पंतप्रधान कार्यालय
श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांसमवेत घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेतील पंतप्रधानांचे निवेदन
Posted On:
05 APR 2025 1:51PM by PIB Mumbai
महामहिम राष्ट्राध्यक्ष दिसानायक जी,
दोन्ही देशांचे प्रतिनिधी,
माध्यमांतील सर्व मित्रवर्ग ,
नमस्कार!
आयु बोवन!
वणक्कम्!
आज राष्ट्राध्यक्ष दिसानायक यांच्या हस्ते ‘श्रीलंका मित्र विभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले जाणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हा सन्मान केवळ माझा सन्मान नाही, तर हा 140 कोटी भारतीयांचा सन्मान आहे. हा भारत आणि श्रीलंकेतील नागरिकांमधील ऐतिहासिक संबंधांचा आणि दाट मैत्रीचा सन्मान आहे.
या सन्मानासाठी, मी राष्ट्राध्यक्ष महोदयांचे, श्रीलंका सरकारचे आणि येथील नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानतो.
मित्रांनो,
पंतप्रधान या नात्याने श्रीलंकेचा हा माझा चौथा दौरा आहे. 2019 मधील माझा मागील दौरा, अत्यंत संवेदनशील काळात झाला होता. त्या वेळी मला विश्वास होता की श्रीलंका उभारी घेईल, आणि अधिक सक्षमतेने उभारी घेईल.
मी श्रीलंकेच्या नागरिकांच्या संयम आणि धैर्याचे कौतुक करतो आणिआज श्रीलंका पुन्हा प्रगतीच्या मार्गावर आहे हे पाहून मला आनंद वाटतो. भारतासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की, एका खऱ्या शेजारी मित्राप्रमाणे आम्ही आमचे कर्तव्य बजावले आहे. 2019 मधील दहशतवादी हल्ला असो, कोविड महामारी असो, किंवा अलीकडील आर्थिक संकट असो – प्रत्येक कठीण प्रसंगात, आम्ही श्रीलंकेच्या नागरिकांसोबत उभे राहिलो आहोत.
मला थोर तमिळ संत तिरुवल्लुवर यांचे शब्द आठवत आहेत. त्यांनी म्हटले होते –
सेयर करिय याबुल
नट पिण
आदु पुल
विणैक्करिय याबुल कापु
अर्थात, आव्हाने आणि शत्रूंविरुद्ध एका खऱ्या मित्राच्या आणि त्याच्या मैत्रीच्या ढालीपेक्षा अधिक सुरक्षितता कोणती असू शकते?
मित्रांनो,
राष्ट्रपती दिसानायक यांनी त्यांच्या पहिला परदेश दौऱ्यासाठी भारताची निवड केली होती. आणि, त्यांच्या पहिल्या परदेशी पाहुण्याचे भाग्य मला लाभले. हे आपल्यातील दाट संबंधांचेच प्रतीक आहे.
आमच्या शेजारी सर्वप्रथम आणि व्हिजन ‘महासागर या दोन्हींमध्ये श्रीलंकेला विशेष स्थान आहे. गेल्या चार महिन्यांमध्ये, राष्ट्राध्यक्ष दिसानायक यांच्या भारताच्या दौऱ्यानंतर, आपल्या परस्पर सहयोगात उल्लेखनीय प्रगती झाली आहे.
सामपूर सौर ऊर्जा प्रकल्पामुळे श्रीलंकेच्या ऊर्जा सुरक्षेला मदत मिळेल. बहुउत्पादक पाईपलाईनच्या बांधकामासाठी व त्रिंकोमालीला ऊर्जा केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी जो करार झाला आहे त्याचा लाभ श्रीलंकेतील सर्व नागरिकांना होईल. दोन्ही देशांमधील ग्रीड इंटर कनेक्टीव्हिटी करारामुळे श्रीलंकेसाठी वीज निर्यातीचे पर्याय खुले होतील.
मला आनंद आहे की आज श्रीलंकेतील धार्मिक स्थळांसाठी 5000 सौर छत व्यवस्थांचे उद्घाटन होणार आहे. श्रीलंका युनिक डिजिटल आयडेंटीटी प्रकल्पा’मध्ये देखील आम्ही सहकार्य करू.
मित्रांनो,
भारताने ‘सबका साथ सबका विकास या दृष्टिकोनाचा अवलंब केला आहे. आम्ही आमच्या भागीदार देशांच्या प्राधान्याना देखील महत्त्व देतो.
केवळ गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत आम्ही 100 दशलक्ष डॉलरहून अधिक रकमेच्या कर्जाचे अनुदानामध्ये रूपांतर केले आहे. आमच्या कर्ज पुनर्रचना करारामुळे श्रीलंकेतील लोकांना तात्काळ मदत मिळेल. आज आम्ही व्याजदर कमी करण्याचा देखील निर्णय घेतला आहे. भारत आजही श्रीलंकेच्या जनतेच्या पाठीशी उभा असल्याचे हे प्रतीक आहे.
पूर्वेकडील प्रदेशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी सुमारे 2.4 अब्ज श्रीलंकन रुपयांचे मदत पॅकेज दिले जाणार आहे. आज आम्ही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी श्रीलंकेतील सर्वात मोठ्या गोदामाचेही उद्घाटन केले आहे.
उद्या आम्ही ‘माहो ओमनथायी’ रेल्वे मार्गाचे उद्घाटन करणार आहोत. तसेच ‘माहो अनुराधापुरम’ विभागात सिग्नल प्रणालीची पायाभरणी करणार आहोत. लवकरच कांकेसंतुरई बंदराच्या आधुनिकीकरणाचे काम सुरू होणार आहे.
श्रीलंकेत भारतीय वंशाच्या तमिळ समुदायासाठी दहा हजार घरे बांधण्याचे काम लवकरच पूर्ण होईल. श्रीलंकेतील 700 अतिरिक्त कार्मिकांना भारतात प्रशिक्षण दिले जाईल. यामध्ये खासदार , न्यायपालिकेशी संबंधित लोक, उद्योगाशी संबंधित लोक, प्रसार माध्यमातील कर्मचारी यांच्यासह युवा नेत्यांचाही समावेश आहे.
मित्रांनो,
आपल्या दोन्ही देशांचे सुरक्षा हित समान असल्याचे आम्ही मानतो. दोन्ही देशांची सुरक्षा एकमेकांशीशी जोडलेली आणि परस्परांवर आधारित आहे.
भारताच्या कल्याणाप्रति संवेदना बाळगल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष दिसानायक यांचे आभार मानतो. संरक्षण क्षेत्रातील सहयोगासाठी करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण कराराचे आम्ही स्वागत करतो. कोलंबो सुरक्षा परिषद आणि हिंदी महासागर क्षेत्रात सुरक्षा सहयोगाबाबत देखील एकत्र काम करण्यासाठी आम्ही सहमत आहोत.
मित्रांनो,
भारत आणि श्रीलंका यांच्यात अति प्राचीन आध्यात्मिक आणि भावनिक संबंध आहेत.
1960 मध्ये माझे गृह राज्य गुजरातमधील अरावली पर्वतामध्ये सापडलेले भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष दर्शनासाठी श्रीलंकेत पाठवले जात आहेत, याचा मला अत्यंत आनंद आहे.
त्रिंकोमालीमधील थिरुकोनेश्वरम मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी भारत मदत करेल. अनुराधापुरम महाबोधी मंदिर परिसरात पावन नगर आणि ‘नुरेलिया’मध्ये ‘सीता एलिया’ मंदिराच्या निर्मितीतही भारत मदत करेल.
मित्रांनो,
आम्ही मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाशी संबंधित मुद्द्यांवरही चर्चा केली. या प्रकरणात आपल्याला एका मानवी दृष्टिकोनातून पुढे वाटचाल केली पाहिजे यावर आम्ही सहमत आहोत. आम्ही मच्छीमारांची तात्काळ सुटका करण्यावर आणि त्यांच्या बोटी परत करण्यावरही भर दिला.
आम्ही श्रीलंकेत पुनर्बांधणी आणि समन्वयावरही चर्चा केली. राष्ट्राध्यक्ष दिसानायक यांनी आपले समावेशी दृष्टिकोनाबद्दलचे विचार मांडले. श्रीलंकेतील सरकार तमिळ लोकांच्या आकांक्षा नक्कीच पूर्ण करेल अशी मला आशा आहे. श्रीलंकेत संविधानाची संपूर्ण अंमलबजावणी आणि प्रांतीय परिषद निवडणुका घेण्याची आपली वचनबद्धता सरकार पूर्ण करेल, असा मला विश्वास आहे.
मित्रांनो,
भारत आणि श्रीलंकेतील संबंध परस्पर विश्वास आणि सद्भावनेवर आधारित आहेत. आपल्या नागरिकांच्या आकांक्षा आणि आशा पूर्ण करण्यासाठी आपण एकमेकांच्या सोबतीने काम करत राहू.
मी पुन्हा एकदा आपण केलेल्या सौहार्दपूर्ण स्वागताबद्दल राष्ट्राध्यक्ष दिसा नायक यांचे हार्दिक आभार मानतो. भविष्यात आपण आपली भागीदारी नव्या शिखरावर नेऊ असा मला विश्वास आहे.
खूप खूप आभार!
***
N.Chitale/T.Pawar/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2119268)
Visitor Counter : 27
Read this release in:
Odia
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada