गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मोदी सरकारच्या अंमली पदार्थमुक्त भारत निर्मिती मोहिमेला गती देत, अंमली पदार्थ नियंत्रण विभाग एनसीबीने 88 कोटी रुपयांच्या मेथमॅफेटाईन गोळ्यांचा मोठा साठा जप्त केला.


इंफाळ आणि गुवाहाटी प्रदेशामध्ये आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करांच्या टोळीतील चार जणांना अटक केली.

“अंमली पदार्थांच्या तस्करीचा सतत शोध घेतला जाणार, अंमली पदार्थ तस्करांची गय केली जाणार नाही, हस्तगत केलेले अंमली पदार्थ हेच एनसीबीच्या सखोल आणि चौफेर तपासाचा उत्कृष्ट नमुना ठरतो आहे.” केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडून अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या गटाचे अभिनंदन.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली, अंमली पदार्थ नियंत्रण विभाग- एनसीबी देशभरात बेधडक दृष्टिकोनाने अंमली पदार्थ तस्करी मार्गांचा सामना करत आहे.

Posted On: 16 MAR 2025 12:02PM by PIB Mumbai

 

अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांची दया केली जाणार नाही, असे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. 88 कोटी रुपयांच्या मेथमॅफेटाईनच्या गोळ्यांचा मोठा साठा जप्त केल्याबद्दल आणि आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करांच्या चार जणांना अटक केल्याबद्दल अंमली पदार्थ नियंत्रण विभाग -एनसीबीचे गृहमंत्री शाह यांनी अभिनंदन केले. हस्तगत केलेला अंमली पदार्थांचा साठा सखोल आणि चौफेर तपासाचा उत्कृष्ट नमुना ठरतो आहे, असे शाह यांनी आपल्या सामाजिक माध्यमावरच्या एका पोस्ट मध्ये म्हटले आहे. 

अंमली पदार्थ मुक्त भारत निर्मितीच्या मोदी सरकारच्या मोहिमेला गती मिळत असून, त्याचाच भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय इंफाळ आणि गुवाहाटी या भागातील अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीच्या 4 जणांना अटक करण्यात आली आहे, असे देखील शाह यांनी आपल्या सामाजिक माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

अशी सविस्तर कारवाई....

13 मार्च 2025 रोजी केलेल्या पहिल्या कारवाईमध्ये इंफाळ विभागातल्या अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लिलॉंग परिसरात एका ट्रकला थांबवून त्याची चौकशी केली असता, ट्रकच्या मागील भागातल्या एका कोपऱ्यामध्ये लपवून ठेवलेल्या 102.39 किलो मेथमॅफेटाईनच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या  तसेच ट्रक मधल्या दोन जणांना अटक करण्यात आली. या कारवाईनंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी लगेच पुढच्या कारवाईकडे आपला मोर्चा वळवला आणि लीलोंग परिसरात असलेल्या संशयित अमली पदार्थ तस्करांना ताब्यात घेतले, आणि त्यांच्याकडूनही ड्रग्स तस्करीसाठी वापरले जाणारे चार चाकी वाहन जप्त केले. या प्रकरणातल्या आणखी काहींचा शोध घेतला जात आहे.

या कारवाईनंतर त्याच दिवशी एका माहितीच्या आधारे गुवाहटी विभागातील अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सिलचर जवळच्या आसाम- मिझोराम सीमेवर संशयित करीमगंज या ठिकाणी एका चार चाकी गाडीला अडवले व त्याची देखील सखोल तपासणी करण्यात आली, आणि या तपासात गाडीच्या स्टेफनी टायर मध्ये 7. 48 किलो मेथमॅफेटाईन पदार्थाच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या. या गाडीतून एकाला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणामध्येही संशयित असणाऱ्या इतरांचा देखील शोध आता घेतला जातो आहे.

यानंतरच्या दुसऱ्या घटनेमध्ये मिझोराम राज्य उत्पादन शुल्क विभागाने 6 मार्च रोजी ब्रिगेड बावंगकॉन एझोल येथून 46 किलो क्रिस्टल मेथ जप्त केले. या प्रकरणाचा तपास आता अंमली पदार्थ नियंत्रण विभाग करतो आहे. या प्रकरणामध्ये आंतरराज्य किंवा आंतरराष्ट्रीय तस्करीचे धागेदोरे शोधण्यासाठी अंमली पदार्थ नियंत्रण विभाग या प्रकरणाचा तपास करतो आहे.

ईशान्य प्रदेशातील भौगोलिक स्थानामुळे या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची तस्करी होते. म्हणूनच हा प्रदेश देशातील सर्वात असुरक्षित म्हणून ओळखला जातो आहे. त्यामुळेच केंद्रीय गृहमंत्रालयाने 2023 मध्ये या प्रदेशातील अंमली पदार्थाच्या विरोधातील लढाईला बळकटी देण्यासाठी अंमली पदार्थ नियंत्रण विभागाला सशक्त केले आहे. अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या पाच शाखांच्या माध्यमातून तसेच ईशान्येकडील प्रादेशिक मुख्यालयाकडून या प्रदेशात होणाऱ्या अमली पदार्थाच्या तस्करीच्या विरोधात विशेषता (YABA)  म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेथमॅफेटाईनच्या गोळ्यांसारख्या कृत्रिम औषधांच्या तस्करीत सहभागी होणाऱ्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आणि सतत कारवाई केली जात आहे. अमली पदार्थ तस्करीमुळे केवळ या भागातील तरुण लोकसंख्येलाच नव्हे तर संपूर्ण देशाच्या सुरक्षेलाही धोका निर्माण झाला आहे,असे याबाबतच्या वृतात म्हंटले आहे.

***

S.Pophale/R.Dalekar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2111635) Visitor Counter : 27