पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार मेळाव्याला केले संबोधित
राष्ट्र उभारणीत युवकांचे सक्रिय योगदान असेल तर, देशाचा वेगाने विकास होतो आणि त्या देशाला जागतिक स्तरावर ओळख मिळते: पंतप्रधान
आज भारतातील तरूण समर्पण आणि नवोन्मेषाद्वारे आपल्यातील अफाट क्षमतांचे प्रदर्शन जगासमोर करीत आहेत: पंतप्रधान
'मेक इन इंडिया' उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि भारतातील तरुणांना जागतिक स्तरावर प्रमाणित उत्पादने तयार करण्याची संधी प्रदान करण्यासाठी या अर्थसंकल्पात, उत्पादन अभियानाची घोषणा सरकारने केली : पंतप्रधान
उत्पादन अभियान देशभरातील लाखो एमएसएमई आणि लघु उद्योजकांनाच नव्हे तर देशभरात नवीन रोजगाराच्या संधी देखील निर्माण करेल : पंतप्रधान
देशातील तरुणांना केंद्रस्थानी ठेवून मुंबईत जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचे (वेव्हज) आयोजन; तरुण निर्मात्यांना प्रथमच असे व्यासपीठ करणार प्रदान: पंतप्रधान
मीडिया, गेमिंग आणि मनोरंजन क्षेत्रातील नवोन्मेषकांसाठी, प्रतिभा प्रदर्शित करण्याची अभूतपूर्व संधी ‘वेव्हज’मुळे मिळेल : पंतप्रधान
भारताची महिला शक्ती नोकरशाहीपासून ते अवकाश आणि विज्ञानापर्यंत विविध क्षेत्रात नवीन उंची गाठत असून, सरकारचा ग्रामीण महिलांना सक्षम बनवण्यावरही भर – पंतप्रधान
Posted On:
26 APR 2025 12:13PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रोजगार मेळाव्याला मार्गदर्शन केले; याप्रसंगी दूरदृश्य प्रणालीमार्फत विविध सरकारी विभाग आणि संघटनांमध्ये नवनियुक्त 51,000 हून अधिक तरुणांना नियुक्ती पत्रांचे वितरण आज करण्यात आले. आज भारत सरकारच्या विविध विभागांमध्ये या तरुणांच्या कारकिर्दीतील नवीन जबाबदाऱ्यांची सुरुवात होते आहे, असे पंतप्रधानांनी आजच्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना सांगितले. देशाची आर्थिक चौकट मजबूत करणे, अंतर्गत सुरक्षा मजबूत करणे, आधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये योगदान देणे आणि कामगारांच्या जीवनात परिवर्तनकारी बदल घडवणे, अशी आवश्यक कर्तव्ये पार पाडण्याचे काम या तरुणांना करावयाचे आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. तरुण ज्या प्रामाणिकतेने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडतील त्याचा भारताच्या विकसित राष्ट्र बनण्याच्या प्रवासावर सकारात्मक परिणाम होईल, असे पंतप्रधानांनी अधोरेखित कले. नव्याने कामावर रूजू होणारे तरुण अत्यंत समर्पण भावाने त्यांची कर्तव्ये पार पाडतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
“कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीचा आणि यशाचा पाया त्या देशाच्या तरुणाईच्या कामगिरीवर उभा असतो, जेव्हा तरुण राष्ट्र उभारणीत सक्रियपणे सहभागी होतात तेव्हा राष्ट्राचा वेगाने विकास होत असतो आणि ते राष्ट्र जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करते”, असे मोदी यांनी अधोरेखित केले. “भारतातील तरुण त्यांच्या कठोर परिश्रम आणि नवोन्मेषाद्वारे जगासमोर आपली अफाट क्षमता दाखवत आहेत”, असे त्यांनी अधोरेखित केले. सरकार प्रत्येक टप्प्यावर देशातील तरुणांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढत राहतील याची खात्री करत आहे, असे ते म्हणाले. कुशल भारत, स्टार्टअप इंडिया आणि डिजिटल इंडिया सारख्या उपक्रमांमुळे तरुणांसाठी नवीन संधी निर्माण होत आहेत. या मोहिमांद्वारे, सरकार भारतातील तरुणांना त्यांची प्रतिभा जगाला दाखवण्यासाठी एक खुले व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे, असेही ते म्हणाले. या प्रयत्नांमुळे, या दशकात, भारतातील तरुणांनी तंत्रज्ञान, डेटा आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात देशाला आघाडीवर नेले आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी यूपीआय ओएनडीसी आणि जेम (गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस) सारख्या डिजिटल व्यासपीठाच्या यशावर प्रकाश टाकला. डिजिटल अर्थव्यवस्थेत युवा वर्ग परिवर्तनकारी बदल कसे घडवत आहेत हे या व्यासपीठाद्वारे दर्शवले जात आहे, असेही ते म्हणाले. भारत आता रिअल-टाइम डिजिटल व्यवहारांमध्ये जगात आघाडीवर आहे आणि या यशाचे मोठे श्रेय तरुणांना जाते, असे त्यांनी सांगितले.
या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या उत्पादन मोहिमेचे उद्दिष्ट 'मेक इन इंडिया' उपक्रमाला चालना देणे आणि भारतातील तरुणांना जागतिक स्तरावर प्रमाणित उत्पादने तयार करण्याच्या संधी उपलब्ध करून देणे, हे आहे, असे पंतप्रधान म्हणाले. "या उपक्रमामुळे देशभरातील लाखो सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) तसेच लघु उद्योजकांनाच मदत होणार नाही तर देशभरात नवीन रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील", असे पंतप्रधानांनी सांगितले. "भारतातील सध्याचे तरुणांसाठी संधींचा हा अभूतपूर्व काळ आहे" असे त्यांनी नमूद केले. भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील, असे आयएमएफ ने नुकतेच आपल्या अहवालात जाहीर केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. या वाढीचे अनेक पैलू आहेत, ज्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे येत्या काळात सर्व क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधींमध्ये वाढ असल्याचे ते म्हणाले. अलिकडच्या काळात, ऑटोमोबाईल आणि पादत्राणे उद्योगांनी उत्पादन आणि निर्यातीत नवीन विक्रम स्थापित केले आहेत, ज्यामुळे तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. पहिल्यांदाच, खादी आणि ग्रामोद्योगातील उत्पादनांनी 1.70 लाख कोटी रुपयांच्या उलाढालीचा टप्पा ओलांडला आहे, ज्यामुळे विशेषतः ग्रामीण भागात लाखो नवीन रोजगार निर्माण झाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. त्यांनी अंतर्देशीय जलवाहतुकीतील अलिकडच्या लक्षणीय कामगिरीवर भाष्य केले, यावर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले की 2014 पूर्वी, अंतर्देशीय जलवाहतुकीद्वारे दरवर्षी केवळ 18 दशलक्ष टन मालवाहतूक केली जात होती. या वर्षी, मालवाहतुकीची संख्या 14500 कोटी टनांपेक्षा जास्त झाली आहे. पंतप्रधानांनी या यशाचे श्रेय भारताने या दिशेने सातत्यपूर्ण धोरणात्मक आणि निर्णय घेण्याची जी पद्धत स्वीकारली, त्याला दिले. देशात राष्ट्रीय जलमार्गांची संख्या 5 वरून 110 वर पोहोचली आहे आणि या जलमार्गांची परिचालन लांबी अंदाजे 2,700 किलोमीटरवरून जवळपास 5,000 किलोमीटरपर्यंत वाढली आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. या कामगिरीमुळे देशभरातील तरुणांसाठी नवीन संधी निर्माण होत आहेत हे त्यांनी अधोरेखित केले.
“मुंबईत लवकरच वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (वेव्हज) 2025चे आयोजन होणार आहे. हा कार्यक्रम तरुणांना केंद्रस्थानी ठेऊन आयोजित करण्यात येत असून, तरुण निर्मात्यांना पहिल्यांदाच असे व्यासपीठ प्रदान करण्यात येत आहे."ही परिषद माध्यमे, गेमिंग आणि मनोरंजन क्षेत्रातील नवोन्मेषकांना त्यांची प्रतिभा दाखविण्याची अभूतपूर्व संधी देते", असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. मनोरंजन क्षेत्रातील स्टार्टअप्सना, गुंतवणूकदार आणि या उद्योगातील आघाडीच्या लोकांसोबत जोडले जाण्याची संधी वेव्हज मध्ये मिळेल, जेणेकरून हे जगासमोर त्यांचे विचार मांडण्यासाठी सर्वात मोठे व्यासपीठ बनेल, असे मोदी म्हणाले. या कार्यक्रमादरम्यान आयोजित केलेल्या विविध कार्यशाळांमधून तरुणांना एआय, एक्सआर आणि इमर्सिव्ह मीडियाची ओळख होईल यावर त्यांनी भर दिला. "वेव्हज भारताच्या डिजिटल कंटेंट भविष्याला ऊर्जा प्रदान करेल", असेही ते म्हणाले.
पंतप्रधानांनी भारतातील तरुणांच्या समावेशकतेचे कौतुक केले आणि समाजातील प्रत्येक घटक देशाच्या यशात योगदान देत आहे, हे अधोरेखित केले. भारतातील मुली विविध क्षेत्रात आघाडीवर आहेत, त्यांनी अलिकडेच आलेल्या यूपीएससी निकालांचा हवाला देत सांगितले की, पहिल्या दोन क्रमांकावर महिलांनी स्थान मिळवले आहे आणि पहिल्या पाच टॉपर्सपैकी तीन महिला आहेत. नोकरशाहीपासून ते अवकाश आणि विज्ञान अशा क्षेत्रात महिला नवीन उंची गाठत आहेत. आमचे सरकार स्वयं-सहायता गट, विमा सखी, बँक सखी आणि कृषी सखी यासारख्या उपक्रमांद्वारे ग्रामीण महिलांना सक्षम बनवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे, ज्यामुळे नवीन संधी निर्माण झाल्या आहेत", असे मोदी म्हणाले.
हजारो महिला आता ड्रोन दीदी म्हणून काम करत आहेत, त्यांच्या कुटुंबांसाठी आणि गावांसाठी समृद्धी सुनिश्चित करत आहेत. देशात 90 लाखांहून अधिक बचत गट सक्रिय आहेत, ज्यामध्ये 10 कोटींहून अधिक महिलांचा समावेश आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या गटांना बळकटी देण्यासाठी, सरकारने त्यांचे बजेट पाच पटीने वाढवले आहे आणि ₹20लाखांपर्यंतच्या तारणमुक्त कर्जाची तरतूद सुरू केली आहे. मोदी यांनी मुद्रा योजनेच्या सर्वात मोठ्या लाभार्थी महिला असल्याचे सांगून देशातील 50000 हून अधिक स्टार्टअप्समध्ये महिला संचालक आहेत हे प्रामुख्याने नमूद केले.विविध क्षेत्रांमध्ये अशा परिवर्तनकारी बदलांमुळे भारताचा विकासाचा संकल्प बळकट होत आहे आणि रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या अधिक संधी निर्माण होत आहेत, असे त्यांनी नमूद केले.
आज रोजगार पत्रे मिळालेल्या तरुणांना संबोधित करताना पंतप्रधानांनी अधोरेखित केले की मिळवलेले पद हे त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाचे फळ आहे. आता त्यांच्या आयुष्यातील पुढील टप्पे केवळ स्वतःसाठीच नव्हे तर राष्ट्रासाठी समर्पित करण्याची वेळ आली आहे यावर त्यांनी भर दिला. सार्वजनिक सेवेची भावना सर्वोपरि राहिली पाहिजे असे त्यांनी सांगितले. जेव्हा एखादी व्यक्ती त्यांच्या सेवेबद्दल सर्वोच्च आदराने काम करते तेव्हा त्यांच्या प्रयत्नांना राष्ट्राला एका नवीन दिशेने नेण्याची शक्ती मिळते असे पंतप्रधानांनी सांगितले. सर्व नवनियुक्त व्यक्तींची कर्तव्ये, नवोन्मेष आणि वचनबद्धता यांची पूर्तता भारतातील प्रत्येक नागरिकाचे जीवन सुधारण्यास थेट हातभार लावेल.
जेव्हा व्यक्ती जबाबदारीच्या पदांवर पोहोचतात तेव्हा नागरिक म्हणून त्यांची कर्तव्ये आणि भूमिका अधिक महत्त्वाची असते, असे नमूद करून, मोदी यांनी या दृष्टीने जागरूकता निर्माण करण्याची गरज अधोरेखित केली. त्यांनी 'एक पेड माँ के नाम' या सध्या सुरू असलेल्या मोहिमेवर प्रकाश टाकला आणि निसर्गाप्रती कृतज्ञता आणि सेवेचा संदेश म्हणून प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने एक झाड लावावे असे प्रोत्साहित केले. त्यांनी नवनियुक्तांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी या मोहिमेत अधिकाधिक लोकांना सहभागी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. जूनमध्ये येणारा आंतरराष्ट्रीय योग दिन हा यशस्वी कारकिर्दीसोबतच निरोगी जीवन सुरू करण्याची एक उत्तम संधी आहे हे लक्षात आणून देऊन त्यांनी आरोग्य हे केवळ व्यक्तींसाठी आवश्यक नाही तर कार्यक्षमतेसाठी आणि देशाच्या उत्पादकतेसाठी देखील महत्त्वाचे आहे यावर भर दिला.
पंतप्रधानांनी व्यक्तींना त्यांच्या क्षमता वाढवण्यासाठी मिशन कर्मयोगी उपक्रमाचा वापर करण्यास प्रोत्साहित केले. त्यांनी सांगितले की त्यांच्या भूमिकेचा उद्देश केवळ पदे भूषवणे नाही तर भारतातील प्रत्येक नागरिकाची सेवा करणे आणि देशाच्या प्रगतीत योगदान देणे हा आहे. नागरी सेवा दिनानिमित्त सांगितलेल्या 'नागरिक देवो भव' या मंत्राचे स्मरण करून आणि नागरिकांची सेवा करणे हे आपल्या इष्ट देवतेच्या पूजेसारखे आहे यावर भर देऊन, प्रामाणिकतेने आणि समर्पणाने भारत एक विकसित आणि समृद्ध राष्ट्र बनेल, असा विश्वास व्यक्त करत पंतप्रधान मोदी यांनी भाषणाचा समारोप केला. 140 कोटी भारतीयांची स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी तरुण नवनियुक्तांना काम करण्याचे आवाहन केले.
पार्श्वभूमी-
रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेनुसार, 15वा रोजगार मेळा देशभरातील 47 ठिकाणी आयोजित केला जाईल. यामुळे तरुणांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि राष्ट्रीय विकासात प्रभावीपणे योगदान देण्यासाठी अर्थपूर्ण संधी उपलब्ध होतील.
देशभरातून निवडलेले नवनियुक्त तरुण- तरुणी केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये/विभागांमध्ये सामील होतील ज्यात महसूल विभाग, कार्मिक आणि सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्ती वेतन मंत्रालय, गृह मंत्रालय, टपाल विभाग, उच्च शिक्षण विभाग, रेल्वे मंत्रालय, कामगार आणि रोजगार मंत्रालय इत्यादींचा समावेश आहे.
***
S.Bedekar/S.Mukhedkar/H.Kulkarni/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2124512)
Visitor Counter : 21
Read this release in:
Tamil
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Nepali
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Kannada
,
Malayalam