पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील आनंदपूर धाम इथे जनसभेला केले संबोधित
विकास आणि वारसा या मंत्रांच्या आधारेच नव भारत पुढे वाटचाल आहे : पंतप्रधान
आपला देश ऋषीमुनींची, विद्वानांची आणि संतांची भूमी, जेव्हा जेव्हा आपला समाज कठीण काळातून जातो, तेव्हा ऋषीमुनी किंवा विद्वान व्यक्तिमत्वे या भूमीवर अवतरत समाजाला नवी दिशा दाखवतात : पंतप्रधान
गरीब आणि वंचितांच्या उन्नतीचा संकल्प, ‘सबका साथ, सबका विकास'चा मंत्र हीच सेवाभावना म्हणजे सरकारचे धोरण आणि वचनबद्धता : पंतप्रधान
भारतासारख्या देशात आपली संस्कृती केवळ आपल्या अस्मितेशी जोडलेली नाही, तर आपली संस्कृतीच आपल्या क्षमतांना बळकटी देते : पंतप्रधान
Posted On:
11 APR 2025 6:04PM by PIB Mumbai
भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा प्रसार करण्याच्या आपल्या वचनबद्धतेला अनुसरून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील अशोकनगर जिल्ह्यातील इसागढ तहसील इथल्या आनंदपूर धामला भेट दिली. त्यांनी गुरुजी महाराज मंदिरात दर्शन आणि पूजा केली आणि आनंदपूर धामच्या मंदिर परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. या निमित्ताने पंतप्रधानांनी दिल्ली, हरयाणा, पंजाब आणि देशभरातून मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांचे स्वागतही केले. श्री आनंदपूर धामला भेट देऊन आणि गुरुजी महाराजांच्या मंदिरात प्रार्थना करून आपले मन प्रसन्न झाल्याचे त्यांनी सांगितले.
संतांच्या तपश्चर्येने पावन झालेल्या आणि जिथे परोपकाराची भावना परंपरा बनली आहे, तसेच सेवेचा संकल्प मानवतेच्या कल्याणाचा मार्ग दाखवतो, अशा ही पवित्र भूमी असल्याची भावना त्यांनी व्यक्त करत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भूमीचे वेगळेपण अधोरेखित केले. दुःखाला अशोकनगरात प्रवेश करण्याची भीती वाटते, असे संतांनी सांगितल्याचा दाखलाही त्यांनी दिला. बैसाखी आणि श्री गुरु महाराज जी यांच्या जयंतीच्या उत्सवात सहभागी झाल्याबद्दलचा आनंदही त्यांनी व्यक्त केला. प्रथम पादशाही श्री श्री 108 श्री स्वामी अद्वैत आनंद जी महाराज आणि इतर पादशाही संतांना त्यांनी आदराने वंदन केले. 1936 मध्ये श्री द्वितीय पादशाही जी यांची महासमाधी आणि 1964 मध्ये श्री तृतीय पदशाही जी यांचे नीज स्वरुपात लीन होणे, या घटनांचा दाखला देत या दिवसाचे ऐतिहासिक महत्त्व त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी या पूज्य गुरूंना आदरांजली वाहिली तसेच माता जागेश्वरी देवी, माता बीजासन आणि माता जानकी करिला माता धाम यांना नमन केले. बैसाखी आणि श्री गुरु महाराज जी यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने त्यांनी सर्वांना शुभेच्छाही दिल्या.
भारत ही नेहमीच कठीण काळात समाजाला मार्गदर्शन करणाऱ्या ऋषीमुनी, विद्वान आणि संतांची भूमी आहे असे पंतप्रधान म्हणाले. पूज्य स्वामी अद्वैत आनंद जी महाराज यांचे जीवन याच परंपरेचे प्रतिबिंब आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. आदि शंकराचार्यांसारख्या आचार्यांनी अद्वैत तत्त्वज्ञानाचे अगाध ज्ञान विशद केल्याच्या काळाचे स्मरण त्यांनी उपस्थितांना करून दिले. वसाहतवादाच्या काळात समाज या ज्ञानापासून दूर जाऊ लागला, असे त्यांनी नमूद केले. मात्र, याच काळात अद्वैताच्या तत्त्वांद्वारे राष्ट्राच्या आत्म्याला जागृत करण्यासाठी संतांचा उदय झाला, असे त्यांनी सांगितले. पूज्य अद्वैत आनंद जी महाराजांनी अद्वैताचे ज्ञान सामान्य लोकांसाठी सोप्या भाषेत सुलभरित्या उपलब्ध करून हा वारसा पुढे नेला आणि ते जनसामान्यांपर्यंत पोहोचवले, ही बाब त्यांनी ठळकपणे अधोरेखित केली.
