रम राबवत आहेत. या भगिनींना उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करता यावेत म्हणून सरकार त्यांना लाखो रुपयांची मदत पुरवत आहे. अशा 3 कोटी भगिनींना लखपती दीदी बनवण्याचा आमचा संकल्प आहे. मला या गोष्टीचे समाधान वाटते की आतापर्यंत दीड कोटीहून अधिक लखपती दीदी बनल्या आहेत. आता गावोगावी बँक सखी लोकांना बँकिंगशी जोडत आहेत. सरकारने विमा सखी तयार करण्याची मोहीमही सुरू केली आहे. आपल्या भगिनी आणि कन्या आता देशाला विमा संरक्षण देण्यातही मोठी भूमिका बजावत आहेत.
मित्रहो,
एक काळ असा होता जेव्हा नवीन तंत्रज्ञान यायचे, तेव्हा महिलांना त्यापासून दूर ठेवले जात असे. आज आपला देश तो काळही मागे सोडत आहे. आज सरकारचा प्रयत्न असा आहे की आधुनिक तंत्रज्ञानातही आपल्या भगिनी आणि कन्यांनी पुढे येऊन नेतृत्व करावे. आज जसे शेतीमध्ये ड्रोन क्रांती येत आहे, त्याचे नेतृत्व आमच्या गावातील भगिनीच करत आहेत. नमो ड्रोन दीदी अभियानामुळे गावातील भगिनींचे मनोबल उंचावत आहे, त्यांची कमाई वाढत आहे, आणि त्यांना गावात नवी ओळख मिळत आहे.
मित्रहो,
आज आपल्या कन्या मोठ्या संख्येने शास्त्रज्ञ, डॉक्टर, इंजिनिअर आणि वैमानिक बनत आहेत. आपल्याकडे विज्ञान आणि गणित शिकणाऱ्या मुलींची संख्या सातत्याने वाढत आहे. आज, आपल्या सर्व प्रमुख अंतराळ मोहिमांमध्ये, आपल्या माता, भगिनी आणि कन्या मोठ्या संख्येने शास्त्रज्ञ म्हणून काम करत आहेत. चांद्रयान-3 मोहिमेचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. चांद्रयान 3 मोहिमेत 100 हून अधिक महिला शास्त्रज्ञ आणि अभियंता सहभागी झाल्या होत्या. हा स्टार्ट-अप्सचा काळ आहे, आमच्या कन्या स्टार्ट-अप्सच्या क्षेत्रातही असामान्य काम करत आहेत. देशातील जवळजवळ पंचेचाळीस टक्के स्टार्ट अप्समध्ये, किमान एक संचालक आपली माता, भगिनी अथवा कन्या असते. आणि ही संख्या सातत्याने वाढत आहे.
मित्रहो,
आमचा असा प्रयत्न आहे की, धोरण निर्मितीत देशाच्या कन्यांचा सहभाग सातत्त्याने वाढत राहावा. गेल्या दशकभरात या संदर्भात एकापाठोपाठ एक अनेक पावले उचलण्यात आली आहेत. आमच्या सरकारमध्ये पहिल्यांदाच पूर्णवेळ महिला संरक्षण मंत्री बनली. पहिल्यांदाच एक महिला देशाच्या अर्थमंत्री झाल्या. पंचायतीपासून ते संसदेपर्यंत महिलांची संख्या सातत्त्याने वाढत आहे. यावेळी 75 खासदार महिला आहेत, आणि हा सहभाग आणखी वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
नारी शक्ती वंदन अधिनियमामागेही हीच भावना आहे. हा कायदा वर्षानुवर्षे लागू झाला नव्हता, पण आमच्या सरकारने तो मंजूर केला. आता संसद आणि विधानसभेत महिला आरक्षणाला पुष्टी मिळाली आहे. सांगायचे तात्पर्य म्हणजे भाजप सरकार आपल्या भगिनी आणि लेकींना प्रत्येक स्तरावर, प्रत्येक क्षेत्रात सक्षम बनवत आहे.
मित्रहो,
भारत हा संस्कृती आणि परंपरेने समृद्ध देश आहे. आणि सिंदूर हे आपल्या परंपरेतील नारी शक्तीचे प्रतीक आहे. रामाच्या भक्तीत रमलेले हनुमानजींनी देखील सिंदूर धारण केलेला आहे. आपण शक्तीपूजेत सिंदूर अर्पण करतो. आणि हा सिंदूर आता भारताच्या शौर्याचे प्रतीक बनला आहे.
मित्रहो,
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केवळ भारतीयांचे रक्त सांडले नाही तर त्यांनी आपल्या संस्कृतीवरही आघात केला आहे. त्यांनी आपल्या समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दहशतवाद्यांनी भारताच्या नारी शक्तीला आव्हान दिले आहे. हे आव्हान दहशतवाद्यांसाठी आणि त्यांच्या मालकांसाठी काळ ठरले आहे. ऑपरेशन सिंदूर ही भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी आणि सर्वात यशस्वी दहशतवादविरोधी कारवाई आहे. ज्या ठिकाणी पाकिस्तानच्या सशस्त्र दलांनी भारतीय कारवाईची कल्पनाही केली नव्हती, अशा ठिकाणचे दहशतवादी तळ भारताने उद्ध्वस्त केले. त्यांनी शेकडो किलोमीटर आत घुसून त्यांना उद्ध्वस्त केले. दहशतवादाच्या छुप्या युद्धाला आता खपवून घेतले जाणार नाही हे ऑपरेशन सिंदूरने स्पष्ट केले आहे. आता घरात घुसूनही मारू आणि दहशतवाद्यांना पाठबळ देणाऱ्यांना त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल. आता भारतातील प्रत्येक नागरिक म्हणत आहे, 140 कोटी देशवासीयांचा बुलंद आवाज म्हणत आहे - जर तुम्ही गोळी झाडली तर समजून जा की गोळीचे प्रत्युत्तर तोफेच्या गोळ्याने मिळेल.
मित्रहो,
ऑपरेशन सिंदूर हे आपल्या नारी शक्तीच्या शौर्याचे देखील प्रतीक बनले आहे. या कारवाईत बीएसएफने बजावलेली महत्वपूर्ण भूमिका आपण सर्वजण जाणतोच. जम्मूपासून पंजाब, राजस्थान आणि गुजरातच्या सीमेपर्यंत, मोठ्या संख्येने आमच्या बीएसएफच्या महिला कर्मचारी आघाडीवर होत्या, आघाडी सांभाळत होत्या. त्यांनी सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. कमांड अँड कंट्रोल सेंटरपासून ते शत्रूच्या चौक्या नष्ट करण्यापर्यंत, बीएसएफच्या शूर कन्यांनी अद्भुत शौर्य दाखवले आहे.
मित्रहो,
आज राष्ट्रीय संरक्षणात भारताच्या कन्यांची क्षमता जग अनुभवत आहे. यासाठीही गेल्या दशकात सरकारने अनेक पावले उचलली आहेत. शाळेपासून ते युद्धभूमीपर्यंत, आज देशाला आपल्या लेकींच्या शौर्यावर अभूतपूर्व विश्वास आहे. पहिल्यांदाच आपल्या लष्कराने मुलींसाठी सैनिक शाळांचे दरवाजे खुले केले आहेत. 2014 पूर्वी एनसीसीच्या कॅडेट्स मध्ये फक्त 25 टक्क्यांपर्यंत मुली असायच्या, आज त्यांची संख्या 50 टक्क्यांवर पोहोचत आहे. काल देशात आणखी एक नवा इतिहास रचला गेला. आज तुम्ही वर्तमानपत्रात वाचले असेलच की, राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजेच एनडीएमधून महिला कॅडेट्सची पहिली तुकडी उत्तीर्ण झाली आहे. महिला आता, लष्कर, नौदल आणि हवाई दलात उच्च पदांवर कार्यरत आहेत. आज, लढाऊ विमानांपासून ते आयएनएस विक्रांत युद्धनौकांपर्यंत, महिला अधिकारी त्यांचे शौर्य गाजवत आहेत.
मित्रहो,
आपल्या नौदलाच्या शूर कन्यांच्या शौर्याचे एक अलीकडील उदाहरण देखील देशासमोर आहे. मी तुम्हाला नाविका सागर परिक्रमा बद्दल सांगू इच्छितो. नौदलाच्या दोन शूर कन्यांनी सुमारे 250 दिवसांचा सागरी प्रवास पूर्ण करताना जग प्रदक्षिणा घातली आहे. त्यांनी हजारो किलोमीटरचा हा प्रवास मोटारीवर चालणाऱ्या नावेतून नव्हे तर वाऱ्यावर चालणाऱ्या नौकेतून केला आहे. कल्पना करा, समुद्रात 250 दिवस, इतके दिवस समुद्रात राहून, अनेक आठवडे जमीन दृष्टीपथात नसताना आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समुद्रातील वादळ किती तीव्र असते ते आपण जाणतोच; खराब हवामान असो, भयानक वादळ असो, त्यांनी प्रत्येक अडचणीवर मात केली आहे. आव्हान कितीही मोठे असले तरी, भारताच्या कन्या त्यावर मात करू शकतात हेच यातून प्रतीत होते.
मित्रहो,
नक्षलवाद्यांविरुद्धच्या कारवाया असोत किंवा सीमापार दहशतवाद असो, आज आपल्या कन्या भारताच्या सुरक्षेची ढाल बनत आहेत. आज, अहिल्यादेवींच्या या पावन भूमीवरून, मी पुन्हा एकदा देशाच्या नारीशक्तीला वंदन करतो.
मित्रहो,
देवी अहिल्या यांनी त्यांच्या कारकिर्दीत विकासकामांसह वारसाही जपला. आजचा भारत देखील विकास आणि वारसा दोन्हीच्या साथीने वाटचाल करत आहे. आजचा कार्यक्रम म्हणजे देश आधुनिक पायाभूत सुविधांच्या बांधकामाला कसा वेग देत आहे याचे उदाहरण आहे. आज मध्य प्रदेशमध्ये पहिली मेट्रो सुविधा उपलब्ध झाली आहे. इंदूरने याआधीच स्वच्छतेचा ठसा जगात उमटवला आहे. आता इंदूर हे मेट्रोसाठीही ओळखले जाणार आहे. येथे भोपाळमध्येही मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. मध्य प्रदेशात रेल्वेच्या क्षेत्रात व्यापक काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने रतलाम-नागदा मार्गाचे चौपदरीकरण करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे या प्रदेशात अधिक गाड्या धावतील आणि गर्दी कमी होईल. केंद्र सरकारने इंदूर-मनमाड रेल्वे प्रकल्पालाही मान्यता दिली आहे.
मित्रहो,
आज मध्य प्रदेशातील दतिया आणि सतना देखील हवाई प्रवास नेटवर्कशी जोडले गेले आहेत. या दोन विमानतळांवरून बुंदेलखंड आणि विंध्य प्रदेशातील हवाई संपर्क सुधारेल. आता माँ पितांबरा, माँ शारदा देवी आणि पवित्र चित्रकूट धाम यांचे दर्शन घेणे अधिक सुलभ होईल.
मित्रहो,
आज भारत इतिहासाच्या एका अशा वळणावर आहे जिथे आपल्याला आपली सुरक्षा, आपली ताकद आणि आपली संस्कृती अशा प्रत्येक पातळीवर काम करायचे आहे. आपल्याला अधिक कष्ट घ्यावे लागतील. यामध्ये आपल्या मातृशक्तीची, आपल्या माता-भगिनी-कन्यांची महत्वपूर्ण भूमिका आहे. आपल्याला लोकमाता देवी अहिल्याबाईजींची प्रेरणा आहे. राणी लक्ष्मीबाई, राणी दुर्गावती, राणी कमलापती, अवंतीबाई लोधी, कित्तूरची राणी चेन्नम्मा, राणी गायदिनलू, वेळू नाचियार, सावित्रीबाई फुले, अशी प्रत्येक नावे आपल्याला अभिमानास्पद आहेत. लोकमाता अहिल्याबाईंची ही 300 वी जयंती आपल्याला सदैव प्रेरणा देत राहो, आपण येणाऱ्या शतकांसाठी एका सक्षम भारताचा पाया बळकट करू या, या शुभेच्छांसह मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. तुमच्याकडचा तिरंगा उंच करून माझ्यासोबत म्हणा -
भारत माता की जय!
भारत माता की जय!
भारत माता की जय!
वंदे मातरम!
वंदे मातरम!
वंदे मातरम!
वंदे मातरम!
वंदे मातरम!
वंदे मातरम!
वंदे मातरम!
वंदे मातरम!
वंदे मातरम!
***
S.Tupe/S.Patil/A.Save/R.Agashe//V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2133134)