पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

‘खेलो इंडिया’च्या 7 व्या युवा क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधानांनी दूरदृश्‍य प्रणालीद्वारे केलेले भाषण

Posted On: 04 MAY 2025 11:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 मे 2025

 

बिहारचे मुख्यमंत्री  नितीश कुमार जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, मनसुख भाई, भगिनी रक्षा खडसे आणि रामनाथ ठाकूर जी, बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी जी आणि विजय कुमार सिन्हा जी, उपस्थित असलेले इतर मान्यवर पाहुणे, सर्व खेळाडू, प्रशिक्षक, इतर कर्मचारी आणि माझे प्रिय तरुण मित्र!

देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व खेळाडूंचे मी मनापासून स्वागत करतो - प्रत्येकजण एकमेकांपेक्षा अधिक चांगला आणि  प्रत्येकजण एकमेकांपेक्षा अधिक प्रतिभावान आहे.

मित्रांनो,

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा या  बिहारमधील विविध शहरांमध्ये स्पर्धा आयोजित केल्या जातील. पटना ते राजगीर, गया ते भागलपूर आणि बेगुसराय पर्यंत, 6,000  हून अधिक तरुण खेळाडू पुढील काही दिवसांत बिहारच्या या पवित्र भूमीवर आपला ठसा उमटवतील. आपली स्वप्ने आणि संकल्प सिद्धीस नेतील. मी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो. भारतातील क्रीडा प्रकार आता एक सांस्कृतिक ओळख म्हणून स्वतःला स्थापित करत आहेत. आणि भारतात आपली क्रीडा संस्कृती जितकी वाढेल तितकीच एक राष्ट्र म्हणून आपली ‘सॉफ्ट पॉवर’  वाढेल. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा म्हणजे, देशातील तरुणांसाठी क्रीडा क्षेत्रामध्ये एक महत्त्वाचे व्यासपीठ बनले आहे.

मित्रांनो,

कोणत्याही खेळाडूला त्यांची कामगिरी सुधारण्यासाठी, सतत स्वतःला  वेगवेगळ्या कसोट्यांवर सिध्‍द करावे लागते. यासाठी  अधिक सामने खेळणे आणि अधिक स्पर्धांमध्ये भाग घेणे आवश्यक असते. एनडीए सरकारने नेहमीच आपल्या धोरणांमध्ये याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. आज आपल्याकडे खेलो इंडिया विद्यापीठस्तरीय क्रीडा स्पर्धा, खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा, खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा  आणि खेलो इंडिया पॅरा स्पर्धा  आहेत. याचा अर्थ, देशभरात वेगवेगळ्या पातळीवर वर्षभर राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा नियमितपणे आयोजित केल्या जात आहेत. यामुळे आपल्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांची प्रतिभा चमकण्यास मदत होते. मी तुम्हाला क्रिकेट जगतातील  एक उदाहरण देतो. अलिकडेच, बिहारचा सुपुत्र असलेल्या वैभव सूर्यवंशीची आयपीएलमध्ये शानदार कामगिरी आपण पाहिली. इतक्या लहान वयात वैभवने एक जबरदस्त विक्रम रचला. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमागे अर्थातच त्याचे कठोर परिश्रम आहे, परंतु विविध पातळ्यांवर झालेल्या असंख्य सामन्यांमुळे त्याच्या प्रतिभेला उदयास येण्याची संधी मिळाली. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, तुम्ही जितके जास्त खेळाल तितके तुम्ही अधिक बहरता. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धे  दरम्यान, सर्व खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर खेळण्याचे बारकावे समजून घेण्याची संधी मिळेल आणि तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल.

मित्रांनो,

भारतात ऑलिंपिकचे आयोजन व्हावे हे प्रत्येक भारतीयाचे दीर्घकाळापासूनचे स्वप्न आहे. आज, भारत 2036  मध्ये ऑलिंपिकचे आयोजन करण्यासाठी प्रयत्नशील आहे

आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये भारताचे अस्तित्व बळकट करण्यासाठी आणि शालेय स्तरावरील क्रीडा प्रतिभेची ओळख तयार करण्यासाठी, सरकार शालेय स्तरापासूनच खेळाडूंना प्रशिक्षण देत आहे. खेलो इंडिया उपक्रमापासून ते टॉप्स (टार्गेट ऑलिंपिक पोडियम स्कीम) पर्यंत, या उद्देशासाठी एक संपूर्ण परिसंस्था विकसित करण्यात आली आहे. आज, बिहारसह देशभरातील हजारो खेळाडूंना याचा फायदा होत आहे. सरकार आपल्या खेळाडूंना नवनवीन  खेळ/क्रीडा प्रकार खेळण्‍याची संधी मिळावी आणि वेगवेगळे खेळ चांगले खेळता यावेत यासाठी अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यावरही लक्ष केंद्रित करत आहे. त्यामुळेच गतका, कलारीपयट्टू, खो-खो, मल्लखांब आणि अगदी योगासनासारख्या खेळांचाही खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. अलिकडच्या काळात, आपल्या खेळाडूंनी अनेक नवीन खेळांमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे. भारतीय खेळाडू आता वुशु, सेपाक- टकरा, पेन्चक-सीलाट, लॉन बॉल्स आणि रोलर स्केटिंग यासारख्या खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत, आपल्या महिला संघाने लॉन बॉल्समध्ये पदक जिंकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

मित्रांनो,

भारतातील क्रीडाविषयक पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यावरही सरकार लक्ष केंद्रित करत आहे. गेल्या दशकात, क्रीडा बजेटमध्ये  तिपटीने वाढ करण्यात आली आहे. यावर्षी, क्रीडा बजेट सुमारे 4,000 कोटी रुपये आहे. या अर्थसंकल्पातील एक महत्त्वाचा भाग क्रीडा पायाभूत सुविधांच्या विकासावर खर्च केला जात आहे. आज देशभरात एक हजाराहून अधिक खेलो इंडिया केंद्रे कार्यरत आहेत, त्यापैकी तीन डझनहून अधिक केंद्रे एकट्या बिहारमध्ये आहेत.

एनडीएच्या डबल इंजिनि गव्हर्नमेंट मॉडेलचा बिहारलाही फायदा होत आहे. राज्य सरकार स्वतःच्या पातळीवर अनेक योजनांचा विस्तार करत आहे. राजगीरमध्ये खेलो इंडिया स्टेट सेंटर ऑफ एक्सलन्सची/ राज्यस्तरीय उत्कृष्टता केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.

बिहारला बिहार क्रीडा विद्यापीठ आणि राज्य क्रीडा अकादमी सारख्या संस्था देखील देण्यात आल्या आहेत. पाटणा-गया महामार्गावर एक क्रीडा शहर बांधले जात आहे. बिहारच्या गावांमध्ये क्रीडा सुविधा विकसित केल्या जात आहेत. आता, खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा राष्ट्रीय क्रीडा नकाशावर बिहारची उपस्थिती आणखी भक्कम करेल.

मित्रांनो,

क्रीडा जगत आणि क्रीडा-संबंधित अर्थव्यवस्था आता केवळ खेळाच्या मैदानापुरती मर्यादित राहिलेली नाही. आज, ते तरुणांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराचे नवीन मार्ग निर्माण करत आहे. फिजिओथेरपी, डेटा अॅनालिटिक्स, क्रीडा तंत्रज्ञान, प्रसारण, ई-स्पोर्ट्स आणि व्यवस्थापन ही क्षेत्रे महत्त्वाची उप-क्षेत्रे म्हणून उदयास येत आहेत. आपले तरुण प्रशिक्षक, फिटनेस प्रशिक्षक, भरती एजंट, इव्हेंट मॅनेजर, क्रीडाक्षेत्राचे  वकील आणि क्रीडा माध्यम तज्ञ म्हणूनही करिअरचा विचार करू शकतात.

दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, स्टेडियम आता फक्त सामने खेळण्याचे ठिकाण राहिलेले नाही - ते हजारो रोजगाराच्या संधींचे स्रोत बनले आहे. क्रीडा उद्योजकतेच्या क्षेत्रातही तरुणांसाठी अनेक नवीन शक्यता दिसत आहेत. देशात स्थापन होत असलेली राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठे आणि नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण, यामुळे खेळांना मुख्य प्रवाहातील शिक्षणाचा भाग बनवण्यात आले आहे, या दोन्हींचा उद्देश केवळ उत्कृष्ट खेळाडूच नाही तर भारतातील उच्च दर्जाचे क्रीडा व्यावसायिक देखील निर्माण करणे आहे 

माझ्या तरुण मित्रांनो,

जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये खिलाडू वृत्ती असणे किती महत्त्वाची आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. खेळताना  आपण संघभावना जाणतो  आणि क्रीडा क्षेत्रात इतरांसोबत कसे पुढे जायचे हे शिकतो. तुम्ही मैदानावर तुमचे सर्वोत्तम दिले पाहिजे आणि एक भारत, श्रेष्ठ भारत (एक भारत, महान भारत) चे ‘ब्रँड अ‍ॅम्बेसेडर’ म्हणून आपली  भूमिका देखील मजबूत केली पाहिजे. मला खात्री आहे की,  तुम्ही बिहारहून अनेक अद्भुत आठवणी घेऊन परताल. बिहारच्या बाहेरून आलेल्या खेळाडूंनी लिट्टी-चोखाचा आस्वाद नक्की घ्यावा. बिहारमधील मखानाही तुम्हाला नक्कीच आवडेल.

मित्रांनो,

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमधून खिलाडू वृत्ती, खेळाची आणि देशभक्तीची  मजबूत भावना तुमच्यामध्‍ये निर्माण व्‍हावी, असे मला वाटते. या कामनेबरोबरच आज येथे 7 व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धे चे उद्घाटन झाल्याचे जाहीर करतो.

 

* * *

S.Bedekar/H.Kulkarni/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2127002) Visitor Counter : 7