माहिती आणि प्रसारण मंत्रालय
“डिजिटल रेडिओ हे भविष्यवादी माध्यम आहे; अॅनालॉग माध्यमाचेही सह-अस्तित्व असले पाहिजे”- वेव्हज 2025 मध्ये झालेल्या चर्चेतील काही मुद्दे
“उत्तम आशय, सहयोगी संबंध, परस्पर मंचाचा वापर करून केलेल्या जाहिराती रेडिओ माध्यमासाठी शुभ संकेत आहेत”
‘रेडिओची पुनर्कल्पना: डिजिटल युगातील भरभराट’- वेव्हज 2025 मधील समृद्ध करणारी चर्चा
Posted On:
02 MAY 2025 5:35PM
|
Location:
PIB Mumbai
मुंबई, 2 मे 2025
‘रेडिओची पुनर्कल्पना: डिजिटल युगातील भरभराट’ या विषयावर आधारित गटचर्चेने आज जागतिक स्तरावरील विविध विषय तज्ञांना आशयघन चर्चा करण्यासाठी वेव्हज 2025 च्या मंचावर एकत्र आणले.
यासाठी उपस्थित मान्यवर गट सदस्यांमध्ये कमर्शियल रेडिओच्या प्रणेत्या जॅकलिन बियरहॉर्स्ट, डिजिटल रेडिओ मोंडायलच्या (डीआरएम) अध्यक्ष रुग्झान्ड्रा ऑबरेजा, डीआरएमचे उपगटनेते अलेक्झांडर झिंक, प्रसारभारतीचे माजी सीईओ आणि डीप टेक फॉर भारत चे सह संस्थापक शशी शेखर वेम्पती तसेच प्रसारण तंत्रज्ञान सुप्रसिध्द व्यक्तिमत्त्व टेड लावेर्ती यांचा समावेश होता. रेड एफएमच्या संचालक तसेच सीओओ निशा नारायणन यांनी सदर चर्चेचे संचालन केले आणि आणि त्यातून रेडिओ प्रसारण उद्योगावर प्रभाव पाडणाऱ्या घटकांवर प्रकाश पडेल याची काळजी घेतली.
“डिजिटल रेडिओ हे भविष्यवादी माध्यम आहे; मात्र अॅनालॉग माध्यमाचेही सह-अस्तित्व असले पाहिजे”
जॅकलिन बियरहॉर्स्ट म्हणाल्या की डिजिटल रेडिओ हा भविष्यातील प्रमुख प्रकार असणार आहे कारण त्यातून अधिक दर्जेदार ध्वनी, अधिक विश्वसनीय संप्रेषण आणि बहुमाध्यम घटक समाविष्ट करून घेण्याची क्षमता असे अनेक फायदे मिळतात. “काही संदर्भांत, विशेषतः साधे संभाषण आणि मर्यादित डिजिटल पायाभूत सुविधा असलेल्या भागांमध्ये अॅनालॉग रेडिओ समर्पक ठरतो, डिजिटल प्रसारणाच्या देशेने बदल घडून येत आहे आणि तो यापुढेही होत राहणे अपेक्षित आहे,” त्यांनी मत मांडले. अॅनालॉग स्वरुपातून डिजिटल स्वरुपात परिवर्तन होण्यातून खर्च वाचतो असे मत यावेळी तज्ञांनी व्यक्त केले.
मात्र, दहशतवादी हल्ले, पूर इत्यादींसारख्या आपत्कालीन काळात जेव्हा डिजिटल नेटवर्क उपयोगी ठरत नाही तेव्हा प्रसारण हा अत्यंत महत्त्वाचा मदत घटक ठरतो याकडे जॅकलिन बियरहॉर्स्ट आणि अलेक्झांडर झिंक यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. या मुद्द्याबाबत मत मांडताना डीआरएमच्या अध्यक्ष रुग्झान्ड्रा ऑबरेजा म्हणाल्या की भारतातील 600,000 खेड्यांमध्ये पोहोचू शकलेल्या अॅनालॉग रेडिओचे जतन होणे महत्त्वाचे आहे. आपत्कालीन परिस्थितीत प्रसारण रेडिओ निसंशयपणे अधिक मोठ्या समूहापर्यंत पोहोचू शकतात असे मत तज्ञांनी यावेळी व्यक्त केले. “जुन्या तंत्रज्ञानांमध्ये व्यत्यय न आणता नव्या तंत्रज्ञानांची सुरुवात करणे आव्हानात्मक आहे,” रुग्झान्ड्रा ऑबरेजा म्हणाल्या.
रेडिओ संवादातील नवे 5 सी
जॅकलिन बियरहॉर्स्ट यांनी कॉन्शसनेस (सावधगिरी), क्लॅरीटी (स्पष्टता), कॉन्फिडन्स (आत्मविश्वास),कंट्रोल (नियंत्रण) आणि कॅपॅबिलिटी (कर्तुत्व) या पाच सी घटकांचा उल्लेख केला आणि त्यांना समृध्द होत जाणाऱ्या डिजिटल रेदिओ पायाभूत सुविधांच्या युगात अत्यावश्यक ठरणाऱ्या नव्या 5 सी घटकांशी जोडून घेतले. ते म्हणजे कव्हरेज (पोहोच), कंटेंट (आशय), कन्झ्युमर डिव्हाईसेस (ग्राहकांचे संच), कार (मोटरकार), कम्युनिकेशन (संवाद). जेथे रेडिओचे श्रोते आहेत अशा सुयोग्य क्षेत्रांमध्ये रेडिओ नेटवर्क कार्यरत होत आहे याची खात्री करून घेण्याचा सल्ला त्यांनी दिला.
या क्षेत्राची भरभराट होण्यासाठी एकत्रित प्रयत्न करताना श्रोत्यांच्या संख्येचे मोजमाप करणे हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. कोणत्याही प्रकारे गोपनीयतेचा भंग न करता श्रोत्यांची संख्या मोजण्यासाठी वापरण्यात येणारी वैशिष्ट्ये अंतर्भूत असलेल्या रेडिओप्लेयर आणि रेडिओ एफएमसारख्या रेडिओ अॅपच्या वापराबद्दल टेड लावेती यांनी माहिती दिली. असे कार्यक्रम आणि अॅप, नमुना सर्वेक्षणे आणि श्रवण डायऱ्या भारतातील मोठ्या प्रमाणात रेडिओ श्रोते असलेल्या भागांचे विश्लेषण करण्यासाठी वापरता येतील असा सल्ला त्यांनी दिला.
चांगला आशय, सहयोग, इतर मंचावरून होणारा प्रचार परिणामकारक ठरतो
‘कंटेंट इज किंग' - अर्थात कंटेट हा राजा आहे- हा या क्षेत्रातील यशाचा मंत्र आहे यावर तज्ज्ञांनी एकमत व्यक्त केले.निशा नारायणन यांनी वैविध्यपूर्ण प्रकारच्या आशयासाठी खाजगी एफएमना भरमसाठ परवाना शुल्काच्या समस्येचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. परिणामी, ज्या एफएम वाहिन्या मुख्यतः लोकप्रिय संगीताची गरज पूर्ण करतात त्यांना इतर गटात मोडणाऱ्या आशयापेक्षा तुलनेने कमी परवाना शुल्क आहे. रेड एफएमच्या सीओओंनी खाजगी एफएम वरील आशयात विविधता आणण्याची गरज मान्य केली.
चांगल्या, उपयुक्त आशयाचे मूल्य विशद करताना, जॅकलीन बियरहोर्स्ट यांनी ॲब्सोल्युट रेडिओ या ब्रिटिश डिजिटल रेडिओ केंद्राच्या यशोगाथेविषयी सांगितले , या केंद्रांने 70, 80 आणि 90 च्या दशकात श्रोत्यांसाठी फायदेशीर असलेल्या विविध शैक्षणिक आणि प्रचारात्मक क्रियाकलापांमध्ये सहभागी होण्याच्या जोडीला आर्थिक उत्पन्न मिळवून प्रगती साध्य केली होती.
डिजिटल रेडिओमध्ये श्राव्य आशयापेक्षा आणखीही काही गोष्टी आहेत - त्यात दृष्य आणि टेक्स्ट उपयोजने असून ती प्रेक्षकवर्ग वाढण्यासाठी फायद्याची आहेत, अलेक्झांडर झिंग यांनी डिजिटल रेडिओच्या या आणखी एका पैलूकडे लक्ष वेधले.
रेडिओचा श्रोतृवर्ग वाढण्यास परिसंस्थेने आधार देण्याची गरज टेड लॅव्हर्टी यांनी व्यक्त केली. त्यासाठी त्यांनी सांगितलेल्या काही उपायांमध्ये कमी किमतीची उपकरणे तयार करणे, अँड्रॉइडसारखे अनुकूल प्लॅटफॉर्म असणे अशा उपायांचा समावेश आहे. श्रोत्यांच्या विविध उपसमूहांना आकर्षित करण्यासाठी बाह्य हार्डवेअर घटकांच्या अस्तित्वाव्यतिरिक्त, आशयातील वैविध्य देखील महत्त्वाचे ठरते.
हवामान बदल आणि डिजिटल रेडिओ
डिजिटल रेडिओ अधिक कार्यक्षम मॉड्युलेशन तंत्रांचा वापर करून आणि सिंगल-फ्रिक्वेन्सी नेटवर्क सक्षम करून लक्षणीय ऊर्जा बचत साध्य करू शकतो. मात्र, एफएम स्टेशन बंद करणे शक्य नाही. जरी काही युरोपीय देशांनी एफएम स्टेशन पूर्णपणे बंद करून आणि संपूर्ण डिजिटायझेशन करण्याचा प्रयत्न केला असला तरी, ते योग्य नाही, असे रुक्सांद्रा ओब्रेजा म्हणाल्या. धोरणात्मक उपायांबाबत सरकारशी बोलताना व्यावसायिक रेडिओ स्टेशनच्या गरजा शोधणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सुचवले.

भारतातील रेडिओ उद्योग - परिसंस्था मजबूत करण्यासाठी वाव
युरोपमधील सार्वजनिक धोरणांनी डिजिटल रेडिओच्या उपलब्धतेचा फायदा घेतला आहे, असे रुक्सांद्रा ओब्रेजा यांनी सांगितले. कारमध्ये रेडिओ, मोबाईल फोन असणे, बाजारात रेडिओ सेट सहज उपलब्ध असणे ही त्या दिशेने महत्त्वाची पावले आहेत. भारतात डिजिटल रेडिओ कन्सोर्टियम तयार केले पाहिजे, असे तज्ञांचे मत असल्याचे त्या म्हणाल्या.
डिजिटल रेडिओ क्षेत्रासाठी भारत एक प्रेरक शक्ती आहे, असे रुक्सांद्रा ओब्रेजा म्हणाल्या. डिजिटल ते टेरेस्ट्रीयल रेडिओ महत्वाचे आहेत तसेच डिजिटल ते मोबाइल रेडिओ देखील महत्त्वाचे आहेत, असे त्या म्हणाल्या. "प्रसार भारतीची सेवा जवळपास 90 कोटी लोकसंख्येपर्यंत पोहोचत आहे. भारत या क्षेत्रात सुवर्ण हंस आहे. भारतात अब्जावधी मोबाईल फोन वापरकर्ते आहेत, हे त्यांनी लक्षात आणून दिले. ही शक्ती स्थाने आणखी बळकट करणे महत्त्वाचे आहे", असे त्या पुढे म्हणाल्या.
भारत रेडिओसाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे, हे शशी शेखर वेम्पत्ती यांनी सांगितले. वेम्पत्ती यांनी या माध्यमाचा उल्लेख मूळ सार्वजनिक संपत्ती असा केला. या क्षेत्रासाठी समन्वित सार्वजनिक कृतीची गरज त्यांनी अधोरेखित केली. "रेडिओ कुठेही जाणार नाही. भारतातील रेडिओ ग्राहक समाजाच्या एका व्यापक वर्गातून येतात", असे त्यांनी देशातील या क्षेत्राचे फायदे सांगताना अधोरेखित केले. काही विशिष्ट श्रेणीतील उपकरणांमध्ये रेडिओ असणे आवश्यक आहे अशा अटींचा क्रम धोरणात्मक उपायात समाविष्ट असू शकतो, असे ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे संचलित उपकरणे तसेच पारंपरिक रेडिओसारखी पॅसिव्ह उपकरणे एकाच वेळी उपलब्ध असली पाहिजेत, हे त्यांनी स्पष्ट केले.
हवामान बदल हा सार्वजनिक धोरणांचा एक महत्त्वाचा निर्धारक असल्याने, पारंपरिक उपकरणे जतन करणे महत्त्वाचे आहे. रेडिओ उपकरण उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी 'मेक इन इंडिया' सारख्या योजनांचा वापर करून भारतातील रेडिओची परिसंस्था मजबूत करण्याचे आवाहन टेड लॅव्हर्टी यांनी केले.
भारतात आणि इतरत्र डिजिटल रेडिओ हाच पुढे जाण्याचा मार्ग आहे यावर तज्ञांनी सहमती दर्शवली आणि मोठ्या शहरांमध्ये सामान्य ट्रान्समिशन पायाभूत सुविधा असलेल्या व्यावसायिक स्टेशन्सनी सहकार्यासाठी एक व्यासपीठ तयार करावे असे आवाहन तज्ञांनी केले.
* * *
PIB Mumbai | JPS/Sanjana/Manjiri/Shraddha/D.Rane
Release ID:
(Release ID: 2126216)
| Visitor Counter:
18