भौतिक प्रगतीच्या काळात युद्ध, संघर्ष आणि मानवी मूल्यांची होणारा ऱ्हास यांसारख्या जागतिक समस्यांवरही पंतप्रधानांनी आपली मते व्यक्त केली. मी आणि तू असा भेद करणारी मानसिकताच या समस्यांचे मूळ कारण असल्याचे त्यांनी सांगितले. अशा मानसिकतेमुळेच माणसे एकमेकांपासून दूर जाऊ लागल्याचे ते म्हणाले. भेदभावाला न मानणाऱ्या अद्वैत तत्त्वज्ञानात या समस्यांवर उत्तर असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. प्रत्येक सजीवात ईश्वराचे दर्शन घेणे आणि संपूर्ण सृष्टी ही ईश्वराचे रुप असल्याचे मानणे म्हणजेच अद्वैत तत्वज्ञान असल्याचे मार्गदर्शन त्यांनी उपस्थितांना केले. परमहंस दयाळ महाराजांनी जो तू आहेस तोच मी आहे, इतक्या सोप्या शब्दांत हे तत्त्व सुंदरपणे मांडले असल्याचा दाखला त्यांनी दिला. माझे आणि तुझे यातला भेद नष्ट करणारा हा विचार खूपच गहिरा असल्याचे पंतप्रधान म्हणाले. सर्वांनीच हा विचार अंगीकारला, तर सर्व संघर्ष नष्ट होऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी पंतप्रधानांनी सहावे पादशाही स्वामी श्री विचार पूर्ण आनंद जी महाराज यांच्यासोबत या आधी झालेल्या आपल्या चर्चेचा अनुभव उपस्थितांसोबत सामायिक केला. सहावे पादशाही स्वामी श्री विचार पूर्ण आनंद जी महाराजांनी प्रथम पादशाही परमहंस दयाळ महाराज जी यांची शिकवण आणि आनंदपूर धामच्या सेवा उपक्रमांबद्दल आपल्याला सांगितल्याचे ते म्हणाले. आनंदपूर धाममध्ये ध्यानासाठी आखून दिलेली पाच तत्त्वे त्यांनी अधोरेखित केली. यात निःस्वार्थ सेवेच्या तत्वाचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. निःस्वार्थ वृत्तीने दुर्बलांची सेवा करण्याच्या भावनेबद्दलही त्यांनी सांगितले, मानवतेच्या सेवेत नारायण पाहणे, हा भारतीय संस्कृतीचा आधार आहे असे ते म्हणाले. आनंदपूर विश्वस्त हीच सेवेची संस्कृती समर्पणाने पुढे नेत आहेत, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. ही विश्वस्त संस्था हजारो रुग्णांवर उपचार करणारी रुग्णालये चालवते, मोफत वैद्यकीय शिबिरांचे आयोजित करते, गायींच्या कल्याणासाठी आधुनिक गोशाळा चालवते आणि नवीन पिढीच्या विकासासाठी शाळा चालवते, ही बाबही त्यांनी नमूद केली. आश्रमाच्या अनुयायांनी हजारो एकरांच्या पडिक जमिनींचे रुपांतर हरीत क्षेत्रात केला, हे आनंदपूर धामने पर्यावरणाच्या संवर्धनात दिलेले महत्त्वाचे योगदान असल्याचे ते म्हणाले. आश्रमाने लावलेली हजारो झाडे आता परोपकारी ठरत आहेत असेही ते म्हणाले.
सरकारच्या प्रत्येक उपक्रमाच्या केंद्रस्थानी हीच सेवेची भावना आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत, प्रत्येक गरजू व्यक्ती अन्नाच्या समस्येपासून मुक्त झाली असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. त्याचप्रमाणे, आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून गरीब आणि वृद्धांना आरोग्य सेवेच्या समस्यांपासून मुक्ती मिळाली आहे, तर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत दुर्बलांसाठी सुरक्षित घरांची सुनिश्चिती होत आहे असे त्यांनी सांगितले. जल जीवन मिशनच्या माध्यमातून गावांतील पाण्याशी संबंधित समस्या सोडवल्या जात आहेत आणि नवीन एम्स, आयआयटी आणि आयआयएमची विक्रमी संख्या गरीब मुलांनाही त्यांची स्वप्ने साकार करण्यात मदत करत आहे, असे त्यांनी नमूद केले. 'एक पेड माँ के नाम' या मोहिमेच्या माध्यमातून सरकार पर्यावरण संवर्धनाची वचनबद्धता जपत असल्याचे ते म्हणाले. या मोहिमेअंतर्गत देशभरात कोट्यवधी झाडे लावण्यात आली आहेत अशी माहिती त्यांनी दिली. इतक्या मोठ्या व्याप्तीच्या यशामागे सेवा भावनेचीच प्रेरणा असल्याचे पंतप्रधान म्हणाले. सबका साथ, सबका विकास या मंत्रांच्या आधारे वाटचाल करत गरीब आणि उपेक्षित लोकांच्या उन्नतीचा संकल्प आपल्या सरकारने केला असल्याचे पंतप्रधान म्हणाले. हीच सेवेची भावना सरकारचे धोरण आणि वचनबद्धता अशा दोन्हीमध्ये असल्याची बाब त्यांनी ठळकपणे अधोरेखित केली.
सेवेचा संकल्प स्वीकारल्याने केवळ इतरांनाच फायदा होतो असे नाही तर त्यांचे व्यक्तिमत्वही महान होते आणि दृष्टिकोनही व्यापक होतो, असे अधोरेखित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले की, सेवेची भावना व्यक्तींना समाज, राष्ट्र आणि मानवतेच्या मोठ्या उद्दिष्टांशी जोडते. त्यांनी सेवेत निरंतर कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या समर्पणाविषयी आदर व्यक्त केला आणि निःस्वार्थ सेवेच्या कृतींद्वारे अडचणींवर मात करणे हे कसे दुसरे स्वरूप बनते, यावर प्रकाश टाकला. पंतप्रधान मोदी यांनी सेवेचे वर्णन ‘आध्यात्मिक साधना’ असे केले आणि सेवाकार्याची तुलना पवित्र गंगेशी केली. अशा सेवा साधनेमध्ये प्रत्येकाने डुबकी मारली पाहिजे, असेही ते म्हणाले. अशोक नगर आणि आनंदपूर धाम सारख्या प्रदेशांच्या विकासाच्या जबाबदारीवर त्यांनी भाष्य करत त्यांचे राष्ट्र मोठे करण्यामध्ये योगदान त्यांनी अधोरेखित केले. कला, संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्याचा समृद्ध वारसा लाभलेल्या या भागामधली विकासाची क्षमता त्यांनी अधोरेखित केली. पंतप्रधानांनी मध्य प्रदेश आणि अशोक नगरमधील प्रगतीला चालना देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवरही प्रकाश टाकला. इथल्या चंदेरी साड्यांसाठी भौगोलिक मानांकन (जीआय) टॅगद्वारे चंदेरी हातमागाला नवीन उंची गाठून देणे आणि या प्रदेशातील आर्थिक विकासाला गती देण्यासाठी प्राणपूरमध्ये ‘क्राफ्ट’ हातमाग पर्यटन गावाची स्थापना यांचा समावेश आहे. यावेळी त्यांनी असेही नमूद केले की, मध्य प्रदेश सरकारने उज्जैन सिंहस्थासाठी आधीच तयारी सुरू केली आहे.
अलिकडेच रामनवमीचा भव्य उत्सव आयोजित केला होता, त्याचे कौतुक करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "राम वन गमन पथ" च्या सुरू असलेल्या विकास कामावर प्रकाश टाकला. या मार्गाचा एक महत्त्वाचा भाग मध्य प्रदेशातून जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मध्य प्रदेशच्या उल्लेखनीय आणि अद्वितीय ओळखीवर भाष्य केले आणि सांगितले की, या उपक्रमांमुळे या राज्याचे वेगळेपण आणखी दृढ होईल.
पंतप्रधानांनी देशाला 2047 पर्यंत विकसित भारत बनविण्याच्या महत्त्वाकांक्षी ध्येयाचा पुनरुच्चार केला आणि ते साध्य करण्याचा विश्वास व्यक्त केला. या प्रवासात भारताची प्राचीन संस्कृती जपण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली, विकास साधताना अनेक देशांनी त्यांच्या परंपरांशी नाळ तोडली असली तरी, भारताने त्याचा वारसा जपला पाहिजे असे त्यांनी नमूद केले. "भारताची संस्कृती केवळ त्याच्या ओळखीशी जोडलेली नाही तर त्याच्या क्षमतांना बळकटी देते", असे अधोरेखित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंदपूर धाम न्यासाचे या संदर्भात महत्त्वपूर्ण योगदान आहे, याबद्दल कौतुक केले आणि न्यासाच्या सेवा उपक्रमांमुळे विकसित भारताच्या दृष्टिकोनात नवीन ऊर्जा निर्माण होईल असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी बैसाखी आणि श्री गुरु महाराज जी यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त शुभेच्छा देऊन भाषणाचा समारोप केला.
मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.
पार्श्वभूमी
आनंदपूर धामची स्थापना आध्यात्मिक आणि समाज कार्यासारख्या, परोपकारी उद्देशांसाठी करण्यात आली आहे. 315 हेक्टर क्षेत्रफळावर विस्तारलेल्या या धाममध्ये 500 पेक्षा अधिक गायी आहेत. इथली गोशाळा आधुनिक आहे आणि श्री आनंदपूर न्यास परिसराअंतर्गत शेतीविषयक उपक्रम चालवले जातात. न्यासाच्यावतीने सुखपूर गावात एक धर्मादाय रुग्णालय, सुखपूर आणि आनंदपूरमधील शाळा आणि देशभरातील विविध सत्संग केंद्रे चालविण्यात येतात.
***
N.Chitale/T.Pawar/S.Bedekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2121111)
Visitor Counter : 28
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam