पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

जिनिव्हा येथे आयोजित जागतिक आरोग्य सभेच्या 78 व्या सत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित


‘आरोग्यासाठी एक विश्व’ ही यावर्षीच्या जागतिक आरोग्य सभेची संकल्पना, जागतिक आरोग्याबाबत भारताने पाहिलेल्या स्वप्नाशी सुसंगत : पंतप्रधान

निरोगी विश्वाचे भवितव्य समावेशकता, एकात्मिक दूरदृष्टी आणि सहयोगावर अवलंबून : पंतप्रधान

सर्वात असुरक्षित असणाऱ्यांची आपण किती उत्तम काळजी घेतो यावर जगाचे आरोग्य अवलंबून : पंतप्रधान

ग्लोबल साऊथ देश आरोग्यविषयक आव्हानांमुळे विशेषत्वाने प्रभावित झाले आहेत, भारताचा दृष्टीकोन अनुकरणीय, प्रमाणबद्ध आणि शाश्वत प्रारूप देऊ करतो: पंतप्रधान

जून महिन्यात 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन येत आहे,‘एक वसुंधरा, एक आरोग्य यासाठी योग’ ही यावर्षीची संकल्पना आहे : पंतप्रधान

निरोगी पृथ्वीची उभारणी करताना, कोणीही मागे राहून जाणार नाही याची सुनिश्चिती करूया: पंतप्रधान

Posted On: 20 MAY 2025 6:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 मे 2025

जिनिव्हा येथे आयोजित जागतिक आरोग्य सभेच्या 78 व्या सत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सर्व उपस्थितांना हार्दिक शुभेच्छा देऊन सभेच्या यावर्षीच्या ‘आरोग्यासाठी एक विश्व’ या संकल्पनेला अधोरेखित करत ही संकल्पना जागतिक आरोग्याबाबत भारताने पाहिलेल्या स्वप्नाशी सुसंगत आहे, यावर भर दिला.वर्ष 2023 मध्ये जागतिक आरोग्य सभेत आपण ‘एक वसुंधरा, एक आरोग्य’ संकल्पनेविषयी बोललो होतो अशी आठवण उपस्थितांना करून देत पंतप्रधान म्हणाले की, समावेशकता, एकात्मिक दूरदृष्टी आणि सहयोग यांच्यावर निरोगी विश्वाचे भवितव्य अवलंबून असते

समावेशकता ही भारताच्या आरोग्यविषयक सुधारणांच्या केंद्रस्थानी आहे हे ठळकपणे सांगून पंतप्रधान मोदी यांनी आयुष्मान भारत या जगातील सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेवर अधिक प्रकाश टाकला. या योजनेद्वारे 580 दशलक्ष लोकांना आरोग्य विमा संरक्षण मिळाले असून त्यांना मोफत उपचाराची सुविधा मिळाली आहे. नुकताच या योजनेचा विस्तार करून आता 70 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या सर्व भारतीय नागरिकांना सदर योजनेत सामावून घेण्यात आले आहे.  हजारो आरोग्य आणि निरामय केंद्रांच्या व्यापक जाळ्याकडे लक्ष वेधून ते म्हणाले की या केंद्रांमुळे कर्करोग, मधुमेह आणि रक्तदाब यांसारख्या आजारांची  लवकर तपासणी तसेच निदान सोपे झाले आहे. जनतेला उत्तम गुणवत्तेची औषधे कमी दरात उपलब्ध करून देणाऱ्या हजारो जन औषधी केंद्रांची भूमिका देखील त्यांनी अधोरेखित केली.

आरोग्यविषयक परिणामांमध्ये सुधारणा घडवून आणण्यातील तंत्रज्ञानाची भूमिका स्पष्ट करताना मोदी यांनी गर्भवती महिला आणि मुलांच्या लसीकरणाचा मागोवा घेणारा डिजिटल मंच तसेच  वैशिष्ट्यपूर्ण  डिजिटल आरोग्य ओळख प्रणाली यासारखे भारतातील डिजिटल उपक्रम‌ अधोरेखित केले, ज्यामुळे लाभ, विमा, नोंदी आणि माहिती एकत्रित करण्यास मदत होते .  टेलिमेडिसिनमुळे कोणताही रुग्ण आता डॉक्टरपासून वंचित  राहू शकत नाही, असे त्यांनी नमूद केले.  त्यांनी भारताच्या मोफत टेलिमेडिसिन सेवेवर प्रकाश टाकला, ज्यामुळे 340 दशलक्षाहून अधिक सल्लामसलती शक्य झाल्या आहेत. भारताच्या आरोग्य उपक्रमांच्या सकारात्मक परिणामांविषयी बोलताना‌ त्यांनी एकूण आरोग्य खर्चाची टक्केवारी म्हणून खिशाबाहेरील खर्चात लक्षणीय घट झाल्याचे नमूद केले. त्याच वेळी त्यांनी सरकारी आरोग्य खर्चात लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट केले.

"जगाचे आरोग्य हे आपण सर्वात असुरक्षित लोकांची किती चांगली काळजी घेतो यावर अवलंबून असते", असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले, ग्लोबल साऊथ क्षेत्र आरोग्य आव्हानांमुळे विशेषत्वाने प्रभावित आहे, असे त्यांनी सांगितले आणि भारताचा दृष्टिकोन अनुकरणीय, प्रमाणबद्ध  आणि शाश्वत प्रारूप उपलब्ध करतो यावर त्यांनी भर दिला. त्यांनी भारताचे शिक्षण आणि सर्वोत्तम पद्धती जगासोबत, विशेषतः ग्लोबल साउथसोबत सामायिक करण्याची तयारी दर्शविली. जूनमध्ये होणाऱ्या 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी जागतिक सहभागाला प्रोत्साहन दिले. त्यांनी या वर्षीची संकल्पना 'एक पृथ्वी, एक आरोग्य यासाठी योग' यावर प्रकाश टाकला आणि योगाचे जन्मस्थान म्हणून भारताची भूमिका स्पष्ट करत सर्व देशांना आमंत्रण दिले.

पंतप्रधान मोदी यांनी जागतिक आरोग्य संघटना (डब्लू एच ओ) आणि सर्व सदस्य राष्ट्रांचे आयएनबी कराराच्या यशस्वी वाटाघाटींबद्दल अभिनंदन केले. ही जागतिक सहकार्याद्वारे भविष्यातील साथीच्या आजारांशी लढण्याची सामायिक वचनबद्धता असल्याचे वर्णन केले. कोणीही मागे राहणार नाही याची खात्री करताना निरोगी ग्रह निर्माण करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी वेदांमधील कालातीत प्रार्थना सांगितली, हजारो वर्षांपूर्वी भारतातील ऋषीमुनींनी, जिथे सर्वजण निरोगी, आनंदी आणि रोगमुक्त असतील, अशा जगासाठी प्रार्थना कशी केली होती, हे स्पष्ट केले. हा दृष्टिकोन‌ जगाला एकत्र आणेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 


S.Kakade/S.Chitnis/N.Mathure/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2130002)