पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

अंगोलाच्या राष्ट्रपतींसोबत घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत पंतप्रधानांनी केलेले निवेदन

Posted On: 03 MAY 2025 5:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 मे 2025

 

महामहीम, अध्यक्ष लोरेंसू

दोन्ही देशांचे प्रतिनिधी,

प्रसारमाध्यमांमधील सर्व सहकारी

नमस्कार!

बें विंदु!

मी राष्ट्रपती लोरेंसू आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे भारतात हार्दिक स्वागत करत आहे. हा एक ऐतिहासिक क्षण आहे. 38 वर्षांनी अंगोलाचे राष्ट्रपती भारत भेटीवर आले आहेत. त्यांच्या या भेटीमुळे केवळ भारत-अंगोला संबंधांना नवी दिशा आणि गती मिळत आहे, तर भारत आणि आफ्रिका यांच्यातील भागीदारीला देखील बळ मिळत आहे.

मित्रांनो,

यावर्षी भारत आणि अंगोला आपल्या राजनैतिक संबंधांचा 40 वा वर्धापनदिन साजरा करत आहेत. पण आमचे संबंध त्यापेक्षाही प्राचीन आहेत, अतिशय घनिष्ठ आहेत. ज्यावेळी अंगोला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संघर्ष करत होता, त्यावेळी भारत देखील संपूर्ण विश्वास आणि मैत्रीच्या भावनेने पाठिशी होता.

मित्रांनो,

आज, विविध क्षेत्रात आमचे घनिष्ठ सहकार्य आहे. भारत, अंगोलाचा खनिज तेल आणि वायूच्या सर्वात मोठ्या खरेदीदारांपैकी एक आहे. आम्ही आमच्या ऊर्जा भागीदारीला व्यापक बनवण्याचा निर्णय घेतला आहे. मला ही घोषणा करताना अतिशय आनंद होत आहे की, अंगोलाच्या सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी 200 दशलक्ष डॉलरच्या संरक्षण कर्जाला मंजुरी देण्यात आली आहे.  संरक्षण प्लेटफॉर्म्स ची दुरुस्ती आणि देखभाल आणि पुरवठा यावर देखील चर्चा झाली आहे. अंगोलाच्या सशस्त्र दलांना प्रशिक्षण देण्यामध्ये सहकार्य करण्यास आम्हाला आनंद होईल.

आमच्या विकासाच्या भागीदारीला पुढे  नेताना आम्ही डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, अंतराळ तंत्रज्ञान आणि क्षमता उभारणीत अंगोलासोबत आमच्या क्षमतांची भागीदारी करू. आज आम्ही आरोग्य सुविधा, डायमंड प्रोसेसिंग, खते आणि दुर्मिळ खनिजांच्या क्षेत्रातही आपल्या संबंधांना आणखी बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे. अंगोलामध्ये योग आणि बॉलिवुड ची लोकप्रियता आमच्या सांस्कृतिक संबंधांच्या मजबुतीचे प्रतीक आहे. आमच्या लोकांशी लोकांच्या संबंधांना बळकटी देण्यासाठी, आम्ही आमच्या युवा वर्गादरम्यान यूथ एक्स्चेंज कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

मित्रांनो,

आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सहभागी होण्याच्या अंगोलाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहोत. आम्ही अंगोलाला भारताच्या आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा आघाडी, बिग कॅट अलायन्स आणि जागतिक जैवइंधन आघाडी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी देखील आमंत्रित केले आहे.

मित्रांनो,

दहशतवाद हा मानवतेसाठी सर्वात मोठा धोका आहे,यावर आमचे एकमत आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांप्रती राष्ट्राध्यक्ष लॉरेन्सू आणि अंगोला देशवासीयांनी व्यक्त केलेल्या संवेदनांबद्दल मी त्यांचे आभार मानले. आम्ही दहशतवादी आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांविरुद्ध कठोर आणि निर्णायक कारवाई करण्यास वचनबद्ध आहोत. सीमापार दहशतवादाविरुद्धच्या आमच्या लढ्याला अंगोला देत असलेल्या पाठिंब्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो.

मित्रांनो,

140 कोटी भारतीयांच्या वतीने, मी अंगोलाला आफ्रिकन राष्ट्रसंघाच्या अध्यक्षपदासाठी शुभेच्छा देतो. भारताच्या जी-20 अध्यक्षपदादरम्यान आफ्रिकन राष्ट्रसंघाला जी-20 मध्ये कायमस्वरूपी सदस्यत्व मिळाले, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. भारत आणि आफ्रिकेतील देशांनी वसाहतवादी राजवटीविरुद्ध एकत्र आवाज उठवला होता. एकमेकांना प्रेरित केले होते. आज आम्ही ग्लोबल साऊथ गटातल्या देशांच्या हितांचे, त्यांच्या आशा, अपेक्षा आणि आकांक्षांचे प्रतिनिधित्व करणारा आवाज बनून एकत्र उभे आहोत.

गेल्या दशकात आफ्रिकेतील देशांशी आमच्या सहकार्याला गती मिळाली. आमचा परस्पर व्यापार जवळपास 100 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आहे. संरक्षण सहकार्य आणि सागरी सुरक्षेत प्रगती झाली आहे. गेल्या महिन्यात भारत आणि आफ्रिका यांच्यात पहिला नौदल सागरी सराव ‘ऐक्यम्’ आयोजित करण्यात आला. गेल्या 10 वर्षांत आम्ही आफ्रिकेत 17 नवीन दूतावास उघडले आहेत. आफ्रिकेसाठी 12 अब्ज डॉलरहून अधिकच्या कर्ज रेषांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच, आफ्रिकेतील देशांना 70 कोटी डॉलर्सची अनुदान सहाय्यता देण्यात आली आहे. आफ्रिकेतील 8 देशांमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रे उघडली गेली आहेत. भारत आफ्रिकेतील 5 देशांसोबत डिजिटल सार्वजिनिक सोयीसुविधांच्या क्षेत्रात सहकार्य करत आहे. कोणत्याही आपत्तीत आम्हाला आफ्रिकेतील लोकांसोबत खांद्याला खांदा लावून ‘प्रथम प्रतिसादकर्ता’ म्हणून काम करण्याचा सन्मान मिळाला आहे.

भारत आणि आफ्रिकन राष्ट्रसंघ हे प्रगतीतले भागीदार आहेत. आम्ही ग्लोबल साऊथचे आधारस्तंभ आहोत. मला विश्वास आहे की, अंगोलाच्या अध्यक्षपदाच्या काळात भारत आणि आफ्रिकन राष्ट्रसंघ यांच्यातील संबंध नवी उंची गाठतील.

सन्माननीय महोदय,

पुन्हा एकदा, मी आपले आणि आपल्या शिष्टमंडळाचे भारतात हार्दिक स्वागत करतो.

खूप खूप धन्यवाद.

ओब्रिगादु ( पोर्तुगीज भाषेत धन्यवाद).

 

* * *

H.Raut/Shailesh/Nikhilesh/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2126492) Visitor Counter : 18