माहिती आणि प्रसारण मंत्रालय
सर्जनशीलता, माध्यमे आणि तंत्रज्ञानाचा संगम जगाच्या माध्यम क्षेत्रात परिवर्तन घडवत आहे; उच्च दर्जाचा कंटेंट तयार करण्याकरिता वेव्हज क्रिएटर्ससाठी व्यासपीठ प्रदान करेल : केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव
माध्यमे आणि मनोरंजन उद्योगासाठी चर्चा, सहकार्य आणि नवोपक्रमांना चालना देण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून वेव्हज 2025 काम करेल: केंद्रीय मंत्री डॉ. एस. जयशंकर
तंत्रज्ञानाची प्रगती आणि सामाजिक परिवर्तनात माध्यमांच्या बदलत्या भूमिकेवर प्रकाश टाकणारी वेव्हज 2025 ही एक चळवळ: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
वेव्हजमुळे जागतिक माध्यम कंपन्यांना भारतातील सर्जनशील क्षेत्रात सहभागी होता येईल: केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन
नवी दिल्लीतील राजदूत आणि परराष्ट्र मिशनच्या उच्चायुक्तांसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आयोजित केले वेव्हज 2025 वरचे सत्र
माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात माध्यमे, मनोरंजन आणि डिजिटल पोहोच क्षेत्रात सहकार्य मजबूत करण्यासाठी सामंजस्य करार
Posted On:
13 MAR 2025 9:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 मार्च 2025
माध्यमे आणि मनोरंजन (एम अँड ई) क्षेत्रात जागतिक सहकार्य वाढवण्यासाठीच्या एका मोठ्या उपक्रमाअंतर्गत केंद्र सरकारने आज नवी दिल्लीत वेव्हज 2025 या शिखरपरिषदेविषयी एक उच्चस्तरीय सत्र आयोजित केले. चाणक्यपुरी येथील सुषमा स्वराज भवन येथे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचा उद्देश 1 ते 4 मे 2025 दरम्यान मुंबईत होणाऱ्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेपूर्वी (वेव्हज) आंतरराष्ट्रीय समुदायाला सहभागी करून घेणे हा होता.
परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर, माहिती आणि प्रसारण, रेल्वे तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्यासह महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक तसेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू उपस्थित होते. या कार्यक्रमात सुमारे 100 राजदूत आणि उच्चायुक्त सहभागी झाले.

या कार्यक्रमात माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात माध्यमे, मनोरंजन आणि डिजिटल पोहोच या क्षेत्रातील सहकार्य बळकट करणारे सामंजस्य करार झाले.
या सत्राला संबोधित करताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, "सर्जनशीलता, माध्यमे आणि तंत्रज्ञानाच्या एकीकरणामुळे जागतिक माध्यमांत परिवर्तन घडत आहे आणि हे क्षेत्र अभिसरणाच्या एका नवीन पातळीवर पोहोचत आहे. समाजातील सगळ्या थरातील क्रिएटर्स समूदाय उच्च दर्जाचा कंटेंट अर्थात मजकूर तयार करू शकतात ही 2025 ची मूलभूत संकल्पना आहे असे त्यांनी सांगितले." मुंबईत होणाऱ्या वेव्हज 2025 साठी तंत्रज्ञान, माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रातील काही दिग्गजांना निमंत्रित करत आहोत.", असेही त्यांनी सांगितले. सर्व भागधारकांना वेव्हज 2025 मध्ये सहभागी होण्याचे आणि जागतिक क्रिएटर्स अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
https://x.com/MIB_India/status/1900179200625311810?t=IRcMwSWcSboI-YCceWKtSw&s=08
आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले की, ‘वेव्हज’ हे माध्यम आणि मनोरंजन उद्योगामध्ये चर्चा, सहयोग आणि नवोन्मेशाला चालना देणारे महत्वाचे व्यासपीठ म्हणून भूमिका बजावेल. हा कार्यक्रम मनोरंजन उद्योगातील नेतृत्व, भागधारक आणि नवोन्मेशींना नव्या संधी शोधण्यासाठी, आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि या क्षेत्राचे भविष्य घडवण्यासाठी एकत्र आणेल, असे ते म्हणाले. आर्थिक आणि राजकीय पुनर्संतुलन, सांस्कृतिक समतोलाच्या दिशेने वाटचाल करत आहे. आपण जर खर्या अर्थाने स्थानिक नसलो, तर आपण खऱ्या अर्थाने ग्लोबल नाही. वेव्हज 2025 याच प्रयत्नांची भावना टिपतो, असे ते म्हणाले. केंद्रीय मंत्री जयशंकर यांनी विविध देशांचे राजदूत आणि उच्चायुक्तांना वेव्हज 2025 अंतर्गत असलेल्या जागतिक सहकार्याच्या संधींबद्दल संबंधित सरकारांना माहिती देण्याचे आवाहन केले.

आपल्या भाषणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारताची आर्थिक आणि मनोरंजनाची राजधानी असलेली मुंबई, वेव्हज 2025, च्या आयोजनासाठी अत्यंत योग्य पार्श्वभूमी असून, माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रातील सहकार्य आणि सांस्कृतिक मुत्सद्देगिरी वाढवण्याबरोबरच, ती प्राचीन आणि आधुनिक सांस्कृतिक प्रभावांचा अखंड मिलाफ साधते. ते पुढे म्हणाले की, वेव्हज 2025 ही एक चळवळ आहे, जी तांत्रिक प्रगती आणि सामाजिक परिवर्तनामधील माध्यमांची बदलती भूमिका अधोरेखित करते. नवोन्मेशाला चालना देण्यासाठी गुंतवणुकीला चालना आणि जागतिक भागीदारी निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र वचनबद्ध असल्याचे ते म्हणाले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या स्थापनेचे स्वागत करताना, प्रसारमाध्यमे ही चांगल्या गोष्टींना चालना देणारी प्रेरक शक्ती म्हणून काम करत राहतील, अशी आशा फडणवीस यांनी व्यक्त केली. तंत्रज्ञान आणि सृजनशीलता जगाला प्रेरणा देण्यासाठी आणि जोडण्यासाठी एकत्र येतील, अशा भविष्याला आकार देऊया, असे ते म्हणाले.
माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात सांगितले की, वेव्हज 2025 संयुक्त उपक्रम, सह-निर्मिती आणि व्यवसाय विस्ताराचा मार्ग खुला करत असून, यामुळे जागतिक मीडिया कंपन्या भारताच्या सृजनशील क्षेत्राशी जोडल्या जातील. केंद्रीय राज्यमंत्री म्हणाले की, भारत सरकार माध्यम आणि मनोरंजन उद्योगासाठी अनुकूल वातावरण निर्माण करायला, तसेच व्यवसाय सुलभता, सामग्रीचे स्थानिकीकरण आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला समर्थन देण्यावर ठाम आहे.

माहिती व प्रसारण विभागाचे सचिव संजय जाजू यांनी आपल्या भाषणात सांगितले की, वेव्हज हे संपूर्ण माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राला एकत्र आणणारे जगातील पहिले व्यासपीठ आहे. पारंपारिक आणि उदयोन्मुख माध्यमांमधील दरी भरून काढणे, जागतिक भागीदारी निर्माण करणे आणि सामग्री निर्मिती आणि तांत्रिक नवोन्मेशात भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा वापर करणे, हे सरकारचे ध्येय असल्याचे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, पहिली ‘वेव्हज’ स्पर्धा, अर्थपूर्ण प्रभाव निर्माण करण्यासाठी एकापेक्षा अधिक ट्रॅकच्या आधारावर डिझाइन करण्यात आली आहे. ग्लोबल मीडिया डायलॉगमध्ये मंत्री आणि धोरणकर्ते सहभागी होतील, मार्गदर्शक धोरणात्मक दस्तऐवज म्हणून वेव्हज जाहीरनाम्याद्वारे त्याची सांगता होईल. थॉट लीडर्स ट्रॅक मध्ये उद्योग क्षेत्रातील तज्ञांबरोबर ज्ञानाचे आदान प्रदान करणारी सत्रे होतील. वेव्हज एक्झिबिशनमध्ये कथाकथानातील नवोन्मेश, मंत्रमुग्ध करणारा अनुभव आणि गेमिंग क्षेत्राचे प्रदर्शन आयोजित केले जाईल. भारत पॅव्हेलियन भारताचा माध्यम वारसा आणि भविष्य अधोरेखित करेल. सचिव जाजू म्हणाले की, वेव्हज बझार बिझनेस नेटवर्किंगची सुविधा देईल, तर वेव्हज एक्सेलरेटर (WaveXcelerator) मीडिया स्टार्टअप्सना मार्गदर्शन आणि निधीचे सहाय्य करेल. वेव्हज कल्चरलमध्ये वैविध्यपूर्ण सादरीकरण होणार असून, यामध्ये भारतीय आणि आंतरराष्ट्रीय प्रतिभेची गुंफण पाहायला मिळेल.
वेव्हज 2025: डिजिटल युगातील माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राचे एकत्रिकरण
माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या परिवर्तनशीलतेचे सामर्थ्य ओळखून, वर्ल्ड दृकश्राव्यआणि मनोरंजन शिखर परिषद (वेव्हज) मध्ये सहभागी झालेले सर्वजण1 मे ते 4 मे 2025 दरम्यान मुंबईत एकत्र येणार आहेत. ही ऐतिहासिक परिषद जागतिक नेते, माध्यम तज्ज्ञ, कलाकार, धोरणकर्ते आणि उद्योगातील महत्त्वाचे घटक यांना एकत्र आणणार आहे.
डिजिटल युगाने असंख्य संधी आणि आव्हानेही निर्माण केली आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, स्ट्रीमिंग क्रांती, बौद्धिक संपदा हक्क, चुकीची माहिती आणि माध्यम शाश्वतता यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर या परिषदेमध्ये सखोल चर्चा होईल. पहिल्यांदाच आयोजित केल्या जाणाऱ्या या परिषदेमध्ये सांस्कृतिक विविधता, नवोपक्रम आणि सर्वसमावेशक मीडिया प्रवेश यांना प्राधान्य दिले जाईल.
परिषदेमध्ये कंटेंट निर्मिती आणि प्रसार यामध्ये सर्जनशीलता, समावेशकता आणि जबाबदारी यांचे उच्चतम निकष पाळले जातील. तसेच नैतिक कथाकथन आणि न्याय्य प्रतिनिधित्व याच्या गरजेवर विशेष भर दिला जाईल.
जगाकडे ऐक्याच्या दृष्टिकोनातून पाहत, वेव्हज 2025 अर्थपूर्ण संबंध, सहकार्यात्मक प्रगती आणि सांस्कृतिक ऐक्याला प्रेरित करण्याचा प्रयत्न करणार आहे. ही परिषद जगभरातील माध्यम आणि मनोरंजन उद्योग हा सर्व देश, माणसे आणि संस्कृती यांना एकत्र आणणारा सर्वात मोठा घटक आहे हे अधोरेखित करेल.वेव्हज 2025 एकतेच्या शक्तीवर भर देईल आणि मानवतेपुढील सामायिक चिंता, आव्हाने, संधी आणि सहकार्यात्मक प्रगती यावर लक्ष केंद्रीत करेल. हा दृष्टिकोन वेव्हज 2025 ला सीमारेषांपलीकडील संवाद आणि कृतीसाठी एक जागतिक व्यासपीठ म्हणून स्थान देईल.
ऑरेंज इकॉनॉमीमध्ये वेव्हज 2025 चा समावेश केल्यामुळे माध्यम आणि मनोरंजन उद्योगाच्या आर्थिक वाढीसाठी आणि रोजगार निर्मितीसाठी त्याचा कसा उपयोग होऊ शकतो, यावर भर दिला जाईल. हे जागतिक ऐक्याच्या संकल्पनेशी समर्पक आहे, कारण सर्जनशील उद्योग हे सांस्कृतिक देवाणघेवाणीचे आणि ऐक्याचे प्रभावी साधन आहेत.
मुंबईत वेव्हज 2025 चे आयोजन केल्यामुळे वेगाने बदलणाऱ्या जगात माध्यम उद्योग एकत्रिकरणाचा सर्वांत मोठा घटक कसा बनू शकतो, यावर चर्चा करण्यासाठी ही परिषद एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल. विविध संस्कृती, राष्ट्रे आणि लोक यामधील अंतर भरून काढण्यासाठी माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र हे एक प्रभावी सांस्कृतिक मुत्सद्दी साधन आहे.
* * *
N.Chitale/Prajna/Rajshree/Gajendra/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2111338)
Visitor Counter : 34
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Nepali
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam