संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ऑपरेशन सिंदूर ही केवळ लष्करी कारवाई नव्हती, तर ती भारताच्या राजकीय, सामाजिक आणि धोरणात्मक इच्छाशक्तीचे प्रतीक होती - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह


ऑपरेशन सिंदूरला हे, भारत जेव्हा जेव्हा दहशतवादाविरोधात कारवाई करतो, तेव्हा दहशतवादी आणि त्यांच्या म्होरक्यांसाठी सीमेपलीकडील भूमी देखील सुरक्षित ठिकाण नसते याचाच पुरावा

भारताच्या भूमीवर भारत विरोधी घटक तसेच दहशतवादी संघटनांमुळे आपल्या प्रियजनांना गमावलेल्या निष्पाप कुटुंबांना न्याय मिळेल याची सुनिश्चिती सशस्त्र दलांनी केली

राजनाथ सिंह यांच्या हस्ते आभासी पद्धतीने लखनऊमधील ब्रह्मोस एकात्मिकीकरण आणि चाचणी सुविधा केंद्राचे उद्घाटन

हे संकुल भारताच्या आत्मनिर्भरतेच्या प्रयत्नांना बळकटी देईल तसेच या प्रदेशाच्या सामाजिक - आर्थिक विकासात योगदान देईल

Posted On: 11 MAY 2025 2:36PM by PIB Mumbai

 

ऑपरेशन सिंदूर ही केवळ लष्करी कारवाई नव्हती, तर ती भारताच्या राजकीय, सामाजिक आणि धोरणात्मक इच्छाशक्तीचे प्रतीक होती असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. राजनाथ सिंह यांनी आज 11 मे, 2025 रोजी उत्तर प्रदेशातील लखनऊ इथे ब्रह्मोस एकात्मिकीकरण आणि चाचणी सुविधा केंद्राचे आभासी पद्धतीने उद्घाटन केले त्यावेळी ते बोलत होते. ही कारवाई म्हणजे दहशतवादाविरोधातील भारताच्या कणखर इच्छाशक्तीचे तसेच, भारताच्या भूमीवर भारत विरोधी घटक तसेच दहशतवादी संघटनांमुळे आपल्या प्रियजनांना गमावलेल्या निष्पाप कुटुंबांना न्याय मिळेल याची सुनिश्चिती करणाऱ्या, सशस्त्र दलांची क्षमता आणि निर्धाराची प्रचिती देणारी कारवाई होती अशा शब्दांत राजनाथ सिंह यांनी या कारवाईचे वर्णन केले.

A person in a vest sitting in front of a microphoneDescription automatically generated

ऑपरेशन सिंदूरला हे, भारत जेव्हा जेव्हा दहशतवादाविरोधात कारवाई करतो, तेव्हा दहशतवादी आणि त्यांच्या म्होरक्यांसाठी सीमेपलीकडील भूमी देखील सुरक्षित ठिकाण नसते याचाच पुरावा असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले. उरी इथल्या घटनेनंतरचा सर्जिकल स्ट्राईक, पुलवामा हल्ल्यानंतरचे हवाई हल्ले आणि आता पहलगाम हल्ल्यानंतरच्या अनेक हल्ल्यांमधून, भारताच्या भूमीवर दहशतवादी हल्ले झाल्यास भारत काय करू शकतो याचे दर्शन अवघ्या जगाला झाले असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेच्या धोरणाचा अवलंब करत, आजचा नवा भारत सीमेच्या दोन्ही बाजूंनी होणाऱ्या दहशतवादाविरोधात प्रभावी कारवाई करेल ही बाब स्पष्ट केली आहे असे त्यांनी सांगितले.

ही कारवाई केवळ पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करण्यासाठीच राबवली गेली, या कारवाईत निष्पाप नागरिकांना लक्ष्य करण्यात आले नव्हते ही बाबही त्यांनी ठळकपणे अधोरेखित केली. तरी देखील पाकिस्तानने मात्र भारतातील नागरी भागांना लक्ष्य केले आणि मंदिरे, गुरुद्वारा तसेच चर्चवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असे ते म्हणाले. आपल्या सशस्त्र दलांनी शौर्य आणि संयमाचे दर्शन घडवत पाकिस्तानच्या अनेक लष्करी तळांवर हल्ला करून सडेतोड उत्तर दिले असे ते म्हणाले. आपण केवळ सीमेजवळच्याच लष्करी तळांवर कारवाई केली नाही, तर आपल्या सशस्त्र दलांचा धडाका पाकिस्तानी लष्कराचे मुख्यालय असलेल्या रावळपिंडीपर्यंत पोहोचला असे  ते म्हणाले.

यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ब्रह्मोस एकात्मिकरण आणि चाचणी सुविधा केंद्राविषयी देखील माहिती दिली. हे केंद्र संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या भारताच्या प्रयत्नांना बळकटी देईल आणि मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करून या प्रदेशाच्या सामाजिक - आर्थिक विकासातही योगदान देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनीच होत असलेल हे उद्घाटन म्हणजे एक ऐतिहासिक क्षण आहे, यातून  भारताच्या वाढत्या नवोन्मेषी उर्जेचे प्रतिबिंब उमटले आहे तसेच ही घडमोड  अतिमहत्त्वाच्या, अत्याधुनिक आणि आघाडीच्या तंत्रज्ञानात वेगाने होत असलेल्या जागतिक बदलांशी सुसंगत घडमोड असल्याचे ते म्हणाले.

A person sitting at a desk with two flagsDescription automatically generated

ब्रह्मोसला म्हणजे केवळ जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांपैकी एक नाही, तर ते भारतीय सशस्त्र दलांच्या सामर्थ्याचा संदेश आहे, तो शत्रूंना रोखणारा संदेश आहे तसेच देशाच्या सीमांचे रक्षण करण्याच्या अतूट वचनबद्धतेचा संदेश आहे असे ते म्हणाले. ब्रह्मोस म्हणजे भारत आणि रशियाच्या उच्च संरक्षण तंत्रज्ञानाचा मिलाफ असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

'जोपर्यंत भारत जगासमोर उभा राहणार नाही, तोपर्यंत कोणीही आपला आदर करणार नाही. या जगात भीतीला कोणतेही स्थान नाही, केवळ सामर्थ्यच सामर्थ्याचा आदर करते' असे भारताचे क्षेपणास्त्र पुरुष अर्थात Missile Man आणि माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी म्हटले असल्याचा दाखला त्यांनी दिला. आणि आज भारत जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्रांपैकी एक आहे आणि हे केंद्र भारताची ताकद आणखी वाढवण्यात मदतीचे ठरेल असे त्यांनी सांगितले.

हे सुविधा केंद्र उत्तर प्रदेश संरक्षण औद्योगिक कॉरिडॉर (UPDIC) साठी अभिमानाची बाब असल्याचेही राजनाथ सिंह म्हणाले. या केंद्राच्या माध्यमातून या पूर्वीच सुमारे 500 प्रत्यक्ष आणि 1,000 अप्रत्यक्ष रोजगार निर्माण झाले आहेत, यातून संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून राज्याची वाढत्या स्थानाची प्रचिती येते असे ते म्हणाले. राज्याला (उत्तर प्रदेश) जगातील सर्वोच्च संरक्षण उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचे केंद्र सरकारचे ध्येय आहे, त्याला अनुसरूनच  ध्येयावर आधारित आहे, या कॉरिडॉरची स्थापना करावी असा दृष्टीकोन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने बाळगला ही बाबही राजनाथ सिंह यांनी ठळकपणे अधोरेखित केली.

उत्तर प्रदेश संरक्षण औद्योगिक कॉरिडॉर अंतर्गत आतापर्यंत 34,000 कोटी रुपयांच्या प्रस्तावित गुंतवणुकीसह एकूण 180 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत, तसेच  4,000 कोटी रुपयांची गुंतवणूकही या पूर्वीच झाली असल्याची माहिती त्यांनी दिली.  विमान उत्पादन, यूएव्ही, ड्रोन, दारुगोळा, मिश्रीत आणि अतिमहत्वाचे घटक, लहान शस्त्रास्त्रे, वस्त्रोद्योग आणि पॅराशूट या क्षेत्रात मोठी गुंतवणूक आली असल्याचे त्यांनी सांगितले. या गुंतवणुकीत सार्वजनिक आणि खाजगी अशा दोन्ही क्षेत्रांचा सहभाग असल्याची बाबही त्यांनी ठळकपणे अधोरेखित केली. त्याअंतर्गत लखनऊमध्येच, पीटीसी इंडस्ट्रीज लिमिटेडद्वारे टायटॅनियम आणि सुपर अलॉय मटेरियल प्रकल्प सुरू केले जात आहेत. याशिवाय अतिरिक्त सात महत्त्वाच्या प्रकल्पांचीही पायाभरणी केली जात आहे. यामुळे संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता साध्य करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना गती मिळू शकेल असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

यावेळी राजनाथ सिंह यांनी 'मेक-इन-इंडिया, मेक-फॉर-द-वर्ल्ड' हा केंद्र सरकारचा दृष्टीकोनही पुन्हा अधोरेखित केला. आत्मनिर्भरतेचा अर्थ केवळ भारताच्या स्वतःच्या सुरक्षा गरजा पूर्ण करण्यासाठी निर्मिती करण्यापुरता मर्यादीत नाही, तर त्याबरोबरीनेच देशाला जागतिक बाजारपेठेत संरक्षण उपकरणांचा प्रमुख निर्यातदार देश बनवणे असा याचा अर्थ असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अलीकडील अहवालाचा संदर्भ देत त्यांनी 2024 मध्ये जागतिक लष्करी खर्च 2,718 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढला असल्याचे सांगितले. इतकी मोठी बाजारपेठ म्हणजे एक संधी असून  भारताने ती साधली पाहिजे असे ते म्हणाले. ब्रह्मोस सुविधा केंद्राचे उद्घाटन हे भारताला जागतिक संरक्षण उत्पादन परिसंस्थेतील एक महत्त्वाचा देश बनवण्याच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकार, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) अर्थात डीआरडीओचे शास्त्रज्ञ, अभियंते आणि इतर भागधारकांनी केवळ 40 महिन्यांच्या आत प्रकल्प पूर्ण केल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. सध्याची परिस्थितीत, आपण  कार्यक्षमतेने आणि कालबद्ध रितीने आपली ध्येये साध्य करणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. विकास विषयक एक मजबूत परिसंस्था तयार केल्याबद्दल तसेच उत्तर प्रदेश संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरची स्थापना, लखनऊमधील डीआरडीओचे संरक्षण तंत्रज्ञान आणि चाचणी केंद्र स्थापना आणि 2020 मध्ये संरक्षणविषयक प्रदर्शनाचे आयोजन (DefExpo) अशा  उपक्रमांची अंमलबजावणी हे  इथल्या राज्य सरकारचे श्रेय असल्याचे म्हणत त्यांनी राज्य सरकारचे कौतुकही केले.

