पंतप्रधान कार्यालय
चिलीच्या राष्ट्राध्यक्षांसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेतील पंतप्रधानांच्या निवेदनाचा अनुवाद
Posted On:
01 APR 2025 8:23PM by PIB Mumbai
राष्ट्राध्यक्ष बोरिक महोदय, दोन्ही देशांच्या शिष्टमंडळाचे सदस्य, पत्रकार मित्रांनो नमस्कार! होला!
राष्ट्राध्यक्ष बोरिक यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. त्यांचा भारताप्रती असलेला दृढ मैत्रीभाव आणि दोन्ही देशांचे संबंध मजबूत करण्यासाठीची त्यांची वचनबद्धता खरोखरच अद्भुत आहे. यासाठी त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन! त्यांचं आणि त्यांच्या शिष्टमंडळाचं मी मनापासून स्वागत करतो.
मित्रांनो,
चिली हा दक्षिण अमेरिकेतील भारताचा महत्त्वाचा मित्र देश आणि सहकारी आहे. आगामी दशकात आमचं सहकार्य आणखी मजबूत करण्यासाठीच्या बऱ्याच नव्या उपक्रमांबाबतची माहिती आमच्या आजच्या चर्चेतून समोर आली.
परस्पर व्यापार आणि गुंतवणूक विस्तारण्याच्या कल्पनेचं आम्ही स्वागत केलं आणि हे सहकार्य आणखी वृद्धींगत करण्यासाठी, अद्याप उपयोगात आणली गेली नाहीत अशी काही क्षेत्रं आहेत यावर आमचं एकमत झालं. आज आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना परस्पर लाभाच्या व्यापक आर्थिक भागीदारी करारावरील चर्चा सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
दोन्ही देशांमधल्या दुर्मिळ खनिजांच्या क्षेत्रातल्या भागीदारीवर भर दिला जाईल. लवचिक पुरवठा आणि मूल्य साखळी स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले जातील. कृषी क्षेत्रामधल्या एकमेकांच्या सुबत्तेचा लाभ करुन घेऊन आम्ही अन्न सुरक्षा सशक्त करण्यासाठी सहकार्य करू.
डिजिटल पायाभूत सुविधा, नवीकरणीय उर्जा, रेल्वे, अंतराळ विज्ञान आणि अन्य क्षेत्रातले आपले सकारात्मक अनुभव चिलीसोबत शेअर करायला भारत तयार आहे.
आम्ही चिलीकडे अंटार्क्टिकाचे प्रवेशद्वार म्हणून पाहतो. या महत्त्वपूर्ण क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणाऱ्या 'लेटर ऑफ इन्टेन्ट' या आजच्या कराराचं आम्ही स्वागत करतो.
भारत हा चिलीमधल्या आरोग्य सुरक्षेसाठी मदत करणारा एक विश्वासू सहकारी आहे आणि या क्षेत्रातलं सहकार्य यापुढे आणखी मजबूत करण्यावर आमचं एकमत झालं आहे. चिलीमधल्या नागरिकांनी योग त्यांच्या आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा एक भाग म्हणून स्वीकारला आहे, ही आनंददायी बाब आहे. चिलीमध्ये 4 नोव्हेंबर हा राष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित करणं खरंच प्रेरणादायी आहे. आयुर्वेद आणि चिलीमधलं पारंपरिक वैद्यकीयशास्त्र यांच्यामधलं सहकार्य वाढवण्याच्या संधींचाही आम्ही विचार केला.
संरक्षण क्षेत्रातलं सहकार्य वाढवणं हे आमच्या दृढ परस्पर विश्वासाचं प्रतीक आहे. या क्षेत्रात एकमेकांच्या गरजेनुसार संरक्षण उद्योग उत्पादन आणि पुरवठा साखळी निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. संघटित गुन्हेगारी, अमली पदार्थांची तस्करी आणि दहशतवाद यासारख्या दोन्ही देशांसमोरील आव्हानांचा सामना करण्यासाठी आम्ही सुरक्षा यंत्रणांमधलं सहकार्य वाढवू.
जागतिक पातळीवरचे सर्व वादविवाद आणि संघर्ष संवादातून सोडवण्याबाबत भारत आणि चिली सहमत आहेत. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि अन्य संस्थांची पुनर्रचना करणं गरजेचं आहे यावर आमचं एकमत आहे. आम्ही एकमेकांच्या साथीने जागतिक शांतता आणि स्थैर्यासाठी योगदान देत राहू.
मित्रांनो,
जगाच्या नकाशावर जरी भारत आणि चिली दोन वेगवेगळ्या टोकांवर असले, प्रचंड महासागरांनी वेगळे झालेले दिसत असले; तरी आमच्यात काही नैसर्गिक समानता आहे.
भारतातली हिमालय पर्वतरांग आणि चिलीमधली ऍन्डस पर्वतरांग यांनी हजारो वर्षांपासून आपापल्या देशांची जीवनशैली साकारली आहे. हिंद महासागराच्या लाटांनी जी उर्जा भारताला दिली आहे; तशीच उर्जा चिलीच्या किनाऱ्यावर धडकणाऱ्या प्रशांत महासागराच्या लाटांमध्ये आहे. दोन्ही देशांमध्ये केवळ नैसर्गिक साम्य नाही, तर आमची संस्कृतीदेखील जवळपास सारखीच आहे; वैविध्यतेने नटलेली.
चिलीच्या महान कवयित्री, नोबेल पुरस्कार विजेत्या 'गॅब्रिएला मिस्ट्रल' यांना रविंद्रनाथ टागोर आणि ओरोबिंदो घोष यांच्या काव्यातून प्रेरणा मिळाली होती. भारतातही चिलीमधल्या साहित्याची प्रशंसा होते. चिलीमधल्या नागरिकांची भारतीय चित्रपटांमधली, खाद्यपदार्थांमधली आणि शास्त्रीय नृत्यामधली वाढती रुची हे आमच्या सांस्कृतिक संबंधांचे प्रत्यक्ष उदाहरण आहे.
आज चिलीला आपलं घर मानणारे जवळपास चार हजार भारतीय वंशाचे नागरिक आमच्या सहसंस्कृतीचे संरक्षक आहेत. त्यांना सहकार्य करुन त्यांची काळजी घेतल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष बोरिक आणि त्यांच्या सरकारला मनापासून धन्यवाद देतो.
दोन्ही देशांमधल्या सांस्कृतिक आदानप्रदान कार्यक्रमाबाबत आमचं एकमत झालं याचा आम्हाला आनंद आहे. दोन्ही देशांमधली व्हिसा प्रक्रिया सुटसुटीत करण्याबाबतही आमची चर्चा झाली. भारत आणि चिली देशांतल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आदानप्रदानात वाढ करण्याचं काम आम्ही यापुढेही सुरू ठेवणार आहोत.
महोदय,
तुमच्या भारत दौऱ्यामुळे आपल्या संबंधांमध्ये नवा उत्साह आणि उर्जा निर्माण झाली आहे. ही उर्जा आपल्या द्विपक्षीय संबंधांना नवी दिशा आणि गती देईल तसेच संपूर्ण दक्षिण अमेरिका क्षेत्रातल्या आपल्या सहकार्यालाही गती मिळेल.
भारतातील तुमचा प्रवास आणि निवास आनंददायी ठरावा ही सदिच्छा!
धन्यवाद!
ग्रेशिअस!
अस्वीकरण - हा पंतप्रधानांच्या भाषणाचा अनुवाद आहे. मूळ भाषण हिंदी भाषेतील आहे.
***
JPS/S.Joshi/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2117746)
Visitor Counter : 10
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam