पंतप्रधान कार्यालय
नवकार महामंत्र दिवसाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
Posted On:
09 APR 2025 11:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 एप्रिल 2025
जय जिनेंद्र,
मन शांत आहे, मन स्थिर आहे, केवळ शांतता आहे, एक अद्भुत अनुभूती आहे, शब्दांच्या पलीकडे, विचारांच्या पलीकडे, नवकार महामंत्र अजूनही मनात गुंजत आहे. नमो अरिहंताणं॥ नमो सिद्धाणं॥ नमो आयरियाणं॥ नमो उवज्झायाणं॥ नमो लोए सव्वसाहूणं॥ मन स्थिर आहे , केवळ शांतता , एक स्वर, एक प्रवाह, एक ऊर्जा, कुठलाही चढउतार नाही, केवळ स्थिरता, केवळ समभाव . एक विशिष्ट चेतना, एकसमान लय, अंतर्मनात एकसमान प्रकाश. नवकार महामंत्राची ही आध्यात्मिक शक्ती मला अजूनही अंतर्मनात जाणवते. काही वर्षांपूर्वी मी बंगळुरूमध्ये अशाच एका सामूहिक मंत्रोच्चाराला उपस्थित होतो, आज तसाच अनुभव आला आणि तितकाच गहिरा. यावेळी, देशात आणि परदेशात एकाच वेळी एकाच चेतनेशी जोडलेले लाखो-कोट्यवधी पुण्य आत्मे, एकत्र बोललेले शब्द, एकत्र जागृत झालेली ऊर्जा , हे खरोखरच अभूतपूर्व आहे.
श्रावक-श्राविकानो, बंधू आणि भगिनींनो,
या शरीराचा जन्म गुजरातमध्ये झाला. जिथे गल्लो -गल्लीत जैन धर्माचा प्रभाव दिसून येतो आणि लहानपणापासूनच मला जैन आचार्यांचा सहवास लाभला .
मित्रांनो,
नवकार महामंत्र हा केवळ एक मंत्र नाही, तर तो आपल्या श्रद्धेचे केंद्र आहे. आपल्या जीवनाचा मूळ स्वर आणि त्याचे महत्त्व केवळ आध्यात्मिक नाही. ते स्वतःबरोबरच समाजातील सर्वांना मार्ग दाखवते. लोकांपासून जगापर्यंत असा हा प्रवास आहे. या मंत्रातील प्रत्येक पदच नव्हे तर प्रत्येक अक्षर एक मंत्र आहे. जेव्हा आपण नवकार महामंत्राचा जप करतो तेव्हा आपण पंच परमेष्ठीला वंदन करतो. पंच परमेष्ठी कोण आहेत? अरिहंत - ज्यांनी केवळ ज्ञान प्राप्त केले, जे भव्य जीवांना मार्गदर्शन करतात , ज्यांच्याकडे 12 दैवी गुण आहेत. सिद्ध - ज्यांनी 8 कर्मांचा नाश केला आहे, मोक्ष प्राप्त केला आहे आणि त्यांच्याकडे आठ शुद्ध गुण आहेत. आचार्य - जे महाव्रताचे पालन करतात , जे मार्गदर्शक आहेत , 36 गुणांनी संपन्न असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. उपाध्याय जे मोक्ष मार्गाचे ज्ञान देतात, ज्यांच्याकडे 25 गुण आहेत. साधू - जे तपश्चर्येच्या अग्नीत स्वतः परीक्षा देतात. जे मोक्ष प्राप्तीच्या दिशेने वाटचाल करत आहेत, त्यांच्यातही 27 महान गुण आहेत.
मित्रांनो,
जेव्हा आपण नवकार महामंत्राचा जप करतो तेव्हा आपण 108 दैवी गुणांना वंदन करतो, आपण मानवतेच्या हिताचे स्मरण करतो , हा मंत्र आपल्याला आठवण करून देतो - ज्ञान आणि कर्म हीच जीवनाची दिशा आहे, गुरु हा प्रकाश आहे आणि मार्ग तोच आहे जो आतून निघतो. महामंत्र सांगतो , स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःचा प्रवास सुरू करा, शत्रू बाहेर नाही, शत्रू आत आहे. नकारात्मक विचार, अविश्वास, द्वेष, स्वार्थ, हेच ते शत्रू आहेत, ज्यांच्यवर मात करणे हाच खरा विजय आहे. आणि म्हणूनच जैन धर्म आपल्याला बाह्य जगावर नव्हे तर स्वतःवर विजय मिळवण्याची प्रेरणा देतो. जेव्हा आपण स्वतःवर विजय मिळवतो तेव्हा आपण अरिहंत बनतो. आणि म्हणूनच, नवकार महामंत्र ही मागणी नाही, तो मार्ग आहे. एक असा मार्ग जो माणसाला आतून शुद्ध करतो. जो मानवाला समरसतेचा मार्ग दाखवतो.
मित्रांनो,
नवकार महामंत्र हा खऱ्या अर्थाने मानवी ध्यान, साधना आणि आत्मशुद्धीचा मंत्र आहे. या मंत्राला एक जागतिक दृष्टिकोन आहे. हा शाश्वत महामंत्र, भारताच्या श्रुति–स्मृति परंपरांप्रमाणेच सुरुवातीच्या काळात आधी मौखिक, नंतर शिलालेखांद्वारे आणि शेवटी प्राकृत हस्तलिखितांद्वारे पिढ्यानपिढ्या चालत आला आहे आणि आजही आपल्याला निरंतर मार्ग दाखवत आहे. नवकार महामंत्र पंच परमेष्ठींच्या आराधनेबरोबरच , योग्य ज्ञान, योग्य समज आणि योग्य आचरणाचे प्रतीक आहे, जो मुक्तीच्या दिशेने घेऊन जाणारा मार्ग आहे .
आपल्याला माहित आहे की जीवनाची 9 तत्वे आहेत. ही 9 तत्वे जीवनाला परिपूर्णतेकडे घेऊन जातात. म्हणूनच , आपल्या संस्कृतीत 9 ला विशेष महत्त्व आहे. जैन धर्मात नवकार महामंत्र, नऊ तत्वे, नऊ गुण आणि इतर परंपरेत नऊ निधी , नवद्वार, नवग्रह, नवदुर्गा, नवधा भक्ती , सर्वत्र नऊ आहेत. प्रत्येक संस्कृतीत, प्रत्येक साधनेत. जप देखील 9 वेळा किंवा 27, 54, 108 वेळा, म्हणजे 9 च्या पटीत असतात. का? कारण 9 हे पूर्णतेचे प्रतीक आहे. 9 नंतर सगळ्याची पुनरावृत्ती होते. 9 चा कशानेही गुणाकार केला तर उत्तराचे मूळ पुन्हा 9 येते. हे केवळ गणित नाही, हे तत्वज्ञान आहे. जेव्हा आपण परिपूर्णता प्राप्त करतो, त्यानंतर आपले मन, आपला मेंदू स्थिरतेसह ऊर्ध्वगामी होतो. नवीन गोष्टींची इच्छा राहत नाही. प्रगती झाल्यानंतरही आपण आपल्या मुळांपासून दूर जात नाही आणि हेच महामंत्र नवकारचे सार आहे.
मित्रांनो,
नवकार महामंत्राचे हे तत्वज्ञान विकसित भारताच्या दृष्टिकोनाशी जोडलेले आहे. मी लाल किल्ल्यावरून म्हटले आहे - विकसित भारत म्हणजे विकास आणि वारसा दोन्ही ! एक असा भारत जो थांबणार नाही, एक असा भारत जो डगमगणार नाही, नवीन उंची गाठेल, तरीही आपल्या परंपरांमध्ये रुजलेला राहील . विकसित भारताला आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटेल. म्हणूनच आपण आपल्या तीर्थंकरांच्या शिकवणी जपतो. भगवान महावीर यांच्या दोन हजार पाचशे पन्नासव्या निर्वाण महोत्सवाच्या वेळी आपण तो देशभर साजरा केला. आज, जेव्हा परदेशातून प्राचीन मूर्ती परत आणल्या जातात, तेव्हा त्यात आपल्या तीर्थंकरांच्या मूर्ती देखील परत येतात. तुम्हाला हे जाणून अभिमान वाटेल की गेल्या काही वर्षांत 20 हून अधिक तीर्थंकरांच्या मूर्ती परदेशातून परत आणल्या आहेत, ज्यांची कधी काळी चोरी झाली होती.
मित्रांनो,
भारताची ओळख घडवण्यात जैन धर्माची भूमिका अमूल्य राहिली आहे. हा वारसा जपण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. तुमच्यापैकी किती जण नवीन संसद भवन पाहण्यासाठी गेले असतील हे मला माहित नाही. आणि जरी तुम्ही तिथे गेला असाल तरी तुम्ही बारकाईने पाहिले असेल की नाही? तुम्ही पाहिले, नवीन संसद लोकशाहीचे मंदिर बनली आहे. तिथेही जैन धर्माचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. तुम्ही शार्दूल गेटमधून आत प्रवेश केला की स्थापत्य गॅलरीमध्ये समेद शिखर दिसते. लोकसभेच्या प्रवेशद्वारावर तीर्थंकरांची मूर्ती आहे, जी ऑस्ट्रेलियाहून परत आणण्यात आली आहे.
संविधान दालनाच्या छतावर भगवान महावीरांचे एक अद्भुत चित्र आहे. साउथ बिल्डिंगच्या भिंतीवर सर्व 24 तीर्थंकर एकत्र आहेत. काही बाबतीत चेतना येण्यास वेळ लागतो, त्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागते, परंतु जेव्हा ती येते, तेव्हा प्रखर परिणाम दिसून येतो. ही तत्वे आपल्या लोकशाहीला दिशा दाखवतात आणि योग्य मार्ग दाखवतात. प्राचीन आगम ग्रंथांमध्ये जैन धर्माच्या परिभाषा अतिशय सारगर्भित सूत्रांमध्ये लिहिल्या गेल्या आहेत. उदा. - वत्थु सहावो धम्मो, चारित्तम् खलु धम्मो, जीवाण रक्खणं धम्मो. याच संस्कारांचे पालन करत आमचे सरकार सबका साथ, सबका विकास या मंत्रासह आगेकूच करते आहे.
मित्रहो,
जैन धर्माचे साहित्य हे भारताच्या बौद्धिक वैभवाचा कणा आहे. हे ज्ञान जतन करणे आपले कर्तव्य आहे, आणि म्हणूनच आपण प्राकृत आणि पाली या भाषांना अभिजात भाषांचा दर्जा दिला आहे. आता जैन साहित्यावर अधिक संशोधन करणे शक्य होईल.
आणि मित्रहो,
भाषा टिकली तर ज्ञान टिकेल. भाषा वाढली तर ज्ञान वाढेल. तुम्हाला माहिती आहे, आपल्या देशात शेकडो वर्षे जुनी जैन हस्तलिखिते आहेत. त्यातील प्रत्येक पान हा इतिहासाचा आरसा आहे. ज्ञानाचा महासागर आहे. "समया धम्म मुदाहरे मुणी" - समतेतच धर्म आहे. "जो सयं जह वेसिज्जा तेणो भवइ बंद्गो"- जो ज्ञानाचा दुरुपयोग करतो त्याचा विनाश होतो. "कामो कसायो खवे जो, सो मुणी – पावकम्म-जओ." अर्थात, जो सर्व इच्छा आणि आकांक्षांवर विजय मिळवतो, तो खरा मुनी आहे."
पण मित्रहो,
दुर्दैवाने अनेक महत्त्वाचे ग्रंथ हळूहळू लुप्त होत होते. म्हणूनच आम्ही ज्ञान भारतम मोहिम सुरू करणार आहोत. यावर्षीच्या अर्थसंकल्पात याची घोषणा करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत देशातील कोट्यवधी हस्तलिखितांचे सर्वेक्षण करण्याची तयारी सुरू आहे. प्राचीन वारशाचे डिजिटायझेशन करून, आपण प्राचीनता आणि आधुनिकतेचा संगम साधू. अर्थसंकल्पातील ही एक अतिशय महत्त्वाची घोषणा होती आणि आपल्याला याचा अभिमान वाटला पाहिजे. पण तुमचे लक्ष मात्र बारा लाख रूपये आयकर मुक्त या घोषणेकडे गेले असेल. शहाण्या माणसाला एवढा इशारा पुरेसा आहे.
मित्रहो,
आपण सुरू केलेली ही मोहिम, हा एक अमृत संकल्प आहे! नवीन भारत एआयच्या माध्यमातून शक्यतांचा शोध घेईल आणि अध्यात्माच्या माध्यमातून जगाला मार्ग दाखवेल.
मित्रहो,
मी जैन धर्म जितका जाणला आणि समजून घेतला आहे, त्यानुसार जैन धर्म जितका वैज्ञानिक आहे, तितकाच संवेदनशील सुद्धा आहे. आज जग ज्या परिस्थितींना तोंड देत आहे, मग ते युद्ध असो, दहशतवाद असो किंवा पर्यावरणीय समस्या असोत, अशा आव्हानांवर जैन धर्माच्या मूलभूत तत्त्वांमध्ये उपाय आहेत. जैन परंपरेच्या प्रतीकात लिहिले आहे - "परस्परोग्रहो जीवानाम" म्हणजेच जगातील सर्व प्राणी एकमेकांवर अवलंबून आहेत. म्हणूनच जैन परंपरा अगदी सूक्ष्म हिंसेलाही प्रतिबंध करते. पर्यावरण संरक्षण, परस्पर सौहार्द आणि शांतीचा हा सर्वोत्तम संदेश आहे. आपणा सर्वांना जैन धर्माच्या पाच मुख्य तत्वांबद्दल माहिती आहे. पण आणखी एक महत्त्वाचे तत्व आहे, ते म्हणजे - बहुलतवाद. आजच्या युगात बहुलवादाचे हे तत्वज्ञान अधिक प्रासंगिक ठरते आहे. जेव्हा आपण बहुलवादावर विश्वास ठेवतो तेव्हा युद्ध आणि संघर्षाची परिस्थितीच उद्भवत नाहीत. अशा वेळी लोक इतरांच्या भावना समजून घेतात आणि त्यांचा दृष्टिकोन सुद्धा समजून घेतात. मला वाटते की आज संपूर्ण जगाला बहुलवादाचे तत्वज्ञान समजून घेण्याची गरज आहे.
मित्रहो,
आज जगाचा भारतावरचा विश्वास आणखी दृढ होतो आहे. आमचे प्रयत्न, आमचे परिणाम, आता स्वतःच एक प्रेरणा ठरत आहेत. जागतिक संस्था भारताकडे पाहत आहेत. का? कारण भारताने आगेकूच केली आहे. आणि जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा हे भारताचे वैशिष्ट्य असते की जेव्हा भारत पुढे जातो तेव्हा इतरांसाठीही मार्ग खुले होतात. हा जैन धर्माचा आत्मा आहे. मी पुन्हा म्हणेन, परस्परोपग्रह जीवानाम्! जीवन केवळ परस्पर सहकार्यानेच चालते. या विचारसरणीमुळे जगाच्या भारताकडून अपेक्षाही वाढल्या आहेत, आणि आम्ही आमचे प्रयत्नही वाढवले आहेत. आज अनेक संकटांपैकी सर्वात मोठे संकट आहे, ज्या एका संकटाची सर्वाधिक चर्चा होते आहे, ते म्हणजे - हवामान बदल. यावर उपाय काय आहे? शाश्वत जीवनशैली. म्हणूनच भारताने मिशन लाईफ सुरू केले. मिशन लाईफ म्हणजे पर्यावरण-अनुकुल जीवनशैली. आणि जैन समुदाय शतकानुशतके असेच जगत आहे. साधेपणा, संयम आणि शाश्वतता हा आपल्या जगण्याचा गाभा आहे. जैन धर्मात म्हटले आहे - अपरिग्रह, आता हे लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे. तुम्ही कुठेही असलात, जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असलात, कोणत्याही देशात असलात तरी, मी तुम्हाला मिशन लाईफचे ध्वजवाहक होण्याचे आवाहन करतो.
मित्रहो,
आजचे जग हे माहितीचे जग आहे. ज्ञानाचे भांडार दिसू लागले आहे. परंतु, न विज्जा विण्णाणं करोति किंचि! विवेकाशिवाय ज्ञान हे निव्वळ जडत्व असते, त्यात गहनता नसते. जैन धर्म आपल्याला शिकवतो - केवळ ज्ञान आणि बुद्धीनेच योग्य मार्ग मिळतो. हे संतुलन आपल्या युवा वर्गासाठी सर्वात महत्वाचे आहे. आम्हाला असे वाटते की जिथे तंत्रज्ञान आहे तिथे स्पर्श देखील असावा. जिथे कौशल्य आहे तिथे आत्मा देखील असला पाहिजे. नवकार महामंत्र या ज्ञानाचा स्रोत होऊ शकतो. नवीन पिढीसाठी, हा मंत्र केवळ एक जप नाही, तर एक दिशा सुद्धा आहे.
मित्रहो,
आजघडीला जगभरात इतक्या मोठ्या संख्येने नवकार महामंत्राचा एकाच वेळी जप केला जात आहे, तेव्हा मला असे वाटते की आपण सर्वजण, आज आपण कुठेही बसलो असलो तरी, फक्त या वास्तुमध्येच नाही, जिथे असो तिथून हे ९ संकल्प आपल्या सोबत घेऊन जा. टाळ्या वाजवू नका कारण तुम्हाला वाटेल की संकट येते आहे. पहिला संकल्प - पाणी वाचवण्याचा संकल्प. तुमच्यापैकी बरेच जण महुडी यात्रेला गेले असतील. तिथे बुद्धिसागरजी महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी काहीतरी सांगितले होते, ते तिथे लिहिलेले आहे. बुद्धिसागर महाराजजी म्हणाले होते - "पाणी किराणा दुकानात विकले जाईल..." तब्बल वर्षांपूर्वी ते म्हणाले होते. आज, आपण ते भविष्य जगत आहोत. आपण पिण्यासाठी किराणा दुकानातून पाणी विकत घेतो. आता आपल्याला प्रत्येक थेंबाचे मूल्य समजून घ्यावे लागेल. प्रत्येक थेंब वाचवणे हे आपले कर्तव्य आहे.
दुसरा संकल्प - एक पेड़ माँ के नाम, अर्थात आईच्या नावे एक झाड. गेल्या काही महिन्यांत देशात शंभर कोटीपेक्षा जास्त झाडे लावण्यात आली आहेत. आता प्रत्येक व्यक्तीने आपल्या आईच्या नावे एक झाड लावावे आणि आईचा आशीर्वाद समजून त्याचे संगोपन करावे. जेव्हा तुम्ही मला गुजरातच्या भूमीवर सेवा करण्याची संधी दिली तेव्हा मी एक प्रयोग केला होता.
म्हणून मी तारंगाजीमध्ये तीर्थंकर वन निर्माण केले होते. तारंगाजी वैराण अवस्थेत आहे, जर प्रवासी आले तर त्यांना बसण्यासाठी जागा मिळेल आणि मला या तीर्थंकर वनात, आपले 24 तीर्थंकर ज्या झाडाखाली बसले होते ती झाडे शोधून लावायची होती. मी प्रयत्नांमध्ये कोणतीही कमतरता ठेवली नाही, मात्र दुर्दैवाने मी फक्त 16 झाडे गोळा करू शकलो; मला आठ झाडे सापडली नाहीत. ज्या झाडांखाली तीर्थंकरांनी ध्यान केले होते ती झाडे नष्ट झाल्यामुळे आपल्याला काही वेदना होतात का? तुम्हीही निश्चय करा, ज्या झाडाखाली प्रत्येक तीर्थंकर बसला होता ते झाड मी लावेन आणि ते झाड मी माझ्या आईच्या नावाने लावेन.
तिसरा संकल्प - स्वच्छतेचे ध्येय. स्वच्छतेमध्ये देखील सूक्ष्म अहिंसा आहे, हिंसाचारापासून मुक्तता आहे. आपला प्रत्येक रस्ता, प्रत्येक परिसर, प्रत्येक शहर स्वच्छ असले पाहिजे, प्रत्येक व्यक्तीने त्यात योगदान दिले पाहिजे, करणार ना? चौथा संकल्प- लोकलसाठी व्होकल( स्थानिक उत्पादनांचा आग्रह). एक काम करा, विशेषतः माझ्या तरुणांनो, तरुण मित्रांनो, मुलींनो, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही तुमच्या घरात वापरत असलेल्या कोणत्याही वस्तू, ब्रश, कंगवा, काहीही असो, त्यापैकी किती गोष्टी परदेशी आहेत याची यादी बनवा. तुमच्या आयुष्यात कोणत्या प्रकारच्या गोष्टी घुसल्या आहेत हे पाहून तुम्हाला स्वतःलाच नवल वाटेल. मग ठरवा की या आठवड्यात मी तीन गोष्टी कमी करेन, पुढच्या आठवड्यात मी पाच गोष्टी कमी करेन आणि नंतर हळूहळू दररोज नऊ गोष्टी कमी करेन आणि नवकार मंत्राचा एक-एक जप करत एका वेळी एक कमी करत राहीन.
मित्रांनो,
जेव्हा मी व्होकल फॉर लोकल म्हणतो. भारतात बनवलेल्या वस्तू, ज्या भारतात तसेच जगभरात विकल्या जातात. आपल्याला स्थानिक बाबी जागतिक स्तरावर न्यायच्या आहेत. आपल्याला अशी उत्पादने खरेदी करायची आहेत, ज्यात भारतीयांच्या घामाचा सुगंध असेल, भारतीय मातीचा सुगंध असेल आणि इतरांनाही अशीच उत्पादने खरेदी करण्यासाठी प्रेरीत करायचे आहे.
पाचवा संकल्प - देश दर्शन. तुम्ही जगभर फिरा, पण आधी भारताला जाणून घ्या, आपला भारत जाणून घ्या. आपले प्रत्येक राज्य, प्रत्येक संस्कृती, प्रत्येक कोपरा, प्रत्येक परंपरा अद्भुत आहे, अमूल्य आहे, त्या पाहिल्या पाहिजेत. आपण पाहणार नाही आणि म्हणायचे की जगाने बघण्यासाठी यावे, तर ते कशाला येतील बाबांनो! आता जर आपण आपल्या मुलांना घरी मोठेपणा दिला नाही, तर शेजारी कशाला देईल?
सहावा संकल्प - नैसर्गिक शेतीचा अवलंब करणे. जैन धर्मात असे म्हटले आहे- जीवो जीवास्सा नो हंता - "एका जीवाने दुसऱ्या जीवाचा खून करू नये." आपल्याला पृथ्वी मातेला रसायनांपासून मुक्त करायचे आहे. आपल्याला शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहायचे आहे. नैसर्गिक शेतीचा मंत्र प्रत्येक गावात पोहोचवायचा आहे.
सातवा संकल्प - निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे. खाण्यापिण्याच्या भारतीय परंपरा जपायला हव्या. शक्य तितक्या जास्त ताटांमध्ये भरडधान्य श्रीअन्न दिसायला हवे. आणि लठ्ठपणा दूर ठेवण्यासाठी जेवणात तेलाचा वापर 10 % कमी असला पाहिजे! आणि तुम्हाला हिशोब माहीत आहे, पैसे वाचतील आणि काम कमी होईल.
मित्रांनो,
जैन परंपरा म्हणते - 'तपेनं तनु मनसं होई'. तपश्चर्या आणि आत्मसंयमाने शरीर निरोगी होते आणि मन शांत होते. आणि यासाठी एक मोठे माध्यम म्हणजे योग आणि खेळ. म्हणून आठवा संकल्प म्हणजे योग आणि खेळाचा जीवनात समावेश करणे. घर असो वा कार्यालय, शाळा असो वा उद्यान, आपण खेळणे आणि योग करणे हे आपल्या जीवनाचा एक भाग बनवले पाहिजे. नववा संकल्प हा गरिबांना मदत करण्याचा संकल्प आहे. कोणासाठी मदतीचा हात देणे, कोणाचे तरी ताट भरून देणे, हीच खरी सेवा आहे.
मित्रांनो,
मी हमी देतो की हे नवीन संकल्प आपल्याला नवीन ऊर्जा देतील. आपल्या नवीन पिढीला एक नवी दिशा मिळेल. आणि आपल्या समाजात शांती, सौहार्द आणि दयाभाव वाढेल. आणि मी एक गोष्ट नक्कीच सांगेन, जर मी माझ्या स्वतःच्या भल्यासाठी यापैकी एकही नवीन संकल्प केला असेल, तर तो करू नका. माझ्या पक्षाच्या फायद्यासाठी केला आहे असे वाटत असेल तरी ते करू नका. आता तुम्हाला कोणतेही बंधन नसावे. आणि सर्व महाराज साहेबही माझे ऐकत आहेत, मी त्यांना विनंती करतो की जर माझे हे शब्द तुमच्या तोंडून निघाले तर शब्दांचे बळ आणखी वाढेल.
मित्रांनो,
आपले रत्नत्रय, दशलक्षण, सोळा कारणे, पर्युषण इत्यादी महान उत्सव आत्मकल्याणाचा मार्ग प्रशस्त करतात. तर विश्व नवकार महामंत्र, हा दिवस जगात सतत आनंद, शांती आणि समृद्धी वाढवेल, मला आपल्या आचार्य भगवानांवर पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच मला तुमच्यावरही विश्वास आहे. मी आज आनंदी आहे, आणि मला हा आनंद व्यक्त करायचा आहे कारण मी या गोष्टींशी पूर्वीही जोडला गेलो आहे. या कार्यक्रमासाठी चारही संप्रदाय एकत्र आले आहेत याचा मला खूप आनंद आहे. हे उभे राहून केलेले अभिवादन मोदींसाठी नाही, मी ते त्या चारही संप्रदायातील सर्व महापुरुषांच्या चरणी समर्पित करतो. हा सोहळा, हा सोहळा आपली प्रेरणा, आपली एकता, आपली एकजूट आणि एकतेच्या शक्तीची भावना आणि एकतेची ओळख बनली आहे. आपल्याला देशभर एकतेचा संदेश अशाच प्रकारे घेऊन जायचा आहे. भारत माता की जय म्हणणाऱ्या प्रत्येकाला आपण समाविष्ट केले पाहिजे. विकसित भारताच्या उभारणीसाठी ही ऊर्जा आहे; ती त्याचा पाया मजबूत करेल.
मित्रांनो,
आज आपण भाग्यवान आहोत की देशात अनेक ठिकाणी आपल्याला गुरु भगवानांचे आशीर्वाद मिळत आहेत. या जागतिक कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मी संपूर्ण जैन परिवाराचे अभिनंदन करतो. आज, मी आपले आचार्य भगवंत, मारासाहेब, मुनी महाराज, संपूर्ण देशात आणि परदेशात जमलेल्या श्रावक आणि श्राविकांना आदरांजली वाहतो. आणि हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी विशेषतः JITO (जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन) चे अभिनंदन करतो. नवकार मंत्रापेक्षा JITO ला जास्त टाळ्या मिळत आहेत. JITO अॅपेक्सचे अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी जी, अध्यक्ष विजय भंडारी जी, गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी जी, JITO चे इतर अधिकारी आणि देशाच्या तसेच जगाच्या कानाकोपऱ्यातील मान्यवर, या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.
जय जिनेन्द्र .
जय जिनेन्द्र.
जय जिनेन्द्र.
* * *
A.Chavan/Sushma/Madhuri/Ashutosh/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2120677)
Visitor Counter : 22