या कार्यक्रमाच्या उद्घाटनस्थळावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उपस्थितांना संबोधित केले. आपल्या संबोधनातून त्यांनी लखनऊला संरक्षण उत्पादन केंद्र बनवण्याचे ध्येय पुढे नेल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे आभार मानले. लखनऊमधील हे सुविधा केंद्र मेक-इन-इंडिया उपक्रम, आत्मनिर्भरता आणि संरक्षण उत्पादन क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी योगी आदित्यनाथ यांनी संरक्षण विषयक उत्पादनाला चालना देण्यासाठी राज्य सरकार राबवत असलेल्या उपक्रमांचीही माहिती दिली. उत्तर प्रदेश संरक्षण औद्योगिक कॉरिडॉर सर्व सहा केंद्राअंतर्गत वेगाने कामे सुरू आहेत असे त्यांनी सांगितले. संरक्षण उत्पादन क्षेत्राअंतर्गत राज्यात स्थापन होत असलेल्या सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही क्षेत्रातल्या उद्योगांसह, विविध प्रकल्पांची माहितीही योगी आदित्यनाथ यांनी दिली.

ऑपरेशन सिंदूरने अवघ्या जगाला आता भारत दहशतवाद सहन करणार नाही असा स्पष्ट संदेश दिला, अशा शब्दांत त्यांनी या कारवाईचे महत्व अधोरेखित केले. आता दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही, असे ते म्हणाले.

लखनऊमधील ब्रह्मोस एकात्मिकरण आणि चाचणी सुविधा केंद्र एकूण 200 एकर क्षेत्रात विस्तारले आहे. या केंद्रात बूस्टर उप-असेंब्ली, एव्हियोनिक्स, प्रोपेलंट, रामजेट इंजिनचे एकात्मिकरण घडवून आणले जाईल. या केंद्राच्या संकुलाच्या संरचनेत डिझाइन आणि प्रशासकीय इमारतीसह उपक्रम केंद्राचीही नियोजनात्मक आखणी केली गेली आहे.

या संकुलाच्या उभारणीसाठी अंदाजे 300 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. या संकुलामुळे दीर्घकालीन परिप्रेक्षात संरक्षण उद्योग क्षेत्र आणि संबंधित उद्योजकांसाठी कौशल्य विकासाचा मार्ग प्रशस्तर होणार आहे. या संकुलाला पाठबळ देण्याच्या उद्देशाने संकुलाच्या आसपास सहाय्यक आणि सब - असेंब्लीची संपूर्ण संरक्षण विषयक परिसंस्था विकसित केली जाणार आहे. हे केंद्र भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे विद्यार्थी, पर्यवेक्षक, अभियंत्यांना तसेच  विद्यार्थ्यांच्या औद्योगिकीकरणाची प्रक्रिया आणि कौशल्य विकासात मोठ्या प्रमाणात मदतीचे ठरणार आहे.  यामुळे लोकांना नोकरीच्या संधी शोधण्यासाठी स्थलांतर करण्याची गरज उरणार नाही याचीही सुनिश्चिती केली जाणार आहे.

A person holding a small objectDescription automatically generated

ब्रह्मोस एरोस्पेसने या सुविधा केंद्राच्या कार्यान्वयनासाठी 36 प्रशिक्षणार्थींची निवड केली आहे. नव्याने निवड झालेल्या या प्रशिक्षणार्थींपैकी पाच जणांचा मुख्यमंत्री उत्तर प्रदेश यांच्या हस्ते उद्घाटनाच्या कार्याक्रमाचा भाग म्हणून सत्कारही केला.

उत्तर प्रदेशाचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रिजेश पाठक, मुख्य सचिव मनोज कुमार सिंह, संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव तचेस डीआरडीओ  अध्यक्ष डॉ. समीर व्ही कामत, ब्रह्मोसचे महासंचालक डॉ. जयतीर्थ आर जोशी, लोकप्रतिनिधी आणि केंद्र तसेच राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

***

M.Jaybhaye/T.Pawar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2128143) Visitor Counter : 2