अर्थ मंत्रालय
केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली इंटरनेट बँकिंग आणि यूपीआय सारख्या डिजिटल अॅप्लीकेशन्स सह बँकिंग क्षेत्राच्या परिचालनात्मक आणि सायबर सुरक्षा तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक संपन्न
बँकिंग आणि वित्तीय सेवा अखंड सुरु ठेवून सर्व बँकांनी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा अथवा संकटाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सतर्क आणि सज्ज रहावे असे केंद्रीय मंत्री सीतारामन यांचे निर्देश
बँकांनी सीमाभागातील शाखांमध्ये काम करणारे बँक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी असे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांचे निर्देश
Posted On:
09 MAY 2025 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मे 2025
सीमाभागातील तणावामुळे निर्माण झालेल्या सुरक्षा विषयक चिंतेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँका आणि विमा कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेतली.
वित्तीय सेवा विभाग (डीएफएस), अर्थ मंत्रालय, सीईआरटी-इन, आरबीआय, आयआरडीएआय आणि एनपीसीआय चे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत इंटरनेट बँकिंग आणि यूपीआय सारख्या डिजिटल अॅप्लीकेशन्स सह बँकिंग क्षेत्राच्या परिचालनात्मक आणि सायबर सुरक्षा तयारीचा आढावा घेण्यावर या बैठकीत भर देण्यात आला.

सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सर्व बँका आणि विमा कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांना आपण करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. संपूर्ण बँकिंग व्यवस्थेत सायबर सुरक्षेच्या उपाययोजना अधिक कडक करण्यात आल्याची माहिती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली. मोठ्या प्रमाणातील सायबर हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी बँकांकडून अँटी डीडीओएस (डिस्ट्रिब्युटेड डिनायल-ऑफ-सर्व्हिस) प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. संस्थात्मक सज्जतेची हमी देण्यासाठी उच्च स्तरावर सायबर सुरक्षा आणि आपत्ती निवारणाच्या परिस्थितीचा समावेश असलेल्या मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले आहे. फिशिंगच्या प्रयत्नांवर सक्रियपणे लक्ष ठेवले जात आहे आणि कर्मचाऱ्यांची जागरूकता वाढवण्यासाठी त्यांना अंतर्गत स्तरावर अनेक अलर्ट (धोक्याच्या सूचना) पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
बँक अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांचे सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर (एसओसी) आणि नेटवर्क ऑपरेशन सेंटर पूर्णपणे कार्यरत असून, ती सतर्क आहेत. ही केंद्रे सीईआरटी-इन आणि नॅशनल क्रिटिकल इन्फर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोटेक्शन सेंटर (एनसीआयआयपीसी) यांच्याशी समन्वय साधत काम करत असून, अद्ययावत डेटा शेअरिंग आणि थ्रेट मॉनिटरिंगची (धोका ओळखणे) सुविधा उपलब्ध करत आहेत.
या बैठकीत सीतारामन यांनी वाढता भूराजकीय तणाव आणि आव्हानात्मक काळात आर्थिक स्थैर्य राखण्यात बँकिंग आणि वित्तीय क्षेत्राच्या महत्वाच्या भूमिकेवर भर दिला. सर्व बँकांनी कोणत्याही परिस्थितीचा अथवा संकटाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सतर्क आणि सज्ज रहावे, आणि देशभरातील, विशेषत: सीमावर्ती भागातील नागरिकांना अखंड बँकिंग आणि वित्तीय सेवा पुरवाव्यात असे निर्देश केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिले. प्रत्यक्ष आणि डिजिटल अशा दोन्ही प्रकारच्या बँकिंग सेवा व्यत्यय अथवा अडथळ्यांशिवाय कार्यरत रहाव्यात आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपत्कालीन प्रोटोकॉल अद्ययावत करावेत आणि त्याची चाचणी घ्यावी, असे सीतारामन म्हणाल्या.

सीमाभागातील शाखांमध्ये काम करणारे बँक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेबाबत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली, आणि बँकांनी सुरक्षा संस्थांशी प्रभावीपणे समन्वय साधून त्यांना पुरेशी सुरक्षा पुरवावी असे निर्देश दिले. बँकांनी कोणत्याही परिस्थितीत नागरिक आणि व्यवसायांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच एटीएममध्ये अखंड रोकड उपलब्ध ठेवण्याला, सुरळीत यूपीआय आणि इंटरनेट बँकिंग सेवा तसेच आवश्यक बँकिंग सुविधा याला प्राधान्य द्यावे असे निर्देश त्यांनी दिले.
निर्मला सीतारमण यांनी बँकांना त्यांच्या सायबर सुरक्षा प्रणाली आणि डेटा सेंटरचे नियमित लेखापरीक्षण करण्याचे निर्देश दिले, तसेच सर्व डिजिटल आणि कोअर बँकिंग पायाभूत सुविधा पूर्णपणे संरक्षित आहेत आणि त्यांचे 24 तास निरीक्षण केले जात आहे याची खात्री करण्याचे निर्देश दिले. यामुळे कोणत्याही प्रकारे होणारे नियमांचे उल्लंघन किंवा कोणत्याही प्रतिकूल सायबर क्रियांना प्रतिबंध घालता येईल.
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बँकांना मुख्यालयात दोन समर्पित वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले, यापैकी एक अधिकारी सर्व सायबर-संबंधित बाबींची देखरेख करतील, तर दुसरे बँकेच्या शाखांचे कामकाज आणि एटीएममध्ये रोख रकमेची उपलब्धता यासह इतर कामकाजाच्या बाबींची देखरेख करतील. दोन्ही समर्पित अधिकारी कोणत्याही घटनेची तात्काळ CERT-In / संबंधित संस्था आणि वित्तीय सेवा विभागाकडे (DFS) माहिती द्यावी , असेही त्यांनी सांगितले.
या संदर्भात, बँकांना भारतीय रिझर्व्ह बँक, CERT-In आणि संबंधित सरकारी संस्थांशी तात्काळ समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, जेणेकरून माहितीची देवाणघेवाण आणि प्रतिसाद मजबूत आणि जलद गतीने होईल.

निर्मला सीतारामन यांनी विमा कंपन्यांना वेळेवर दाव्याचे निपटारे आणि अखंड ग्राहक सेवा सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले.
भारत सरकार राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक स्थिरतेसाठी दृढ वचनबद्ध आहे याचा निर्मला सीतारामन यांनी पुनरुच्चार केला. तसेच, देशाची बँकिंग आणि वित्तीय व्यवस्था मजबूत आणि लवचिक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
* * *
N.Chitale/Rajshree/Shraddha/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2128006)
Visitor Counter : 2